Rahul Kulkarni

Children Stories

4  

Rahul Kulkarni

Children Stories

मॅजिक कृष्णा

मॅजिक कृष्णा

6 mins
250


   आज सलग तिसऱ्यांदा तो झोपेतून उठून बसला होता. परवा, काल आणि आज रात्री पण त्याला तेच स्वप्न पडलं होतं. दोन दिवस तो आईबाबांना या विषयी काही बोलला नव्हता. पण आता त्याला थोडं घाबरायला होत होतं.

छोटासा आठ वर्षाचा चिमुकला जीव तो. एवढ्या अकल्पित आणि जादुई स्वप्नाने नक्कीच बिथरला होता. 

.........

श्लोक. आईबाबांच्या काळजाचा एकुलता एक तुकडा. गोकुळाष्टमीच्या दिवशी आठ वर्षांपूर्वी तो वंशाचा दिवा बनून अमर आणि काव्याच्या आयुष्यात आला होता.

त्या छोट्याशा आणि ओसाड गावात त्यांचं त्रिकोणी कुटुंब होतं. आई, बाबा आणि तो. अमर आणि काव्या दोघांना अध्यात्माची आवड असल्याने सुरुवाती पासूनच श्लोकवर चांगले आणि सकारात्मक संस्कार झाले होते. इतकंच काय तर त्यांनी त्याचं नाव सुद्धा अध्यात्माच्या मार्गाला अनुसरून 'श्लोक' असं ठेवलं होतं.

सकाळची बारा वाजेपर्यंतची शाळा झाली की दिवसभर गुराढोरांच्या मागे फिरणे, नवीन रोपे लावून त्यांची निगा राखणे, आईला शेण सारवायला मदत करणे, बाबाला शेतीसाठी मदत करणे, मुलांसोबत बौद्धिक खेळ खेळणे, संध्याकाळी देवापुढे बसून शुभंकरोती आणि स्तोत्र म्हणणे, शाळेचा अभ्यास वेळोवेळी करणे आणि सर्वांची शाबासकी मिळवणे हा श्लोकचा नित्यक्रम होता.

त्याच्या बोलण्याने, वागण्याने, हसण्याने आणि हुशारीने तो सर्व गावालाच हवाहवासा आणि जिव्हाळ्याचा होता.

आणि आपल्याला तर माहितीच आहे की,

"जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला".

पण देवाला जो आवडतो त्याला तो त्याच्याकडेच बोलावून घेतो का, तर नाही. 

काहींना तो आपल्याकडे बोलावून घेतो तर काहींना तो पृथ्वीवरच मोठी, चांगली आणि समाज हितकारक कामं करण्यासाठी राखून ठेवतो.

..........

आजही श्लोकच्या डोळ्यांत स्वप्नाने प्रवेश केला तो भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाने.

तो आता एका सुंदर, मोहक आणि सुगंधी फुलांच्या बागेत भगवान श्रीकृष्णांच्या समोर उभा होता. अतिशय मोहक आणि आकर्षक असं त्या गोपालकृष्णाचं रूप होतं. त्याच्या एका हातात सुदर्शनचक्र होतं, दोन हातात धरलेली सुंदर बासरी होती, एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता. डोक्यावरच्या मुकुटावर छान छान हिरे, माणिक जडलेले होते, मोरपीस लावलेले होते. त्याच्या एका बाजूला गायीची इटुकली दोन वासरं उभी होती, आजूबाजूला छान मोठ्ठा पिसारा काढून मोर नृत्य करीत होते. 

भगवान श्रीकृष्ण श्लोकशी बोलू लागले,

"श्लोका, तू खूप गुणी मुलगा आहेस आणि मला तू खूप आवडला आहेस. पण तू तर सर्वांनाच आवडतो ना. मग मी तुला घेऊन तरी कसा जाऊ. तुला मी घेऊन गेलो तर तुझं सगळं गावंच मला रागवेल आणि माझ्यावर रुसून बसेल, नाही का?". 

"पण मी तुला एक बक्षीस देणार आहे. आवडेल ना तुला. तू नेहमी सगळ्यांचा चांगला विचार करतो, सगळ्यांची सेवा करतो, मदत करतो ना, म्हणूनच मी तुला एक खास बक्षीस देणार आहे".

"सोमवारी तुझा वाढदिवस आहे ना, माझा पण वाढदिवस आहे, कारण त्या दिवशी गोकुळाष्टमी आहे. तुला शाळेला पण सुट्टी आहे..".

"त्या दिवशी तू सकाळी उठून आंघोळ करायची, माझी पूजा करायची, आईबाबांना नमस्कार करायचा आणि आईकडून एक गोड पोळी घेऊन आपल्या गोठ्यातल्या गाईला खाऊ घालायची".

"आणि मग काय गंमत होईल"..

"तू जे बोलशील ते खरं होऊ लागेल, तू जी इच्छा व्यक्त करशील ती लगेच पूर्ण होईल.".

"पण मलाही माझ्या गुरुजींचा धाक असतो ना रे, मला त्यांनाही भेटायला जावं लागतं".

"त्यामुळे सकाळी दहा वाजले की मी निघून जाईल, मग तुझा खाऊ संपला. पण तोपर्यंत तर तुला संधी आहेच ना. तू लवकर तुझी कामं आटोपलीस तर तुला खूप वेळ मिळेल, मग तुला जे पाहिजे ते सर्व मिळेल".

"पण अजून एक गोष्ट लक्षात ठेव, आईबाबांना विचारून काहीच मागायचं नाही. जे तुझ्या मनात येईल तेच खरं होईल".

"आता तू सकाळ झाली की, आईबाबांची परवानगी घे. मला आता गेलं पाहिजे, चल टाटा, मी सोमवारी येईल हं श्लोका...".

.........

श्लोक उठून बसला तेव्हा त्याच्या एका बाजूला आई आणि एक बाजूला बाबा गाढ झोपले होते. 'सकाळी दोघांना सगळं सांगायचं' असं स्वतःशीच म्हणून तो त्या छोट्याशा दुलईत आपलं अंग मुरडून घुसून गेला. त्याला झोप लागली.

श्लोक सकाळी उठला तेव्हा आई दारात रांगोळी काढीत होती तर बाबा गाईंना चारा देत होते. त्याला एकदम आठवलं. आज तर रविवार, म्हणजे सुट्टी, मज्जा.

आईने त्याला दूध दिलं तेव्हाच त्याच्या मनात स्वप्न सांगून टाकण्याचा विचार आला. त्याने आईला जवळ बोलवलं आणि सांगायला सुरुवात केली.

"आई.. आई. मला ना उद्या गोड पोळी करून दे. मला आपल्या गायीला द्यायची आहे खायला".

आई गालातच "हो का, गाईने मागितली का तुझ्याकडे?, देईल हं करून उद्या" असं म्हणून हसू लागली.

"नाही गं आई, मला ना एक स्वप्न दिसलं",

"स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते आणि त्यांनीच मला सांगितलंय, त्यांनी मला बक्षीस पण दिलंय. पण त्यासाठी मला लवकर उठून अंघोळ, पूजा करून गाईला लवकर पोळी द्यायचीय.. समजलं?".

"हो. हो समजलं हं माझ्या गोपालकृष्णा, देईल हं तुला सकाळी लवकरच पोळी करून"

ते ऐकून श्लोक आनंदातच उड्या मारत खेळायला निघून गेला..

काव्या श्लोकच्या शुद्ध निरागसपणावर कितीतरी वेळ एकटीच हसत बसली

..........

श्लोकने आज लवकर झोपायचं ठरवलं होतं, त्याला सकाळी लवकर उठून बरीच कामं उरकायची होती, शिवाय 'देवाकडे काय मागायचं' याची पण मनातल्या मनात तयारी करायची होती.

आजचा संपूर्ण दिवसच तो आनंदात होता, उद्या त्याला जादू मिळणार होती, तो सगळ्या गावामधून आज फिरून आला होता.

..........

श्लोकला जाग आली तेव्हा साडेसात वाजून गेले होते. पण अजूनही बराच वेळ होता. तो पटकन झोपेतून उठला. त्याची सगळी रोजची कामं आटोपून आईला "आई, मला लवकर गोड पोळी करून दे" असं सांगून तो पूजेला बसला. आईबाबांचा पूजेचा नित्यक्रम पाहून त्यालाही आता देवपूजा करता यायला लागली होती. 

शिवाय एकतर आज त्याचा वाढदिवस पण होता आणि त्याला खाऊ पण मिळणार होता. त्याने शांत मन लावून देवाची पूजा केली. सर्व देवांना आणि आई बाबांना डोकं टेकून नमस्कार केला.

तोपर्यंत आईची पोळी तयार झाली होती, घड्याळात नऊ वाजले होते. म्हणजे अजून एक तास शिल्लक होता. त्याने आईकडून गोड पोळी घेतली, देवाला नैवेद्य दाखवला आणि तो गोठ्यात गेला.

त्याची एकुलती एक आणि आवडती गाय मोठ्या प्रेमाने त्याच्याकडे बघत होती, शेजारीच तिचं छोटसं गोंडस वासरू तिला बिलगून उभं होतं.

तो गाईजवळ गेला. आईबाबा त्याच्या हालचाली मोठया आनंदाने डोळ्यात साठवत होते. श्लोकने हातातली गोड पोळी गायीला खाऊ घातली, एक पोळी गाईच्या छोट्या बाळालाही दिली.

'आणि काय गंमत....'

स्वतः भगवान श्रीकृष्ण गोठ्याच्या एका कोपऱ्यात बसून त्याच्याकडे बघत होते. त्याला त्याच्या स्वप्नात दिसलेल्याच रुपात ते शब्द दिल्याप्रमाणे आले होते.

तो एकदम खुश झाला. पण त्याने आईबाबांना ती गोष्ट सांगितली नाही, कारण ते फक्त त्याला एकट्यालाच दिसणार होते.

