Alka Vadhavkar

Others

4  

Alka Vadhavkar

Others

कोरोनायण

कोरोनायण

3 mins
176


 आयुष्यात अनेक सुख दु:खाचे क्षण येतात. त्यांचं जणूं "कोलाजच" तयार होतं आपल्या मनात. काळाच्या ओघात ते धूसरही होतात. पण आपल्या आठवणीतील 'काही क्षण' असे येतात की ज्यातले अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात. त्या आठवणी मनात घर करुन बसतात. एखाद्या अद्भुत कथेसारख्या. माझ्या मनात कोरली गेलेली अशीच एक ह्रद्य आठवण....

       10 मार्च 2021 चा दिवस उजाडला. माझ्या कोरोना टेस्टचा निकाल सांगणारा मेल gmail वर येऊन थडकला. Positive की negative हे 24 तास चाललेलं द्वंद्व आता थांबलं. जीसे डरते थे वो ही बात हो गयी....

     पायाखालची जमीन सरकली पण क्षणभरच. कारण धैर्याने तोंड देण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. मुलं परदेशी मग मलाच धडपड करायला हवी. त्वरीत CT scan केलं. आमच्या डाॅक्टर शेंदारकरांनी दोन्ही रिपोर्टस् पाहून Home quarantine चा सल्ला दिला आणि मी 'बंदिवान' झाले. ट्रीटमेंट सुरु झाली. 

      आधी धावून आला तो माझा "शेजार"... आमच्या नुसत्या पोटापाण्याचाच त्यांनी ताबा घेतला असं नाही तर 73 वर्षाच्या मला व 77 वर्षाच्या ह्यांना मानसिक आधार दिला. 'कोरोना'सारख्या संसर्गजन्य रोगात रक्ताची माणसं, इतर नातेवाईक, मित्र परिवार नाईलाजास्तव पोहोचूं शकत नव्हती. पण ती उणीव माझ्या बिल्डींगमधल्यांनी भरुन काढली . मी भरुन पावले. 

       अजून एक ह्रद्य आठवण म्हणजे नव-यानी 'लिलया' पेललेली घरची जवाबदारी. अगदी भांडी, केर सुध्दा. आयुष्याच्या 'तिन्हीसांजेचा' हा अनुभव आमच्या प्रेमाचं बोलकं उदाहरण होतं.

      दरम्यान माझ्या खोकल्याने बरीच उचल खाल्ली. म्हणून मी हाॅस्पिटल मधे अॅडमीट होणंच योग्य असा आग्रह मुलांनी धरला. आता आधी मी *नकारात्मक भावनांना माझ्या मनातून केलं डिलिट आणि सकारात्मक विचारांचं डाऊनलोड केलं कीट*. देवाला नमस्कार करुन आणि पतीदेवांचा निरोप घेऊन मी उंबरठा ओलांडला. अॅम्बूलन्स मधून माझी वरात निघाली. अर्थात एकटीची. वरातीत बडवतात तसे ढोलताशे नसले तरी तो सायरनचा कानठळ्या बसवणारा आवाज मनाच्या अस्थिरतेत भर घालत होताच.  तारीख होती 13 मार्च 21

      ठाण्याच्या प्रसिध्द कौशल्य हाॅस्पिटल मधे मला जनरल वाॅर्ड मिळाला होता. एरव्ही स्वतःची 'स्पेस' कुरवाळणा-या मला पेशंटची गर्दी सुध्दा आवडून गेली. त्यांची खूप सोबत असणार होती मला. कौशल्याच्या नर्सेस आणि डाॅक्टर्सनी माझा ताबा घेऊन माझी आपुलकीने चौकशी केली अन् मला 'आश्वस्थ' केले. कोरोना विरुद्धची अर्धी लढाई मी इथेच जिंकले. तिथल्या उत्तम ट्रीटमेंटला माझ्याकडूनही प्रतिसाद मिळाला. वाॅर्ड मधील माझा शेजारही माझी विचारपूस करुन हवं नको विचारायचा. ती परिस्थितीच तशी होती. एकमेका सहाय्य करू....

 मी तशी 'विठ्ठलभक्त'! "पंढरीचा विठूराया आणि रखुमाई" मला डॉक्टर आणि नर्सच्या रुपात दिसायचे. माझ्या उशापायथ्याशी बसून सेवा करतायत असं वाटायचं. खरं सांगू मी तेव्हां स्वतःला 'जनीच' समजायचे. तिच्यासाठी कसा तिचा पांडूरंग धावत यायचा मदतीला तसा माझ्यासाठी आला होता माझा 'विठूराया'.

  हाॅस्पिटलचा स्टाफ जेव्हा माझ्याभोवती असायचा तेव्हां मला ते वारीतलं "रिंगण" च वाटायचं. कुणा हाती गोळ्या, पाण्याचा पेला, कुणाहाती सिरींज इ. मला तर ते टाळ चिपळ्यांहून कमी नाही वाटलं. माझी पंढरीची वारीच झाली जणूं. 

*असे हो जया अंतरी भाव जैसा... वसे हो तया अंतरी देव तैसा...* समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात किती यथार्थ म्हटलंय ह्याची जाणीव झाली. 

    7 दिवसांनी घरी आल्यावर अजून जपायचं होतं. पुन्हां 7 दिवस 'होम क्वारंटाईन'. मला कमालीचा अशक्तपणा आला होता. 24 तासासाठी एक सेवेकरी मिळाली. मुलीनी करावी तशी प्रेमळपणे तिने माझी सेवा केली. पैसाच सर्व काही असतो असं नाही ह्याची मला प्रचिती आली. 

    जवळपास एक दीड महिन्यानी माझी गाडी पूर्वपदावर आली. कोरोनाविरुध्द लढाई मी जिंकू शकले ते माझ्या पाठीशी परमेश्वर उभा होता म्हणून. तसेच थोरांचे आशिर्वाद आणि   आप्तेष्टांच्या शुभेच्छा ह्यामुळेच. तसेच ह्यात कुणाचा सिंहाचा तर कुणाचा खारीचा वाटा आहे. ह्या काळात मला माणुसकीचं दर्शन तर घडलंच पण माझ्यातल्या आत्मविश्वासाचंही. माझ्या आठवणीतील ह्या काही क्षणांनी माझं मन व्यापलं आहे. कधीही न विसरण्यासाठी. 

     सीतेच्या आयुष्यात जसं 14 वर्षांचं *रामायण* घडलं तसं माझ्या आयुष्यात हे 14 दिवसांचं *कोरोनायण*. 


Rate this content
Log in

More marathi story from Alka Vadhavkar