Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rahul Shinde

Inspirational Others

3.9  

Rahul Shinde

Inspirational Others

पुनर्जन्म

पुनर्जन्म

4 mins
22.3K


पृथाने नुकताच तिचा चौथा वाढदिवस साजरा केला. तसा अठ्ठाविसावा वाढदिवस होता,पण पुनर्जन्मातला चौथा..

पृथाचं बालपण चार-चौघांसारखंच विविध रंगांनी बहरलेलं,पण ... बालपणी ती मुलगा होती. तिचा जन्म मुलाच्या शरीरात झाला होता.घरातल्या सर्वांचा लाडका,एकुलता एक,त्याचं नाव यश. तो अभ्यास,खेळ सगळ्यात पुढे.. त्याची आजी कौतुकाने म्हणायची,"नातू माझा सर्वगुणसंपन्न हो. अगदी लाखात एक. " तेव्हा तिला आणि कोणालाच माहित नव्हतं, यश लाखात 'एकच' होता. जसं जसं त्याचं वय पुढं सरकायला लागलं,त्याला शरीरातून विचित्र स्पंदनं जाणवायला लागली. वेगळेच बदल. आतून घाबरवणारे,हवालदिल करणारे. त्याचं मन सांगायला लागलं,'शरीर चुकीच्या अवस्थेत जन्माला आलंय. मनाचं आणि शरीराचं लिंग जुळत नाही. ' या विचारानं तो धास्तावून गेला. आपली ही अवस्था कोणाला सांगितली तर सगळे हसतील, थट्टा करतील म्हणून भीतीने त्याच्या पोटात गोळा यायचा.

शरीराच्या उमलत्या बहरात त्याला आजूबाजूला प्रेमात बुडालेली त्याच्याच वयाची जोडपी दिसायला लागली.. आणि त्याच्यासाठी प्रेम?जणू निरर्थकच. दिवसाच्या उजेडात तो सर्वांपासून स्वतःची अवस्था लपवायचा आणि रात्रीच्या अंधारात एकटेपणा त्याला टोचून खायला उठायचा. स्वतःचं शरीर म्हणजे एक तुरुंग वाटायचा त्याला. सगळं असह्य आणि नकोनकोसं झाल्यावर घाबरत घाबरत तो आई-वडिलांशी एकदा बोललाच-

"मनाचं आणि शरीराचं लिंग जुळत नाही. म्हणजे मी शरीराने मुलगा आहे आणि... मन सांगतंय मुलगी असायला हवं."

खिन्न शांतता पसरली.आई-वडिलांना धक्का बसला,पण तो काय बोलतोय हे नीटसं त्यांना समजलं नाही. त्यात वडील कडक शिस्तीचे,परंपरा जपणारे. म्हणाले, "असं काही अस्तित्वात असतं का?एका मुलाला कसं वाटेल तो मुलगी आहे म्हणून?भ्रम आहे तुझ्या मनाचा. नको नको ते विचार करणं बंद कर.दुर्लक्ष करायचं."

या शब्दांनी तो घाबरला. त्याला वाटलं यात आपलीच काहीतरी चूक असेल.वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो याकडं दुर्लक्ष करायलाही लागला,पण.... यातल्या वेदना काही संपेनात. तो पुन्हा आईजवळ तेच बोलला. आईला त्याच्या डोळ्यातील आसवं बघवेनात.ती म्हणाली, "बेटा,तुला त्रास होतोय ना तर आपण एका चांगल्या डॉक्टरांना दाखवूया का?"

त्यांनी यशच्या आईच्या एका ओळखीच्या डॉक्टरांना दाखवलं. त्या निष्णात डॉक्टरांना यशची अवस्था समजली. ते यशच्या आईला म्हणाले,

"मी काय सांगतोय ते नीट आणि शांतपणे ऐका मॅडम. हे एक शारीरिक व्यंग आहे. जेमतेम फक्त एक टक्केच लोक अशा अवस्थेत जन्माला येतात. इट्स कॉल्ड Gender Identity disorder."

"डॉक्टर...डॉक्टर यावर उपाय काय?" सुन्नपणे यशच्या आईने विचारले.

"उपाय आहे. लिंगबदलाचं ऑपरेशन करणं हा यावरचा उपाय आहे. यालाच sex reassignment surgery असं म्हणतात. हे ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला नंतर 'ट्रान्सजेन्डर' संबोधतात. ऑपरेशनमध्ये रुग्णाच्या जीवाला धोका असू शकतो,पण आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे की तो धोका अगदी नगण्य. ऑपरेशननंतर रुग्णाला स्वतःचं अपत्य होण्याची शक्यताही कमी असते..पण ऑपरेशन नाही केलं तर त्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्य निरर्थक वाटू शकतं."

