Anu Apte

Children Stories

2  

Anu Apte

Children Stories

दादापण

दादापण

5 mins
69


राम राई साई सुट्टयो, जास्तीची मेजोरटी...अचानक हे शब्द कानी पडले आणि पन्नाशीतली स्वाती एकदम 35,40 वर्ष मागे तिच्या बालपणात गेली. किती सुरेख होतं ते जगणं. भला मोठा वाडा, त्यात राहणारे 30,35 भाडेकरू, प्रत्येक घरात 2,3 मुलं. लहान मोठे सगळे एकत्र राहायचे जणू.वाड्यात कोणी कधी घराला कुलूप लावलं नसेल, अपवाद फक्त बाहेरगावी जाण्याचा.पाहुणे रावळे त्यांच्या मुला बाळांसकट वाड्यातल्या सगळ्यांना ठाऊक असायचे.


अनेक खेळ, भातुकली,कोजागिरी जागरण ,भोंडला, तुळशीचे लग्न, मंगळागौर तर दर वर्षी असायचीच कोणाची तरी, एखादी ताई लग्न होऊन सासरी गेली असायची किंवा एखादी वहिनी वाड्यात नवी आलेली असायची,खूप धमाल मजा मस्तीचे दिवस होते ते. सगळं बालपण डोळ्यासमोरून जाता जाता एका दिवसापाशी मात्र स्वाती जास्तच रेंगाळली.


राम राई साई सुट्टयो ,जास्तीची मेजोरीटी 2,3वेळा करत महेश वर आज डबा ऐस पैस चं राज्य आलं, लांबवर डबा फेकून सगळी पोरं पोरी पटापट लपली, महेश ने सावकाश डबा आणून चौकातल्या मध्यभागी ठेवला आणि त्याची नजर लपलेल्या सवंगड्यांना शोधायला लागली. स्वाती तशी सावध खेळ खेळणारी, एक जण कोणीतरी आऊट झाल्याशिवाय ती डबा उडवायला आजिबात धावायची नाही, कारण एकदा राज्य आलं की खेळ संपेपर्यंत राज्य पिदायचं हे ठरलेलं, अपवाद फक्त ज्यांना मोठे बहीण भाऊ आहेत त्यांनी राज्य घेतलं तरच. पण खेळताना मज्जा यायची, मुलांचे शर्ट घालून मुली मुद्दाम छोटासा कोपरा बाहेर काढायच्या की चुकीच्या नावाने डबा ऐस पैस केलं राज्य असणारयाने की अंड फुटायचं. मुलगे सुध्दा कधी कधी मुलींचा फ्रॉक घालायचे, त्या काळात असं एकत्र खेळताना मुलींना फ्रॉक च्या आत फक्त पेटीकोट पुरायचा. आई वडिलांना वाड्यात एकत्र खेळताना मुलगी म्हणून कधी काळजी करावीशी वाटत नव्हती, इतकं सगळे मुलगे काळजी घ्यायचे सर्वांची. आज राज्य आल्यावर महेश सावधपणे लपलेल्या सवंगड्यांचा शोध घेत होता, त्याची तीक्ष्ण कावळ्याची नजर सर्वानाच माहीत होती त्यामुळे कोणीही डबा उडवायला जायचं धाडस करतच नव्हतं. महेश ची नजर जेव्हडी कावळ्याची होती तशीच त्याची कर्णेद्रिये पण तीक्ष्ण होती. छोटासा आवाजही त्याच्यासाठी खूप होता, एका काळोख्या जागी एकत्र लपलेले 4,5 जण त्याने बरोबर हेरले आणि पटापट त्यांची नावे घेऊन डबा ऐस पैस केले, नेमकं सगळ्यात आधी नाव स्वाती चं घेतलं, पाठोपाठ सगळेच आऊट झाले आणि दुसऱ्याच डावाला स्वाती वर राज्य आलं. स्वातीच्या बरोबरीच्या 3 जणी, त्यांची प्रत्येकीचे 2,2 मोठे बहीण किंवा भाऊ, महेश आणि तिच्या सारखा एखादाच एकटा असणारा असे 9,10 जण त्या दिवशी खेळात होते. आज राज्य पिंगणार याची मनोमन खात्री बाळगतच उडवलेला डबा घेऊन ती अंगणाच्या मधे येऊन उभी राहिली. लपण्याच्या जागा सर्वच माहीत असल्या तरी कोण कुठे आहे हे शोधायला जागा सोडावी लागणारच होती तिला, डब्यावरचा पाय एक फूट सुद्धा बाजूला नसेल गेला तर तिचा डबा उडवला गेला... दुसर्या वेळेस राज्य, यावेळी सगळे एकदमच एकत्र धावत आले आणि डबा उडवला, सगळे एकत्र आल्यामुळे तिला समजलंच नाही नाव तरी कोणाचं घेऊन आउट करायचं ते, तेव्हड्यात माई म्हणाली "अगं स्वाती ,अशा वेळेस सर्वांच्या नावाने डबा ऐस पैस म्हणायचं, मग सगळे आऊट, सुटतील परत त्यात काय." अच्छा असं असतं होय, खेळातील नवा धडा 10 वर्षांच्या स्वातीला मिळाला, 14 वर्षांच्या माई कडून.वाड्यात हीच तर मज्जा असते, खेळता खेळता च खूप काही शिकायला मिळतं, जीवनानुभव असे बालवयात च पदरी पडतात जणू. तिसऱ्या वेळेस स्वाती पुन्हा डबा घेऊन येऊन डब्यावर पाय देऊन उभी राहिली, कमरेवर हात, डब्यावर पाय आणि मान वळवत फिरणारी नजर, आविर्भाव तर असा होता जणू आत्ता ही सगळ्यांना आऊट करेल. पण हा आविर्भाव क्षणात धुतला गेला, दादू ने येऊन डब्बा उडवला.चौथ्यांदा राज्य, आता मात्र ती रडकुंडीला आली, मुश्किलीने डोळ्यातलं पाणी पापण्यांच्या आड रोखलं आणि फुटू पाहणारा हुंदका ओठ दाताखाली दाबून अडवला. बाजूलाच तिची दुसरीतली बहीण तिच्या सवंगड्यांबरोबर भातुकली मांडून बसली होती. राज्य नंतरही घ्यावं लागणारच होतं. मनात खरा राग येत होता महेश चा, काय गरज होती त्याला माझं नाव पहिल्यांदा घ्यायची, नसतं घेतलं तर आज मला असं सतत राज्य नसतं ना घ्यावं लागलं. डबा उडवायला जाणाऱ्या सगळ्या सवंगड्यां बरोबर जाताना तिने एक रागाचा कटाक्ष महेश कडे टाकून नाक मुरडून दाखवलं त्याला. आणि तेव्हड्यात महेश जोरात ओरडला, "मी खेळ सोडतोय, घरी जातोय," 'का रे? का रे?' सर्वच विचारत होते, त्याने कारण काहीच सांगितलं नाही, स्वातीला वाटलं आपण नाक मुरडून दाखवलं म्हणून रागावला वाटतं, उद्या आई जेव्हा देशमुख काकूंकडे ती शाळेत जाताना सांभाळण्यासाठी सोडेल तेव्हा या ठोंब्याने तक्रार नाही केली म्हणजे मिळवली असं मनात येताच पून्हा तीच मनात म्हणाली रागावला तर रागवू दे, उद्याचं उद्या बघू,म्हणून ओठ उडवत ती डबा आणायला गेली. परत आली तर हा शाणा तिथेच ओटीवर बसलेला. स्वाती

मनातल्या मनात म्हणाली पण, येडा च आहे, इथेच बसलाय तर खेळ का सोडला, काय जणू. विचारात हरवलेली स्वाती कोणाला आऊट करायच्या आतच डबा उडवला जाऊन पुन्हा राज्याची धनी बनली होती. 5व्यांदा राज्य, सगळे जामच हसत होते, तिला मात्र रडू ही येत होतं नि राग सुध्दा. पण आज कधी नव्हे ते स्वाती चं राज्य पिंगवायला मिळतंय म्हटल्यावर सगळ्यांनाच मज्जा वाटत होती हे ही तिला पटत होतं. निघाली सगळी सेना डबा दूरवर उडवायला आणि तेव्हड्यात महेश पुन्हा खेळायला आला. 'मी आलो परत,' तो असं म्हणताच स्वाती नाचायला लागली 'नवा गडी नवा राज,नवा गडी नवा राज' आणि नियमानुसार खरंच तर होतं ते. ती नाचतेय बघून तिच्या मैत्रिणी टाळ्या वाजवत नाचायला लागल्या आणि जरा मोठी मंडळी ओ के म्हणत डबा उडवायला सज्ज झाली. स्वाती मागे होती, डबा आणायला जाता जाता, महेश ने तिच्या डोक्यावर टपली मारली नि पुटपुटला 'येडी पोर'. आणि हसून डबा आणायला गेला. स्वातीला महेश च्या हसण्याचा, टपली मारून पुटपुटण्याचा अर्थ लागायला क्षण पुरला आणि त्याने काय केलं ते तिला उमजलं. महेश चं राज्य पिदणार

नव्हतंच, त्याने पटापट सर्वांना आऊट केलं, पुढे 2,3 डाव रंगले पण आता स्वातीचं खेळात लक्ष नव्हतंच. तेव्हड्यात सर्वांच्या आईच्या हाका आल्याच, खेळ थांबला. स्वाती ची धाकटी बहीण ताई ताई करत तिच्याजवळ आली, तिच्या खेळातली गम्मत तिला सांगू लागली. देशमुख काकूंकडे तिची आई बसली होती, उद्या तिच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम होता आणि तिला घरी यायला उशीर होणार होता, स्वाती, चित्रा थोडा जास्त वेळ उद्या राहतील तुमच्याकडे देशमुख वहिनी असे आई चे शब्द तिने देशमुखांच्या घरात शिरता शिरता ऐकले. देशमुख काकू आईला सांगत होत्या, असू दे हो स्वाती ची आई, राहतील मुली इथे, त्यात काय, काही काळजी करू नका, माधुरी मनीषा बरोबर छान रमतात त्या. आणि "महेश दादा पण असेलच ना मस्ती करायला, खेळायला आमच्या बरोबर" हो तर नक्कीच असेल असं म्हणता म्हणता स्वाती आणि महेश ची आई दोघीही डोळे मोठ्ठे करून बघायला लागल्या, महेश, मनीषा, माधुरी, आणि देशमुख काका सुद्धा मोठं नवल घडल्यासारखे बघत होते... इतक्या वर्षात स्वातीला माधुरी मनीषा ला ताई म्हणतेस तसं महेश ला दादा म्हण हे सांगूनही कधीही न ऐकलेली स्वाती आज महेश दादा मस्ती करायला असेल म्हणत होती. नक्की काय जादू घडली होती आजच्या खेळात हे या मोठ्या मंडळींना कधीच कळणार नव्हतं.

पण दादापण निभवायला महेश मात्र तय्यार होता.


Rate this content
Log in

More marathi story from Anu Apte