Kishor Mandle

Inspirational


4.3  

Kishor Mandle

Inspirational


तंटामुक्त गाव

तंटामुक्त गाव

5 mins 1.5K 5 mins 1.5K

लाल गुलाबी झालरीनी सजलेला मांडव, वऱ्हाडी रंगीबेरंगी कपड्यात सजून आलेले. स्टेजवर वरवधू सात जन्माच्या बंधनात जुळले जात आहेत. अक्षतांनी सगळा मांडव भरून गेला आहे. बाजूला बनत असलेल्या जेवणाचा सुवास पसरला आहे. भटजींच्या मुखातून येणाऱ्या मंगलष्टकाच्या शब्दात नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे. आता हे सगळं वातावरण असल्यावर लग्न नावाचा सोहळा पार पडतोय हे कळलंच असेल. सगळं कसं अगदी सुखावह, आता यात जर एक गोष्ट सांगितली की वातावरणात तापमान 40 अंश आहे. घामाच्या धारा फक्त चेहराच नाही, तर कपड्याच्या आतही न सांगता येतील अशा जागेवरून ओघळत आहेत. मग तो आनंद साजरा करायला जरा जास्तच परिश्रम लागतात. अक्षता पडल्या तश्या जगजाहीर नियमाप्रमाणे लोक जेवणाकडे धावले. दिपकला मात्र अतीव प्रयत्न करूनही न सहन झालेली उष्णता मानवेना. तो पटकन मांडवाबाहेर आला. त्याच्या सारखेच बरेच जण आधीच बाहेर आले होते. समोरच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. अगदी 4-5 अंशाचा फरक असेल पण तोही सुखावह होता. ऑफिसमधल्या मित्राच्या लग्नाला तो आणि अजून तिघे आले होते. मित्राच्या गावी लग्नाला येण्यामागे जो उत्साह होता तो मे महिन्याच्या या गर्मीत निथळून गेला होता. त्याचे मित्रही बाहेर आले. निखिलने लिंबाखाली दिपकला पाहिले. राकेश आणि गौरवला हात दाखवून निखिल झाडाकडे आला. दिपकच्या जवळ येत म्हणाला

“काय झालं तुला, इकडे का आलास? जेवायला जाऊया चल!”

दिपक हातात असलेल्या रुमालाने चेहरा पुसत म्हणाला

“थांब रे निख्या, इथे गर्मीने जीव जायची पाळी आलीय. तुला जेवणाची पडलीय”

तोवर राकेश आणि गौरव आले. त्या दोघाकडे हसत निखिल म्हणाला

“ह्या दोघांची पण अशीच अवस्था आहे, हा गौरव तर तासाभरात 3-4 लिटर पाणी प्यायला असेल”

हसायला पण परिश्रम लागत होते. चौघे झाडाखाली उभे राहून जेवणाच्या मंडपाकडे धावणाऱ्या लोकांकडे पाहत होते. तितक्यात मागे कसलातरी आरडाओरडचा आवाज आला. रस्त्यावर एक जोडपे होते. बाईक रस्त्यावर पडली होती. पुरुष खाली पडलेल्या बाईला लाथा मारत होता. ती ओरडत होती पण तिला उठायला जमत नव्हते. जवळजवळ 5 मिनिटे हा प्रकार चालू होता. तितक्यात मंडपातून तीनचार मुले त्या जोडप्याकडे धावू लागली. त्यांना आपल्याकडे येताना पाहून तो पुरुष घाबरून लटपटत्या पायाने पळू लागला. ती मुले त्याच्या मागे धावत होती. त्या पुरुषाच्या धावण्याच्या परिस्थिती प्रमाणे तो प्यायला होता. अर्थात काही अंतरावरच तो पडला. त्या मुलांनी त्याची गचांडी धरून त्याला उचलला. आता ते सगळे मिळून त्याला मारणार तितक्यात दिपकला मागून आवाज आला. दिपक आणि त्याच्या मित्रांनी मागे वळून पाहिले. नवऱ्याचे वडील मोठ्याने ओरडत होते

“ए पोरानो, मारू नका रे त्याला. इकडे घेऊन या”

पोरांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, पण काकांच्या शब्दावर ते थांबले. त्या पुरुषाला दंडाला धरून मंडपाकडे घेऊन आले. दिपक आणि मित्र हे सगळे अवाक होऊन पाहत होते. मंडपाकडे आल्यावर काकांनी त्या पुरुषाला हात धरून बाजूला नेले. दिपकच्या तर तळपायाची आग मस्तकाला गेली होती. निखिल तोवर बोललाच

“ह्या हारामखोराला तुडवून मारायला पाहिजे होता, काकांनी उगाच अडवलं”

राकेश आणि गौरवने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. दिपकला आलेला राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता पण क्षणातच त्याला काहीतरी आठवले. ती घटना आठवली तसे त्याला त्या माणसावर आलेल्या रागाईतकाच स्वतःचा राग आला. ती घटना अगदी 3 महिन्यापूर्वीची होती. स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभा होता. ट्रेन आली आणि उतारू प्रवासी उतरत असतानाच एक कॉलेजच जोडपं उतरत होते. अकरावी किंवा फारतर बारावीची मुले असतील. ती मुलगी खाली उतरत होती आणि प्लॅटफॉर्मवरून ट्रेन मध्ये चढण्याऱ्या मुलाने तिच्या छातीला हात मारला. त्या मुलीने झटकन त्याच्या पाठीवर हात मारून एक शिवी दिली. दिपक हे सगळे डोळ्यासमोर पाहत होता. त्याला त्या मुलाला पकडणे शक्य होते, पण तो स्तब्ध बघत राहिला. ती मुलगी वळून कंपार्टमेंट मध्ये पाहत शिव्या देत होती. तिचा मित्र किंवा जो कोणी बॉयफ्रेंड होता तो तिला हाताला धरून बोलला

“चल जाऊदे, तो चढला आतमध्ये. गर्दीत सापडणार नाही तो”

दिपक शरीर गोठल्या सारखा हे सगळे पाहत होता, आणि ट्रेन निघाली. त्या मुलीच्या चेहऱ्यावर असलेला राग पाहून दिपकला स्वतःची शरम वाटली. दिपकला ट्रेनमध्ये चढलेल्या मुलाला धरून बाहेर खेचून घेणे सहज शक्य होते. अश्या क्षणाला आपण कसे काय निमुटपणे पाहू शकतो. अर्धा तास तो प्लॅटफॉर्मवर उभा होता. शेवटी ह्यापुढे असे काही आपल्या समोर घडत असेल तर आपण ते अडवायचे हा निश्चय करून तो निघाला होता. पुन्हा ती वेळ आली होती आणि आपण तसेच निश्चल उभे राहिलो. अर्थात त्याच्या मनात चाललेले हे विचार बाजूच्या मित्राच्या मनात चालू असतीलच ह्याची शक्यता कमीच होती. मारणारा पुरुष होता आणि ते निमुटपणे पाहणारेही पुरुष होते… कदाचित!

काळ ह्या सगळ्या दुःखाचे औषध आहे असे म्हणतात. दिवस निघून गेला. त्या जोडप्याचे काय झाले ते कळले नाही. मित्राच्या लग्नाची वरात आहे तर थांबणे भाग होते. लग्न उरकले. नवऱ्याच्या मित्रांनी दिपक आणि इतरांची राहण्याची सोय बाजूलाच केली होती. संध्याकाळ झाली होती, वरातीला वेळ होता. दिपक आंघोळ करून बाहेर आला. निखिल आणि बाकीचे आधीच बाहेर बसले होते. दिपक बाहेर आला तेव्हा बाहेर गर्दी दिसत होती. दिपकने गर्दीतून वाट काढत पाहिले. काका आणि तो सकाळचा पुरुष खाटेवर बसले होते, समोरच जमिनीवर ती बाई बसली होती. तिच्या बाजूला बसलेली वयस्कर बाई कदाचित तिची आई असावी. दिपक पुढे गेला नाही. तिथेच उभा राहून ऐकू लागला. काका बोलत होते

“पाव्हन, तुम्हाला जर आहेर पसंत नव्हता तर मला सांगायचं ना, आमच्या पोरीला मारून काय मिळालं”

तो पुरुष अजूनही दारूच्या नशेतच वाटत होता. त्याने काही बोलायच्या आधीच दुपारी त्या पुरुषाला मारायला गेलेल्या पोरांपैकी एकजण बोलला

“काय नाय आप्पा, ह्याच नेहमीच आहे. हे काय पहिल्यांदा झालं नाही. मागे पण दोन लग्नात असच केलं होतं ह्याने”

काका हातानी त्या मुलाला शांत राहण्याचा इशारा केला. तो पुरुष अडखळत बोलला

“तस काही नाही आप्पा, चुकलं माझं. पुन्हा नाही होणार”

काका काही बोलण्या अगोदरच तो मुलगा आणि आजूबाजूचे ओरडू लागले. एकजण बोलला

“आप्पा ह्याच काय ऐकू नका, हा दरवेळेला हेच म्हणतो. दारू पितो आणि मग असले तमाशे करतो.”

काका समजूत घालत होते आणि ती मुले चिडून पुन्हापुन्हा बोलत होती. या सगळ्यावर तो पुरुष अजूनही फक्त मान हलवत तेच तेच परत बोलत होता. मला माझी चूक कळली आणि असं पुन्हा नाही होणार. दिपक हा सगळा प्रकार पाहत होता. ती स्त्री तिच्या सासरी होणारा जाच सांगत होती आणि त्यावर ठराविक प्रतिक्रिया येत होत्या. काकांचे समजावणे, मुलाचे चिडणे आणि त्या पुरुषाचे माफी मागणे. जवळजवळ अर्धा तास हा प्रकार चालू होता. दिपक कंटाळून मागे वळला. तितक्यात त्या स्त्रीचे वाक्य कानावर आले

“मारतो ठीक आहे, पण चारचौघात मारायची काय गरज आहे”

दिपकची गर्रकन मान मागे वळली. अर्ध्याहून जास्त लोकांना हा मुद्दा पटला होता. गर्दीतून आवाज येत होते

“बरोबर हाय”

“घरातली गोष्ट घरात राहिली पाहिजे”

दिपकच्या मस्तकात नस थरथरू लागली. पुढे काही ऐकावे ही सहनशक्ती संपली होती. तो गर्दीतून वाट काढत बाहेर निघत होता, मनात विचारांची गर्दी जमू लागली.

“साला, नक्की काय चुकतंय. पुरुष म्हणून मी वेळेला उभा नाही राहिलो म्हणून मला माझे मन खातेय. काही स्त्रिया होणाऱ्या अत्याचाराला अश्याप्रकारे योग्य ठरवतायत. प्लॅटफॉर्मवर ती मुलगी उभी राहते तर तिच्या मागे कुणी उभं राहतं नाही.”

दिपक घरात येऊन बसला, अस्वस्थ मनाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. गावाच्या नावाचा बोर्ड दिसत होता.

‘(कुठलेही एक गावाचे नाव) तंटामुक्त गाव पुरस्कृत’

दिपकने एक निराश उसासा देत मनाशी बोलला

“तंटामुक्त गाव… पण गावातल्या जाऊदे पण कुठल्यातरी घरात जर हे चालू असेल तर…


Rate this content
Log in