अंतःकरण - एक पालवी
अंतःकरण - एक पालवी
लहानपणापासूनच मला उत्तरं नसणारी प्रश्न पडतात पण त्या वयात डोळ्यासमोर घडलेल्या वा अनुभवलेल्या गोष्टींचा अदमास देखील येत नाही. मुळात ते वय गोष्टी समजवून घेण्याचे असते , स्वतःला समजून घेण्याइतपत भावना उपजत नसतात. भावना , संवेदना या वेळ आल्यावर जाणवायला लागता नैसर्गिकरित्या पण माझ्या बाबतीत निसर्गाचेही नियम चुकलेच बहुतेक.. म्हणूनच कदाचित मी शब्दांकृत झाले !
माझ्यापाठोपाठ मला दोन बहिणी झाल्या. माझे वय ४ वर्ष , मधलीचे ३ वर्ष आणि धाकटीचे 14 महिने असा माझा परिवार. एकापाठोपाठ तीन मुलींना जन्म देऊनही बापाची मुलाची अपेक्षा काही थांबली नाही.यात आमची ओढताण ती वेगळीच. आम्ही का सहन करायची आणि कशासाठी ? जन्माआधी मरणे किंवा जिवंतपणी मरणाच्या वेदना सहन करणे म्हणजे काहीही झाले तरी मुलींनी फक्त सहन करावे का ? तर त्या सहनशील असतात म्हणून का बाकीचे सगळे निर्दयी असता म्हणून ..
आम्ही तिघी एकाच वयोगटातील त्यामुळे भांडण , मस्ती होणारच... थोडे मोठे झाल्यावर पडल्यानंतर लागेल यापेक्षाही कोणी पाहिल याची भीती असते , मोठ्याने हसले तर वळण नसते अन् रडायचे म्हटलं तर ते तर मुलींचेच काम असते .या सगळ्यात माझ्या आईची मात्र तारांबळ उडायची. बाप वेळ मिळाला तेव्हा घरी यायचा आणि आला की मारझोड, भांडण नेहमीच होतं .आमच्या तिघीच्या रडण्यामुळे आईचा आवाज मात्र दाबला जायचा. प्रत्येकवेळी कोणत्याही कारणामुळे तिचा आवाज दाबला जायच
ा आणि तिलाही त्याची सवय झाली असावी.लग्न झाले म्हणजे जणू नवऱ्याला स्त्रीला छळण्याची सामाजिक परवानगी मिळते की काय माहीत ! माझ्या आईचा जेव्हा छळ व्हायचा तेव्हा ती मोठ्याने रडू शकत नव्हती कारण आम्ही जागे होऊ अशी भीती असावी बहुतेक. पण खरे पाहता जागे होण्याची वेळ तिची होती आमची नव्हतीच ! कधीतरी अचानक फार कौतुक व्हायचे, आमचा बाप आईशी खूप गोड बोलायचा आणि तिला वाहण्यासाठी क्षणभरही अपुरे पडायचे. त्याने तुझ्याकडे बायको म्हणून कधीच पाहिले नव्हते. त्याला फक्त तुझे बाईपन माहीत होतं. त्याने तुझ्या मनावर नाही तुझ्या देहावर प्रेम केले फक्त...
आज विचार येतो की काय झाले असते तू त्याला नकार दिला असता तर ? काय केले असते त्याने ? सोडले असते त्याने तुला.. दुसरे काय करू शकला असता तो? तू त्याच्या सोबत आहे होती तेव्हाही तुला सुख माहीत नव्हते मग तो नसल्याने काय फरक पडणार होता..आमच्या राहण्याची अन् खाण्याची चिंता होती पण मानसिक आणि शारीरिक त्रासापेक्षा भुकेने मेलेलं चालले असते आम्हला. समाजाची भिती का होती तुला? तुझ्यावर अन्याय झाला तेव्हा कुठे होता हा समाज ? संसार मोडण्याची भीती तूच ला बाळगावी ? सगळी कर्तव्य तुझ्या माथी तर मग तुझ्या प्रति त्याचे कोणतेच कर्तव्य नव्हते का ? का फक्त हक्क होता त्याच्याकडे ?
पण लक्षात ठेव तुझ्यासारखी मी नाही... मी लढेल माझ्या हक्कासाठी, न्यायासाठी अन्यायाविरुद्ध अन् तुझ्यासाठी तुझ्याविरुद्ध !!