Kavita Pathade

Others

3  

Kavita Pathade

Others

मृगजळ

मृगजळ

9 mins
12.2K


....आणि तो सूर्य उगवल्यापासून धाव धाव धावत सुटतो, कारण सूर्य मावळे पर्यंत तो जिथपर्यंत धावणार, तेव्हढी जमिन त्याला मिळणार होती. परमेश्वर त्याला प्रसन्न झाला होता ना!पण सूर्य मावळायच्या आत जिथून निघाला तिथेच त्याला पोहोचायचे होते आणि तो पोहोचला पण! पण माहितीये काय झालं?'काय आजोबा'?क्षणाचाही विलंब न करता प्रिन्स ने आजोबांना विचारले. तो पोहोचला पण धावून इतका थकला की गतप्राण झाला."आजोबा, किती वेडा हो तो माणूस, एव्हडी जमिन कशाला हवी होती त्याला."छोटा प्रिन्स बोलला.

   पुण्यात पहिले दोन कोरोना पॉझिटीव्ह निघाले आणि 35 वर्षानंतर आज मला गाव आठवत होतं.एव्हढ्यात गावाकडून दादा चा फोन आला "तुला आवडेल तर काही दिवस गवाकडे ये, माय-आप्पा काळजी करतायेत"दादा बोलत होता ,मी क्षणाचाही विलंब न करता "हो" म्हंटलो कारण मला आता फक्त माझं गाव सुरक्षित ठेवणार होतं. फॅमिली सह मी गावी आलो . माझा मुलगा प्रिन्स ला चक्क शहरी भाषेत माझे वडील गोष्ट सांगत होते.गोष्ट सांगत असतांना शेवटी त्यांनी जाणूनबुजून माझ्याकडे टाकलेल्या कटाक्षाने मी ओशाळलो.रात्री निंबाच्या झाडाखाली आप्पांनी स्वतः घातलेल्या अंगणातल्या खाटेवरच्या अंथरुणावर माय च्या लुगड्याची गोधडी घडी करून डोक्याखाली घेतलेल्या मला लहानपणी मायच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला मी आठवलो.

    बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडल्यापासून ते स्वतःची कंपनी टाकून ,कंपनीत शे-दिडशे वर्कर्स कामाला ठेवून फक्त प्रगती आणि प्रगतीचे 35 वर्षे क्षणार्धात पुसले जाऊन थेट माझ्या बालपणीचा आठवणपट जणू डोळ्यापुढे सरकू लागला.

      आम्ही तीन भाऊ, एक बहिण. आई जिला आम्ही "माय" म्हणायचो आणि वडील म्हणजे "आप्पा". माय-आप्पा-आम्ही चारी भावंडे आणि आप्पांच्या वाट्याला आलेली एकरभर जमिन एवढ आप्पांच विश्व! आप्पा म्हणजे वारकरी माणूस .आमच्या विश्वात खूष असायचे .कष्ट म्हणजे 'विठ्ठलाची भक्ती' असे त्यांना वाटे! भावंडांची नावे ही ठेवली निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई !

    मोठा भाऊ निवृत्ती त्याला आम्ही 'दादा' म्हणत असू ,दोन नंबर ज्ञानदेवास 'ज्ञानू' आणि मी लहान 'सोपा' याआणि 'मुक्ता' म्हणजे जणू मुक्ताई आप्पांच्या पोटी अवतरली होती! आई नऊवारी साडी नेसायची. कामातही तिच्या डोक्यावरचा पदर पडल्याचे मला आठवत नाही. पहाटे उठून सडा-रांगोळी, पाणी भरणे इत्यादी पासून तर आप्पांना शेतात कामाला मदत करन हिच तिची पूजा! निवृत्ती दादाकडे बैलांना पाणी पाजणे, शेतीकामाला शाळेतून आल्यावर शक्य तेवढी मदत करणे हे काम असे. ज्ञानू लक्ष्मी गाईची धार काढून तिचा चारापाणी करी .मुक्ताई आईच्या मागे लुडबुड आणि मी शेंडेफळ सहसा काम नसायचे मला .माझी आणि मुक्ताईचे अंघोळ मायच बरेच दिवस घालायची. आईच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्याने अंग पुसून घ्यायला मला आवडे. आणि माय तो काढून त्याचे छान काठ शिवून बनवून ठेवत असे. शाळेत साने गुरुजींची गोष्ट ऐकल्या दिवसापासून आंघोळ झाल्यावर मीही मायला जमिनीवर पदर टाकायला सांगे. डोक्यावरचा पदर कधीही न पडू देणारी माय आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तसे करायची. अचानक दादा येत असे आणि "सोपान, मनाला घाण लागू नये त्यासाठी जप बरं ,आईच्या पायघड्यांची आठवण ठेव" असं म्हणून गालातल्या गालात हसायचा. माय मग त्याला रागवायची आणि मी पदरावरून उतरल्यावर पटकन माझ्या पावलांनी ओलसर झालेला पदर तसाच डोक्यावर घ्यायची . दादाला शेतीची आवड होती ,ज्ञानूला गाई आवडायच्या .संध्याकाळी मला आणि मुक्ताला ज्ञानू ओसरीत बसून हातात छडी घेऊन मास्तरांची छान नक्कल करून आम्हाला शिकवायचा. आप्पा कष्ट करून आम्हाला शक्य तेवढे सुखात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. साधेसुधे का होईना पण कपडे, चप्पल ,शाळेची दप्तर घेऊन देण्याचा त्यांचा प्रयत्न असे पण स्वेटर दप्तर अशा बऱ्याच वस्तू मी लहान असल्याने आणि प्रत्येकाला नवे घेऊन देणे आप्पांना शक्य नसल्याने मला जुनेच वापरावे लागायचे.शेजारच्या शेतातील सरपंचाचा शहरातील मुलगा दिवाळीत दोन दिवस आला की मी त्याची कार, त्याची लहान मुले ,त्यांचे बूट ,त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान यांचेकडे एक सारखा बघत असे ,ही गोष्ट आप्पांच्या लक्षात यायची.

   माय भल्या पहाटे उठायची.मायची पहाटेची कामे आटपून झाल्यावर आप्पा उठत. नंतर दादा ,ज्ञानू, शेवटी मी आणि मुक्ता! चुलीवर भाजी टाकून माय भाकरीच्या आधी चहा ठेवायची .चुलीवर चहा उकळल्याचा सुगंध दरवळे. "आप्पा, दादा, ज्ञानू, सोपा चला, चहा झाला" छोटी मुक्ता ओरडायची. सर्वांनी सोबत चहा घ्यायचा असा माय- आप्पांचा आग्रह असे आणि आम्हालाही तसे आवडे. बुधवारी छोटे छोटे गोल कडक पाव मिळायचे कारण आप्पा मंगळवारी बाजारातून पाव आणायचे. चहाच्या कपात भिजवून ,तो पाव बशीत टाकून खायला मला आणि मुक्ता ला आवडे.मंगळवारी संध्याकाळी सुद्धा सर्वांनी गोल करून भत्ता खाण्याची मजा काही औरच असायची! आप्पा हाताने टचकन कांदा फोडायचे .दादा तर हिरवी मिरची भत्त्याला जोडी खायचा. भत्ता खातांना खूप गप्पा मारायचो. 

