STORYMIRROR

Swati Kanitkar

Children Stories

3  

Swati Kanitkar

Children Stories

आजोळच्या गावी जावे.......

आजोळच्या गावी जावे.......

2 mins
144

आपणा सर्वांनाच मे महिन्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी मिळाली की आपल्या आजोळी जावेसे वाटते. माझे आजोळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील, 'विलये' हे डोंगर दर्याखोर्यंयांनी नटलेले एक निसर्गरम्य खेडेगाव. आम्ही दर मे महिन्यात कोकणात जायचो. आधी आमच्या लहानपणी आम्ही तरेने ( होडीने ) जायचो. पण पाण्याला भरती असल्याशिवाय होडी चालायची नाही. मग आम्ही राजापूरला एका मामाकडे मुक्काम करायचो. तरी भरती नसेल तर आम्हाला डोंगर पासून आमच्या गावाला डोंगर दर्यातून, पठारातुन चालत जावं लागे. बाजूने नदीचे वाहते पाणी आणि झाडी हे मनोहर दृश्य बघायला मिळत होते. आणि मग तीन ते साडेतीन तास चालल्यावर लांबुनच कोठेतरी एक टुमदार घर दिसायचं. आम्ही मळ्यातून वाट काढत जायचो. गडग्याच्या इथुन रायवळ आंबा आम्हाला खुणावायचा. मग गोठ्यामध्ये पाच मिनिटे शिरून खळयामधुन ओसरीवर जायचो. मग नंतर माजघर ओलांडून मागच्या खळ्यातून हात पाय धुवायला विहीरीवर जायचो. मग आजी, आजोबा , मामा, मामी आम्हाला दटावायचे की विहीरीत डोकावू नका. ह्या विहीरीच्या पाटाचे पाणी झाडांना मिळायचे. तिथे एक हौद होता. त्या हौदाला कळशी किंवा माठ व हंड्याने मामी, आजी, आई पाणी भरायचे. तिथे एक तिसरे मस्त मोठं खळ होतं. त्याच्या उजव्या बाजूला औदुंबराचे झाड होते. व तुळशी वृंदावन होते. नंतर आमची गँग स्वयंपाकघरात जाऊन मऊ भातावर तुटून पडायची. त्या मऊ भातावर वेसवार ( मेतकुट ), तूप किंवा दही आणि आंब्याचे लोणचे व फोडणीची मिरची घेऊन अक्षरशः स्वर्गातल अमृत प्राशन करायचो. मऊ भाताची पातळ पेज, आंबे, फणस, कैरी, काजू पपई, दारातले रामफळ हे एखाद्या पंचपक्वानांच्या पेक्षाही लाख मोलाचे वाटायचे. आणि रानातला मेवा म्हणजे करवंद, जांभळं जाम वगैरे ह्यांचा आम्ही आस्वाद घ्यायचो. ह्या सर्वांमुळे मला असे म्हणावेसे वाटते की

घर असावे कौलारू घरासारखे

नकोत नुसत्या भिंती

मायेचा असा आजोळचा ओलावा असावा,

नकोत नुसती नाती

आणि ज्या क्षणाची आम्ही मुलं वाट पाहायचो तो क्षण म्हणजे गावाला जाण्याचा.

शाळेला सुट्टी पडावी पटकन

आमची गट्टी जमावी एस्टी व गर्द झाडी झुडुपांशी

पळत पळत जावे मामाच्या गावाला चटकन,

जाऊया मामाच्या गावाला जाऊया.

अशा माझ्या लाडक्या आजोळच्या माणसां बरोबरच त्या अगत्यशिल आणि आमचे बालपण समृद्ध करणार्या घराचे मी ह्या लेखाद्वारे आभार मानते. जसे एखाद्या माणसाचे आपण आभार मानतो तसे या आजोळच्या वास्तुचे मी आभार मानते.


Rate this content
Log in