Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nagesh S Shewalkar

Others

5.0  

Nagesh S Shewalkar

Others

त्रिकोणीय सामना

त्रिकोणीय सामना

9 mins
1.8K


"नमस्कार! ही आपली सर्वांची लाडकी, आवडती सरमिसळ वाहिनी! मी गुलाबी गुलाबो तुमचे गुलाबी शब्दांसोबत, गुलाबी गुलाबी पुष्प दाखवून मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते, शुभेच्छा देते. आज स्टुडिओमध्ये हे बदललेले वातावरण, सर्वत्र पसरलेली ही गुलाबी रंगाची मनमोहक, आकर्षक छटा पाहून तुम्हाला आज 'गुलाबी दिवस, रोज डे..'आहे की काय अशी शंका आली असेल परंतु तसे काही नाही. आज आहे..... प्रेम दिवस.... वैलेंटाईन डे!.... विसरलात ना? सर्वात प्रिय व्यक्तीला आजच्या प्रेमदिनाच्या गुलाबी शुभेच्छा दिल्यात ना? विश केले ना? साथीदारास आवडणारी डिश बनवली का? भेट वस्तू देताना सेल्फी काढलीत का? नाही? अरेरे! काय सेल्फीश आहात हो. उठा. पळा. विश करा. सरप्राईज द्या. छानसे गिफ्ट द्या. थांबा. थांबा. अहो, लगेच निघालात का? काय बाप्पा तुमची घाई. अशी लगीनघाई करु नका. आजचा हा विशेष दिन संपायला खूप अवधी आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटायला जाण्यापूर्वी तुमच्या आवडत्या सरमिसळ वाहिनीने आजच्या या विशेष दिनानिमित्त तुमच्यासाठी आणलेली ही दोन दृश्य तर पाहून जा. तर बघा...अशी वेळ तुमच्यावर येऊ नये या अपेक्षेने..गोडगुलाबी शुभेच्छांसह!"

•• दृश्य पहिले ••

ते एक फार मोठे शहर होते. इतर कोणत्याही मोठ्या शहरात असणाऱ्या बागेप्रमाणे त्या नगरीतही एक छान, सुंदर, मनमोही, विस्तीर्ण अशी बाग होती. मुळात सुंदर, आकर्षक असणाऱ्या त्या बागेलाही त्या दिनाचे औचित्य साधून मस्तपैकी सजविण्यात आले होते. प्रेम दिवसाचे महत्त्व जाणून तिथे जमलेली तरुणाई बेधुंदपणे प्रेमाविष्कारात दंग होती. जग, देहभान विसरुन मौजमजा करीत होती. तिथे पोहोचलेली सरमिसळ वाहिनीची टिम ती सारी प्रेमदृष्यं टिपत असतानाच त्यांचे लक्ष एका वैतागलेल्या, चिडलेल्या युवकाकडे गेले. सरमिसळची निवेदिका त्याच्याजवळ गेली आणि त्याला विचारले,

"हाय, यंगबॉय! आजच्या या खास दिवशी तुझ्या चेहऱ्यावर ही उदासीनता का? प्रेमिकेची वाट पाहतोय का? येण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी येत नाही असा निरोप दिला का?"

"नाही हो. ती येणारच होती पण शेवटच्या क्षणी बायकोने घोळ घातला."

"म्हणजे तुला बायको असतानाही तुला प्रेमिका आहे? वॉव! किती छान ना? एक सांग, हे तुझं लफडं.... म्हणजे प्रेमप्रकरण तुझ्या बायकोला माहिती आहे का?"

"नाही हो. बायकोला माहिती असते तर तिने मला आज इथे येऊ दिले असते का? पण माझ्या मुर्खपणामुळे काही क्षणांपूर्वीच बायकोला माहिती झाले आहे. शिवाय माझे लग्न झाले आहे हे प्रेयसीलाही कळलं..."

"अरे, बाप रे! आजच्या दिवसाचे मस्त गिफ्ट मिळाल की तुला. पण तुझे हे 'सिक्रेट' दोघींसमोर ओपन कसे झाले?"

