उत्तरायण
उत्तरायण
शारदाताई सकाळी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. एकीकडे गरमागरम वाफाळलेला चहा आणि पेपर वाचन ह्यात त्यांचा सकाळचा वेळ छान जायचा.पेपर वाचत असताना फाटकाचा आवाज आला, बघितलं तर त्यांची मुलगी राधिका आली होती. शारदाताई म्हणाल्या 'काय गं आज सकाळी सकाळीच कशी आलीस,ऑफिसला जायचं नाही का '? त्यावर राधिका म्हणाली ' हो ऑफीसलाच चालले पण जाता जाता मुद्दाम तुला भेटायला आले, अगं आता चार दिवस सुट्टी आहे ना म्हणून आम्ही दोघे मुलांना घेऊन पिकनिक ला जातोय.' ' हो का अरे वा मस्तच, जा छान फिरुन या ,मुलांना पण तेव्हढाच बदल होईल. बरं बस जरा मी पटकन चहा करते'.पण राधिकाने आईला हाताला धरून परत झोपाळ्यावर बसवून म्हणाली ' आई अगं मी चहा नाश्ता सर्व घेऊन आले ,बरं ही भाजी आणि फळं आणली होती, फ्रीजमध्ये ठेवते'.बरं आई येते मी असं म्हणून राधिका निघाली.
शारदा ताईंना राधिका आणि केदार ही दोन मुलं,केदार नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला.राधिकाचं सासर पुण्यातीलच असल्यामुळे शारदाताईंना तिचा आणि आशिष म्हणजे जावयाचा खूप आधार होता. शारदाताईंचे पती दोन वर्षांपूर्वी ह्रदय विकाराच्या झटक्याने गेले. वडील गेल्यानंतर केदार लगेच अमेरिकेहून आला.आईला म्हणाला 'आई तु आता ईथे एकटी नको राहूस ,आमच्या बरोबर अमेरिकेला चल,नीता तुझी चांगली काळजी घेईन, त्यावर नीतापण म्हणाली आई खरंच तुम्ही चला आमच्या बरोबर, कौस्तुभ बरोबर तुमचा वेळ छान जाईल, त्याला पण आजीकडून लाड करून घेता येतील.पण त्या म्हणाल्या 'तुम्हा दोघांचं म्हणणं बरोबर आहे पण अरे माझं सगळं आयुष्य ईथे पुण्यात गेलं ,ह्या घरात तुझ्या बाबांच्या पण खूप आठवणी आहेत आणि आमच्या दोघांच्या मेहनतीने हे घर ऊभं केलय त्यामुळे आता सर्व सोडून येणं कसं शक्य आहे, हां पण दोन तीन वर्षातून एकदा नक्की येत राहीन आणि अरे राधिका आणि जावई बापू आहेतच शिवाय माझं समाजकार्यही सुरु असतं त्यामुळे माझा वेळ पण छान जाईल आणि मी तब्येतीची पण नीट काळजी घेईन. आईच्या या ठाम निर्णयापुढे केदारला गप्प बसावं लागलं.
सदाशिवराव गोखले ह्यांची परिस्थिती पण शारदाताईंसारखीच होती. दोघेही एकाच बोटीतील प्रवासी म्हणायला हरकत नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला. सदाशिवरावांच्या पत्नीचे आठ दहा वर्षापूर्वी निधन झाले होते. तिच्याशिवाय एकटं राहणं त्यांना जड जावू लागलं. दिपक त्यांना अमेरिकेला घेऊन गेला, पण तिथे सहा महिने राहून ते पुण्याला परतले.माणसं सोडणं हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार, नातेवाईक खूप होते.सर्वजण अगदी आस्थेने त्यांना काय हवं नको ते बघत असत.सदाशिवराव स्वतः खूप Active होते. स्वतःला नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून ठेवीत.त्यांचा जेष्ठ नागरिकांचा क्लब होता.शारदाताईंनी मैत्रिणीच्या आग्रहाखातर क्लब जाॅईन केला होता, तिथेच सदाशिवरावांची आणि त्यांची ओळख झाली. दोघांनाही वाचनाची आवड असल्याने वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा रंगायच्या.
