Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
दमलेल्या बाबाची कहाणी
दमलेल्या बाबाची कहाणी
★★★★★

© Kishor Mandle

Tragedy

10 Minutes   1.6K    61


Content Ranking

दमलेल्या बाबाची कहाणी

“पायावर डोके ठेवत रांगेने भाविक पुढे सरकत राहतात, मशीन चालावी तसा माझा हात आशीर्वाद द्यायला वर येतो.

मधेच डोक्यावरून हात फिरवला की तो किंवा ती असे गहिवरून जातात की विचारू नकोस! माझ्या समोर अगदी

गरीब गाय असा चेहरा करून उभे राहतात. बाहेर जाताना मात्र आज बाबांनी माझ्यावर कृपावर्षाव केला म्हणून अशी

काही मान ताठ होते, की एखाद्या वेळी मलाच हसू येते. कृपावर्षाव हा अफलातून शब्द सुचणारी डोकी खरच सुपीक असतील.

तसा हा एकच शब्द नाही, माझ्या नावाच्या पुढची उपाधी बोलशील तर एकाच वेळी आठदहा देवाची नावे घेतल्याचे पुण्य

पदरात पडेल.”

सत्यानंद बाबा उर्फ सुनील झोपाळ्यावर झुलत बोलत होता. समोरच्या खुर्चीत बसलेला दामोदर उर्फ दामू उत्सुकतेने ऐकत

होता. हाताखालचा लोड सरळ करत सुनील सवयीप्रमाणे मागे रेलून बसला. वीस वर्षांनी त्याचा बालमित्र भेटला होता.

मधल्या काळात दोघांच्याही आयुष्यात बरंच काही घडून गेले होते. दामू आणि सुनील छोट्याश्या खेड्यात जन्माला आलेले.

एकजण आज हजारो लोकांचे दैवत बनला होता, लोक त्याच्या पायाशी लोळण घालत होते. दामू मात्र गावची पाच एकर जमीन

कसायला पाणीच नाही म्हणून आज शहरात कामधंदा शोधायला आला होता. हातात असलेला व्हिस्कीचा ग्लास खाली ठेवत

सुनील दाढीवर हात फिरवत म्हणाला

“दामू तू काही काळजी करू नको, मी आहे ना! मी सगळं व्यवस्थित करेन. तुझ्या सगळ्या स्वप्नांना मी पूर्ण करेन ”

हातात ग्लास घेऊन कडवट घोट रिचवला.

दामूच्या हातात असलेला ग्लास तसाच राहिला होता. सुनील बालमित्र होता पण मधल्या 20 वर्षात त्याचाशी कसलाच संपर्क नव्हता. आयुष्याची घडी अशी काही विस्कटेल अस स्वप्नातही वाटले नव्हते. अगदी फार नाही पण एकूण 50 एकर जमीन दामुचे वडील आणि त्यांचे चार भाऊ अशी सामायिक होती. पाचही भाऊ तेव्हा एकत्र राहायचे. घर चालवून वर पैसा उरावा एवढं त्याची काळी माय त्याला देत होती. सुनीलचे वडील त्यांचे मूळ गाव सोडून इथे स्थायिक झाले होते. त्याच कारण कधीच दामुने त्याला विचारले नाही पण थोड्याच दिवसात दोघांची मैत्री खूप घट्ट झाली होती. सुनीलच्या बाजूने कदाचित त्याच कारण त्यावेळी दामुच्या घरची सुबत्ता असेल. दामुशी मैत्री झाल्यावर जोपर्यंत गावात होता तोवर सुनील एकदाही दुपारचं जेवण घरी जेवला नव्हता. शाळा जशी सुटायची तसे दामू आणि त्याचे गावातले मित्र काहीना काहीतरी खेळ शोधायचे. कधी विहिरीत पोहायला जा, अर्थात विहीर दामुचीच असायची. नाहीतर अजून काही खेळ. खेळून दमल्यावर सगळी आपल्या घरी जायची. दामू मात्र कधीच सुनीलला जाऊन द्यायचा नाही. घरी ताटाला ताट लावून दोघे जेवायचे आणि मग सुनील घरी जायचा. काळ बदलला आणि पाच भाऊ वेगळे झाले. जमीन वाटली गेली. मनात वाढलेली हाव मायेच्या अनंत झऱ्यापुढे कमी पडली. तरीही बरंच चाललं होतं. मधल्या काळात सुनील शिक्षणासाठी मामाकडे गेला. निसर्गाने कोप केला. पाण्याची कमतरता एक वर्ष, दोन वर्षे... जमेल तेवढी ताणून पाहिली. पण शेतीच्या खर्चापुढे येणारी मिळकत घर चालवायला लागणाऱ्या पैश्यापुढे हरली. मग पैसे कमवायला दुसरा काहीतरी मार्ग शोधणे हाच पर्याय उरला. बायकोने घरातले तेल संपलय आणि आधीच्या उधारीमुळे दुकानदार काही दुकानासमोर उभं करत नाही असे सांगितले. साधू वाण्याच्या दुकानासमोर उभा होता. साधुचं शेम्बड पोर दुकानात लावलेल्या tv चे रिमोट बरोबर खेळत होते. आता दुकानात tv कसा असेल हा प्रश्न पडला असेल तर, वर्ल्ड कप चालू असताना ह्याच दुकानाच्या समोर गावातली लोकं तमाशाचा फड लागल्यासारखे चादरी घेऊन बसायचे. साधूला तेवढाच मोठेपणा आणि गावातल्या लोकांना विरंगुळा. पण तो tv तिथेच स्थायिक झाला. साधूचे शेम्बडे पोर चॅनेल बदलत होते, आतून त्याच्या आईचा आवाज आला तसे ते पोर आत पळून गेले. साधू बरच काही ऐकवत असताना दामुचे लक्ष चॅनेलवर स्थिरावले. कुठलातरी संस्कार नावाच्या चॅनेलवर एक बाबा प्रवचन देत होता. काहीतरी ओळखीची खूण दिसावी आणि आपण ते टक लावून पाहत राहावे तसे दामू स्तब्ध झाला. चेहरापट्टी थोडीशी ओळखीची वाटत होती पण बोलण्याची लकब मात्र हुबेहूब सुनील सारखी. दामू तेलाबद्दल विसरून गेला. दहा पंधरा मिनिटे तसाच टीव्ही कडे पाहत राहिला. साधू दुसऱ्या लोकांना सामान देत दामुकडे पाहत होता. टीव्हीवर असलेली व्यक्ती सुनीलच आहे हे खात्री करत होता तेवढ्यात साधू वाण्याने हाक मारली.

“दामू काय सामान पाहीजेल का तुला! का बारक्या पोरासारखं टीव्ही बघत उभा राहिलाय”

साधूचे बोलणे ऐकून दामू भानावर आला. हातातली तेलाची किटली सावरत म्हणाला

“तेल पाहीजेल थोडंसं, अर्धा लिटर द्या. मी आठवड्याचा बाजार झाला की पैसे देतो”

साधूने त्याच्या हातातून किटली घेतली. तेल घालत म्हणाला.

“ सामानाला कधी नाही बोललोय का, पण उधारी पाचशेवर गेली. ह्या आठवड्यात जरा हिशोब पुरा कर. आम्हाला पण दुकान चालवायला पैसा लागतो ना!”

दामुने मान हलवली. हातात तेलाची किटली घेऊन दुकानासमोरच घुटमळत होता. जरा चाचरत विचारले

“साधूशेठ ते टीव्हीवर माणूस आहे तो कोण आहे”

साधू टीव्हीकडे पाहत हसायला लागला.

“तू कुठे ह्या बाबा लोकांच्या नादी लागतोस, ही आपली कामं नव्हेत. मुंबईत खूप मोठं नाव आहे ह्याचं. मी उन्हाळ्यात बायको पोरांना घेऊन बहिणीकडे गेलेलो. सत्यानंद बाबाचा मोठा फोटो होता हॉलमध्ये. माझ्या बहिणीने बळेबळेच मला प्रवचनाला घेऊन गेली. काय पण बोल हा, मजा आहे लेकाची. लोक लाईन लावून पायावर डोकं काय ठेवतात, पैसे पण देतात.”

दामुच्या मनाची मात्र खात्री झाली होती, हा नक्कीच सुनील आहे. आता तो सत्यानंद बाबा झाला असला तरी तो सुनीलच होता आणि साधूच्या सांगण्या वरून सुनील चांगलाच श्रीमंतही झाला होता. मुंबईत दामुचे कोणी ओळखीचे नव्हते, मग सुनीलकडे काही कामाचं झाले तर!

दामुला विचारात गुंगलेले पाहून सुनीलने दामुच्या समोर बोटांनी चुटकी वाजवली. भानावर आलेल्या दामुने नकळत हातात असलेला ग्लास ओठाला लावला. सुनीलने दाढीवर हात फिरवत आपला ग्लास ओठाला लावला. एक घोट घश्यात उतरला आणि शब्द निसटू लागले.

“सकाळी तू समोर उभा राहून जसा सुनील बोललास ना, एकदम तुझ्या विहिरीत मोटेच्या कट्ट्यावरून उडी मारल्या सारखे वाटले. बाहेर अंगाची लाही होत असताना ते पाणी जितके सुखावह वाटायचे ना तसं तुला पाहिल्यावर झाले. तुला भक्तांच्या रांगेत पाहून गोंधळून गेलो...पण तसं न दाखवण्यात आता मी पटाईत झालोय.”

तिथे जरी सुनीलने ओळख दाखवली नाही पण आपल्या विश्वासातल्या माणसाला दामुच्या मागे पाठवून दिले. सत्संग उरके पर्यंत दामूला आतल्या बाजूला थांबवून ठेवले होते. घरी येताना दामुची सगळी हकीकत ऐकली. घरी आल्यावर निरामयी माता उर्फ अनुराधाला त्याने ओळख करून दिली. आज बऱ्याच वर्षांनी सुनीलने दारूला स्पर्श केला. अर्थात सत्यानंद बाबाला हँगओव्हर होऊन चालणार नव्हतं आणि दुसऱ्या कुणासमोर दारू पिणे त्याच्या प्रतिमेला साजेसे नव्हते.

दामू आल्यापासून फार बोलत नव्हता, सुनीलच्या ह्या सगळ्या थाटाकडे पाहून तो विस्मयचकित झाला होता. सुनीलला माहीत होते की गावचा दरिद्री मुलगा अचानक सत्यानंद बाबा कसा झाला असेल हे दामुला कळत नव्हते. बरेच वर्षे मनातली ही कबुली कोणासमोर तरी द्यायची होती.

“दामू तुला प्रश्न पडला असेल ना की तुझ्या बरोबर खेळणारा मुलगा आज दुनियेचा देव कसा झाला!”

दामुच्या मनातला प्रश्न असला तरी थोडेसे अवघडत त्याने होकारार्थी मान हलवली.

