STORYMIRROR

Chandrakant Lanjewar

Children Stories

4  

Chandrakant Lanjewar

Children Stories

निरागस बालपण

निरागस बालपण

3 mins
369

ही गोष्ट आहे पावसाळा ऋतूतील एका सकाळी घडलेल्या प्रसंगाची. ज्याच्या पाऊलखुणा आजही माझ्या मनात उमटल्या आहेत. आदल्या दिवशी खूप पाऊस पडल्यामुळे सगळीकडे गारवा पसरलेला होता. सकाळचा गार वारा अंगावर शहारा आणत होता. सोबतच पहाटेचं रम्य वातावरण मनाला आनंदीत करत होते. सगळीकडून पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता.


आई पहाटेस उठून आपली कामे आटपत होती. मी घरामागील मोकळ्या जागेत एका दगडावर जाऊन बसलो व सुंदर हिरव्यागार निसर्गाचं निरिक्षण करू लागलो. थोड्या वेळातच मी त्या रम्य वातावरणात स्वतःचे भान हरपून बसलो. विविध पक्षांचे आवाज, चिमण्यांचे दाणे टिपणे व लगेच भुर्रकन उडून जाणे. हे जणू एक सुंदर स्वप्नासारखेच भासत होते. सगळीकडे हिरवळ आणि छोट्या-छोट्या डबक्यांमध्ये पाणी साचलेलं होतं. त्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडलेलं होत. जणू वाटत होते, धरतीने हिरव्या रंगाच्या परिधान केलेल्या शालूवर निळसर पांढर्‍या रंगाचे ठिपके रंगविलेले आहेत. सारंकाही मनाला मंत्रमुग्ध करणारं.


पक्षाचं निरिक्षण करता-करता अचानक माझं लक्ष फणसाच्या झाडाखाली बसलेल्या एका कावळ्याकडे गेलं. झाडाखाली डबक्यात साचलेल्या पाण्याजवळ तो शांतपणे बसला होता. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक बघीतले तेव्हा मला जाणवलं की, तो अगदी चिंब भिजलेला होता. त्याचे पंख पूर्ण ओले झालेले होते आणि थंडीमुळे तो कुडकुडत होता.


कावळ्याकडे बघून मला वाटलं की, तो पंख वाळविण्याकरिता तिथं आला असेल. पण काही वेळानंतर माझ्या लक्षात आले की, तो त्या डबक्यातील पाणी पिण्याचा प्रयत्न करत होता. पण थंडीमुळे त्याला हलता येत नव्हते व पाण्यापर्यंत त्याला आपली चोच नेता येत नव्हती. असे अनेक प्रयत्न तो करत होता,पण पाणी पिण्यात त्याला यश मिळत नव्हते. तो पाण्यासाठी फार व्याकूळ झाला होता. ते बघून माझ्या मनातून एक आवाज आला. "अरे बघत काय बसलाय, जा ऊठ! त्या मुक्या प्राण्याला पाणी पाज." मी उठलो व त्या कावळ्याकडे जाऊ लागलो. दोन पावले टाकल्यावर मनात विचार आला, याला आपण हात लावला आणि इतर पक्षांनी जर याला त्यांच्यामध्ये घेतलं नाही तर. मी हा विचार करून तिथेच थबकलो.


मी पुन्हा त्या कावळ्याकडे बघू लागलो. त्याचा पाणी पिण्याचा प्रयत्न तसाच सुरू होता. ते बघून मला राहावलं नाही व मी थेट आईकडे धाव घेतली. आईला सर्व हकिकत सांगितली व विचारले, "आई मी त्या कावळ्याला पाणी पाजून येवू का गं?" आईने बाहेर येऊन त्या कावळ्याकडे पाहिले व म्हणाली, "जा बाळ त्याला पाणी पाजून ये."


आईचे ते शब्द ऐकून मला फार आनंद झाला. मी एका ग्लासात पाणी घेऊन त्याच्याकडे धावत सुटलो. आई माझ्याकडे कौतुकाने बघत होती. मी कावळ्याजवळ गेलो. एका हाताने कावळ्याच्या चोचीत पाणी घालू लागलो. कावळ्याला पाणी पिताना बघून अत्यानंद झाला. अचानक तो कावळा जमिनीवर कोसळला. मी त्याला हलवून पाहू लागलो, पण तो काही हलेना. तो अगदी थंड पडला होता. माझ्या लक्षात आले की, त्याने आपला प्राण सोडला होता. ते पाहून माझे मन अगदी सुन्न झाले व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी उठलो, मागे वळून आईकडे धाव घेतली. आईला घट्ट मिठी मारली. मला रडतांनी पाहून आई म्हणाली, "अरे! रडतोस कशाला?" मी म्हणालो, "आई तो कावळा मरण पावला." आई म्हणाली, "अरे रडू नकोस. कदाचित तो कावळा तुझ्या हातचं पाणी पिऊनच मरणार असेल. तुला तर त्याला शेवटच्या क्षणी पाणी पाजल्यामुळे पुण्य लाभेल." मी आईचे ते शब्द ऐकून शांत झालो. आई म्हणाली, "जा! त्या कावळ्याच्या बाजूला एक खड्डा करून त्यामध्ये त्याला घालून त्यावर माती अंथरुण घे. " मी आईच्या म्हणण्याप्रमाणे तसचंं केलं.


आजही मला त्या कावळ्याबद्दल सहानुभूती वाटते. त्याचा तो करूण अंत आजही माझ्या मनाला हेलावून जातो.


Rate this content
Log in

More marathi story from Chandrakant Lanjewar