झरणारं दुःख
झरणारं दुःख
श्रावणातली एक ओली सकाळ. मी आणि माझी मुलगी स्वानंदी प्राजक्ताचा सडा ओंजळीतून परडीत भरुन घेत होतो. पाचसहा वर्षाची स्वानंदी ,तिची चिमुकली ओंजळ अन् त्यात लालकेशरी देठाचा प्राजक्त फारच खुलून दिसत होता. मी परडी घेऊन घरात आले. स्वानंदी अजुनही फुलांसोबत होती. मी कामाला लागले . तेव्हढ्यात , "आई.....! " अशी स्वानंदीची जोरात हाक कानावर आली. मी घाबरुन धावतच अंगनात गेले. एक कुत्रा मांजरीला पकडून पळत जातांना दिसला. अन् मांजरींचं पिल्लू मात्र तिथेच पडून होतं. त्या कुत्र्याच्या तावडीतून मांजर वाचणं अशक्यच वाटत होतं. मी आणि स्वानंदीने पिल्लूला घरात आणलं. खूप बावरलं होतं बिचारं. त्याला थोडं दूध दिलं प्यायला तेव्हा थोडी तरतरी आली पिल्लूला.
"आई, पिल्लूची आई मेली असेल का गं ?"
स्वानंदीला मरण कसं कळलं? तिच्या प्रश्नाने क्षणभर मी निःशब्द झाले. झाल्या घटनेने तिच्या नाजुक हातातला प्राजक्त अगदीच मलूल झाला होता. पिल्लूची वेदनाच जणू स्वानंदीच्या डोळ्यातून झिरपतांना मला जाणवली.
"आई गं, अजून दुध देऊ का पिल्लूला?"
स्वानंदी पिल्लूजवळ बसून मला विचारत होती.
"अगं पुरे आता. छोटं पिल्लू आहे ते. मोठी म्याऊ नाही काही ती. आपण पिल्लूला छोटीशी गादी करुन देऊ आणि थोडावेळ त्याला आराम करु देऊ."
स्वानंदींच्या उत्साहावर विरजन पडू नये म्हणून मी तिला घेऊनच एक जुनी नरम साडी घेऊन त्याची घडी घातली अन् त्यावर पिल्लूला ठेवलं. आणि स्वानंदीला अभ्यासाला पाठवलं. पण बाईसाहेबांचं अभ्यासात लक्ष लागेल तर नं. दोन दोन मिनीटाने पिल्लू काय करतं बघायला ती येत होती.
दोनतीन दिवसात पिल्लूमध्ये चांगलीच तरतरी आली होती. स्वानंदीचा तर पूर्ण वेळ पिल्लूभोवती घुटमळण्यात जात होता.
"आई , पिल्लूला जर दुधात कॉम्प्लॅन दिलं तर तो लवकर मोठा होईल नं गं ?"
जाहिरातीचा परिणाम अजून काय. चूकुनही तसं करु नको ही समज तिला देऊन मी कामाला निघनार तर तिचा दुसरा प्रश्न.
"आई गं, आपण पिल्लूच नाव ठेवायचं का गं? "
स्वानंदीचं लाघवी बोलणं अन् गोजिरवाणं हास्य माझ्या जीवनातील बहरक्षणच जणू. तिला म्हटलं,
"का नाही? तुला आवडत असलेल्या नावानीच आपण हाक मारु या."
स्वारी खुश होऊन पिल्लूला 'मनी' म्हणायला लागली. सकाळ झाली की डोळे चोळतच ती मनीजवळ जायची अन् शाळेतून आली तरी लगेच पळत मनीजवळ जायची. स्वानंदीचं विश्व बनत चाललं होतं जणू हे पिल्लू. त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याच्याशी खेळणं यात तिचा भरपूर वेळ जायचा. नवी मैत्रीणच मिळाली जणू तिला. मनी पण तितकाच जीव लावायची तिला. तिला सोडून कुठेच जायची नाही . प्राणी पक्षी मुके असले तरी त्यांच्या संवेदना मात्र मुक्या नसतात हेच खरं.
एक दिवस माझी बहिण आणि तिचे पती येणार म्हणून मी नाश्त्याचं सामान घेऊन आले. फ्रुटजॅम पाहून स्वानंदी जाम खूश झाली.
"वॉव , मावशी येणार आहे ? पण काकांना पहिलेच सांगशील बरं माझे गाल ओढायचे नाही म्हणून . अश्शे गाल ओढतात ते..."ओढून दाखवत ती सांगू लागली. मला हसायलाच आलं.