            माय म्हणजे जणू अन्नपूर्णाच!रात्रीचे जेवण एक पर्वणीच असायची .चुलीवर पाट्यावर वाटलेल्या मसाल्याच्या भाजीचा स्वर्गीय वास ,दुसऱ्या बाजूला माय भाकरी थापत असायची .मी चुलीला लाकडं घालण्यासाठी बसायचो. भाजी आणि भाकरी चे दोन्ही वास एकत्र नाकात गेल्यावर भूक जास्तच खवळे .दादा जेवणासाठी ताटे घेई. आप्पांनी काशाची म्हणजे कास्य धातु ची ताटे आवर्जून घेतलेली होती .रांजनातही तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी माय टाके .मुक्ता जेवतांना पिण्यासाठी पाण्याचे भांडे घेई. मी लोखंडी सांडशी चा चिमट्या सारखा वापर करून निखाऱ्यावर पापड भाजायचो. ज्ञानू खूप छान वाढायचा. आम्हा मुलांना ही सर्व मुलींची कामेसुद्धा यावीत असा मायचा आग्रह असे. जेवण करतांना भाजी भाकरीची कधीच तक्रार आप्पा करत नसत.इकडे ताट वाढेपर्यंत मायच्या भाकरी झालेल्या असायच्या. सर्वजण मांडीला मांडी लावून बसायचो. आप्पा दिवसभरच्या शेती विषयीच्या गप्पा करायचे. दादा मोठं लक्षपूर्वक ऐकायचा. "आप्पा, तुम्ही आता कष्ट नाही करायचे" कमी वयातला समजूतदार दादा आप्पांना सांगे. निवृत्ती मास्तरांनी कसं शिकवलं ?कशा छड्या दिल्या यावर बोलायचा. जेवतांना सर्वांना वाढायचं काम माय करायची ."ताटात उष्ट न्हाई टाकू ,भगवंतानं भरपूर दिलं रे पोरांनो आपल्याला, उतू मातू नये "अशी आहे त्यात आणि समाधान मानून अन्न परब्रम्ह माय शिकवे ."माय, मला ह्या वर्षी नवं स्वेटर पाहिजे, मी ज्ञानू च नाही वापरणार","आप्पा, मला नविन छान बूट आणि दप्तर हवं" अशी कुरकुर माझी असे.छोटी मुक्ता सर्वांच्या गप्पा ऐकायची .संध्याकाळी आप्पा ओसरीत खाटेवर मांडीवर रेडिओ घेऊन बसायचे . मी आणि मुक्ता त्यांच्या आजूबाजूला बसायचो .दादा आणि आणि ज्ञानू त्यांच्या मांडीवर हात ठेवून त्यांच्या पायाजवळ खाली बसायचे."माय, ये ना तू पण इकडे"मुक्ता मायला बोलवायची."भाकरी करता करता माय ऐकत असते ग"ज्ञानू म्हणायचा. भजन, किर्तन आम्ही सर्व आणि स्वयंपाक करताना मायही तल्लीन होऊन ऐकायची. झोपताना मी आणि मुक्ता दोन्ही मायच्या पोटावर हात टाकून तिच्या आजूबाजूला झोपायचो. एका खाटेवर आम्ही तिन्ही म्हणजे जणू एकच वाटायचो!आमच्या बाजूला खाटांवर आप्पा, दादा आणि निवृत्ती असायचे .झोपताना गोष्ट सांगणे, गाणे म्हणणे ,जोक सांगणे अशा जणू पाळ्याच होत्या. "सीतामाई जनक राजाची लाडकी लेक पण वनवासात जंगलात लाकडं गोळा करत फिरे""माय सीता माईची गोष्ट सांगू लागली की मुक्ता नाक ओढू लागे आणि माय डोळ्यांना पदर लावत असे. आप्पा महाभारताच्या गोष्टी सांगायचे .दादा अभंग छान म्हणायचा. निवृत्ती चुटकुले सांगे. मुक्ता बडबड गीते आणि मी मोठ्या झालेल्या (पैशाने) माणसांच्या मास्तरांनी सांगितलेल्या गोष्टी सांगायचो. खंडोबाची यात्रा आली म्हणजे आप्पा बैलगाडी जुंपायचे.आई पाण्याची कळशी, शिदोरी आणि आमच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून टाकायचे उपरणे घ्यायची. दादा बैलगाडी हाकायचा .केवढं सुख वाटायचं !आम्ही खूप आनंदात असायचो. लवकर कमी उन्हात पोहोचण्यासाठी निघायचो .अचानक मागून निघालेली सरपंचाच्या मुलाची पांढरीशुभ्र पण गावाच्या धुळीने माखलेली कार भुरकन पुढे निघून जायची .ती दिसेनाशी होईपर्यंत मी त्या कारकडे एकटक बघत असायचो.