शारदा ताईंनी राधिका आणि सदाशिवरावांची ओळख करून दिली, राधिकाला पण त्यांचा स्वभाव खूप आवडला. सदाशिवरावांचा मुलगा दिपक आणि शारदाताईंचा केदार दोघांचीही एकदा योगायोगानेच तेथील महाराष्ट्रमंडळात भेट झाली. तिथे बरेचदा सांस्कृतिक कार्यक्रम, गेट टूगेदर होत असल्याने आणि दोघेही पुण्याचेच असल्यामुळे त्यांचात छान मैत्री झाली. घरचे विषय निघायचे. दिपक म्हणायचा ' माझी आई गेल्यापासून बाबा अगदी एकटे पडले, ईथे दोन, तीन वेळा येऊन गेले पण कायमस्वरूपी ईथे राहायला नाही म्हणतात'.त्यावर केदार म्हणाला 'अरे माझ्या आईचं पण असंच आहे, तिला पुण्यातच राहायला आवडतं, बरं आपण एवढ्या दुरुन त्यांची कशी काळजी घेणार ,ह्या वयात कुणाच्या तरी आधाराची गरज भासते, तसं माझी बहिण राधिका आणि तिचे मिस्टर आहेत पण तिलापण तिचा संसार आहेच की,तरी पण ती दोघेही आईची होता होईल तेवढी काळजी घेतात.
[ ] दिपकच्या मुलांना शाळेला सुट्टया सुरु झाल्यामुळे त्याने भारतात पुण्याला जाण्याचा प्लॅन केला. तीन चार वर्षांपासून जायला जमलं नाही, म्हणून बाबांना भेटून यावं आणि त्यांना परत एकदा आपल्या बरोबर ईकडे येण्याबद्दल म्हणावं, त्याने केदारला पण तसं सांगितलं. केदार बोलला 'अरे वा छान मग माझ्या आईला पण नक्की भेट. घरी कुणी आलेलं आईला आवडत आणि आई साठी थोडं सामान द्यायचं होतं, तेवढं तिला देशील कां प्लीज.' ह्यावर दिपक म्हणाला 'अरे हे काय विचारण झालं, तु दे सामान, मला पण तुझ्या आईला भेटायला आवडेल. ठरल्या प्रमाणे दिपक बायको मुलांबरोबर पुण्यात आला.सदाशिवराव तर एवढे खुश झाले.किती तरी वर्षांनंतर त्यांच घर ठरलेलं होत.ह्या सर्वांसाठी काय करू अन काय नको असं त्यांना झालं
दिपक केदार च्या आईला शारदा ताईंना भेटायला गेला. केदारने आईला अगोदर तशी कल्पना देऊन ठेवलेली असल्यामुळे त्यांनी राधिका आणि जावई बापूंना पण बोलावून घेतले. सदाशिवराव पण दिपकबरोबर आले होते. सर्वांच्या छान हसत खेळत गप्पा, नाश्ता चहा झाला. केदारच्या आईची आणि आपल्या वडिलांची एवढी चांगली मैत्री बघून दिपकला पण खूप छान वाटलं.
घरी आल्यानंतर सदाशिवरावांनी दिपकला त्यांची आणि शारदाताईंची जेष्ठ नागरिक संघात भेट झाली, दोघांनाही वाचनाची समाजकार्याची आवड आहे, आमचे विचार जुळत असल्याने आमच्यात छान मैत्री आहे वगैरे सांगितले.हे सर्व ऐकल्यानंतर दिपकला वाटले, ह्या दोघांनी एकत्र येऊन आयुष्यभर एकमेकांना साथ दिली तर हे सर्वांसाठी चांगलं आहे. त्याने नीताला आपला विचार सांगितल्यावर तिलापण दिपकचे म्हणणे पटले.नंतर त्याने केदारला फोन करुन सर्व सांगितले, केदार म्हणाला 'तुझं म्हणणं मला पटतय ,असं झालं तर आपल्या सगळ्यांसाठी चांगलंच आहे पण मला विचार करायला थोडा वेळ दे.'नंतर केदार राधिकाशीपण बोलला. सर्वांनाच हा विचार पटून गेला.
केदार पण सुट्टी घेऊन बायको आणि मुलांना घेऊन पुण्याला आला.त्याला अचानक आलेला बघून शारदा ताईंना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. दिपक आणि केदारने आप आपल्या आई वडिलांना विचार बोलून दाखवला, त्यांना समजावले. सदाशिवराव शारदा ताईंनी विचार करायला थोडा वेळ मागितला.
मग एक दिवस दोघांनीही सर्वांना एकत्र बोलावून आपला होकार सांगितला.दोघांनीही एकमेकांच्या संपत्तीवर हक्क न गाजवता त्याबाबतचा निर्णय स्वतःचा राहील असे सांगितले. दोघांच्याही मुलं सुना जावयाच्या उपस्थितीत दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायचे ठरवले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने सदाशिवराव शारदाताई विवाहबद्ध झाले.मुलांना आता आईबाबांची काळजी नव्हती. आपण आईबाबांसाठी योग्य निर्णय घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते.