सरु आणि जावई आले. जावयांनी दोन मोठ्ठे चॉकलेटस स्वानंदीच्या हातात देताच स्वारी खूश. पण काकांनी गाल ओढताच माझ्याकडे तिने बघितले आणि&nbs
p;म्हणाली , "बघ , मी सांगितलं नव्हतं तुला ?" सर्वच हसायला लागले.
मी नाश्ता तयार केला. सॅन्डविच वर फ्रुटजॅम टाकून दिलेला नाश्ता सरुला खूप आवडला. ते दोघे निघून गेल्यावर मला स्वानंदीने विचारले.
"आई गं, हे ब्रेड आणि जॅम चारते माझ्या मनीला."
मी नकार नाही दिला. पण थोडच चारायला सांगितलं . स्वानंदी आनंदाने पळतच गेली. मी स्वयंपाकघर आवरायला घेतलं.
"आई गं...." स्वानंदीची किंकांळी ऐकून मी घाबरले. धावतच गेले तर पिल्लू निपचित पडलेलं. स्वानंदी जोराजोरात रडायला लागली. मी शेजारी रहाणा-या एका प्राण्यांच्या डॉक्टरांना फोन केला. ते लगेच आलेत. त्यांनी पिल्लूला तपासलं आणि फुड पॉयझनिंगमुळे पिल्लू मेल्याचं निदान केलं. स्वानंदी रडून रडून घाबरल्यासारखी करत होती. मग लक्षात आलं की हा पदार्थ तर स्वानंदीने पण खाल्ला. मी लगेच तिला घेऊन आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली. वाटेत सरुला फोन करुन तिलाही हे खाल्ल्यामुळे कसं वाटतं ते विचारलं. तर ती नॉर्मल होती.
"जास्त रडण्यामुळे स्वानंदीला अस्वस्थ वाटत आहे. बाकी काही प्राब्लेम नाही." स्वांनदीला तपासत डॉक्टर म्हणाले.
"पण तो पदार्थ खाऊन पिल्लूला फुड पॉयझनिंग झाले डॉक्टरसाहेब." मनीच्या जाण्याने मी सुद्धा हळवी होऊन गेली होती.
"फ्रुटजॅम वगैरे पदार्थात जे केमिकल्स वापरतात ते पचवण्याची शक्ती अजून या मुक्या प्राण्यांमध्ये यायची आहे अजून. आपण आपल्या स्वार्थी बांधवांमुळे बरच विष पचवतो आहोत." डॉक्टरसाहबे शांतपणे बोलत होते पण मी मात्र दुःखाने तळमळत होते. एक जीव गेला होता घरातला. मुका असला तरी जीव लावला होता सर्वांना त्यानी, स्वानंदीचा तर जीव की प्राण झाला होता. नकळत का होईना पण त्याची आमच्या हातून झालेली ही हत्याच होती.
"डॉक्टरसाहेब, अशा पदार्थावर बंदी नाही का टाकता येणार?"
"हवाबंद खाद्यपदार्थात केमिकल्सचा वापर करतातच. पण इतर प्रगत देशात त्याचं प्रमाण अत्यल्प असतं आपल्या देशात मात्र स्वार्थीपणामुळे त्याचं प्रमाणच नाही. कायद्यानूसार अपायकारक पदार्थाची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षासुद्धा देता येते." डॉक्टर साहेबांनी माहिती पुरवली.
मी परत येताना दुकानात गेली. त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. पण "जसा माल येतो तसा विकतो" असं बोलून त्यांनी हात वर केले. घरी आले. स्वानंदी खूपच कोमेजून गेली होती. तिला म्हटलं," थोडं काही तरी खाऊन घे. नंतर औषध देते."
तशी ती म्हणाली," आई मी पण मनीसारखी मरुन जाईल का गं?" स्वानंदीच्या या प्रश्नाने माझं उरलं सुरलं अवसान गळालं.
दुसऱ्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणच्या विभागात गेले. तिथल्या अधिकाऱ्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि या प्रकरणात तुम्ही काय करु शकता हे विचारलं तर ते म्हणाले,"आमचा विभाग माणसांसाठी आहे जनावरांसाठी नाही."
"आज जनावर गेलं पण उद्या माणसं मरतील अशा खाद्यपदार्थानी... आणि मरतच आहेत."
माझ्या या वाक्याने ते खूप चिडले आणि "तुमच्या घरातलं कुणी माणूस गेलं की मग या." असं म्हणून मला बाहेरचा रस्ता दाखवला.
मी सुन्न झाले. "आई, मी पण या मनीसारखी मरुन जाईल का गं ?" या स्वानंदीच्या प्रश्नाचे उत्तर मला कुठे मिळेल याचा विचार करत बाहेर पडले.