     

   दादा पास झाला पण परिस्थितीने दहावी नंतरच्या शिक्षणाचे दारे बंद केलीत .तो आनंदाने पूर्णपणे आप्पांना मदत करू लागला .निवृत्ती मात्र मला दहावीनंतर डी.एड्. करायचं असा हट्ट धरून बसला .त्याचा हट्ट आप्पा आणि दादाने पूर्ण केला. चक्क वयाच्या एकोणिसाव्या वर्षी नोकरीला लागला. "मी बारावीनंतर शहरात शिकायला जाईल" असं रोजचं गाणं माझं असे. मला जणू शहरातून काहीतरी खुणावत होते .विसाव्या वर्षीच दादाचे मायआप्पांनी मामाच्या मुलीशी लग्न लावून दिले. निवृत्तीलाही डीएड मुलगी मिळाली. पण त्याने गावाकडचे संबंध कमी केले नाहीत. सुट्टीच्या दिवशी तो गावी यायचा. त्याला गोठ्यातील गाय अजूनही खुणावत होती .बारावीनंतर हट्टानुसार मला पुण्याला शिकायला टाकायचे ठरले. शेंडेफळ म्हणून जास्त लाडका मी .माय खूप दुःखी झाली .पण काही बोलली नाही. शिक्षणाच्या खर्चात आप्पा, दादा आणि निवृत्तीने काहीच कमी पडू दिले नाही .तीन-चार महिन्यात दादा नाहीतर आप्पा पितळाच्या डब्यात लाडू आणि माझ्या आवडत्या सांजोऱ्या घेऊन भेटायला यायचे .पत्र चालू असायचे. मनिऑर्डर्स यायच्या .अभ्यास करत गेलो .चांगल्या मार्कांनी पास होत गेलो .डिग्री पूर्ण झाल्यावर नशीब अजमावण्यासाठी छोटीशी कंपनी टाकायचे ठरवले. कसे माहीत नाही पण आप्पांनी पैसे पाठवले. नशीब जोरावर होते. यश आलं .वर्कर्स काम करू लागले .फ्लॅट घेतला. कार घेतली .प्रत्येक ब्रँडेड वस्तू घेतली. कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांचा आवडता आणि आदर्श विद्यार्थी मी होतो. माझ्यासोबतच शिकायला असलेल्या त्यांची मुलगी रिया हिच्या प्रेमात कधी पडलो कळलेच नाही. गावाकडे लग्न करण्यास नकार देऊन पुण्यातच लग्न झाले. माय ,आप्पा ,दादा निवृत्ती आणि नवरा मुलांसह मुक्ता आठ दिवस पुण्यात आले .मायची नऊवारी आणि आप्पांचे धोतर थोडे खटकत होते .पण आठ दिवसाचा प्रश्न होता.त्यांच्यात आणि माझ्यात एक भक्कम भिंत बांधली जाते याच्याकडे मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले .लग्न समारंभानंतर ते गावी परतले. माझी प्रगतीची दौंड पुन्हा सुरू झाली. मॉडर्न स्वयंपाकघर, बेडरूम, होम थिएटर, भिंतीवर भव्यदिव्य एल इ डी, इम्पोर्टेड कार बघता बघता गाव सोडून 35 वर्षे झाली. भराभर यशाच्या पायऱ्या चढत होतो. अचानक दोन महिन्यांपूर्वी चीनचा कोरोना कर्मभूमीत म्हणजे पुण्यात दाखल झाला .भयभीत झालो. गावाकडची आठवण झाली. पण फोन करायचे धाडस होईना. एवढ्यात याआप्पांचा फोन आला. "जमलं तर" आठ दिवस ये गावाकडे असे त्यांनी कळकळीने सांगितले परंतु हेच असं सांगता जमलं तर हा शब्द त्यांनी वापरला कारण त्यांनाही ठाऊक होते की आता मला गावाची ओढ अजिबात राहिलेली नव्हती. मी आणि रिया आणि प्रिन्स असे आमचे सर्व कुटुंब गावाकडे गेलो. कारण गाव सोडून इतर कुठेच आता सुरक्षित वाटत नव्हते .गावी जाऊन चार दिवस झाले आणि लगेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लोक डाऊन जाहीर झाले आणि आम्ही गावी अडकलो .गावी अडकल्याच्या भावनेने व्यथित झालो. प्रिन्सला आणि रियाला गावाकडे खूप करमले. आठवड्यानंतर मी गावी सेट व्हायला लागलो. प्रकर्षाने काहीतरी जाणवत होतं. सर्वकाही असूनही कसली तरी कमतरता! त्याने रात्री अंथरुणात पडल्यापडल्या लागणारी झोप तीस वर्षापूर्वीच गेली होती. आप्पा दादा ची मुलं आणि प्रिन्सला गोष्ट सांगायचे. दादा भजन म्हणायचा. रिया श्रीमंताची एकुलती एक मुलगी !पण शक्य तेवढं मायला मदत करायची. मायला जरा अवघडल्यासारखे वाटे .तिने तर चक्क जीन्स ऐवजी साडी वापरणे सुरू केलं."U are very luky dear, इतके चांगले आई,वडिल, भाऊ तुला मिळाले, and yessss I also, पण तू मला, प्रिन्स ला आणि स्वतःला इतकी वर्षे ह्या सुखपासून वंचित ठेवले. Any way" तिने सुस्कारा सोडला.तिच्या बोलण्यात आणि वागण्यात मायचं लुगडं किंवा आप्पांचे धोतर यांचं अवघडलेले पण दिसत नव्हतं. जीम व्यायाम करणारी रिया दादा चे अभंग आदराने ऐकत होती. मला रिया आणि माझ्यातला फरक समजला आणि पडल्यापडल्या झोप न येण्याचं तीस वर्षापासून कारणही!

     

   पस्तीस वर्षांपासून ,सोडलेल्या गावाचीच काय पण जिच्या डोईवरच्या पदरावर पाय ठेवून चाललो तिच्या पदराची कधीच आठवण काढली नाही. आप्पांनी ,दादाने शिक्षण, कंपनीसाठी पुरविलेले पैसे म्हणजे त्यांच्या घामाचे पैसे होते असा विचार सुद्धा केला नाही .एकुलती एक बहीण मुक्ताला कधी रक्षाबंधनाला बोलावले नाही किंवा भाऊबीजेला तिच्याकडे गेलो नाही .शिक्षक झालेल्या निवृत्ती दादाचे सुरुवातीच्या काळातले पत्र , त्यांना नियमितपणे उत्तर सुद्धा दिले नाही किंवा अलीकडे कधी व्हिडिओ कॉल करून त्याची चौकशी केली नाही. मी मौल्यवान ब्रँडेड वस्तूंसाठी इतका धावत राहिलो की अमूल्य माणसांपासून मी दूर दूरच जात राहिलो.

    कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये गावी आल्यावर मला कळले की बाहेरून मागवलेल्या पिझ्झा- बर्गर किंवा फाइव स्टार च्या जेवणाला मायच्या चुलीवरच्या भाकरीची सर कधी, कधीच येऊ शकत नाही. टब बाथ दगडावर मायने घातलेली आंघोळीची बरोबरी कधीच करू शकत नाही .दादा ने स्वतः गायलेले अभंग किंवा संपूर्ण कुटुंबात तोडकीमोडकी खेळलेली अंताक्षरी ही कुठल्याही होम थेटर पेक्षा निश्चितच निश्चितच आनंददायी ,आदरणीय आहे. भाऊबीजेला सुट्टी काढून परदेशात फिरायला जाण्यापेक्षा मुक्ताने केलेली ओवाळणी ही खूप खूप श्रेष्ठ आहे. देशी-परदेशी सेंटच्या सुवासापेक्षा अप्पांच्या घामाचा वास पवित्र आहे. हाताने फोडलेल्या कांद्याबरोबर खाल्लेला भत्ता हा कोणत्याही महागड्या खाऊ पेक्षा महाग आहे. 

    मी ठरवलंय, आता पैश्यामागे धावणं कमी करायचं, प्रिन्सला सुट्ट्या लागल्यावर महिनाभर गावी यायचं आणि नकली सुखामागे न पळता शाश्‍वत , आत्मिक समाधान देणारं, अंथरुणात पडताच झोप लागणार सुख लुटायचं !कारण मनुष्याची तहान ही मातीच्या माठातल्या थंडगार पाण्यानेच भागते, ती डांबरी रस्त्यावरच्या मृगजळाने नाही, कधीच नाही......!


"ब्रँडेड सुखापोटी माणूस


झाला आज बाधित आहे


स्वैरभैर होऊन विसरला


कस्तुरी तर नाभीत आहे!!!


मातीच्या माठातच घरी


थंडगार बघ जळ आहे


धावत आहेस ज्यामागे माणसा


ते तर फसवे मृगजळ आहे...!!!

------------------------------


Rate this content
Log in

More marathi story from Kavita Pathade