“मामाकडे शिकायला गेलो. बारावी पूर्ण केली आणि इंजिनिरिंगला ऍडमिशन घेतलं. वडिलांनी खूप कष्ट केले माझ्या शिक्षणाकरता. मी पण त्यांच्या प्रयत्नांना वाया जाऊन दिले नाही. इंजिनिरिंग पूर्ण केली. नशिबाने साथ दिली आणि मुंबईत नोकरीसुद्धा मिळाली. आईवडिलांनी लग्न करून दिले. पाच वर्षे खूप आनंदात गेली. मुलगा 2 वर्षाचा झाला. सगळं अगदी सुरळीत चालले होते आणि मंदी आली. महिना 40 हजार पगार असताना एक दिवशी अचानक कंपनीने स्टाफ कमी करायला सुरू केले. काहीच दिवस उलटले असतील आणि दोन महिन्याचा पगार देऊन निरोपाचा नारळ दिला. शहरात राहणाऱ्या लोकांना लागलेल्या साथीमध्ये मी पण होतो. घराचा आणि गाडीचा हप्ता चालू होता. दोन महिन्याचा पगार आणि आधी साठवलेली काही बचत चार महिने पुरली. कुठे नोकरी मिळत नव्हती आणि जवळ असलेली जमा संपायला लागली होती. बायका पोरे आहेत तर खर्च आलाच. मला नोकरी मिळत नव्हती. आईवडिलांच्या मर्जीने गावची मुलगी केली. अनुराधा तशी खूप चांगली आहे रे! पण सातवी पास मुलीला काय नोकरी मिळणार. अजून जास्तीत जास्त दोन महिने आपण तग धरू शकू हे मला कळून चुकले. निराशा ही एक अशी गोष्ट आहे जिला आपण कितीही दूर ढकलून देण्याचा प्रयत्न करतो पण धीर हरला की ती सावली सारखी चिकटून बसते. घरात कधीच मनाची ही परिस्थिती दाखवली नाही, पण कणखर राहायला कुठेतरी आधाराची गरज भासते. दिवसभर घरी बसून मन अजून बैचेन व्हायचे म्हणून घराजवळ असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन बसायचो. सुरवातीला संध्याकाळी जायचो, नंतर दुपारपासून ते मंदिर बंद होईतो बसायचो. बँकमधले पैसे आता जवळपास संपायला आले तसे माझे मंदिरात जाणे वाढले. मी दिवसभर मंदिरात असायचो. कधीकधी अनुराधा मला घ्यायला यायची. एक दिवस मुलांच्या शाळेची फी भरली. अकाऊंटवर आता पाच हजार उरले होते. मी सुन्न होऊन मंदिरात बसलो होतो. मला आजूबाजूला काय चाललंय हे जवळजवळ समजणं बंद झाले होते. एकटक गाभाऱ्यात असलेल्या पिंडीकडे पाहत होतो आणि एक स्त्री माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मी माझ्याच विश्वात होतो. तिने तिचे रडणारे बाळ माझ्या पायाजवळ ठेवले. माझ्यासमोर घुडग्यावर बसून रडत होती. ती काय बोलत होती त्याकडे माझे लक्षही नव्हते. त्या गोष्टीला तीन दिवस झाले असतील, मी सकाळी मंदिर उघडायचे वेळी बाहेर उभा होतो. मंदिराचे दार उघडण्या अगोदरच एक स्त्रीपुरुष माझ्या पायावर लोटांगण घालू लागले. मला खरच काही कळत नव्हते. मी माझ्या विचारात जस दार उघडले तसे माझे गाऱ्हाणे सांगायला आत गेलो. सवयी प्रमाणे माझ्या जागेवर बसलो. ते नवराबायको माझ्या मागेमागे आले. मला काहीच कळेना. त्या बाईने तिच्या मुलाला पुन्हा माझ्या पायावर ठेवले. पायाशी अगदी सातआठ महिन्याचे बाळ पाहून न राहवून त्याला उचलून घेतले. एखादं क्षण त्याच्याकडे पाहून त्या स्त्रीच्या हातात दिले. मी माझ्या विचारात मग्न होतो. त्या पुरुषाने माझ्या पायाजवळ पाचशेची नोट ठेवली. दोघे माझ्या पायावर लोटांगण घालून निघून गेले. संध्याकाळ पर्यंत पायाजवळ सातआठशे रुपये जमा झाले होते. त्यादिवशी पहिल्यांदा माझे लक्ष त्या पिंडीकडे नव्हते. मंदिर बंद होण्याच्या वेळेला एक माणूस माझ्याजवळ अगदी आस्थेने आला. माझ्या पाया पडत म्हणाला ‘बाबा मंदिर बंद करू का?’ मला त्या क्षणाला काय बोलावे कळेना. मी एकदा अपराधी नजरेने आतल्या पिंडीकडे पाहिले आणि उठलो. पायाशी पडलेल्या पैश्याकडे मन अडकले होते पण वाकून ते उचलायची हिंमत होत नव्हती. मी तसाच उठलो आणि घरी निघून आलो. त्या रात्री झोप लागेना. सकाळी atm मधून पैसे काढल्यावर आलेली पावती समोर धरून बसलो होतो. पाच हजार उरले होते. पुढच्या महिन्यात घराचा हप्ता येणार होता. आई आणि बाबांना काही दिवसा पूर्वी गावी पाठवले होते. अनुराधा मुलाला शाळेत चालवत नेत होती. गावावरून मामाने निरोप पाठवला होता की गरज पडल्यास गावी निघून ये, पण एवढे सगळे उभे केलेले सोडून गावी जाणे मनाला रुचत नव्हते. मंदीचा काळ ओसरे पर्यंत नोकरीचे काही होईल अशी आशा दिसत नव्हती. काय कराव कळत नव्हते. रात्रभर विचारात पडून राहिलो.”

सुनीलच्या आवाजात आता थरथर जाणवू लागली होती. त्याने डोळे भरून आले म्हणून बाजूला असलेला केशरी रुमाल हातात घेतला. त्यावर ओम नमः शिवाय असे लिहिलेल्या शब्दाकडे पाहत डोळे पुसले. दामू त्याच्या मित्राकडे खूप मायेने पाहत होता. घरी आल्यापासून आता त्याला बालमित्र दिसत होता. लहानपणी एकदा आपल्या घरी जेवताना सुनीलच्या डोळ्यात आलेले पाणी त्याला आठवले. सुनीलने एकवार दामुकडे हसून पाहिले

“बरेच दिवस झाले रे… बोलून… रडून. सोड, पुढची गोष्ट सांगतो. तर दुसरा दिवस मंदिरात जायचे नाही असा निश्चय केला. दुपार पर्यंत घरीच बसून होतो. जशी संध्याकाळ झाली तसा अंधार पसरू लागला. संध्याकाळी अगदीच राहवले नाही म्हणून मंदिराकडे गेलो. बाहेरूनच नमस्कार केला. परत फिरून घराकडे निघणार तेव्हा समोरून येणारे काही लोक मला पाहून हात जोडून उभे असलेले दिसले. अगदी अवघडत मी त्यांना नमस्कार केला. तेवढ्यात आतून तो कालचा माणूस धावत बाहेर आला. माझ्या समोर हात जोडून म्हणाला ‘बाबा संध्याकाळची आरती घेता का?’ मला काय चाललंय हे कळेना. मी काही उत्तर देण्याआधीच त्याने माझा हात धरला आणि मंदिरात घेऊन गेला. पुढचे सगळे अगदी यांत्रिकपणे करत गेलो. आरतीची थाळी माझ्या हातात होती. लोक मागे आरती म्हणत होते. मी आतल्या पिंडीकडे पाहत थाळी फिरवत होतो. आरती संपली आणि लोकांनी आरती घेत रांगेने माझ्या पाया पडायला सुरू केले. समोर तो माणूस शांतपणे हे सगळे पाहत होता. कालच्या सारखेच आजही लोक आरती घेऊन थाळीत पैसे टाकत होते. हळूहळू गर्दी पांगली. मी ते आरतीचे ताट खाली ठेवले. देवाला नमस्कार केला आणि बाहेर निघालो. मागून आवाज आला.

‘सत्यानंद बाबा, जरा थांबा’ मी मागे वळलो. त्या माणसाच्या हातात आरतीची थाळी होती. माझ्याजवळ येत तो म्हणाला. ‘दक्षिणा तर घेऊन जा तुमची’ मी अजूनही त्याच्याकडे वेड्यासारखा पाहत होतो. थाळीत दोन-तीनशे रुपये जमले होते. माझ्या हातात त्याने पाचशेची नोट ठेवली. माझ्याकडे हसत म्हणाला. ‘उद्या सकाळच्या आरतीला या’ आणि तो निघून गेला. मी हातात असलेल्या पाचशेच्या नोटेकडे पाहत राहिलो. मुठीत ती पाचशेची नोट घट्ट धरून मी घरी आलो. अनुराधाला सांगावेसे वाटले पण ती आपल्या बद्दल काय विचार करेल ह्या लाजेने काहीच बोललो नाही. एक गोष्ट आपण कदाचित कधीच कुणाला सांगत नसू पण ती प्रत्येकाच्या मनात असते, हाव! माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. एकदा आईला स्वप्न पडले की ती दळणाच्या चक्कीच्या दरवाजावर बसलेली होती. वेळ घालवायचा म्हणून ती जमीन बोटांनी उकरू लागते आणि तिला एक रुपयाचे नाणे मिळते. ते नाणे पाहून ती पुन्हा जमीन उकरते, पुन्हा एक नाणे. जाग येईपर्यंत ती जमीन उकरत होती.”

घरातला एक नोकर बोलला

“साहेब तुम्हाला बाईसाहेब जेवायला बोलवतायतं”

सुनीलने चिडून त्याच्यावर हाताखाली असलेला लोड फेकला.

“मातेला सांग, आम्ही येतोय.”

दामुने त्या नोकराकडे पाहिले. त्या नोकराने निमूटपणे लोड उचलून सुनीलच्या बाजूला ठेवला आणि आत निघून गेला.

सुनीलच्या चेहऱ्यावर राग होता की अजून काही हे दामू विचार करत असतानाच सुनीलने त्याचे उत्तर दिले.

“हिला आपण जगाची माता असल्या सारखे वाटायला लागलंय, लोक येऊन पाय धुवून पितात ना हिचे.”

दामु उठून उभा राहिला. सुनील अजूनही झोपाळ्यावर बसल्या बसल्या धुमसत होता. सुनीलच्या डोक्यावर हात फिरवून दामू बोलला.

“सुनील तुला माझ्या इतके कुणी ओळखत असेल तर त्या वहिनी आहेत. जेवायलाच बोलवत आहेत ना!”

सुनीलने एवढा वेळ अडवून ठेवलेला बांध सुटला.

“चुकलंच रे, तिने हे आयुष्य निवडले नाही. बायको आहे ना ती. नवऱ्याच्या मागे डोळे झाकून चालत आलीय. मी जरी पळवाट निवडली असेल तरी ती माझ्या मागेच चालणार ना!”

सुनील झोपाळ्यावरून उठून उभा राहिला. दामुने एकदा त्याच्या डोळ्यात पाहिले. सुनीलच्या खांद्यावर हात ठेवून बोलला.

“काय झाले, कशामुळे झाले. ह्याचा विचार करण्यापेक्षा ह्यापुढे काय करता येईल हे ठरव. चुका सगळे करतात. पण चुकांची जाणीव झाल्यानंतर तुम्ही काय करता ह्यात तुमच्या आतला परमेश्वर जिवंत आहे की नाही हे कळते.”

सुनीलने एकदा शांतपणे दामुच्या डोळ्यात पाहिले. खांद्यावर असलेला दामुच्या हाताला खाली ठेवत हसत बोलला.

“चल दामू, जेवून घेऊया. उद्या सोमवार आहे ना! शंकराच्या आरती नंतर माझी आरती असते”

सुनील लटपटत्या पायाने आत जाऊ लागला. दामू समोरच्या बंगल्याचा समोर उभा राहून लोकांच्या देवाला उदास जाताना पाहत होता.

दमलेल्या बाबाची कहाणी सुनील

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..