Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dilip Yashwant Jane

Drama

4.8  

Dilip Yashwant Jane

Drama

स्वप्न

स्वप्न

8 mins
3.5K


रात्री दीड-दोन वाजेची वेळ असेल. दिनू अचानक दचकून जागा झाला. संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असूनदेखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता. घशाला कोरड सुटली होती. कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोवळ्या, भाबड्या मनाला पडला होता. पण आपल्याला असले भास कसे होतील? त्याचं दुसरं मन म्हणत होतं. ते स्वप्नच असलं पाहिजे. त्यानं मनोमन खात्री करून घेतली. 'स्वप्न',ते पण किती भयानक! आणि सकाळची स्वप्नं म्हणे खरी ठरतात हे कोठेतरी त्यानं ऐकलं होतं. सकाळची स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला. शरीराला कंप सुटला. भाळी स्वेदबिंदूनी गर्दी केली. तेवढ्यात फाळकं तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर 'मॅव' करत घरात आली. तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून व त्याचवेळेस गावकुसाबाहेर कुत्र्यांचं भेसूर विव्हळणं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला. अंगावरचं पांघरुणही बाजूला न करता तो तसाच उठला. अंगावरली गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली. तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला. रस्त्यावरल्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडं नजर टाकली. आई नेहमीसारखीच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून अन् आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती. खाटेवरचं अंथरूण गोळा झालेलं होतं. अंगावर पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती. त्याच गोधडीचं एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होतं. आईच्याच जुन्या लुगड्यापासून आईनेच कधीकाळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जणू भूईलाही ऊब देत होती. तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला. क्षणभर द्विधा मनःस्थितीत तेथेच रेंगाळला. आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको अशा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकली. पण तेवढ्यानही आईनं किंचितशी हालचाल केली. झोपमोड होऊ नये म्हणून श्वासांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरूण हळूवार सरळ केलं अन् निद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडं एकटक पाहात तो बराच वेळ तेथेच उभा राहिला. 'आई' किती गोड शब्द! वात्सल्याचं मूर्तिमंत रूप. अखंड, अव्याहत वाहणारा प्रेमळ, मधुर मायेचा अमूर्त अमृतझरा. पण आता ती फारच थकली होती. अतिकष्टानं, आयुष्यभराच्या अतीव श्रमानं पार खंगली होती. आठ दिवसांपासून असलेल्या तापानं अन् कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती. कधीकधी खोकताना वाटे, बास्! संपलं आता सारं!


आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून अंथरुणात निजलेली आई जाग येताच खुणेनच बोलवी. दिनू जवळ गेला तर पार खोबणीत गेलेल्या तिच्या अधू डोळ्यातून घळघळा वाहणारं पाणी थांबता थांबत नसे. तशाही परिस्थितीत ती दिनूशी बोलायचा प्रयत्न करी. पण बोलताबोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबता थांबत नसे. आईची अशी अवस्था पाहून दिनूचं काळीज तीळतीळ तुटायचं. त्याची अगतिकता, हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई. आई इतकीच त्याच्या कोवळ्या, अजाण मनाची तगमग, घालमेल आईच्या या साऱ्या वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई.

अजूनही ती तशीच झोपलेली होती. दिनू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला. त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपला. मस्तकास हात लावून पाहिला. ताप बराच उतरला होता. रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता. कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले. आईचे ते पांढरे, अर्धवट पिकलेले केस, धुणीभांडी करून राखेने काळवंडलेले, शेतात राबून राकट झालेले ते हात, चेहऱ्यावर-हातापायांवर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची, गरीबीची अन् असहायतेची... 


बराच वेळ तो तसाच बसून होता. त्याला भूतकाळ खुणवू लागला. एकएक प्रसंग त्याला आठवायला लागला. तो मनाशी विचार करू लागला, वडिल जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण! वडिल संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे, गप्पा मारायचे, गोष्टी सांगायचे. सुटीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे, त्यांचे मित्र सदाअप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे, तर कधी रघूतात्यांच्या बागेत. रोजचं रात्रीचं जेवण आई, वडिल आणि मी सोबतच करायचो. नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो. मी मंदिराच्या ओट्यावर, पायऱ्यांवर खूपखूप खेळायचो. घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो. कधीकधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप मोठ्ठं झाल्यागत वाटायचं.


गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची. आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला वडिल घेऊन द्यायचे. माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे. पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्देवाचे फास आमच्याभोवती घिरट्या घालायला लागले. आई डोंगराएवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली. बिचारी पहाटेस लवकर उठायची. घरची तसेच अजून दोन-चार घरची धुणीभांडी पटापट आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची. जाताना असंख्य सुचनांसोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची. शक्य होतील तेवढे माझे लाड पुरवायची. मला कळायला लागल्यापासून मी ही दळण-कांड्यात, धुणं-भांडयात तिला मदत करायचो. पण आता... आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे. तिनं माझ्यासाठी जे सोसलं, जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय्य. त्यासाठी वाट्टेल ते झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणी-भांडी करू देणार नाही. फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं, असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले, आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट. कामं लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला. घरातली झाडलोट करून, पाणी भरून स्वतःची तयारी केली. पहाटेच पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघालासुद्धा.


