Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Shinde

Comedy Inspirational

4  

Rahul Shinde

Comedy Inspirational

अनोखा दिवस

अनोखा दिवस

4 mins
16.1K


     शहरापासून थोडं बाहेर असलेल्या टेकडीवर रहदारी तशी बऱ्यापैकीच होती. टेकडीवर असणारं मोठं राम मंदिर त्या टेकडीची शानच. रविवारच्या दिवशीही तिथली माणसं रोजच्यासारखीच लवकर उठून आपापल्या उद्योगाला लागली होती .भल्या सकाळी सकाळीच टेकडीवर विशी-पंचविशीतले दोन मुले आणि दोन मुली पळत आली आणि त्यांनी आपल्याच तंद्रीत चाललेल्या,कपाळावर भडक कुंकू भाळलेल्या सखू आजीला आडवले. 

"शोधा, शोधा आजी. " त्यांच्यातला एकजण धापा टाकीत म्हणाला तशी आजी एकदम दचकलीच. 

"अगं बाय! काय झालं तुमास्नी. एवढ धापा टाकतायसचा ते? अन काय सोधायचंय तुमचं?" सखू आजीनं विचारलं.   

"अहो आमचा सुनील हरवलाय हो, शोधा त्याला लवकर. "एकजण रडण्याचे कढ काढत म्हणाली. 

"कोण सुनील? तुमच्यापैकी कुणाचा भाव हाय?"

"भाऊ नाही हो, पण मुलासारखा आहे आम्हाला."

"मुलासारखा?" सखूआजी जरा कोड्यातच पडली. 

"हो, आमचा कुत्रा सुनील, आम्हाला मुलासारखाच आहे. हरवलाय हो. "

"काय? कुत्रा व्हय.. . हुडका की मग तुमचं तुमीच. मला माझी कामं हायत. जाऊदे मला बेगिन." सखूआजीला जरा रागच आला. 

"असं काय करता आजी? तुम्हाला इथली माहिती आहे. इकडच पळत आला होता सुनील. तुम्ही कुठं बघितला का त्याला?" त्यांच्यातला एकजण म्हणाला. 

"न्हाय बा, म्या नाय बघितला.आता माझा येळ खाव नका. हुडका तुमीच. "

सकाळ-सकाळच्या या गोंधळानं आजूबाजूची माणसं तिथं जमा व्हायला लागली.एक नवरा बायकोची जोडी मोटरसायकलवरून जायला लागली होती, तेही हा गोंधळ बघून त्यांच्याजवळ थांबली. 

"काय झालं,कोण हरवलं तुमचं?" नवऱ्याने विचारले. 

"आमचा सोन्यासारखा कुत्रा हरवलाय, तुम्ही कुठं पाहिला का इकडं?"

"अहो, तुमी कशाला थांबवली गाडी? ही पोरं 'वेडी ' वाट्ट्यात मला. नाहीतर काहीतर काळंबेरं हाय . कुत्रं हरवलं म्हणून कोण रडतं का? अन एवढा दंगा करतं का रस्त्यावर?" बायको नवऱ्याला म्हणाली. 

"तू हळू बोल, उगच कुत्र्यासारखी भुंकू नकोस.... आता असतो एखाद्याचा प्राण्यावर जीव." नवरा बायकोवर खेकसला आणि त्यानं मुलांना विचारलं,

"कधी हरवलाय तुमचा कुत्रा?"

"दहा वर्षं झाली, इकडे टेकडीवरच आल्यावर हरवला. अजून शोधतोय त्याला."एकजण म्हणाला तसं आपला विजय झाल्यासारखं बायको नवऱ्याला म्हणाली,

"घ्या, सांगितलेलं पटत न्हाय. घ्या स्वताची फजिती करून. दहा वर्षापूर्वी हरवलेलं कुत्रं आता जिवंत तरी आसल का? एवढं ह्यांना कळत न्हाय, म्हणजे ही पोरं 'वेडी' न्हायतर काय म्हणायची ?"

नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटलं .त्यानं मोटोरसायकल चालू केली आणि ते आपल्या कामाला निघाले. सखूआजीनेही तिथून काढता पाय घेतला.

"ही पोरं पोरी मेंटल हॉस्पिटल मधनं पळून आल्यात बहुतेक, सकाळ सकाळी ." जमलेल्यांपैकी एकजण दुसऱ्याला म्हणाला. 

"शक्यता आहे, पण यांचे कपडे, अवतार सगळं ठीक वाटतंय ." दुसरा म्हणाला. 

"आजकाल येड्यांना बी फॅशन करावीशी वाटते , शेल्फी' काढण्यासाठी . ही नक्की हॉस्पिटलमधूनच पळून आल्यात." पहिला पुन्हा ठामपणे म्हणाला.

"हे चोर पण असू शक्त्यात, भुरटे चोर. युक्ती लढवून चोरी करायला आलेले." त्यांचं बोलणं ऐकत असलेला तिसरा त्यांना म्हणाला. 

 काहीजण त्यांना वेडे समजून तिथून निघून गेले, काहीजण हे मनोरंजन पाहत तिथेच थांबून राहिले. 

" दहा वर्षांपूर्वी हरवलेला कुत्रा अजून जिवंत राहतोय होय? त्याला शोधण्यात काय पॉईंट नाय." थोडे वयस्कर गृहस्थ चेहऱ्यावर गंभीर भाव आणून म्हणाले. 

"असा कसा पॉईंट नाय? दहा वर्षांपूर्वी त्याच्यासाठी बनवलेलं मटण मी अजून फ्रीज मध्ये ठेवलंय." त्या चौघापैकी एक मुलगी म्हणाली. 

"मग एक काम करूया. जवळच पोलीस चौकी आहे.तिथले साहेब माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडे आपण तक्रार करूया,चला." जमलेल्यांपैकी एकजण फिरकी घेत म्हणाला. 

"अ ..पोलिस...काही उपयोग होत नाही पोलिसांचा.. यात पोलिस काय मदत करणार. " चौघेही थोडे गोंधळले.  

"आम्हीच शोधतो त्याला आता. वेगवेगळ्या दिशांनी. "एकजण म्हणाला आणि चौघेही मंदिराच्या दिशेने निघाले. तशी गर्दीचीही पांगापांग झाली.

***************

  सूर्य वर माथ्यावर येत असताना टेकडीच्या उतारावर मोठा अपघात झाला. चार चाकी कारने दुचाकीला धडक दिली होती. दोन चाकीवरील युवक रस्त्यावर बेशुद्ध पडला होता. रस्त्यावर रक्त सांडले होते. तातडीने काय करावे हे भोवती जमलेल्या गर्दीला समजेना. तेवढ्यात तिथे दोन युवक आणि दोन युवती आल्या. त्यातल्या एकाने लगेच ऍम्ब्युलन्स साठी कॉल केला.... मात्र वेळ दवडून चालणार नाही हे लक्षात येताच त्यांच्यातल्या एकाने रिक्षा बोलवून आणली आणि त्यातून अपघात झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेले. त्या चौघानाही रस्त्यावरील बऱ्याच जणांनी ओळखले आणि लोक त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघू लागले, कारण काहीच तासांपूर्वी वर टेकडीवर 'कुत्रा हारवलाय' म्हणून धुमाकूळ घालणारे ते हेच चार 'वेडे' होते. आता तेच अपघातग्रस्ताला कसलाही विचार न करता पूर्णपणे मदत करत होते. हे पाहून ते 'वेडे' नक्की कोण आहेत हा प्रश्न सर्वानाच पडला.

   .... ते शहाणे 'वेडे ' होते. जीवनाच्या धावपळीत खरे शहाणे वेड्यासारखे धावत असतात, त्यांना हे 'वेडे' रोखतात. मुद्दामच त्यांना थापा मारतात.त्या शहाण्यांचा वेळ घेतात. कधी कुत्र' हरवल्याचं सांगतात, कधी काहीही असंबद्ध बडबडून इतरांना आपण वेडे असल्याचं भासवतात. असं करण्यामागे या 'वेड्यांचा' इतरांचं निखळ मनोरंजन करण्याचा हेतू असतो. इतराना दैनंदिन व्यापातून, कष्टातून क्षणभर विसर पाडण्याचा प्रयत्न असतो. 

हा अनोखा खेळ ते आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळतात,कधीकधी ते एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन झाडाला "भॊ" करतात. त्यांच्या खेळामुळे जमलेल्या गर्दीमध्ये मनोरंजनात्मक चर्चा सुरु होते आणि दिवसभर करमणूक होईल असा विषय ते सर्वाना देऊन जातात. कधी ते रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याला पकडून जेवायला घेऊन जातात,कधी अपघातग्रस्ताला पुढाकार घेऊन मदत करतात. 

             अतिशहाणपणानं दुखी-कष्टी बनलेल्या या पृथ्वीवरील बोजा हलका करण्यासाठी असं वेडं होण्याचीही गरज असते,ते चौघ आठवड्यातून एकदा 'वेडेपणा' पांघरून त्याचा मनमुराद आनंद घेतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy