Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Patil

Thriller

3  

Santosh Patil

Thriller

आभास

आभास

8 mins
16K


रामा संध्याकाळी दमून भागून शेतावरून घरी आला. त्याची बायको कमळी त्याची वाट पाहात दारातंच उभी होती.

 “का वं, किती येळ म्हणाचा ह्यो?”

 “आता शेतात काय कमी कामं आसत्यात व्हय?’’

 “काय सगळं येडताक व्हऊन बसलंय धनी. तुमी आगोदर च्या-पाणी घेवा बगू.”समज

“आगं पर, काय झालंय ते सांगशील का न्हायी?"

 ”समदं सांगती. पर आगोदर हातपाय धुऊन च्या-पाणी घेवा बगू.”

     रामा जे समजायचे ते समजून गेला. गावात कोणीतरी मयत झाले असणार आणि गुरू महाराजांनी कान फूंकल्यामुळे कोणी ’मयत झाल्याचे कानावर पडताच, त्या मयताचे दहन झाल्याशिवाय त्याला काहीही खाता पीता येणार नव्हते. ताज्या पान्याने पुन्हा जेवण केल्यानंतरच तो काही खाऊ पीऊ शकणार होता.

“बरं बरं, कर बगू लवकर. तवंर मी हातपाय धुऊन येतो.”

      रामाने हातपाय धुऊन घेतले. कमळीने दिलेला चहा त्याने लगबगीने पीला.

“आता बोल, कोण गेलं गावातलं?”

“आवं, गावातलं कोण गेलं न्हायी.“

“मग, तुजी ही तारांबळ कशापायी?“’

“आवं, वडगावच्या पावन्याचा चुलता, हाणमंता मेला म्हणं. मगाशीच सांगावा आलाय.”

“आत्ता गं का करायचं?”

“आत्ता काय करणार? पावन्याचा पावणा हाय, पर जावायाची भावकी! न्हायी जाऊन बी चालाचं न्हायी. पावणा उगंचंच जिंदगीबर तेवडाचा सबूद आपल्यावर ठेवंल.”

       इकडे आड तिकडे विहीर अशी रामाची अवस्था झाली होती. काय करावे हेच तेला सुचत नव्हते.

“तेबी खरंच हाय. पर... आता आली का पंचायत.”

“कमळीची तगमग वाढंतच होती.”

“सगळ एडताक व्हऊन बसलंय. धनी तुमाला यायला पार मध्यानरात व्हईल आणि वाट बी आडवळणी हाय.”

 “आगं पर, जायाला तरी पाजेच की! आता आडरानाला आणि आंधाराला घाबरून चालणार हाय व्हय?’’

“पर, रातचं परत गावाकडं यायच्या भानगडीत पडू नगंसा धनी. तितंच पावन्याच्या घरात रात काडून सकाळचला परत येवा.”

“आगं, काय याड बीड लागलं का तूला? लेकीच घरात पाणी तरी पीतो का आपण? आणि तू तितं रात काडायला सांगालीस व्हय?”

      कमळीचा चेहरा काळजीने काळवंडला होता. तसा तिला समजावणच सुरात रामू म्हणाला-

‘‘आगं, तू कशापायी काळजी करतीयास? वाट पायाखालचीच हाय! आणि वडगाव काय लई लांब न्हायी. मद्यानरातीच्या  आतच परत येतो का न्हायी ते बग.’’

       रामू गडबडीने वडगावला जाणची तारी करू लागला. धुतलेला सदरा आणि खांद्यावर टॉवेल टाकून तो बाहेर पडला. हातात कंदील, राकणीची काठी आणि वेळप्रसंगी सोबत असावे म्हणून बंडीच खिशात फरशीचे पाते होतेच.

