Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

1  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

सर्वा।

सर्वा।

7 mins
1.4K


    दिवाळी संपून पंधरा दिवस झाले. तशी या वर्षी दिवाळी थोडी उशीराच आली मना, नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात. आता गावातील मंडईच्या निमीत्ताने घरोघरी येणारे पाहूणे, पाहूणचार आटोपून आपापल्या गावाला परत जायला लागली होती. सगळे ग्रामीण भागातील. कुणी शेतकरी तर कुणी बटईदार, तर कुणी शेतमजूर. म्हणजे काय तर सगळे कोणत्या ना कोणत्या स्तरावर शेतीच्या कामाशी जुडले होते.

पाहूणे परतू लागले, आणि घरमालक आपापल्या शेतावर जावू लागले.

अशाच एका सायंकाळी नर्मदा, "बकुळे, अव बकुळे। काय करतस व। अव बकुळे." आपल्या घराशेजारच्या व नेहमीच्या ओळखितील बकुळेला आवाज देत,तिच्या घराच्या बाहेर उभी राहून,ती बाहेर निघण्याची वाट बघू लागली.

खूप वेळाने, " कोन होय???" मागच्या परसबागेतून दाराजवळ उभी राहून बकुळेचा लांब सुर।

"अव येन व इकळे, मी होव नर्मदा."

बकुळेने आवाज ऐकला व हातात विळा घेवून बाहेर आली.

"बोल व। काय मनतस माय." बकुळा

"आमचा हलका धान आला व कापावले, आपल्या संगच्या बाया पाय अन् सांग त्यायले, उद्यापासनच सुरू करून देवून."

"उद्या?? असा कसा होइल? कोनाचे इरे पाजवले आयेत, कोनाचे नसत। मिच त आता इऱ्यान हरदिले खंती मारत होतो. अव मायाच इरा पाजवला नसे." बकुळा

"अव काय इऱ्याची फिकर करतस माय, माया घरी पाच सहा इरे पाजवले अन् मुठ बी बसवले आयत." नर्मदा

"अव पन सगळ्याजनी घरी आयत क नाइ त पयले पावा लागन न, त्यायले ईचारा लागन। आतासीन अंधार पडता सांगाले आलीस." बकुळा

"मंग कसी मनतस." नर्मदा

"उद्याचा दिस जावू दे. उद्या ये तू, मी तवरीक त्यायले पायतो गावावरून आल्या क नाई सगळ्या, अन् काय मनतत त इचारून बी ठेवतो. मंग बोलून." बकुळा

"बर, पाय मंग तसी मी येइन उद्या संध्याकाळी, ढोर घेवून येवाच्या घनी." नर्मदा.

नर्मदा आपल्या घरी गेली. आणि बकुळा हातातील विळा, छपरातील वरणीला खोचून, लागलीच मागच्या पावलाने वळली। आणि दोन तिन घराच्या अंतराने एका छोट्याशा झोपडीत गेली.

"रखूमे, अव् रखूमे। आयस का???" बकुळा.

"कोन होय।। ये इकळे." रखमा ने बसल्या जागून हाक दिली.

"अव मी हो।" म्हणत बकुळा सरळ आत गेली.

रखमा चुलीजवळ, स्वयंपाकाच्या काड्या छोटे छोटे तुकडे करून, तळपायाने मोडत होती. रखमाने जवळच भिंतीला टेकलेला एक पाट तिच्या कडे सरकावत,

"ये।बस।"

"कवा आलीस व गावावरून."

"कालच आलो, सांग काय मनतस." रखमा

"नर्मदी आलती, मने आपल्या संग च्या बायाले सांग,हलका धान आला आहे काटावाले, उद्यापासून हलका धान धरावाचा आये. मी मनलो, उद्या नाइ येवू,पयले सगळ्यायले सांगा लागल.उद्या ये मनलो तिले." बकुळा।

"बेस केलीस. इरे गिरे पावा लागतील. बाकिच्यायले बी उद्या इचारून घे. अन् बाई, बोलनी पयले करून घेजो गा. मंग वेळेवर झंझट नायी पायजे." रखमा

"हो तुमी सगळ्या जसे मनजा तसे."

आणि बकुळा परत जायला उठली. तोच,

"अव बस न्। घोटभर चाय घेन व्." म्हणत रखुमाने लवकरच चुलीत काटक्या लावून छोट्याशा पातेल्यात चहा ठेवला. चहा शिजेपर्यंत दोघींनी हालहवाला विचारला आणि चहा शिजताच, दोघी चहा घेवून , बकुळा घरी परतली. तिला ही स्वयंपाकाला लागायचे होतेच. पण तिच्या जिवाला मात्र स्वस्थता नाही. तिने चुल पेटवली आणि पटापट स्वयंपाक करून मोकळी झाली. आता तिच्या पायाचे चाक, फिरायला चुटपूट करू लागले. तिला सोबतच्या सख्यांना केव्हा भेटते, व केव्हा धान कटाइला जायचे आहे म्हणून सांगते असे झाले. ती पुन्हा घरी लेकरांना सांगून बाहेर पडली. आणि परतली ती दोन तासा नंतर. जेव्हा बकुळा परतली, तेव्हा तिच्या मुखावर, पुर्वी असलेली अस्वस्थता कुठल्या कुठ गायप होवून, ती आता एखादे कार्य फत्ते केल्याच्या आनंद व समाधानाने संतूस्ट झाल्याचे दिसत होती.

घरच्यांनी कुणीच तिला कुठे व कशासाठी गेली होती, हे विचारले नाही.

दुसरा दिवस उगवला,तसा नेहमी प्रमाणे मावळतीला आला. आणि शेतातून ढोर यायच्या वेळेवर नर्मदा बकुळाच्या अंगणात आली. आज तिथ छपरात आधीच पाच सहा महिला बसलेल्या तिला दिसल्या. तिने सगळ्यांकडे पाहिले. त्या सगळ्या तिला नेहमीच्या व ओळखिच्या होत्या.

"बेस झाला. सगळा मेळ एकाच जागी भेटला व बाई." नर्मदाने आनंद झाल्याचा भाव व्यक्त करून, बोलणीला सुरवात केली.

"सांगा व कसा घेता. गुथ्यात घेता क हुंड्यान घेता? धानात घेता क पैस्यान घेता? क रोजीन् येता। सांगा."

सगळ्या एकमेकी कडे बघू लागल्या. सल्ला तर आधीच झाला होता त्यांचा, पण म्होरकरनीने समोर बोलायचे होते. रखूमा,"एकरा परमान् हुंड्यात घेवून आमी."

नर्मदा थोडा वेळ विचार करू लागली.

"काय भाव घ्याल त्।" नर्मदा

"जो गावात सुरू आहे तोच आमी बी घेवून, पन बाई, धान कापून झाल्यावर आमी सर्वा बी येचून."

"येचा न त बापा। तुमाले कोन् नाइ मनला. मले काय येवळा वेळ आये का, क मी उचलत बसीन."

मालकीन आणि मजदुरनींमधे मोलभाव झाला. नर्मदा घराकडे परतली.

तशाच सगळ्या एकमेकींना, "उद्या लवकर उठा ये, सात वाजत नाइत् बाद्यायवर पोहचलू पायजे. आठ दिवसात कापकुप करून साफ. टाक मना आमचा पैसा."

सगळ्या भविष्यात हातात येणाऱ्या पैशाची कल्पना करून आनंदल्या, हर्षोल्लासीत झाल्या. आणि खी खी करून, पदर तोंडाला लावत, हसत घरी निघून गेल्या.

दुसऱ्या दिवसापासून, गावात धान कटाई सुरू झाली. एका एका शेतकऱ्यांच्या शेतातील धान कटाइ होवून, महिण्या भरात, पूर्ण गावकऱ्यांचे शेत साफ. आता गावातील धान कटाइ संपली.

आणि आजुबाजूच्या गावांमधे रोजी मिळते का? याचा शोध सुरू झाला.

कुणाला मिळाला,कुणाला नाही मिळाला.

ज्यांना बाजुच्या गावामध्ये रोजी मिळाली, ते बाजूच्या गावी गेले मजुरीला. ज्यांना जवळपास मजुरी लागली नाही, त्यांनी दुरच्या गावांकडे धाव घेतली.

बकुळाच्या गावाहून, दोन कि.लो.मिटर अंतरावर असलेला एक छोटासा रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनवरून, दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकल व पँसेंजर गाड्या वाटेतील छोट्या,छोट्या खेड्यातील स्टेशन ला थांबून,चढणारे व उतरणारे प्रवासी घेवून पुढे धावत असत. अशाच गावांना हे शेतमजुर, गावातील शेतीचे काम संपून रोजी संपली, की शेतीच्या हंगामानुसार, कधी रोवणी,कधी निंदन, कधी धान कटाई, तर कधी मिरच्या तोडीला जायचे. बकूळा व तिच्या सोबतीनींचा समुह पण त्यात समाविष्ट रहायचा.

डिसेंबरच्या मध्यापर्यंत जवळ जवळ सगळ्यांच्या शेतातील धान कटाइ होवून, धानाचा चुरणा होवून, धान राइसमिलावर पिसाइ साठी नेण्यात येवू लागले. आणि आता या महिलांनी, शेतातील सर्वा वेचायला जायला सुरवात केला.

बकुळा, रखमा आणखी तिघी चौघी अशा सोबतीने, एक मोठा ओडगा( बांबूची मोठी टोपली) पण शेणाने, नेहमी नेहमी सारवून चांगला चिकन केलेला व छोट्या छोट्या फटी बुजवलेला मोठा टोपला. त्याच्या सोबत वर्षभर घर वा अंगण झाडून झाडून सिंदीच्या लांब लचक फळ्याचा पुर्ण बुचा जावून, पेंट मारायच्या ब्रश येवढ्या आकाराचा फळा, जुन्या पुऱ्यान्या नवूवारी साडिचा काँटन चा फडका, व एक बांबू पासून बनलेला, पण किटनवलेला सुप.

किटनवलेला म्हणजे, बाजारातून नवा कोरा आणलेला सूप. खूप सुती कापड जाळून, त्याची उरली राख हाताने चांगली मळून, त्यात असली जवसाचे तेल टाकून ते मिश्रण कालवून संपुर्ण सुपाला लावले जाते. म्हणजे लिपून सारवले जाते. त्यातील तेल उन्हाने उडून मिश्रण सुपाला पलिस्तर केल्याप्रमाणे पक्के होइपर्यंत सुर्याच्या उनेला वाळत घातलेला काही दिवसाने तेल उडून जातो. व सुप दहा वर्षे तरी टिकणार येवढा मजबूत होतो. सोबत जेवनाची शिदोरी व पाण्याची बाँटल. येवढ साहित्य घेवून बकुळा व तिच्या सोबतीनींनी महिणा भराची पास काढून जवळ्या गावातील शेतात सर्वा वेचायला जावू लागल्या.

शेतात गेल्यानंतर, धान कापतांना व नंतर धानाची मळणी करून, बारदान्यात भरून धानगिरणीवर नेल्यानंतर, त्या बांद्यांमधे राहिलेला व इकडे तिकडे सड्यासारखा विखूरलेला धान, छोट्या फळ्याने झाडून झाडून एकत्र करून, नंतर जवळ असलेल्या काँटनच्या म्हणजे सुती फडक्याने वेचून, तो हाताने झटकत झटकत सुपात जमा करायचा. पसा पसाभर जमा झाले की , पाखळून नंतर तो धान नंतर ओळग्यात जमा करायचे.

धान कापडाने वेचले की जमिनीवरील माती न येता केवळ कापडाला धान चिकटून तेवढेच गोळा केले जाइ.

अशा प्रकारे सायंकाळी परतिची गाडी येइपर्यंत दोन किंवा चार पायल्या,जेवढे मिळेल तेवढे धान गोळा करून, पून्हा बकुळा व सोबतीनी रेल्वेनेच परतत असत.

याच मोसम मधे आजुबाजूच्या गावी यात्रा वगैरे भरीत होत्या. लग्नसराइला पण सुरवात झाली आणि रोजचे ये जा करणारे तर होतेच.

एक दिवस, "रखूमे, आता सर्वाबी सरत आला व्. दिवसभर बांद्या झाडू झाडू, टोपल्यात दोन पायल्या धान जमा नाइ हो. जावू दे बाई, जेवळा झाला तेवळा. उगाच हाल हाल करत या कुत्र्यासारखा अन् संध्याकाळी दोन टिबूकल्या हालवत घरी जा. त्याच्या पेक्षा उद्यापासून येवूच नाइ." बकुळा धान गोळा करता करता बोलली.

"हो गा बाई, जावू दे. जेवळा झाला तेवळा. होइल लेकरायले संकरातीले मुरमुरे खावाले. नाइ येवू उद्यापासून."

सगळ्यांनी एका सुरात एकमत केल. आणि नेहमीच्या वेळेवर रेल्वेस्टेशन कडे निघाल्या.

प्लेटफार्म वर आल्या. तिथे चढणाऱ्यांची गर्दी होतीच. नेहमीच्या वेळेवर गाडी आली. पण जेवढे चढणारे होते, त्यापेक्षा दुप्पट उतरणारे होते. उतरणारे उतरले आणि तेवढ्याच घाईने चढणाऱ्यांची धावपळ सुरू झाली.

बकुळा व इतर महिला डोक्यावर टोपल घेवून, एका हाताने दारवाज्यातल्या दंड्याले पकडून वरती चढत पूर्ण दाराची अडवणूक केली.

सगळ्याजणी आत मधे कुठे जागा मिळते का म्हणून घुसल्या. आणि इकडे खालचे प्रवासी वर चढून पुन्हा गाडी तशीच पँक झाली.

बकुळा जागेच्या शोधात थोडी आतमधेच गेली. आणि खिडकी जवळची थोडिशी जागा तिला टेकायला मिळाली.

एक स्टेशन जावून दुसराच स्टेशन तिचा गाव होता. नेहमीच्या आपल्या गतीने भरभर गाडी धावत पूढे गेली. आणि एक स्टेशन मागे सुटून, बकुळाचा गाव आला.

खिडकी जवळ बसली असल्यामुळे, गार वारा अंगाला लागून व दिवस भराचा अंगावरील कामाचा शिणवा, यामुळे तिला झापळ आली. दाराच्या जवळ पास असणाऱ्या सोबतीनी स्टेशनवर उतरून गेल्या. आणि बकुळा मात्र आतमधेच राहिली. रखूमाने खाली उतरुन पाहिल तर बकुळा सोबत उतरलेली तिला दिसली नाही.

"अव माय, बकुळी कोटी रायली." रखुमा ओरडली.

"अव उतरली काइ, क रायली अंदरच. खिडकी जवळ बसली होती." दुसरी बोलली.

आणि रखुमा धावत खिडकी जवळ गेली. तर बकुळा खिडकीला टेकून झोपलेली दिसली.

"ये बकुळे, अव उतरन् गाव आला." रखुमाचा आवाज कानी पडताच, ती खळबळून जागी झाली. आणि सिट वरून उठली. पण तोच आगगाडीने शिट्टी मारली. व एक धक्का देत गाडी सुरू झाली.

"अगे माय, गाडी बी सुरू झाली न व्."

खाली रखमा व वर बकुळा एकाच वेळेस उद्गारल्या.

इकडे रखमा पण थोडीशी कावरी बावरी झाली, "आता काय करणार ही."

आणि तिकडे बकुळा पण घाबरून पटकन मांडिवरचा टोपला डोक्यावर घेत, "ये दादा.. अगा हट. बाजुले हो. मले उतरावाचा आये." बकुळा ओरडली.

"अव त आतावरी काय करत होतीस मावसी."

"अगा डोरा लागला गा दादा जरासा." तोंडाने पुटपुट करीत, ती गर्दीतुन वाट काढत, कशी तरी दारापर्यंत येण्याचा प्रयत्न करू लागली. पण कुणी न कुणी मार्गात आडकाठीच करी.

शेवटी ती दारात येइ पर्यंत गाडीने प्लेटफार्म सोडला. बकुळेने मात्र उतरण्याचा घाइत या गोस्टीकडे दुर्लक्ष केला.

तिने पहिल्या पायरीवर पाय ठेवला. आणि खाली प्लेटफार्म ची फरशी असेल, या अंदाजाने पाय मांडण्याचा प्रयत्न केला. पण तिची गफलत झाली.

तिचा पाय एखाद्या खोल दरीत गेल्याप्रमाणे,ती खाली पडली आणि डोक्यावरचा सर्वा वेचलेला टोपला, कुठे तरी घरंगळत जावून, धान अस्तावेस्थ झाले.

आणि बकुळा, बकुळा पटरीत पडून तिच्याही अंगावरील कापडासह देहाच्या चिंधळ्या चिंधळ्या झाल्या.

प्लेटफार्म मधील लोक तो पर्यंत धावत आले. पण गाडीने जोराची गती पकडून, केव्हाचेच आपले मार्ग आक्रमीले होते.

हे दृष्य रखमा व सोबतच्या महिलांनीही पाहिले. त्या धावत आल्या.

"अव बकुळे, असी कसी झोपलीस व्, अव उठ न बाय, तुया सर्व्याचा धान कसा सांडला बईनी." रखुमा जिवाचा आकांत करून रडू लागली.आणि लोक बघू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy