Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjay D. Gorade

Drama Thriller

4.7  

Sanjay D. Gorade

Drama Thriller

सदाशिव

सदाशिव

7 mins
1.6K



सदू आणि महादू दोघे भाऊ होते. सदू मोठा तर महादू लहान होता. त्यांचा शेती व्यवसाय होता. ते पारंपारिक पद्धतीने बैलांच्या मदतीने शेती करत. मिरगाचा पाऊस चांगलाच पडून गेल्याने इतर शेतकर्‍यांप्रमाणे सदू आणि महादूचीही शेतात बाजरीचं बियाणं पेरण्याची धावपळ सुरू झाली होती. 


बरडाच्या जमिनीत अर्ध-अधिक पेरून झालं होतं, सदू पाभरीने पुढे पेरत होता तर महादू राहाख्याने मागे ते ढाळत (सपाट करणे) होता. वावराच्या कडेला पोहचलेला महादू आैत मागे वळवत असताना त्याचं लक्ष सहज पुढे पेरत चाललेल्या सदूच्या आैताकडे गेले. बैलं हाकारत पेरत पुढे चाललेल्या सदूच्या दोन्ही पायांच्या मधे पांढरं-शुभ्र पात्यासारखं काहीतरी वळवळताना चमकलेले त्याला दिसले. निरखून पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. एक भला मोठा साप पाभरीच्या दात्यांमध्ये गुरफटलेला होता. पाभरीच्या दात्यांमध्ये अडकलेला तो साप आैतासोबत फरपटत-फरपटत चालला होता. सात-आठ पावलं त्याची ती जीवघेणी फरपट तशीच चालू होती. कशीतरी सापाने स्वतःची पाभरीच्या दात्यांमधून सुटका करून घेतली; तोच सदूचा पाय सापावर पडला. कामात मग्न सदूने सापाच्या शेपटीवर पाय देताच तो चवताळला, अन फूस करत त्याच्या उजव्या पायाला डंख मारत कडाडून डसला. चावा घेऊन पलटी झालेला साप पुन्हा सोयीचा होत जवळच असलेल्या गवतात मरणाच्या भीतीने सळसळ करत निघून गेला.


डोळ्यांदेखत सदूला झालेला सर्पदंश पाहून महादू खूप घाबरला. आता आपला भाऊ सापाच्या विषारी दंशामुळे मरणार या विचारानेच त्याच्या काळजात धडकी भरली. ती घटना इतकी निमिषार्धात घडली होती की, तो सदूला सावधही करू शकला नव्हता. कळले तेव्हा साप गवताचा आश्रय घेत गायब झाला होता. काय करावं काही त्याला सुचेना. त्या आडरानात चिटपाखरूही नजरेत पडत नव्हते, जे मदतीला धावून येईल. काय करावे? कुणाला बोलवावे? तो हादरून गेला होता.  


सदूचं मात्र काही झालंच नाही असं पेरणी करायचं काम चालू होतं. त्याच्या गावीही नव्हते की, आपल्याला साप चावला आहे. आऊताच्या सहा-सात तासाच्या फेर्‍या झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, महादूने आऊत थांबवलेले आहे व तो चमत्कारिक नजरेने आपल्याकडे पाहतो आहे. महादूचं ते खुळ्यागत एकटक आपल्याकडे पाहणं विचित्र वाटल्याने त्याने पण आऊत थांबवून विचारणा केली, “काय रं... काय झालं, असं काय येड्यागत पाहतोया!”


साप चावूनही धडधाकट असलेल्या भावाकडे महादू अविश्वासाने पाहत होता. सापाच्या विषारी दंशाने कोणीही असो वाचण्याची सुतरामसुद्धा शक्यता नव्हती, पण सदूला काहीही झालेले नव्हते. तो विस्मयचकित होत म्हणाला, “काय नाय, असंच पाहतोया, कौतुक वाटतंया, तू लयीच पक्का हाय!” 


“म्हणजे? समजलो न्हाय!” काम थांबवून हा काय वेड्यागत बडबडतो आहे, बोलणे विषयाशी सुसंगत न वाटल्याने सदू संभ्रमित झाला होता.  

‘सापाचं इष लगेच नायतर हळूहळू अंगात भिणत असण!’ मनात विचार येताच महादू बांधावरच्या निंबाची एक छोटी फांदी मोडून घेऊन आला व सदूच्या समोर धरत म्हणाला, “ते राहू दे... हा निंबाचा पाला खा, कडू लागतूया का, पहा?”


“मी जनावर हाय व्हय, निंबाचा पाला खाया!” देणं न घेणं आणि कंदील लावून येणं, मधेच नको ते खुसपट काढलेले पाहून सदू त्याच्यावर डाफरला होता.


विषारी साप चावल्यावर निंबाचा पाला खाल्ला तर कडू लागत नाही, असं महादूने कुठंतरी ऐकलं होतं. आता त्याला ते आठवताच तो लागलीच निंबाची छोटी फांदी तोडून घेऊन आला होता. मन चिंती ते वैरीही न चिंती, मनात नको-नको त्या घोंघावणार्‍या विचारांची खात्री तरी करून घ्यावी; साप विषारी आहे की बिनविषारी. तो आग्रह करत म्हणाला, “खा तरी, आयुर्वेदिक असतुया, मी म्हणतू म्हणून खा!”


“आण!” वैतागल्यागत सदूने त्याच्या हातातून निंबाची फांदी हिसकावून घेतली. लहान मुलागत हा असा काय वागतो आहे हे त्याला अजिबात कळत नव्हते. लहान भावाचा नादानपणा पुरवायचा म्हणून त्याने निंबाचे तीन-चार पाने तोडून कचंकचं चावली. माळरान शेतातला कडूनिंब तो; त्याच्या पानापानांत खचून कडूपणा भरलेला होता. खाताच त्याला भयंकर कडू लागला होता. तोंड वेडंवाकडं करत तो म्हणाला, “लेका किती कडू हाय, काहीपण खाया सांगतूया!”


“काही नाय... बिनइषारी हाय!” 

निंबाचा पाला खाऊन सदूचं वेडंवाकडं झालेलं तोंड पाहून महादूला गंमतही वाटली होती आणि मनाला धीरही आला होता. ‘काळ आला हुता पण येळ आली नव्हती!’ मनोमन म्हणत त्याने देवाचे आभार मानले होते. चावलेला साप एकतर बिनविषारी तरी असावा किंवा विषारी असेल तर त्याच्या विषदंती वेळेवर प्रसरण तरी पावल्या नसाव्या. मनाला समजूत घालणारे असे वेगवेगळे अंदाज तो मनात बांधत होता, मात्र त्याने एका गोष्टीची विशेष खबरदारी बाळगली होती. त्याला झालेल्या सर्पदंशाबद्दल चकार शब्दानेदेखील त्याने वाच्यता केली नव्हती, कारण सदू एक नंबरचा भित्रा आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते. उगाचच तो न घडलेल्या गोष्टीवर विचार करत बसेल आणि नको तो अनर्थ ओढावून घेईल असे त्याला वाटले होते.


तोंडातील निंबाच्या पानांचा हिरवा चोथा ‘थू-थू’ बाजूला थुंकत सदू म्हणाला, “निंबाचा पाला इषारी नव्हं कडू असतूया!”


“मला वाटलं, इषारी असतूया...!”

महादू गंमतीने त्याच्या अजाणतेपणाची फिरकी घेत हसत होता. त्याच्या हसण्यात भाऊ सुखरूप असल्याचा आनंद ओतप्रोत होता.  

***** 

एक वर्षानंतर 

सदू आणि महादू बरडाच्या जमिनीत बाजरीच्या बियाणाची पेरणी करत होते. अर्ध-अधिक पेरून झालं होतं. बैलांना विसावा व औतकर्‍यांना पाणी प्यायचे म्हणून औतं उभी केलेली होती. पाणी पिता-पिता महादूला मागच्या वर्षाची घडलेली घटना आठवली. मागच्या वर्षी या वावरात पेरणी करत असताना सदूला साप चावला होता. तो साप पाहूनच मूर्च्छा येईल इतका तो भयंकर होता. मात्र सदूला त्या सापाच्या दंशाने काहीही झाले नव्हते. उलट गेल्या एक वर्षात त्याला साधा तापदेखील आला नव्हता. सापाचे विष पचविणारा सदाशिव म्हणजे शंकराचाच दुसरा अवतार आहे की काय असे त्याला वाटले होते. असेही सदाशिव म्हणजे शंकराचे दुसरे नाव आहे. त्याच्या या बहादूरीचे त्याला नेहमीच कौतुक राहिले होते, पण त्याची ही बहादूरी त्याने कटाक्षाने इतरांजवळ सांगण्याचे टाळले होते. एक वर्षापासून मनाच्या कुपित बंद करून ठेवलेला भित्र्या भावाचा भीम-पराक्रम आज उघड करावा असे त्याला वाटले होते, पण त्याचं साशंक मन त्याला परवानगी देत नव्हते.


“दादा, मागच्या वर्षी या वावरात तुझ्यासंग एक इपरीत घडले हुते. सांगितले असते, पण नगं... तू घाबरून जाशीन!” न राहूनही महादू बोलला होता.


“नाय घाबरणार, सांग!” घटाघटा वाडग्याने पाणी पित असलेला सदू आश्वासकपणे बोलला होता.


“नगं, तू लय डरपोक हाय, मला ठाव हाय!” नकार देत महादूने मनातलं गुपित सांगायचं टाळलं होतं.


“येक वर्षात काई झालं नाय, तर अता हुणार हाय? सांग...!” सदू बेफिकीरेने बोलला होता.


“पहाय बरं!” सदूची भयरहित मुद्रा पाहून महादूला त्याच्यातील भित्रेपणा चांगलाच कमी झालेला दिसला होता, तरी मनातले गुपित उघड करायला त्याचं मन चाचरत होतं. खूप आग्रह झाल्यावर अखेर टोपरा नको म्हणून तो शब्द सोडवून घेत म्हणाला, “परत मला दोष देशीन!”  


“नाही देणार, सांग!” सदूला आता उत्सुकता लागली होती.


“तू म्हणतू म्हणून सांगतूया!” त्याचा निडरपणा पाहून महादूला विश्वास आला होता. ‘येक वर्षात काई झालं नाय, तर अता हुणार हाय?’ हे त्याचं म्हणणं त्याला पटलं होतं. जे काही व्हायचे ते तेव्हाच एक वर्षापूर्वी झाले असते. वर्षापासून मनात दडवलेलं गुह्य उघड करण्यास राजी होत तो म्हणाला, “मागच्या वर्षी याच वावरात त्या ठिकाणी एक इषारी साप तुला चावला हुता, पाहून तूही घाबरून गेला असता इतका तो मोठा हुता, पण तुला त्याच्या डसण्याने काईच झालं नाही!” 


“काय सांगतूया!” ऐकूनच सदूच्या तोंडाचा धक्का बसल्यागत ‘आ’ झाला होता.


“खरं सांगतूया... देवाशपथ!”


निलकंठेश्वराप्रमाणे हलाहाल पचविणार्‍या त्याच्या धाडसाबद्दल महादू विश्वास देत कौतुकाने म्हणाला, “तू फकस्त मनाने डरपोक हाय, शरीराने नाय!”


घडलेली हकीकत मग महादू मिठमिरची लावून रंगवून रंगवून सांगू लागला, ‘गेल्या वर्साला आपुन दोघं या वावरात पेरणी करत हुतो... एक भला मोठा साप तुया औताखाली म्हंजे पाभरीच्या खाली आला हुता... पाभरीच्या दात्यांमधे अडकलेला इषारी साप खूप प्रयत्नांनी सुटला... पुढं तो साप तुया पायाखाली आला... तू पाय दिल्याने सापाने तुया उजव्या पायाला डंख मारला... मी खूप घाबरलू... तुला मात्र काईच झाले नव्हते... मी तुला निंबाचा पाला खाया लावला... असं वगैरे वगैरे...!’


मनात एक वर्षापासून दाबून ठेवलेलं रहस्य रितं करताना किती आणि कसं सांगू असं त्याला झालं होतं. 

बराच वेळ झाला उभी केलेल्या औताची जनावरं कंटाळली होती, तरी महादू बोलायचं थांबत नव्हता. भारतातील सर्वात विषारी जातीच्या सापाचे विष पचविणारा सदाशिव त्याच्या लेखी जगातल्या सात आश्चर्यापैकीच एक होता, गर्व करावी अशी ती घटना तो कौतुकाने तोंडाला फेस येईपर्यंत सांगत होता. मात्र बोलताना एक गोष्ट तो अजूनही बिलकुल विसरला नव्हता. सदू प्रमाणापलिकडंचा भित्रा आहे. त्याला त्याच्या जिगरबाजपणाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्याच्यात आत्मविश्वासाचं बळ भरत हिंमत वाढवणं आवश्यक आहे. नाहीतर नको तो अनर्थ व्हायचा.  

विनाकारण खांद्यावर जू घेऊन उभे असलेल्या बैलांपैकी एका बैलाने जू सांडवले तेव्हा गप्पांत दंगलेला महादू बोलायचा थांबला. वेळ बराच झालेला पाहून दोघं भाऊ काळजी करावी तसे उठले व राहिलेलं वावर पुन्हा जोमाने पेरायला भिडले. सूर्य मावळतीकडे झुकलेला प्रथमच त्यांना दिसला होता. आजच्या आज बरडाची पट्टी त्यांना पेरायची होती.


हयगय न करता ठरलेलं काम पूर्ण करायला पुन्हा नेटाने ते जुंपले होते. तासातासाने पेरायचे वावर कमी होत होते. पेरत असताना सदूचे औत त्याला साप चावला होता त्या ठिकाणी पोहचले असेल-नसेल, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक! तो धाडकन जमिनीवर कोसळला. पाठीमागे राहाख्याने पेरलेलं वावर ढाळत असलेल्या महादूने ते उघड्या डोळ्यांनी पाहिलं, आणि हातातील औत तेथेच सोडून देत घाबरून त्याने त्याच्याकडे धाव घेतली.


इतक्यात चांगले गप्पा मारत होतो, अचानक काय झाले त्याला? काहीच कळायला मार्ग नव्हता. घाबरलेला महादू त्याच्याजवळ पोहचताच त्याने प्रथम त्याचा श्वास आणि नस दोन्ही हात लावून तपासून पाहिले. दोन्हीही थांबल्यासारखे भासले. घाईघाईने उठून बसवत तो त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण सगळं अचेतन होतं. धावत-पळत जाऊन बांधावरच्या मटक्यातले गार पाणी आणले, त्याच्या चेहर्‍यावर शिंपडले, पण अजिबात सादास प्रतिसाद मिळत नव्हता. मनात भीती होती तेच अखेर घडले होते. साप चावला आहे या हैबतीने तो गतप्राण झाला होता. आपला भाऊ जग सोडून निघून गेला आहे हे समजताच त्याने टाहो फोडला, “दा... दा...!”


पावसाने हिरवं होऊ पाहणार्‍या रानाला चिरत महादूची हृदयद्रावक साद कितीतरी वेळ प्रतिसाद होऊन सगळ्या रानात घुमत होती; काळजाला चिरावी तशी. एक वर्षापूर्वी चावलेला साप पण त्याने आता सदूचा जीव घेतला होता. विनाकारण मानगुटावर बसलेलं भीतीचं भूत इतकं सगळं समजावूनही जीवघेणं ठरलं होतं.

***** 

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama