Kishor Mandle

Others


4.8  

Kishor Mandle

Others


माणुसकी

माणुसकी

3 mins 1.6K 3 mins 1.6K

स्टेशनच्या जिन्यावरून धावत अनिकेत खाली आला. विरार ट्रेन निघणार तितक्यात कंपार्टमेंटमध्ये शिरला आणि ट्रेन चालू झाली. कंपार्टमेंटमध्ये दोन-तीन लोक होते. खिडकी पकडून तो बसला. तासभर तरी लागणार होता. त्याने बॅग बाजूला ठेवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. एकेक स्टेशन मागे जात होते. डोळे अलगद निद्रेच्या स्वाधीन झाले. अचानक हसण्याचा आवाज आला आणि त्याची झोप तुटली. घड्याळात 11 वाजले होते. आता तो एकटाच होता. स्टेशन आले होते आणि पाच सहा जणांचे टोळके आत आले. त्यांच्या मागे एक मुलगा आत आला. नजर बावरलेली, एक प्रकारची भीती चेहऱ्यावर दिसत होती. ते टोळके त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसत होते. अनिकेतने त्या मुलाकडे पाहिले. बारीक अंगयष्टी आणि बॅग छातीजवळ धरून तो अनिकेतच्या समोर बसला. त्या टोळक्यातून एकजण मोठ्याने ओरडला

“ए गुड, लेगा क्या”

समोरचा मुलगा अजूनच बावरला. अनिकेतकडे पाहत तो खिडकीला टेकून बसला. अनिकेतला साधारण अंदाज आला की तो मुलगा थोडा बायकी वाटत होता. अनिकेतने लगेच नजर फिरवून बाहेर पाहिले. दरवाजा जवळ उभे राहून ते टोळके त्या मुलाला काहीबाही बोलत होते. अनिकेत बाहेर पाहत होता पण कानावर शब्द पडत होते. ती मुले नको नको ते शब्द वापरत त्याला आवाज देत होते. अनिकेत ते शब्द कानावर पडत असूनही बाहेरच पाहत होता, पण एका क्षणाला त्याचे लक्ष समोर बसलेल्या मुलाकडे गेले. तो मुलगा डोके टेकवून बसला होता. त्याच्या बंद डोळ्यातून एक छोटासा अश्रू गालावर ओघळला होता. एक अनामिक चीड आतून उसळून आली, पण… समोर बसलेला बाह्य रुपावरून तरी पुरुष होता. अश्या कुणासाठी काय विचार करायचा. 2 स्टेशन उरले होते. फक्त 10 मिनिटांचा प्रश्न होता. अनिकेत पुन्हा बाहेर पाहू लागला. फारतर काही सेकंद गेले असतील आणि त्या टोळक्यातला एक मुलगा समोरच्या मुलाच्या बाजूला येऊन बसला. आता हुंदक्याचा आवाज थोडासा वाढला. फारतर काही क्षण गेले असतील आणि अनिकेतने न राहवून पाहिले. समोर बसलेल्या मुलाच्या हाताला जबरदस्ती ओढत बाजूचा मुलगा स्वतःच्या जननेंद्रियाला लावायचा प्रयत्न करत होता. मस्तकात एक रागाची सणक पसरली. अनिकेत मनगटावरचे कडे मागे सरकवून उठला आणि एक सणसणीत कानाखाली बाजूच्या मुलाच्या कानाखाली वाजवली. मर्दांगी दाखवणारा तो मुलगा हेलपटत खाली पडला. ट्रेन एव्हाना स्टेशनला लागत होती. अनिकेत उठून उभा राहिला आणि खाली पडलेल्या मुलाच्या पेकाटात लाथ घालत बाकीच्या मुलाकडे पाहत बोलला

“ह्याला उचलायच आणि गपचुप खाली उतरायचं”

खाली पडलेल्या आपल्या साथीदारांची हालत आणि अनिकेतचा पवित्रा पाहून सगळे मर्द धावत खाली उतरले. खाली पडलेला शेवटचा मर्द कसातरी धडपडत खाली उतरला. अनिकेत दरवाजा जवळ आला आणि मोठ्याने ओरडला

“परत दिसला ना, तर मी घेईन एकेकाला”

ट्रेन निघाली. श्वास आवरत तो आत येऊन बसला. समोरचा मुलगा अजूनही थरथरत होता. काही क्षण त्याला तसाच पाहत असताना न राहवून अनिकेत उठला, आणि त्या मुलाच्या बाजूला बसला. अनिकेतने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला तसा त्या मुलाने मिठी मारली. हमसून रडत असताना त्याची मिठी अनिकेतला का कुणास ठाऊक अबनॉर्मल वाटली नाही. शेवटचे स्टेशन येणार होते. अनिकेतने त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि बोलला

“dont worry, मी आहे”

ट्रेन शेवटच्या स्टेशनवर आली, हळूहळू थांबली. तो मुलगा अजूनही अनिकेतला बिलगून बसला होता. त्या मुलाचा होणारा स्पर्श awkard नव्हता.

तो स्पर्श फक्त एखाद्या मदतीसाठी हाक देणाऱ्या व्यक्तीचा होता, मग ती स्त्री असो, पुरुष असो… किंवा चुकीच्या शरीरात अडकलेल्या जीवाची असो.Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design