Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others Tragedy

5.0  

Suresh Kulkarni

Others Tragedy

' राधा '

' राधा '

6 mins
4.9K


त्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती. कुठे भटकतोय कोणास ठाऊक? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात! काय तर म्हणे ट्रेकिंग! पण इतके दिवस नाही रहात माझ्यापासून दूर! आता आला की, त्याला कधीच सोडणार नाही! नो रानटीपणा! नो डोंगर-दऱ्या, तो भिरभिरता वारा आणि संध्याकाळच भटकण! विचारात तिला समोरची गाडी दिसलीच नाही. गाडी तिला उडवून निघून गेली!

000

तरुण लेकीचे हाल बापाला पहावले नाहीत. हसती खेळती अल्लड राधा अंथरुणाला खिळली होती! आईच्या माघारी बापाने तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपली होती. बापाने हाय खाल्ली. तो तळहाताचा फोड माझ्या हाती देऊन त्यांनी डोळे मिटले. तेव्हापासून राधा माझ्या सोबतच आहे.

000

मी राधेला खूप लहानपणापासून ओळखतो. अगदी ती पाचवीत असल्या पासून. तेव्हा मी तिसरीत होतो.

"सुरश्या ,तुला तो शिक्या आठवतो कारे?" अचानक तिने विचारले

"कोण श्रीकांत का ? हो,न आठवायला काय झालं ?माझ्याच तर वर्गात होता !पण आज इतक्या वर्षांनी अचानक त्याची आठवण तुला का झाली ?"

"तुला न त्याची एक गम्मत सांगायची राहून गेलीये ! "

आता आमच्या ' सहजीवनाला ' आठ नऊ वर्षा होऊन गेलीत . मी अडतीसच्या आत बाहेर अन ती चाळीसीच्या जवळ पास आहे . अन हिला शाळा -कॉलेजच्या 'गमती 'आठवत्यात ! हिला कधी काय आठवेल सांगता येत नाही !

"काय ' गम्मत ' आहे ?"

"तो तुला न 'वेडा पीर ' म्हणायचा ! तुझ ट्रेकिंगच वेड दुसर काय ?! तू म्हणे उंच डोंगर माथ्यावर जावून 'राधे SSS' म्हणून, त्या सिनेमातल्या टारझन सारखा ओरडतोस !आणि -आणि प्रतिध्वनीची वाट पहातोस ! असे तो सांगायचा . अन न तू असे पक्षाच्या पंखा सारखे लांब हात करून डोंगर उतारावरून धावत खाली येतोस म्हणे ! खरे कारे ?"

" तो 'शिक्या ' न ,तोच बावळट होता ! " माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या .

"हो ,हो तीच तर ' गम्मत ' सांगायचीयय तुला ! तुम्ही दोघे ना बारावीचा शेवटचा पेपर देवून घरी परतत होतात . मला पाहून तो मागेच थांबला होता !"

"असेल थांबला . मला नाही आता आठवत इतके मायनर डीटेल्स . बर मग ?"

"तेव्हा न त्यान मला 'प्रपोज ' केल होत ! "

" काय म्हणतेस ? अन हे तू मला इतक्या दिवसांनी सांगतेस ?" निखळ गाढवपणा होता तो . मला माहित होत ! तरी मी चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत विचारले .

" तस नाही रे , पण तोही माझ्यावर प्रेम करायचा ना ?पण आता जावू दे ना ! मी तुझ्या ,माझ्या साठी कॉफी करते ! "माझ्या होकारा ,नकाराची वाट न पहाता ती किचन मध्ये गेली . ती न कधी कधी खूप पझेसिव्ह होते !अन खर सांगू , मला ते खूप आवडत !

मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो . किती सुकलीय ! तिच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ , अत्ताश्या थोडी हलकी झालीत पण अजून आहेतच . खूप अशक्त होत चाललीयय ! तिचे घनदाट ,निळसर झाक असलेले केस आता विरळ , निस्तेज आणि पांढरे पण होत आहेत ! पण चालीतला डौल आणि शालीनता अजून तसाच टवटवीत आहे ! याच शालीन सौंदर्यावर मीच काय अख्ख कॉलेज 'फिदा ' होत . पण आता ------. ती विरत चालल्या सारखी झालीयय !

" अं ,घे !" आम्ही कॉफीचे मग घेऊन फ्रेंच विंडोत बसलो . तिला असं खिडकीत बसून , बाहेर पहात चहा /कॉफी प्यायला आवडते ,म्हणून मी खिडक्यांच्या मागे घराच्या आतून बसण्यासाठी ओटे करून घेतलेत . खिडकी बाहेर तुरळक पावसाचे थेंब तुटत होते . पाऊस ,तो धुंद करणारा मातीचा सुगंध , अन ते धसमुसळ वार ! हे सगळं म्हणजे राधेचा जीव कि प्राण !

"सुरश्या , चल उठ ! गच्चीत जावूत ! पाऊस पाडायला आलाय ! "

"राधे आग , हे काय तुझ वय आहे का पावसात भिजायचं ? पुढल्या वर्षी चाळीशीची होशील ! "

"चल हट ! तू ये माझ्या मागून ! मी जाते पुढे !"ती गेली पण जिन्या कडे . मी तिच्या मागे पळालो , म्हणजे तसा प्रयत्न केला ! कॉलेजात रनर होतो , हल्ली जरा जडावलोय !गच्चीवर जावून पाहतोय तर ----

दोन्ही हात पसरून राधा पावसात हळुवार पणे गिरक्या घेत होती ! किती आनंदात होती ! वय विसरून लहान मुला सारख बागडत होती ! पावसाचे थेंब वरच्यावर तोंडात झेलण्याचा प्रयत्न करत होती ! वेडी कुठली ! हिची अशी अनंत रूप मला डोळ्यात साठवून ठेवायची आहेत ! जुनी गोष्ट आहे . ती आठवी -नववीत असावी . असाच अचानक पाऊस आला . चालू वर्ग सोडून हि वर्गाबाहेरच्या ग्राउंडवर आली होती . झग्याची टोक दोन्ही हातात धरून गाऱ्या -गाऱ्या भिंगोऱ्या करून गोल गोल फिरत होती ! पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती . मी हळूच तिच्या जवळ गेलो . त्या चार गिरक्यांनी तिला थकवलं होत ! तिला आधार देत घरात आणलं . नाही म्हणलं तरी भिजलीच होती . डोकं कोरड्या टॉवेलने पुसून ,कोरडे कपडे दिले . संध्याकाळी सपाटून ताप भरला .

"सुरश्या ,मला खूप थकल्या सारख वाटतय रे ! "

" तू पावसात भिजलीस ना ! मग थकवा ,ताप येणारच ! तू माझ ऐकत नाहीस मग तुलाच त्रास होतो, अन मला सुद्धा ! पॅरासिटोमोल घे . बर वाटेल . " ती मलूल होऊन पांघरुणात गुरफटून बेड वर पडली होती .

"कारे ,तुला आठवतो का ' तो ' पाऊस ?"

" कोणता ग ?" मी तीच डोक चेपत विचारल .

"आपण गणिताचा क्लास करून घरी येताना लागला होता तो ! "

"तो ना आठवतोय कि . "

" अशीच संध्याकाळच्या साडेसात -आठ ची वेळ होती .अचानक आभाळ भरून आल होत . आत्ता घरी पोहचू म्हणून तू निघालास , तू निघालास म्हणून मी पण तुझ्या मागे निघाले ! कसच काय ? रप रप पाऊस पडू लागला . दोघेही भिजलो होतो ! त्यात स्ट्रीट लाईट बंद झाले ! समोरच दिसेना ! "

" हो ,हो मला सगळ आठवतय ! " मला यातल काहीही आठवत नव्हत , पण मी दिल दडपून .

"मग आपण घरी कसे पोहोंचलो माहित आहे ?"

"कसे ?"

"मला माहित होत ,तुला अंधाराची खूप भीती वाटते ! मी तुला गच्च डोळे मिटायला लावून , माझ्या खांद्यावर हात ठेवायला लावले होते ! अन मी अंधुक प्रकाशात चालत होते . तू सारखा 'घर आल का ?-घर आल का ?' म्हणत होतास ! तो लहान मुलांचा खेळ असतोना तसा ! आता सांगते ,तेव्हा मला खूप मस्त वाटत होत ! मी बरी झाले आणि पुन्हा पाऊस आलाकी आपण पुन्हा तो 'घर आल का ?' खेळ खेळण्याची माझी इछ्या आहे . "

" राधे तून दिवसेन दिवस बालिश होत चाललीस ! "

" असू देत ! मला माहित आहे तू माझी प्रत्येक इछ्या पूर्ण करणार ! कारण ----"

" कारण काय ?"

"कारण मी ---मी फार दिवसाची सोबती नाही ! मृत्यू माझ्या डोक्यात कॅन्सर च्या रुपात दडलाय ! "

" स्टोप इट !पुन्हा पुन्हा तेच तेच नको सांगू ! मला ते सत्य असले तरी नाही ऐकवत ! आणि ---आणि मी तुला नाही जावू देणार !! "

000

राधेच्या त्या अपघाता पासून तिची स्मरणशक्ती काही प्रमाणात हरवली आहे . काही गोष्टी तिने सत्य म्हणून स्वीकारल्या आहेत , तर काही सत्य तिने झिडकारले आहेत . त्या अपघाता नंतर तिला सावरायला खूप वेळ लागला होता . अजूनही ती त्यातून 'पूर्ण ' बरी झाली असें म्हणता येत नाही . ती सावरतेय असे वाटत असतानाच ,ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालाय ! माझ्या तळहातावरचा ' फोड ' काही दिवसांचाच सोबती आहे ! हे तिलाही आणि मलाही माहित आहे ! फक्त एकच गोष्ट तिला माहित नाही !जी फक्त मलाच माहित आहे !

ती माझी राधाच आहे , जिच्यावर मी जीवापाड प्रेम केल ,आणि करतोय ! पण --पण ती ज्या ' सुरश्या 'वर जीव ओवाळून टाकते तो मी नाही !! तिच्या स्मरणशक्तीने इथेच दगा दिलाय !...... असं आजारपण देवान कोणालाच देऊ नये ज्यात रोग्यालाच आजार माहित नसावा ! त्या दिवशी सुरेश ट्रेकिंगहून परतलाच नाही . दोन दिवस वाट पाहून आम्ही तपास केला . त्याची बाईक एका कड्याच्या पायथ्याशी पार्क केली होती , वर कड्याच्या टोकाला बॅकसॅक पडली होती . चार दिवसांनी त्याचा मृत देह एका कपारीत सापडला ! पण राधेचं मन हे स्वीकारायला तयार नाही ! तेव्हा पासून ती मलाच तिचा ' सुरश्या ' समजतीय !

आता तिचे थोडेच दिवस राहिलेत . मी देवाच्या चरणी रोज हीच प्रार्थना करतोय की ,

"देवा , तिचा हा भ्रम असाच राहू दे ! तिला शेवट पर्यंत तिच्या ' सुरश्या ' सोबत जगू दे ! आणि मला माझ्या राधे सोबत ! "


Rate this content
Log in