       झपाझप पावले टाकत तिने गावची वेस ओलांडली आणि वडगावच वाटेला लागला. रस्ता आडरानातून जात होता. सारे शिवार टिपूर चांदण्यात न्हाऊन निघाले होते. भान शांततेचा भंग करत, किरकिरकीडे जीवाच आकांताने ओरडंत होते. मध्येच कोल्हेकुई आणि वटवाघळांचा चित्कार तंना साथ देत होता. पण तो कशालाही दाद देत नव्हता. त्याला हे काही नवीन नव्हते.

       त्याचे पाय पुढे पडतंच होते. बघता बघता वडगावची सीमा जवळ येत होती. तसा त्याच्या पायांचा वेग अधिकंच वाढला. एव्हाणा रात्रीचे साडे अकरा वाजले होते. पाहुन्याचे शेत वेशीबाहेर होते. दूरूनच शेतात बत्तीचा प्रकाश दिसत होता. आणि त्या प्रकाशात चाललेली माणसांची हालचाली त्याला स्पष्ट दिसत होती.

      ‘‘आरं तेच्या मायला मयत शेतात आणून ठेवलंय वाटतंय. आगीन द्यायच्या आत जाग्यावर पोचायला पायजे.’’

       स्वतःशीच पुटपुटंत रामाच्या पावलंनी गती घेतली. धावत पळंत तो त्या ठिकाणी पोहोचला. मयत सरणावर ठेवले होते. त्यावर लाकडे रचली जात होती.

       ‘‘ये, थांबा रं, पावणस्नी पाणी पाजू द्या.’’

       माणसं पाय दोन पाय मागे सरकली. तसा रामा पुढे झाला. त्याने तांब्यातली धोत-याची पाने पुन्हा पान्यात बुडविली.

       ‘‘च्यामायला! तुळशीच पानांच्या जागी धोत-याची पानं...? आसती एकेका गावची रीत.’’

        त्याने स्वतःच्याच मनाला समजावले.आणि तो मयताच्या तोंडात पाणी सोडन्यासाठी त्याचे तोंड शोधू लागला. आणि त्याला धक्काच बसला. मयत पालथे झोपविले होते. त्याने नीट निरखून पाहीले, तर मयताचे ढुंगण पान्याने भिजले होते.

       ‘‘म्हणजे हे लोक मयताच्या तोंडात पाणी पाजवत नव्हते, तर...छे छे...! हे का इप्रित!’’

        स्वतःचच विचारातील रामू पाल अंगावर पडावी तसे झटकन चार पाय मागे सरकला.

‘‘हां, झाली कारं समदी?’’

त्यातलाच एक वयस्क माणूस सर्वांना उद्देशून म्हणाला-

‘‘व्हय व्हय, झाली समदी.’’

गर्दीतून आवाज आला.

‘‘कासव्वा, ये फुडं.’’

       मर्तुकीचे पुढारीपण करणारा कोणीतरी एक वयस्क माणूस म्हणाला, तशी रामूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

‘‘म्हणजे...? मयला कासव्वा आगीन देणार? बाई आसून ...?’’

        प्रसन्न चेह-याने आणि बोडक्या कपाळाने कासव्वा समोर आली.

‘‘आसली कसली म्हणाची ही बाई? नव-याच्या मयताचं जराबी सोयरसुतक हिच्या थोबाडावर दिसत न्हायी!’’

        स्वतःशीच पुटपुटंत तो पुढे काय होणार आहे, ते पाहू लागला. तिच्या पाठोपाठ आलेल्या चार बोडक्या कपाळाच्या बायकांनी तिला हिरव्या साडीची ओठी भरली, मळवंट भरला, एखाद्या नववधूला सजवावे तसे तिला नटविले जात होते. रामा अवाक होऊन सारे पहात होता. न राहून त्याची नजर इकडे तिकडे भीरभीरली. एवढ्या गर्दीत त्याची नजर आपल्या जावयाला शोधत होती. पण तो कोठेच दिसत नव्हता. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या इसमाला त्याने न रहावून विचारलेच-

       ‘‘का हो पावणं, शिरपती मांगल्याच्या घरची कोणच माणसं कशी काय मयताला आली न्हायीत?’’

त्या इसमाने एवढ्या अंधारातूनही रामाला खालपासून वरपर्यंत न्याहाळले.

       ‘‘आत्ता का? आवं पावणं, ह्या जगात भाऊबंदकी रावणाला चुकली न्हायी, का अर्जुनाला चुकली न्हायी. ती तुमा आमाला चुकल व्हय?’’

रामू काय समजायचे ते समजून गेला. पण लगेच  मनातील शंका वाणी किडयासारखी वळवळंत बाहेर आली.

‘‘पावणं, मला सांगा, ह्या मयताला पालतं का झोपीवलं? आशानं तो सोर्गात न्हायी, तर नरकात जाईल की वं!’’

‘‘हे बगा पावणं, गाव बदाललं, की चालीरीती बी बदलत्यात!’’

‘‘आसं व्हय, पर आमी आसं कुटं बगीतलं न्हायी. आणि त्या मयताच्या विधवेला इतकं का नटीवलं जातंय?’’

‘‘आवं पावणं, मी म्हटलं न्हायी का, गाव बदाललं की, चालीरीती बी बदालत्यात. तुमच्या गावातल्या चालीरीती येगळ्या, आमच्या गावातल्या चालीरीती येगळया.’’

       अनेक जळमटांनी माखलेल्या रामूचे मन त्या उत्तराने काही साफ झाले नाही. सारी जळमटे तशीच राहीली. पण, असेल या गावची रीत वेगळी! असे स्वतःचच मनाला समजावत तो मूकाट्याने समोर पाहात उभा राहीला. सारे सोपस्कर आता पार पडले होते. केंव्हा एकदा हा कार्यक्रम आटोपतोय आणि केंव्हा एकदा आपले गाव गाठतोय असे त्या झाले होते. कारण मयताला जावईपाहुणे न आल्यामुळे त्यांच्या घरी अशावेळी जाणे ठीक नव्हते. तेंव्हा त्याला गावाकडे परतणशिवाय पर्याय नव्हता.

       आपल्याच विचारातील रामू झटका बसावा, तसा भानावर आला. मयताला भडाग्नी न देताच लोकांनी त्या मयताच्या नटविलेल्या विधवेला तिरडीवर बसविले. चार लोकांनी ती तिरडी खांद्यावर घेतली आणि नाचत गात गावच्या दिशेने चालू लागले. रामा हे सर्व वेड लागलसारखा पहातंच राहीला. सरणातील एक लाकूड अचानंक घरंगळून खाली पडले. त्या आवाजाने तो दचकून भानावर आला. आता त्याला स्वतःचाच राग येत होता.

       ‘‘झक मारली आणि झुणका खाल्ला. पावन्याचा पावणा मेंला आणि बोंबालतान डावा हात गेला, आशातली गत झालीया. हे गाव म्हणजे खुळ्याची चावडी हाय! हीतली रीतभात जगापेक्षा येगळी हाय. आता हितनं गुमान आपला गाव गाठलेला बरा.’’

       असे स्वतःशीच बडबडंत तो गावच वाटेला लागला. एव्हाना मध्यानरात झाली होती. स्वतःवरच वैतागत त्याची पावले झपाझप पडत होती. मघाशी जीवाच्या आकांताने ओरडणारे किर्रकिर्र किडे रामूची चाहूल लागताच, दातखिळी बसावी तसे गप्प बसत होते. त्यांना साथ देणार कोल्हेकुईनेही त्यांची साथ केंव्हाच सोडली होती. रामूला हे सर्वच जरा विचीत्रच भासत होते. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. फक्त त्याच्या पायांचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता. कोणीतरी आपला पाठलाग करतेय असे त्याला उगीचंच वाटंत होते. तो मध्येच थांबून आपल्या मागे कोणी येत तर नाही ना, याची खात्री करून घेत होता. पण मागे कोणीच नसायचे. आता त्याचे धीट काळीज भीतीने लोन्यासारखे वितळू लागले होते. तोंडाने मारूती नामाचा जप करत, त्याचे पाय झपाझप पडत होते. आता घाबरून चालणार नव्हते. मन घट्ट करून तो चालंतच होता. चालता चालता तो एका ठीकाणी थबकला.

        ‘‘हे आणि का इप्रीत? आपण वाट चुकलो की, काय? परत आपण सरणाजवळ कस काय पोहोचलो?”

       तो पाठ फिरवून पुन्हा गावची वाट तुडवू लागला. बराच वेळ तो चालंत होता. पण गाव काही येत नव्हता. हळूहळू त्याच्या कंदीलाची वात बारीक होऊन फडफडू लागली. तशी त्याची बोबडीच वळायची वेळ आली. कारण कंदीलातील रॉकेल संपत आले होते. अशा भयाण रात्री, अशा आडवळणावर कंदील विझला तर..., त्याला ती कल्पनाही सहन होत नव्हती. पण अखेर तीही वेळ जवळ येत होती. कंदील सावरंत त्याची पावले वेग घेत होती.

       इकडे कमळीच जीवाची घालमेंल सुरू होती. मध्यानरात्र सरत आली होती.

       धनी मध्यानरातीपतोर परताय पायजे व्हतं. पर,अजून कसं आलं न्हायीत?’हा प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर वाट पाहून, ती स्वतःच कंदील हातात घेऊन बाहेर पडली. आणि वडगावच रसत्याला लागली. तासाभरात तिला दूरून कंदीलाचा प्रकाश दिसू लागला. तसा तिच पायानी वेग घेतला.

      ‘‘धनी... आवं धनी...’’

      रामूच्या कानावर ती आरोळी पडली. आणि त्याचा घाबरा घुबरा चेहरा आनंदाने फुलून गेला.

      ‘‘च्यामायला, ह्यो तर कमळीचा आवाज हाय! बिच्चारी कमळी! किती जीव टाकतीया आपल्यावर! मला घरी जायला वक्कोत झाला, तर येवढया अंधारात ती मला सोधत आलीया!’’

      पण दुस-याच क्षणी त्याचा फुललेला चेहरा खर्रकन कोमेजला.

‘‘कमळी इतकया राती हीतं? झुरळाला घाबरणारी आपली कमळी, एवड्या अंधारातनं हितं ईल? तेबी एकटीच? ह्या टायमाला? छ्या छ्या. हे शक्य न्हायी. आता मात्र मला ह्यो समदा भूताटकीचा खेळ वाटतोय.’’

       कमळीचा आवाज जसा जसा जवळ येत होता, तसा रामूचा धीर खचंत होता. भीतीने त्याची गाळण उडाली होती. अचानक मागे वळून तो रानावनातून सैरावैरा धाऊ लागला. त्याला त्या आवाजापासून दूर जाचे होते. ठेचाळंत, पडंत, धडपडंत तो धावत होता. पळता पळता तो एका विहीरीत पडला. पट्टीच्या पोहणार्‍या रामूला भीतीने पाण्यात हातपाही मारता येत नव्हते.

       दुस-या दिवशी सारा गाव विहीरीच्या काठाला जमा झाला होता. अथक प्रयत्नानंतर अखेर रामूचा मृतदेह पान्यातून बाहेर काढन्यात आला. तसा कमळीने टाहो फ़ोडला. चारी दिशांना पाहुन्याना सांगावे धाडले गेले. रामूचा मृतदेह गावात आणला गेला. हळूहळू दुपार टळून संधकाळ होऊ लागली होती.

       ‘‘आता जास्ती वेळ मयत ठेवून चालणार न्हायी. गावात कुणाचं कान फुकल्यालं आसत्यात, कुणाचं उपास तापास आसत्यात. तवा मयत शेतात नेऊ आणि कोण पावणं येणार हायीत तेंची वाट पाहु बघुया. कसं सखोबा?’’

       गणपा चोथ्याने सखोबा सावंताला आपला विचार बोलून दाखवला.

      ‘‘व्हय व्हय. आसंच करूया गंपूमा?’’

       केरबा सावंताने गणपा चोथ्याच्या बोलन्याला दुजोरा दिला. आणि मयत तिरडीवर घालून शेताकडे नेन्यात आले. सारा गाव रामाला पोहोचवाला शेतामधे जमा झाला होता. पण रामाची मूलगी शांता अजून वडगावहून आली नव्हती. आणि ती आल्याशिवाय मयताला भडाग्नी दिली जाणार नव्हती. सर्वजण तिचीच वाट पाहत होते. इतक्यात कोणी पाहूणे कंदीलाच्या उजेडात वाट काढत धावंत पळंत येत होते. रडन्याच्या आवाजावरून कमळीने आपल्या लेकीला ओळखले. तसा तिला हुंदका अनावर झाला. बत्तीवाली माणसं पुढे होऊन तिला प्रकाश दाखवू लागले. कमळीने शांताकडे पाहून हंबरडा फोडला. तिच्याबरोबर तिचा नवराही होता आणि त्यांच्या मागे... कमळीच्या भरून आलेल्या डोळ्यांमुळे ती व्यक्ति तिला नीट दिसत नव्हती. रडणारी कमळी अचानक गप्प झाली. तिने आपले डोळे पुसले आणि डोळे फाडून ती त्या इसमाकडे पाहंतच राहीली. शांता आणि तिच्या नव-यासोबत असणारा शांताचा चुलंत सासरा, हाणमंतही धावंत पळंत येत होता.

       ‘‘कोण... ? हणमंतराव...? हेंच्याच तर मर्तुकीच सांगावा आला व्हता आणि धनी हेंचच मर्तुकीला गेलं व्हतं. पर ह्यो तर... म्हणजे तो सांगावा... न्हायी न्हायी हे कसं ...’’

स्वतःशीच पुटपुटणार कमळीच्या पांढरफटक डोळ्यांप्रमाणेच तिचा चेहराही पांढराफटक पडला होता. काय घडते आहे कोणालाच काही कळंत नव्हते. डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच कमळी जीवाच्या आकांताने धाऊ लागली. आणि अंधाराच पोटात गडप झाली होती. मयताला जमलेल्या बत्त्या क्षणात कमळीच्या शोधात रानावनात विखूरल गेल्या. पण कमळी कोणालाच सापडली नाही.

       बराच वेळ कमळी वेड लागलसारखी अंधारातून धावत होती. धावत धावत ती वडगावच सीमेंजवळ पोहोचली. दूरूनंच तिला एका ठीकाणी प्रकाश दिसत होता. आणि त्या प्रकाशात तिला माणसांच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या. तसा तिचा वेग अधिक वाढला. धावत पळंत ती त्या ठीकाणी पोहोचली. तेथे कोणाचेतरी अंतिम संस्कार चालले होते. सारे लोक तिला वाट करून देत होते.

       ‘‘ये थांबा रं, पावणीबाईला मयताला पाणी पाजू द्या.’’

कमळीची नजर मयताला जमलेल्या सा-या माणसांच्यावर भिरभीरत होती आणि तिची भिरभीरनारी नजर एका इसमावर स्थिरावली. माणसांच गर्दीत रामा तिच्याकडे प्रसन्न चेह-याने पाहात उभा होता.

-00000-

लेखक-

श्री.संतोष नारायण पाटील

मु.पो.मुमेवाडी ता.आजरा

जि.कोल्हापूर

मो.9423300475


Rate this content
Log in

More marathi story from Santosh Patil

Similar marathi story from Thriller