.........

आता त्याची पाळी होती. त्याने देवाला नमस्कार केला आणि डोळे बंद करून "देवा, माझ्या आईचा भाजलेला हात लवकर बरा होऊ दे" अशी मनोमन प्रार्थना केली.

त्याने डोळे उघडून समोर बघितलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादाचा हात त्याच्याच दिशेने वर आला होता.

त्याचा विश्वास असला तरी उत्सुकता होतीच. त्यामुळे पळतच तो आईजवळ गेला. त्याने आईचा भाजलेला हात हातात घेतला. आणि काय आश्चर्य, आईचा हात अगदी बरा आणि ठणठणीत झाला होता.

आईचा तर स्वतःच्या डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसत नव्हता, दोन दिवसांपूर्वी भाजलेला हात किती त्रास देत होता, आता तिथे कशाची खूण सुद्धा नव्हती.

श्लोक पुन्हा आपल्या जागेवर आला आणि त्याने एक एक गोष्ट पटापट मागायला सुरुवात केली

देवा......

"आमच्या शेजारच्या आजींना दिसत नाही, त्यांचे डोळे आंधळे आहेत, त्यांना डोळे दे",

"माझ्या चिमणीचा तुटलेला पंख चांगला होऊ दे",

"आमच्या गावाच्या कोरड्या नदीला पाणी दे, पुष्कळ पाऊस पडू दे",

"माझ्या गावाला पण तुझ्या गावासारखं हिरवंगार दिसू दे",

"माझ्या पडक्या शाळेला छान करून दे",

"केळकर काकांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत ना देवा, त्यांना चांगली बुद्धी दे",

"सगळ्यांची शेतं चांगली पिकू दे",

"कुणालाच आजारी पडू देऊ नको", "कुणालाच उपाशी ठेवू नको",

"सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखी ठेव",

..........

श्लोकने डोळे उघडले तेव्हा दहा वाजतच आले होते, त्याला मिळालेल्या जादूमुळे गावामध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता, संपूर्ण गावात त्याची बातमी वाऱ्यासारखी पोहोचली होती, पूर्ण गाव त्याच्या घरी जमा झालं होतं, सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद दिसत होता, त्याच्यासोबत सर्वांनीच त्याच्या दिशेने हात जोडले होते.

त्याचं लक्ष समोर गेलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच मुद्रेत अजूनही तिथे बसलेले होते. ते हळूहळू जागेवरून उठले, त्यांची जाण्याची वेळ जवळ आली होती. श्लोकने हाताच्या घड्याळात पाहिलं, एक मिनिट शिल्लक होता. 

त्याने पटकन डोळे बंद केले, मनोभावे देवाचं स्मरण करून 

"देवा, सर्वांना तुझी आठवण म्हणून नदीकिनारी तुझं छानसं देऊळ बांधून दे, तू कायम सर्वांच्या मनात राहा"

अशी शेवटची मागणी केली आणि हळूहळू डोळे उघडले, 

भगवान श्रीकृष्णांनी डोळे भरून त्याच्याकडे पाहिले आणि "तथास्तु" म्हणून हळूहळू त्यांची मुद्रा हवेमध्ये विरून गेली.

........

इकडे सगळा गाव कितीतरी वर्षांनंतर हिरवागार झाला होता. कुणाचीही काहीही तक्रार नव्हती, सगळे सुखी झाले होते, सर्वांना चांगली बुद्धी मिळाली होती, सर्वांच्या ओठी कृष्णनामाचा जप चालला होता.

आज गोपाळकाला होता, सगळा गाव नदीकिनारी गेला, तिथे भव्य सुंदर कृष्णाचं आकर्षक मंदिर उभं होतं. चारही बाजूला सुंदर फुलांची झाडी, बगीचे होते, त्यात छोटे मोठे मोर, पक्षी, पाखरं आनंदाने बागडत, डोलत होते.

सर्व गावाने मंदिरात जाऊन मनोभावे कृष्णाला नमस्कार केला, देवाचा आशीर्वाद घेतला.

संध्याकाळी गावामध्ये भव्य दिव्य दहीहंडी बांधली गेली, सर्वांनी गोपालकाल्याचा प्रसाद वाटला, श्लोकच्या हाताने दहीहंडी फोडली गेली.

श्लोकच्या जादूने आज सगळा गाव सुखी, आनंदी झाला होता. इतकेच नव्हे तर सगळी मुभा असून देखील श्लोकने देवाकडे त्याच्या स्वतःसाठी वैयक्तिक काहीच मागितलं नव्हतं, फक्त दुसऱ्यांचा, गावाच्या भल्याचा विचार केला होता. त्यामुळे त्याच्या बद्दलचा आदर गावात अजून वाढला होता.

सर्वांनी गावाची प्रगती करण्याची, निगा राखण्याची शपथ घेतली आणि सुखाने आपापल्या घराची वाट धरली.


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Kulkarni