"काय झाले, बाहेर जातोय असे पत्नीला सांगून मी प्रेयसीला भेटायला इथे आलो. ठरल्याप्रमाणे प्रेमिकाही येणार होती. मी बाहेर पडताना केलेली ही विशेष केशरचना, घातलेला हा ठेवणीतला पोशाख, माझा मुड, माझी अगतिकता पाहून संशयाचा महामेरू असणाऱ्या पत्नीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असावी. मी प्रेमिकेची वाट बघत असताना माझा भ्रमणध्वनी वाजला. मला वाटले, मी पोहोचलो का हे विचारण्यासाठी मैत्रिणीने फोन केला असावा म्हणून त्यावरील नाव न पाहताच मी भ्रमणध्वनी उचलून म्हणालो,

"हाय जानू, मी पोहोचलाय. किती वेळ आहे तुला? ये ना ग लवकर. आजच्या खास दिवशी मी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतोय...."

"अच्छा! असे आहे तर. घरी तर या. तुमच्या डोळ्यातला प्राण काढून नाही हातावर दिला ना तर टिकली नाही लावणार तुमच्या नावाने."

"बाप रे! म्हणजे फोन बायकोचा होता तर." निवेदिकेने विचारले.

"हो ना. मला बसलेल्या त्या धक्क्यातून मी सावरण्यापूर्वीच माझा भ्रमणध्वनी पुन्हा वाजला. मला वाटले की, मला पुन्हा खडसावण्यासाठी बायकोनेच केला असणार म्हणून मी पुन्हा नाव न पाहताच फोन उचलला आणि म्हणालो, काय वैताग आणलास ग तू? येतोय ना घरी. मग बोलू. बायको आहेस की, घोरपड आहेस... चोवीस तास चिकटून राहायला?"

"मग? काय म्हणाली तुझी ती...."

"तीही जाम भडकून म्हणाली की, तू विवाहित आहेस तर? बायको असल्याचे माझ्यापासून लपवलेस. मला फसवलेस. आय हेट यू! गो टू हेल..." म्हणत तिने फोन बंद केला.

"अरेरे! दोन्ही वेळा राँग नंबर लागला म्हणायचा तुझा. काय वेळ आली तुझ्यावर? बट नेवर माइंड! ट्राय अगेन. मैत्रीण गेली उडत. बायकोला गमावू नकोस. बायको सलामत तो लफडे पचास! आधी घरी जा. जाताना बायकोच्या आवडीची वस्तू, आवडता पदार्थ आणि एक छानसा गजरा घेऊन जा. मग बघ. बेस्ट ऑफ लक! ऑल दि बेस्ट!..." निवेदिका त्या तरुणाला प्रोत्साहित करण्यासाठी म्हणाली.....

"वॉव! बघा एक तीर दो निशाणे साधताना होणारी अवस्था! तेलही गेले, तूपही गेले! अशी फजिती त्या बिचाऱ्याची झाली. असे तुमच्यासोबत कधी झाले का? भविष्यात होणार नाही ही काळजी घ्या. फोनवर कोण बोलतय हे समजल्याशिवाय बोलण्याची घाई करू नका.आता बघूया अजून एक प्रसंग खास सरमिसळ वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी........."

°°° दृश्य तिसरे °°°

संध्याकाळची वेळ होती.सूर्यदेव परतण्याची तयारी करत असताना सृष्टीवर एक सुंदर, अनोखी, मनमोही छटा पसरली होती. वैलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवसाचे वातावरण त्या छटेमध्ये स्वतःची बेधुंद छबी निर्माण करीत होते. प्रेम दिवसाचे निमित्त साधून प्रेमीयुगल एकमेकांवर असलेले प्रेम निरनिराळ्या ढंगाने व्यक्त करीत होते. शहरातील बागबगीचे, उद्यानात भरपूर गर्दी होती. वातावरणात पसरत चाललेल्या धुंदीत प्रेमीजन बेफाम, बेभान होत होते. प्रत्येक जण तो दिवस, तो क्षण अविस्मरणीय कसा करता येईल या प्रयत्नात असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या 'रती हॉस्पिटलमध्ये ' स्वागत कक्षातला दूरध्वनी खणाणला. शेजारी बसलेल्या तरुणीने तो तत्परतेने उचलला. मधाळ आवाजात ती म्हणाली,

"रती हॉस्पिटलमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आमच्या अत्याधुनिक हॉस्पिटलतर्फे प्रेमदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा! बोला. मी आपली काय सेवा करु शकते?"

"धन्यवाद! क्षणभर तर मला वाटले की दवाखान्यासारख्या त्रासदायक, वैताग आणणाऱ्या ठिकाणाहून शुभेच्छा म्हणजे आश्चर्यच.आनंद झाला. धन्यवाद! मला एक रुग्णवाहिका हवी होती."

"अँम्बुलन्स? अहो, हे काय, आजच्या एवढ्या संस्मरणीय दिनी रुग्णवाहिका? अच्छा! हा खास दिवस विशेष आठवणीत राहावा म्हणून प्रेयसीची रुग्णवाहिकेतून धिंड....आय मिन...सफर काढणार आहात का?"

"मी 'मदन' हॉटेलमधून बोलतोय..."

"व्वा! छान जोडी जमली की, रती... मदन! बरे, अपघात झालाय का? मारामारी झालीय का? पोलिसांना कळवले का? ...."

"म...म... मॅडम ऐकून घ्या. आमचे मदन हॉटेल पंचतारांकित आहे. आज वैलेंटाईन डेचा मुहूर्त साधून आम्ही एक योजना जाहीर केली आहे. त्यानुसार आज जी व्यक्ती तिच्या आवडत्या प्रेमिकेला घेऊन आमच्या हॉटेलमध्ये येईल त्यास बिलामध्ये तीस टक्के सुट मिळेल."

"अरे,वा! किती छान! खूप गर्दी झाली असेल ना? "

"गर्दी तर झालीच हो. पुढे तर ऐका. जो मैत्रिणीसोबत न येता बायकोला घेऊन येईल त्याला पन्नास टक्के सुट मिळेल..."

"असे कसे? प्रेमिकेसोबत तीस टक्के आणि पत्नी असेल सोबत तर पन्नास टक्के हा तर मैत्रिणीवर अन्याय आहे. बरे, एक सांगा,जो एकटा.....सिंगल आहे अशांसाठी काही विशेष सुट?"

"आहे. त्यांच्यासाठीही खास ऑफर आहे. अशा अविवाहित तरुण-तरुणी आमच्या हॉटेलमध्ये आल्या तर हॉटेलतर्फे त्यांना त्यांचा आजच्यासाठीचा पार्टनर निवडण्याची संधी देण्यात येईल शिवाय त्यांना तीस टक्के सुटही मिळेल."

"अहो, ऐनवेळी जमवलेली जोडी म्हणजे खाओ-पिओ, मजा करो..."

"मॅडम, विचार बदला, देश बदलेल. आमची अशी भूमिका आहे की, अशा सिंगल मुला-मुलींना एकत्र बसण्याची, खाण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळाली तर हे काही क्षण त्यांना कदाचित विवाहाच्या पवित्र बंधनात बांधल्या जाण्याची संधी देतील."

"बरोबर आहे. समजा, तुमच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी एखाद्याने वेगळाच डाव रचला म्हणजे? कुणी आपल्या पत्नीसोबत स्वतःची प्रेमिकाही घेऊन आला तर?"

"हे अस्स! आत्ता आली बघा,तुमची अँम्बुलन्स रुळावर. तुम्ही म्हणता तशी योजनाही आहे. प्रेमिका आणि पत्नी दोघींनाही जो आमच्या हॉटेलमध्ये घेऊन येईल त्यांना नव्वद टक्के अशी घसघशीत सुट तर मिळलेच शिवाय शहरात कुठेही आमच्या खर्चाने पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येईल."

"अहो, ऐकतानाच माझी उत्सुकता वाढू लागली आहे. एक सांगा, असा एखादा त्रिकोणीय मुकाबला झाला का? म्हणजे असे त्रिकूट आले काय?"

"शुभारंभ झाला. एक नाही तर तुम्ही म्हणता तसे दोन सामने झाले आहेत."

"काय म्हणता? क्या नजारा होगा? त्या दोन्ही महाशयांना आमचे अभिनंदन सांगा."

"एका सज्जनाला नाही सांगू शकणार कारण व्यवस्थापनाने त्यांना बिलाच्या डबल रकमेचा दंड ठोठावून हाकलून दिले आहे."

"का दंड केला?"

"झाले काय, आमच्या जाहिरातीचा लाभ घेण्यासाठी त्या महाभागाने पत्नीसोबत प्रेमिका म्हणून जी मुलगी आणली होती ती त्याची प्रेमिका नव्हती तर साली...मेहुणी होती."

"काय पण बाई, एक गोष्ट लक्षात घ्या ना,'साली आधी घरवाली'असू शकते म्हणजे मैत्रीण, प्रेमिकाही असू शकते. बरे, त्यांच्या नात्याचे गणित उलगडले कसे?"

"आजच्या विशेष सवलतीचा लाभ घेणारांना आम्ही एक फॉर्म देतोय. त्यात त्यांनी तिघांची नावे, वय आणि नाते लिहायचे आहे. या गृहस्थाने 'मेहुणी' असे न लिहिता 'प्रेयसी' असे लिहिले. ते तिघेही त्यांच्या टेबलवर गेले. जेवणाची ऑर्डर देताना,जेवण येईपर्यंत आणि जेवण होईपर्यंत त्यांची गप्पांची

मैफल रंगली. बोलताना ती साली.... मेहुणी हो... त्यास 'जिज्जू, भाऊजी आणि बहिणीला ताई, ताईसाहेब' असे लाडाने पुकारु लागली. दुसरीकडे तिचा भाऊजी आणि जेवणापुरता झालेला प्रियकर तिला, 'साली, सालीसाहिबा' असे हाकारु लागला. ही गोष्ट आमच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. व्यवस्थापनाने त्यांना हटकताच, भांडे फुटल्याचे समजताच ते तिघेही हात जोडून माफी मागू लागले. परंतु ते खोटे बोलले होते. दुसऱ्या शब्दात त्यांनी चोरी केली होती. म्हणून मग त्यांना दुप्पट दंड ठोठावला..."

"दिला दंड त्यांनी?"

"न देऊन कुणाला सांगणार? शेवटी 'पोलीस मार्ग' होताच."

"काय लोक असतात ना. बरे, दुसऱ्या सामन्यात काय झाले?"

"तो मात्र पत्नी आणि मैत्रीण घेऊन आला होता."

"व्वा! काय डेअरिंग वाढलय लोकांचं? एका म्यानात दोन तलवारी? त्या गृहस्थाचे सोडा हो. पण त्या दोघी एकमेकींची उपस्थिती केवळ आर्थिक फायद्यासाठी मान्य करतात हे केवढे आश्चर्य? पण त्या दोघींना ते अगोदर माहिती होते?"

"नाही ना. तोच तर घोळ झाला ना. त्याने दोघींसोबतचे नाते एकमेकींना समजू दिले नव्हते. त्याला वाटले, आजच्या दिवशी प्रेमाची कबुली बायकोला देऊन प्रेयसीला प्रत्यक्ष बायकोची भेट घडवून आणू या. या विचाराने त्याने एक योजना तयार केली. घरातून तो एकटाच बाहेर पडला. त्यावेळी त्याने बायकोला सांगितले की, माझ्या कार्यालयात एक मुलगी आहे. ती इथे एकटीच राहते. आपल्यासोबत तीही जेवायला आहे. मी पुढे जातो. तू एक तासाने हॉटेलमध्ये ये. असे सांगून तो निघाला आणि मैत्रिणीला घेऊन इथे हॉटेलमध्ये आला. 'थोड्या वेळाने बायको येत आहे.'असे आम्हाला सांगून प्रेयसीसोबत कोपऱ्यातल्या टेबलवर बसला. दोघांच्या गुलुगुलु गप्पा सुरु झाल्या. प्रेमिकेला बायकोबद्दल सांगण्याची तयारी करत असताना, हिंमत धरत असताना त्याच्या बायकोचे आगमन झाले. तिला पतीच्या वागण्याचा, बोलण्याचा संशय आला होता म्हणून ती लवकर निघाली. सुखरूप पोहोचली..."

"वाव! ऐकताना खूप मजा येते. पुढे काय झाले?"

"पत्नी हॉटेलमध्ये पोहोचली. तिने काउंटरवर नवऱ्याची चौकशी केली. ती त्या टेबलकडे निघाली. दुरवरुन टेबलवरचे दृश्य पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. तिचा नवरा एका सुंदर मुलीचा हात हातात घेऊन, थंडपेयाच्या बाटलीत दोन नळ्या टाकून मजेने त्याचा आस्वाद घेत होते. पत्नीबाबत प्रेमिकेला सांगण्याची सुरुवात करत असताना खुद्द पत्नीच तिथे हजर झाली. बायकोचा राग सातव्या आसमानतक पोहोचला. ती रागाने थरथरु लागली. तिचे डोळे राग ओकू लागले. तिच्या नवऱ्याचे लक्ष तिच्याकडे जाताच तो भीतीने गारठला. हॉटेलमध्ये असलेल्या वातानुकुलीत वातावरणात त्याचा चेहरा घामाने डबडबला. त्या दोघांची तशी क्रिया-प्रतिक्रिया पाहून त्याच्या प्रेयसीच्या सारे काही लक्षात आले. तिच्या रागाचा पारा चढला. त्याच्या बायकोने आव पाहिला न ताव, शेजारच्या टेबलवरील फुलदाणी उचलून सरळ नवऱ्याच्या डोक्यावर आपटली. नवरा डोके धरून बसलेला असताना, वेदनेने तळमळत असताना राग अनावर झालेल्या मैत्रिणीने बाजूच्या टेबलवरील पाण्याने भरलेला जग उचलून प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या प्रियकराच्या डोक्यात घातला. त्या युवकाला रक्ताने माखलेल्या अवस्थेत टाकून दोघीही आत्ताच निघून गेल्या. आम्ही अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेची चौकशी केली. परंतु कुठेही उपलब्ध नाहीत म्हणून तुमच्याकडे फोन लावला."

"आहेत. रती हॉस्पिटलमध्ये तीन अँम्बुलन्स आहेत.चालकही तीन आहेत.झाले काय,एका चालकाचे

नुकतेच लग्न झाले आहे. तो बायकोसह मधुचंद्रासाठी गेलाय...हॉस्पिटलची अँम्बुलन्स घेऊन..."

"काय? हनिमूनसाठी रुग्णवाहिका?"

"होय. रती हॉस्पिटलची तशीच परंपरा आहे. ज्या कर्मचाऱ्याचे लग्न होते, त्या कर्मचाऱ्याच्या मधुचंद्राचा सारा खर्च आमचे हॉस्पिटल करते.आणि सोबत प्रवासासाठी खास वाहन म्हणून अँम्बुलन्स देते..."

"अरे, व्वा! केवळ अकल्पनिय! बरे, तीन वाहिन्या आहेत ना?"

"अहो, दूसरा चालक गंभीर आजारी असून आमच्याच हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात आहे."

"तिसरा चालक तर असेल ना?"

"तो आहे हो. तुम्हाला कसं सांगावे याचा विचार करतेय. त्याच काय आहे ना, आज वैलेंटाईन डे आहे ना, तर...आम्ही दोघे....म..म..म..म्हणजे तो चालक आणि मी आज रात्री नऊ वाजता भेटून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणार आहोत. तो मला प्रपोज करणार आहे. तो सुट्टी घेऊन पुढे गेला आहे. मी निघालेच आहे. प..पण मला एक सांगा, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की, त्या दोन्ही कुटुंबाची नावे एका फॉर्मवर लिहून घेतली आहेत. तो..तो..जखमी झाला आहे त्याचे नाव सांगू शकाल का? सहजच आपलं..."

"का नाही? एक मिनिट हं. सापडले. त्याचे नाव आहे..... सुशीलकुमार खाते...."

"काssय? सुशील? खाते? अग बाई, हे काय झाले? मी तर लुटली गेली. बरबाद झाले. कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही."

"क...क...काय झाले? तुम्ही असे का बोलता? "

"तुम्हाला कसे सांगू? अहो, तुमच्या हॉटेलमध्ये जखमी झालेल्या अवस्थेत पडलेल्या सुशीलने एकीला नाही तर आम्हा तिघींना फसवले आहे हो. त्याच्या बाळाची आई होणार आहे मी....हे देवा..." असे म्हणणाऱ्या त्या युवतीच्या हातातून रिसिवर गळून पडला.........


Rate this content
Log in