डॉक्टरांचे शब्द यशच्या आईच्या कानावर घाणाघात करत होते. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या भविष्याबद्दल रंगवलेलं आईचं स्वप्न जणू क्षणात उध्वस्त झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर भीषण शून्यपणा दाटला.

यशची ही अवस्था आजूबाजूला समजली आणि नको नको ते सूर उमटायला लागले.

"शाप असतो हो मागच्या जन्मीचा. जन्मच शापित. काही अर्थ नसतो असल्या जगण्याला." एकीकडून सूर निघायचा.

"बाई,बाई,काय ही पाश्चिमात्य थेरं. कलियुग आलंय हो... "दुसरीकडून सूर निघायचा.खूप कमी जणांनी यशची अवस्था समजून घेऊन त्याला साथ दिली.

यशच्या मनात आत्महत्येचाही विचार आला,पण.. त्याने निर्धार केला,'मरण सोपंच असतं. जगणं कठीण. त्या कठीण जगण्याला आपण सोपं करायचं. लिंगबदलाचं ऑपरेशन करायचं. ..'

वडिलांचा टोकाचा विरोध होता,पण त्याच्या आईने त्याला साथ दिली,ऑपरेशनच्या खर्चासाठी स्वतःचे काही अनमोल दागिनेही विकले…आणि त्याचं ऑपरेशन झालं. मुलाची मुलगी झाली. यशची पृथा झाली. आता शरीरही तेच होतं जे मन सांगत होतं... पण एक ट्रान्सजेन्डर म्हणून समाजाने पृथाचा स्वीकार केला नाही. शेवटी तिला आई-वडिलांपासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिचा शारीरिक संघर्ष संपला,पण सामाजिक संघर्ष चालू झाला.

तिला लोक घाबरायचे,आजारी पडल्यानंतर दवाखान्यात गेली तर तिथले कर्मचारीही तिची टर उडवायचे. 'स्पर्शासारख्या' अनमोल गोष्टीपासून ती तुटली. सगळीकडून तुच्छतेची वागणूक मिळत होती... पण तरी तिचं उराशी बाळगलेलं स्वप्न संपलं नव्हतं. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न,पण त्या मार्गातही असंख्य अडथळे होते. कुठलाही फॉर्म भरताना तेव्हा पुरुष आणि महिलांव्यतिरिक्त 'ट्रान्सजेन्डर' म्हणून पर्याय नव्हता. सगळ्या कागदपत्रांवरून माणूस म्हणून तिचं अस्तित्वच संपलं होतं.

तिनं तीन वेळा न्यायालयात धाव घेतली. जिद्दीने लढा चालू ठेवला. मुलाची मुलगी झालेलं ऍफिडेव्हिट सादर केलं.'व्यवस्थेशी लढणारी पृथा' म्हणून माध्यमांनीही तिच्या प्रवासात तिला न्याय मिळवून देण्यास मदत केली. शेवटी न्याय मिळालाच... तिने तो मिळवला. ट्रान्सजेन्डर म्हणून ती पोलीस दलात भरती झाली.

मानवतेचे अंकुरही अद्याप जिवंत होतेच की ...

नुकताच तिने तिचा चौथा वाढदिवस साजरा केला. तसा अठ्ठाविसावा वाढदिवस होता,पण पुनर्जन्मातला चौथा..

'जीवनाची शाळा' संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात आयुष्याशी दोन हात करून यशस्वी झालेल्या लोकांना मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये तिला बोलावण्यात आलं होतं.

"माझ्यातलं व्यंग लिंगाशी निगडित आहे म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारायचं?एका विशिष्ट चौकटीबाहेर घडणारी गोष्ट समजून घेण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. मानवी वेदनेच्या आणि दुःखाच्या मुळाशी गेल्यावर जगण्याचे नवे आणि सुंदर आशय समजतात." हजारो लोकांसमोर तिने आपला प्रवास उलघडला.शेवटी ती म्हणाली,"माझी ही गोष्ट मी कशासाठी सांगितली?तर अशा अवस्थेत जन्म झाला म्हणून ज्यांनी आत्महत्या केली आणि त्याचा कुणाला पत्ताही लागला नाही,अशांना आदरांजली वाहण्यासाठी.. आणि जे अजून अजाण आहेत आणि ज्यांना आपलं संपूर्ण आयुष्य शाप वाटतो,त्यांना आधार देण्यासाठी.. हे सांगण्यासाठी,"अशी अवस्था म्हणजे आयुष्याचा अंत नाही ,तर तो फक्त आयुष्याचा वेगळा प्रवास आहे ."

पृथानं आपलं भाषण संपवलं,पण तिला सलाम करण्यासाठी सुरु झालेल्या टाळ्या कितीतरी वेळ वाजतच राहिल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational