Nilesh Bamne

Romance


3  

Nilesh Bamne

Romance


एका अनोळख्या वाटेवरून

एका अनोळख्या वाटेवरून

5 mins 1.2K 5 mins 1.2K

एका अनोळख्या वाटेवरून

एका हिरव्यागार बगीच्यातील एका बाकावर बसून पन्नाशीतील रमा समोर खेळणार्‍या आपल्या नातवंडांकडे कुतूहलाने पाहत होती. इतक्यात जवळ - जवळ तिच्याच वयाची एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि स्वतःच्या डोळ्यावरील चष्मा दूर करत म्ह्णाली, ‘ माफ करा, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रमाने डोळ्यांनीच परवानगी दिली असता ती व्यक्ती म्ह्णाली,’ तू रमा आहेस ना ?’ रमाने होकार दिला असता त्या व्यक्तीच्या डोळ्यात अचानक एक अनोळखी भाव निर्माण होऊन ती व्यक्ती थोडया हलक्या आवाजात म्ह्णाली,’ मला ओळखलसं ? मी रमेश ! रमेश हे नाव ऐकताच रमाच्या डोळ्यात अचानक काजवे चमकले आणि बसल्या जागेवरच ती ताडकन उटून उभी राहिली आणि क्षणभर रमेशकडे पाहिल्यावर पुन्हा हळूहळू खाली बसली. क्षणभर काय बोलावे आणि काय बोलू नये तेच तिला सूचत नव्हते पण स्वतःला सावरत जागा करून देत तिने हातानेच रमेशला आपल्या शेजारी बसण्यास खुणावले. रमेश जागेवर बसल्यावर रमा हळूच म्ह्णाली, अरे ! रमेश तू किती बदललास ? सुरुवातीला मी तुला ओळखलेच नाही, जवळ – जवळ पंचवीस वर्षानंतर पाहतेय ना तुला ! बर ! तुझी पत्नी आणि मुलं कशी आहेत ? रमाच्या या प्रश्नावर रमेश हसत म्ह्णाला,’ अग ! मी लग्नच केल नाही तर पत्नी आणि मुलांचा प्रश्न येतोच कोठे ? असं एकाकी जीवन जगण्याचा तुला कंटाळा कसा आला नाही रे ? रमाच्या या प्रश्नाला उत्तर देत रमेश म्ह्णाला,’ तुझी आठवण होती ना माझ्या सोबत, त्या आठवणी सोबतच इतक आयुष्य गेलं आणि आता पुढचही जाईल. बरं ते जाऊ दे ! तुझे पती कसे आहेत ? रमेशच्या या प्रश्नाने रमाचे डोळे पाणावले आणि दबक्या स्वरात ती म्ह्णाली,’ पाच वर्षापूर्वी हृदयविकाराने ते गेले, खूप प्रेमळ होते, लग्नानंतर त्यांनी मला इतक प्रेम दिल की त्या प्रेमाने मी तुला कधी विसरले ते माझे मलाच कळले नाही. आता मुलं मोठी झाली सूना आल्या, नातवंडे झाली, आता नातवंडांसोबत खेळण्यात वेळ कसा निघून जातो काही कळत नाही. इतक्यात रमाची नातवंडे खेळून आली आणि रमा त्यांना घेऊन घरी निघाली. रमेश तेथेच बसून जाणार्‍या रमाकडे पाहत राहिला. चालताना रमाने एकदाच मागे वळून पाहिले आणि ती गोड हसली. जणू ती उदया पुन्हा भेटण्याची सुचनाच देत होती. रमा दिसेनाशी झाल्यावर क्षणभर रमेश आपल्या भुतकाळात हरवून गेला. त्याचा भुतकाळ त्याच्या डोळ्यासमोर पुढे सरकू लागला.

रमेश आणि रमा त्यांच्या लहानपणी पुण्याला शेजारी- शेजारीच राहात होते. दोघं एकाच शाळेत शिकत होते. शाळेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रमाने कॉलेजात जायचे टाळलं. पण रमेशला मात्र पदवीधर होऊन एखादी चांगली नोकरी मिळवायची होती. मधल्या काळात रमा आणि रमेशच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात केंव्हा झाले ते त्यांना देखील कळले नाही. त्यांच्या प्रेमाची गाडी अगदी सुसाट चालली होती. एकमेकांना लपून भेटणं , प्रेम पत्र लिहणं, प्रेमाच्या आणा- भाका घेणं , रुसणं, हसणं, फुगणं , सारं काही व्यवस्थित सुरू होतं. पण देव जाणे कोठे माशी शिंकली आणि रमेश आणि रमाचं प्रेमप्रकरण रमाच्या घरच्यांच्या कानावर गेल. त्यांनी हयांच्या प्रेमाला कडाडून विरोध केला कारण रमेश रमापेक्षा हलक्या जातीतील तर होताच त्याशिवाय तो कामा - धंदयालाही नव्हता. रमा मात्र पळून जाऊनही रमेशबरोबर लग्न करायला तयार होती. पण रमेशला ते मान्य नव्हतं या दरम्यान रमेशचं शिक्षण पूर्ण होऊन त्याला मुंबईला चांगली नोकरी मिळाली. नोकरीनिमित्त रमेश मुंबईला गेल्याच्या संधीचा फायदा उचलून रमाच्या घरच्यांनी रमास जराही चाहूल न लागू देता अचानक पुण्याहून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच रमाच्या नातेवाईकांनी रमाच लग्न जबरदस्तीने मुंबईतील एका श्रीमंत मुलासोबत करून दिलं. महिन्याभरानंतर रमेश पुण्याला माघारी आला असता त्याला सारी हकीकत कळली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रमेशने स्वतःला सावरलं, पण त्याच क्षणी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. ज्यावर तो आतापर्यंत ठाम राहिला.

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी रमा नातवंडांना घेऊन बागेत आली असता रमेश अगोदर तिची वाट पाहत तेथे बसला होता. त्याने आठवणींने आणलेले चॉकलेटस रमाच्या नातवंडांना दिल्यावर ते आभार मानून खेळायला गेले. रमा तेथेच खाली गवतावर बसली असता रमेश ही खाली गवतावरच बसला पण तिच्यापासून थोडा दूर बसला. रमेशच्या दिशेने पाहत रमा म्ह्णाली, नीलम कशी आहे ? रमेश म्ह्णाला, ठिक आहे. तू पुण्याहून गेल्यावर दोन वर्षांनीच नीलमच लग्न प्रवीणसोबत झालं. प्रवीण तोच ना किती प्रेम करायचा तिच्यावर पण बोलायची हिंमत मात्र कधी करत नव्हता अगदी तुझ्यासारखी. रमा थोडी उत्साहानेच बोलत होती. रमाचं बोलणं संपत न संपत तोच रमेश म्ह्णाला, हो ! पण तुझं लग्न झाल्यावर मात्र त्याने हिम्मत केली. मग काय आम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर नीलमला दोन मुली झाल्या. आता नुकतीच त्या दोघींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या. प्रवीणही आता कामावरून निवृत्त झाला आहे. दोघं सुखाने राहत आहेत. आता काही दिवसापूर्वीच नीलम मुंबईला आली होती. ती जेंव्हा जेंव्हा मुंबईला येते तेंव्हा तुझं नाव काढून आसवं गाळल्याखेरीज माघारी जात नाही. म्ह्णते, मला एकदातरी रमाला भेटायचंय ! तिला विचारायचयं की माझ्या दादाला तू असा दगा का दिलास ? मी नाही रे ! तुला दगा दिला ! रमा काकुळतीला येऊन म्ह्णाली, तू मला सूचना न देता मुंबईला गेलास. बाबांनी अचानक पुण्याहून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच त्यांनी लग्न करण्याकरीता माझ्यावर दबाब टाकायला सुरुवात केली. वाटत होतं हे जीवन संपवून टाकावं एकदाचं. पण हिंमत नाही झाली आणि नाईलाजाने मी लग्नाला उभी राहिली. एखादया निर्जीव बाहुलीसारखी. रमाच बोलणं ऐकण्यात गुंग झालेला रमेश म्ह्णाला, जाऊ दे ! जे आपल्या नशिबात होतं ते झालं आता आपण आपल्या नशीबाला दोष दयायचा आणि गप्प बसायचं ! इतक्यात रमाची नातवंडे खेळून आली आणि रमा नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन घराकडे निघाली आणि रमेश तेथेच बसून क्षितिजावर सुर्यास्त पाहत राहिला.

त्यानंतर सतत चार-पाच दिवस रमा बगीच्यात न आल्यामुळे रमेश अस्वस्थ झाला आणि बोलाता - बोलता रमाच्या नातवंडाकडून काढलेल्या पत्यावर जाऊन पोहचला. दरवाज्यात उभा असतानाच आतून भांडण्याचे आवाज त्याच्या कानावर येऊ लागले. आई ! तू वृद्धाश्रमात राहणार की नाही ? तुला समजत कसं नाही आम्हाला तुझ्यामुळे किती त्रास होतो. आमचे मित्र- मैत्रीणी घरी येतात तेव्हा तुझी किती अडचण होते. तुझ्या सुनांबरोबरही हल्ली तुझे पटत नाही. सारखी त्यांच्याबरोबर भांडत असतेच. आणि आता घरातही तू काही कामाची नाहीस. गेले चार दिवस मी तुला समजावतोय तरी तू वृद्धाश्रमात राहायला तयार होत नाहीस. आज जर तू तयार झाली नाहीस तर तुला ओढूनच घेऊन जाईन. हे ऐकूण रमेशने ह्ळूच दरवाजा ढकलला. तोच मुलाने ढकललेली रमा रमेशच्या पायावर येऊन कोसळली.

रमेशला पाहून सारेच स्तंभीत झाले. खाली कोसळ्लेल्या रमाकडे पाह्त रमेश म्ह्णाला, प्राण्यांवरही माणसाप्रमाणे प्रेम करणारी, प्रेमाची साक्षात जिवंत मूर्ती असणारी तू या जनावरांमध्ये राहण्यापेक्षा माझ्याबरोबर चल म्ह्णत रमेशने रमाच्या दिशेने हात पुढे केला. त्याने पुढे केलेला हात क्षणभर विचार करून रमाने धरला आणि एखादया विद्रोही व्यक्तीसरखी ती उठून उभी राहिली. क्षणभर आपल्या मुलांकडे पाहिल्यावर ती रमेशबरोबर निघाली असता तिच्या मुलांनी तिला थांबविण्याचा प्रयत्नही केला नाही कारण आज तिची कोणालाच गरज नव्हती. पण रमेशसाठी मात्र ती एक आश्वासक साथ होती. म्ह्णूनच तर ती समाजाची सारी बंधने, नियम पायदळी तुडवत रमेशबरोबर एका अनोळख्या वाटेवरून चालत होती...


Rate this content
Log in