दिनू अतिशय हुशार व कामसू मुलगा. नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेला, वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला. सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटणारा. परिस्थितीचं प्रचंड ओझं पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरा जाणारा, सर्वांमध्ये वावरणारा, मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा. एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा. शाळेत भरपूर मित्र असतानादेखील परिस्थितीचं रडगाणं कधी कोणापुढं त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही. त्यामुळे तो नेमका कोठे राहतो? कसा राहतो? हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते. त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती. कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा. त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता. आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच. दोघंही एकमेकांना तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपत.


नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गठ्ठा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला. पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघवती का होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय. पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला. त्या बिचाऱ्याला तरी काय माहीत तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून. आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता. त्याला सर्व कामे उरकुन शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती. तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच पण पुढे काय? हे मात्र अनिश्चित होतं. 


काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. ओघानंच सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात घिरट्या घालायला सुरुवात केली. तेवढ्यानंही त्याच्या मनाची अस्वस्थता, तगमग वाढली. डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यानं जोरानं पायडल मारायला सुरुवात केली. पायडलची पिन ढिली असल्याने चेनकव्हरला घासून पायडल खाली येत असताना होणारा आवाज त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता. डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधीप्रकाशात अस्पष्ट दिसत होतं. त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हॅन्डल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी अलगद पुसलं. आपला डावा हात पुन्हा हॅन्डलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला. खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले. सायकलीचा चेंदामेंदा झाला. तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडेझुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला. सायकलीला अडकवलेली वर्तमानपत्रे इतस्ततः फेकली गेली, वाऱ्यानं फडफडू लागली. गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघुनसुद्धा गेली. दिनू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विव्हळत पडला. मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या. त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहचतच नव्हता. त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. हळूहळू डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या. त्याही स्थितीत तो उठून बसला. पायातून जिवघेेणी सणक पार डोक्यापर्यंत गेली. आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले. काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले, ते रक्ताने भरले होते. अंगातला शर्ट फाटला होता. डोकं फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता. तो तसाच उभा राहिला. एक प्रचंड सणक पुन्हा डोक्यापर्यंत गेली, अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला. रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते. जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे दिनूच्या मदतीसाठी ते याचना करत होते. त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं. रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले. रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली. काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली. एका खोल खड्ड्यात बेशुद्धावस्थेत पडलेला दिनू एकाच्या नजरेस पडला. त्यानं सोबत्यांना आवाज दिला. सगळे धावत तेथे आले. दोन-तीन तरूण खाली उतरले. बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली. दोघा-तिघांनी बेशुद्ध दिनूला वर काढले. गाडीत टाकले. बाकीचेही पटापट गाडीत येऊन बसले. ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता. त्यानंही वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली. स्ट्रेचर मागवलं गेलं. शुध्दीत नसलेल्या दिनूला स्ट्रेचरवर टाकलं. डॉक्टर आले. ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले. इलाज सुरू झाला. 


डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता. त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थाची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरु केले. वर्तमानपत्रातल्या माहितीवरुन त्यांनी शाळेशी संपर्क साधला. सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले. हॉास्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने दिनूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं. हळूहळू चर्चा गावभर पसरली. कोणीतरी दिनूच्या आईलाही घेऊन आले. ती बिचारी स्वतःचं आजारपण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे...


दिनू आपली शुद्ध हरपला होता. बेशुद्धावस्थेत तो बडबडत होता. त्याच्या मनचक्षुःसमोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं. 'आई गेल्याचं!' तो त्या ही अवस्थेत ओरडत होता. आई !... आई!... तुला काही होणार नाही..! आई... डोळे उघड..! अगं बघ, मी... मी... दिनू... तुझा दिनू... अगं उघड ना डोळे... हे बघ... बघ ना... मी काय आणले... एकदा तरी बघ ना माझ्याकडे... तुला आता मी सुखात ठेवणार... खूपखूप सुखात ठेवणार... तुला यापुढे कोणाकडेही धुणी-भांडी करावी लागणार नाहीत... तो त्या अवस्थेतही रडत होता, ओरडत होता. जखमांनी विव्हळत होता, कण्हत होता. मध्येच ग्लानी येत होती. डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता. डोळे मिटत होते. शरीरातलं त्राण निघून गेल्याने एकएक अवयव विसावत होते. शरीरावरल्या जखमांसारख्याच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या. 


त्याचं ते ओरडणं, विव्हळणं, असंबद्ध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते. सारेच हळहळत होते. नकळत डोळे ओलावत होते. त्याचे ते करुण, आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते. सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं, आक्रोशानं द्रवत होती. त्याचं त्या अवस्थेतलं आक्रंदणं साहजिकच होतं. कारण पहाटे पडलेली स्वप्नं खरी ठरतात असं त्यानं केव्हातरी, कोठेतरी ऐकलं होतं.


आईची अवस्था तर फारच वाईट होती. काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं, सुचत नव्हतं. तेथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ती खालीच बसली होती. तेथूनच देवाला हात जोडत होती, प्रार्थना करत होती, देवा वाचव रे माझ्या लेकराला... देवा... बाळा..! सोनुल्या... सोन्या... तर मध्येच, दिनू..! माझा दिनू..! दिन्या..! म्हणत रडत होती. तिच्या डोळ्यातलं घळघळ वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती. जमलेले सर्वचजण देवापुढे हात जोडत होते. दिनूला वाचव म्हणून. पण देवालाही हे मान्य नव्हतं. तो सर्वांचा आवडता. म्हणून देवाचाही आवडता झाला. दिनूने शेवटची 'आई..!' हाक मारली आणि दिनूची प्राणज्योत मालवली.


त्यानं पाहिलेलं, फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं. आईला एकटं टाकून...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama