आभाळमाया
आभाळमाया


शाळेला जाण्यापूर्वी वर्तमानपत्र घेण्यासाठी मी गाडी बुक स्टॉल कडे वळवली . बुक स्टॉल मालक गुरुवार असल्याने स्वामी समर्थाची पूजा करत होते. पूजा करायला थोडा वेळ लागेल म्हणून मी थोडं बाजूला येऊन समोर सहज बघितलं ,तर बस स्टॅंडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तीन छोट्या मुली दिसल्या. अंदाजे ६-७ वर्षांची असलेल्या सर्वात मोठया मुलीच्या हातात कापडात ती बाहुली घेऊन खेळत असावी वाटली.तिच्या दोन्ही लहान बहिणी बाजूलाच खेळत होत्या.
वर्तमानपत्र घेऊन मी त्या मुलीजवळ गेलो ,त्या मोठया मुलीच्या हातात पाहिलं तर ते एक लहान बाळ होत . साधारणपणे एक दीड महिन्याचं, त्या पोरीनच सांगितले. बाळाच्या कपाळाच्या एका बाजूला बरीच मोठी सूज आली होती त्याचा एक डोळा पूर्ण झाकला गेला होता . एवढ्या छोट्या निष्पाप जीवाला अस का व्हावं याच वाईट वाटलं.त्या मोठया मुलीला विचारलं , तुमच्या सोबत कोणी आहेत की नाहीत , तसं ती म्हणाली, आई आहे ... बाथरूमला गेलीय . मग तुम्ही कुठून आलाय? सांगली वरून पोरगी म्हणाली. कशासाठी इकडे आलाय तुम्ही, ती भाबडेपणाने म्हणाली, स्वामी समर्थ च्या पाया पडायला आलोत. मग गावाकडे तुमचे वडील नाहीत काय, आहेत दारू पिऊन भांडण करतात , काम करत नाहीत.हे ऐकून आणखीनच वाईट वाटले.शाळेला उशीर होईल म्हणून त्या पोरीच्या हातात पन्नासची नोट ठेवली अन म्हंटल बाळाला दूध आणून पाज, तिनं मोठया खुशीने नोट घेतली.
शाळा सुटल्यावर जाता जाता बघावं म्हणून बस स्टँडकडे वळलो. पाहतो तर काय सकाळच्या ठिकाणी आता एक बाई बाळाला खुशीत घेऊन बसली होती , त्या बाळाची आईच होती. अंगाच पार चिपाड झालेलं, मळकट साडी असा तिचा अवतार होता. मी दुरूनच बघत होतो, थोडया वेळाने अंगावरच दूध पाजून झाल्यावर ती बाई त्या बाळाला हातात उचलुन खेळवत होती, बाळाचे मुके घेता घेता हसत होती, किती सुंदर क्षण! एवढी विपरित परिस्थिती असतानाही तिचं बाळावरच प्रेम आणि तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून सर्व काही असतानाही असमाधानी असणारी लोक आजूबाजूला मला दिसत होती.
उघड्या आभाळाखाली ती माता कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळावर मायेचा वर्षाव करत होती.जणू काही ती आपल्या बाळावर आभाळमाया करत होती. रात्री झोपताना एकच विचार मनात येत होता, काहीही होवो त्या आईचं बाळ लवकर बरं होवो. होईलच,मला विश्वास होता त्या आईच्या आभाळमायेवर !!!