Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Amrut Shivaji Dalvi

Children Comedy Fantasy

4  

Amrut Shivaji Dalvi

Children Comedy Fantasy

मिशन साखर कारखाना भाग ४ !

मिशन साखर कारखाना भाग ४ !

5 mins
1.6K


सर - सर करत आमची घुम्पटं वाट कपात आमच्याही पुढे पळू लागली. धग – धगत्या दुपारच्या त्या रख – रखित शांततेत , तो एकच आवाज गुंगू लागला . रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ – मोठ्या झाडांची झालर असल्याने ऊन लागत नव्हतं . समोर पळत असताना असं वाटात होतं की आमची पाच डब्यांची आग – गाडी कुठल्या तरी अंधार्‍या भूयारीतून जात आहे .

“ पू !!! पूप !!! “ नकळत माझ्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब माझ्या मुखातून सहज बाहेर ओघळलं .

“झुझुक !!! झुझुक !!! “ असं म्हणत बाकीच्या डब्यानीही साध दिली.

“पू !!! पूप !!! “ मी आणखी जोरात ओरडलो .

” ए इंजिनवाल्या !!! धूर कमी सोड “मागून बर्क्याने अस म्हणत वेग कमी करायचा इशारा दिला.

“आग-गाडी घसरली बघ रुळावरनं “ असं म्हणत विक्कू रांगेतून बाहेर आला .

त्याच्या पाठोपाठ बारकू , अन्या आणि बाळू या सगळ्यांची बिनडब्यांची इंजिनं झाली .

“ आपण तिकडं कदी पोचणार ? “ बाळ्यानं धापा टाकत विचारलं .

“आत्ताच सुरु केलंय कि !!! अजून लई ताईम हाय !!! “ अन्या त्याला म्हणाला .

“दादा ! एक सांग , साखर कारखान्यात गूळ बी बनिवत्यात नव्ह ? “ बारकूने उत्सुकतेने विचारलं .

“ व्हय , बनिवत्यात की ! “ विक्कू सहज म्हणाला .

“ मग त्याला साखर कारखाना का म्हणत्यात ? गुळाचा कारखाना का म्हणत न्हाइत ? “

“ तिथं दारू बी बनीवत्यात ! मग काय त्याला दारूचा कारखाना म्हनार ? ” बाळूने नेहेमी प्रमाणे खोड मोडत विचारलं .

त्याच्या कडे दुर्लक्ष करत मी बारकूच्या भाबड्या प्रश्नाचा विचार करत म्हणालो , “ कदाचित साखर जास्त बनवत असतील गुळापेक्षा , म्हणून असल ! ”

बारकूला ते पटलं . त्यानं “ हू !!! ” असं म्हणत सहमती दिली .

थोडं अंतर कापून झाल्यावर आम्हाला दम लागू लागला . समोरच एक पूल दिसत होतं . आम्ही तिथं थांबून त्याच्या कठऱ्यावर बसायचं ठरवलं .

बाळू – लई दम लागलाय . त्या फुलाजवळ थांबूया काय .

बारकू – “ अरुंद पूल ! वाहने हळू हाका ! ”

बारकूने त्या रस्त्यालगत असलेल्या गंजलेल्या लोखंडी खांबावरच्या पाठीवरचा मजकूर वाचून दाखवला .

ते ऐकून सगळ्यांनी , “ झुझूक ! झुझूक ! ” करत आप-आपला वेग कमी केला .

“ छुस्स! ” असा सुसकारा सोडत सगळ्यांनी पुलाच्या कठड्यावर आपला तग धरला .

“ वेगाला आवरा , जीवाला सावरा ! ” बारकूला आणखी एक सूचना दिसली .

“ गाडीचा वेग , जीवनास ब्रेक ! ” अन्न्या आठवून म्हणाला .

“ घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे ! ” विक्कू नाकातनं शुध्द मराठीत म्हणाला .

त्याचं ते ऐकून सगळे हसू लागले .

“ गतिरोधात पुढे आहे ! ” बरकूला पुन्हा काही तरी आठवलं .

“ अहं अहं ! गतिरोधात माघे आहे ! ” बाळू त्याचा टुकार विनोद टाकून स्वतःच हसू लागला .

पण ते कळताच सगळेच त्याला सामिल झाले .

या रस्त्यांवरच्या सूचनाही गमतीशीर असतात . एकदा तर आम्हाला असल्या सूचना गोळा करायचा छंदच लागला होता . या सूचना , लिहिणार्यांच्या विनोद बुध्दीतून प्रकट होतात का काळजीतून , हाच एक मोठा प्रश्न आहे .

“ कुठून इतका घाण वास येतोय ? ” मी नाक दाबत विचारलं .

सगळ्यांनी आधी विक्कूकडे पाहिलं . त्यालाच सवय आहे अश्या चार-चौघात ठुसक्या सोडायची .

“ एSS! मी न्हाई ! मी न्हाई ! खरंच ! ” विक्कू शपथ घेत म्हणाला .

“ ते बघा पूलाखाली काय हाय ! ” अन्न्या पूलाखाली बघत म्हणाला .

गावातला सगळा कचरा त्या पूलाखाली साचला होता . न्हाव्याच्या दुकानातली कापलेली केसे , दवाखान्यातली वापरलेली सालाईन आणि सूया , प्लास्टिकच्या पिशव्या , कुजलेल्या भाज्या , सडून गेल्यावर मागे राहिलेला कुत्र्याचा का रेडकाचा सापळा . अश्या सगळ्या जीनसांनी तयार झालेला तो खमंग वास , वातावरणात दरवळत होता . त्यावर त्याचा आस्वाद घेणाऱ्या माश्यांचा भडिमार तर होताच .

“ ही मोठी मानसं असा सगळा कचरा का म्हणून टाकत असतील पूलाखाली ? ” मी निराश होत म्हणालो .

“ ही मोठी मानसं अशीच असत्यात ! ” बारकू मला सांतवन देत , त्या मोठ्या माणसांवर चिडून म्हणाला .

“ थांब! मी त्या सुया आणि सलायनी घेऊन येतो ”, असं म्हणत विक्कू पुलाच्या कडेनं खाली उतरू लागला .

“ थांब! फिरतोस काय नाही मागं! ”, मी दम देत त्याला म्हणालो .

“ का ? काय होतंय ? ”, असं म्हणत विक्कू आणखी पुढे सरकला .

“ येतोस काय घेऊ काठी! ”, आई मला रागावली की तसं म्हणायची . त्या शब्दांची धास्ती आम्हा सगळ्यांना होती . विक्कू क्षणभर तिथेच थांबला पण नंतर मागं सरकला . बहुतेक त्यालाही त्या घाणीत जाण्याची इच्छा होत नव्हती .

“ दादा ! मी तुला बघून घेईन ”, मला खोटा राग दाखवत माझ्यासमोर हात करत माझी मदत मागत तो म्हणाला .

अन्या बाळ्या आणि बारकू असे सगळे जण अजूनही आशेने त्या पुलाखाली बघत होते .

“ चला इथून ”, मी मोठ्या दादाच्या आवाजात ओरडलो .

“ सोन्यादा ! घेऊया की एक इंजेक्शन आणि सलाईन ” बारकूने बोलायचं धाडस केलं .

“ मातीचा किल्ला करताना त्यात सलाईन टाकून कारंजी करता येईल ”, अन्या हरकूल म्हणाला .

“ दादा घेऊयात की ! ”, सुर ओढत विनवणी करताना ते सगळे अगदी गोड दिसत होते . माझ्या चेहऱ्यावर अलगद स्मित हास्य दरवळलं .

“ नाही ! नाही म्हणजे नाही! ” मी पुन्हा तशाच हुकमी आवाजात म्हणालो .

“ आता आन्तोच ! ”, असं म्हणत विक्कू परत उतरू लागला . मी पळत जाऊन त्याचा हात धरला आणि त्याला मागे खेचून आणलं .

“ विक्कू ! एड्स होईल तूला ! ”, मी त्याला आडव्ण्याचं अंतिम सत्य त्याला ओरडून सांगितलं .

“ एड्स ! ”, असं म्हणत विक्कू तिथच थबकला . अचानक अंग ढिल्ल सोडल्याने माझा तोल गेला आणि आम्ही दोघे खाली अदळलो .

“ ते कसं काय ? ”, उभं राहत विक्कूने उत्सुकतेने विचारलं .

“ मी टीवीत बगिटलय ! ”, मी अंगावरची धूळ झाडत त्याला म्हणालो .

त्यावेळी मुंबईत आम्चाकडेच टीवी होती आणि त्यावर एड्स बद्दल खूप जाहिराती लागत होत्या . आईला वाटायचं मला काही काळत नाही , पण मला किंबहुना आम्हा सर्वांना सगळं कळायचं .

“ मला तहान लागलीया ! ”, अन्या अचानक या सगळ्यामधून म्हणाला .

खरंतर आम्हा सगळ्यांनाच तहान लागली होती पण आजू-बाजूला कुठेच घरे दिसत नव्हती .

“ सगळ्यांनी आप-आपली एक आर्काची गोळी खावा. जाईल तहान ! ” विक्कू सगळ्यांना म्हणाला आणि खिशातून एक अर्काची गोळी काढून हवेत उडवत तोंडात टाकली . आर्काच्या गोळ्या म्हणजे आजचा ‘ पोलो ’ बरं का ! फक्त त्याला मधून होल नव्हतं आणि त्यावर एक रुपयाचा शिक्का कोरलेला होता . ते खाऊन पाणी पिलं की ते पाणी अगदी गार वाटायचं , एकदम भारी वाटायचं ! जिभेवर आर्काची गोळी ठेवून पुन्हा एकदा आम्ही आमची घोड-दौड उर्फ घुम्पट-दौड सुरु केली .


Rate this content
Log in

Similar marathi story from Children