मृत्यु : अंतिम सत्य
मृत्यु : अंतिम सत्य
लहान असताना ऑटोमध्ये बसून मी आणि आई बाहेर जात होतो अणि अचानक एक प्रेत बघितले, तेव्हा तोंड़ घाबरायला झालं आणि चेहरा पड़ला, तेव्हा आई हसून म्हणाली, "हे बघ रमणी, मृत्यु आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे..." अजूनही ते वाक्य मनावर कोरलेलं आहे.
तेव्हापासनच आयुष्याचं गणित कसे मांडावे आणि वेळेची किंमत थोड्या प्रमाणात कळली. आयुष्याचा एक धड़ा घेऊन झाला होता आणि त्यानंतर घरी संस्कृत, वेद या गोष्टी कानी पडू लागल्या. बहुतेक त्यामुळे माझा मृत्युविषयी नकारात्मक दृष्टीकोन कमी झाला.
बऱ्याच जवळच्या लोकांना मृत्युशी झुंज देताना बघितले, अचानक अपघात आणि अशी हज़ार कारणं...
पण मृत्युमुखी पडल्यावर दोनच गोष्टी उरतात त्या म्हणजे, "पश्चाताप" आणि "क्षमा..."
आपण अगदी अजरामर असल्यासारखे जगतो, सतत अहंकार, भांडण, त्याला वाईट बोल, तुच्छ लेख, अपमान कर, वाइट सवयी आणि खूप काही...
पण काल ज्याच्यासोबत भांडलो, तो आज गेला हे कळल्यावर कसं वाटतं हे सुद्धा अनुभवलं... जो आज ठणठणीत होता त्याला कॅन्सरसारखा आजार झालाय हे कळल्यावर कसं वाटतं हे पचवलंय. त्यामुळे छोट्या गोष्टींवरून वाद, पण वेळ वाया न घालवता सर्व काम करायची हे मात्र ठरवले.
आयुष्य कुठल्याही गॅरंटी किंवा वारंटीसोबत मिळत नसतं, जितकं आहे त्याचा पुरेपूर स्वतःसाठी, त्यापेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी ते जगता आले पाहिजे. मी स्वतःसाठी तर जगतोच आहे पण मी कोणासाठी काय केलंय, हा विचार एकदा तरी मनात यायला हवा.
दुसऱ्याच्या सुखात सुख मानता यायला हवे, कोणाचे अश्रू बघून क्षणभर तरी ज्या व्यक्तीला वाईट वाटत असेल त्याला खरे आयुष्य कळले.
जीवन-मरण या चक्रातून मुक्तीचा पहिला मार्ग म्हणजे सेवाभाव, निःस्वार्थ प्रेम आणि मिळालेले दुःख आपल्याच कर्माचे प्रारब्ध आहे याची जाणीव आहे.
आत्मा अमर आहे पण मिळालेले शऱीर आणि त्याची गती ही कशी ठेवायची हे मात्र स्वतःच ठरवायचे असते...
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः