Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Raosaheb Jadhav

Tragedy

3.9  

Raosaheb Jadhav

Tragedy

रिकामे पोट

रिकामे पोट

3 mins
3.6K


दिवस गारठ्याचे होते. अजून बी नदीनं खडकांच्या कुशीत पाणी जपले होते. बारीक खडकी वघळ्यांच्या तोंडाशी बारके डोह पोटात न मावणारे पाणी खुशाल पुढे जाऊ देत होते. त्याच नदीतल्या गुळगुळीत खडकांवर आजूबाजूच्या मळेकरणी धुणं धुताना मनाचे पिळे मोकळ्या करत होत्या. अनेक पिढ्यांच्या सुख-दु:खांना त्या खडकांनी पाण्यासंगत खळखळून वाहताना पाहिलं होतं. सकाळच्या पारगात खडकांच्या अंगावर नदीभर नुसत्या बाया. वाळूत वाळूमय होऊन गेलेले बारके पोरं आन डोहाड्यातल्या पाण्यात बुटकुळ्या मारणारे जरा जाणते पोरं, पाण्याच्या गढूळपणाचे गूढ उकलण्याचं वय न झालेले.

आज जरा उशीरानं आलेल्या नंदानं नदीतल्या मोकळ्या खडकावर धुण्याचं गाठोडं टाकलं. आन एरव्ही खडकाचे अंग मिळवण्यासाठी भांडणारी रखमा आपले धुण्याचे पिळे उचलून जरा लांबच्या खडकाकडे पळाली. काही बाया हसल्या. काहींनी नाकं मुरडली. काही आडून-पाडून बोलणं बोलत राहिल्या.

“दोन जीवाशी बाईनं आसं वाकून धुणं आपटू नयी.” रखमाचं हे बोलणं न समजण्याइतकी नादान नव्हती ती. काहींनी फिदीफिदी हसत घसड्यांचा वेग वाढवला. काहींनी गालात मूलकत पाण्यात टाकलेले कपडे जोरात विसळले तर काहींनी दाबले पिळे उलगडत हातांसोबत कपडेही झटकले.

अंगानं बलदंड आन डोक्यानं हुशार असणाऱ्या नंदाला अचानक काळजात खडक घुसल्यागत झालं. हा एकटेपणा धुण्यासोबत ती पाण्यात वाहता करू लागली. तिच्याशी मोकळं बोलणारी पमी सुद्धा आता तिला टाळू पाहात होती. ‘आपल्यापायी दहा वर्ष बिनविरोध सरपंच असलेल्या संजूच्या आजोबांना सरपंचकी गमवावी लागली.’ बराच वेळ नंदा धुण्याऐवजी काळीजच खडकावर आपटत राहिली. त्यातच कालपर्यंत बिनधास्त संजूसोबत फिरणाऱ्या नंदाला वास्तवाची जाणीव होऊ लागली होती. ती एकटी पडली होती. आईच्या शब्दांचे गांभीर्य तिला उमजू लागले होते. आपण खडकावर बसलो नसून सुसरीच्या पाठीवर बसल्याचा भास तिला होऊ लागला. तो खडक अचानक हालू लागला होता. आता खरंच तिला दोन जीवाशी असल्याचा भास होऊ लागला. मान जरा उचलली तरी तिला फिरल्या सारखं वाटू लागलं. खडकावर ती बसली नसून संजू बसला आहे आणि तो खडक त्याला सुसर होऊन ओढून नेऊ लागला आहे. असे तिला वाटू लागले. हातातला धुण्याचा पिळा पाण्याकडे फेकण्यासाठी उभी राहताच धाडकन कोसळली. धुणेकरणी धावल्या. कोणी जवळ बसत दातखीळ उचकू लागल्या. तर कोणी हळूच पोटावर हात फिरवून मनातल्या शंका दूर करून घेऊ लागल्या. कोणी लांब उभ्या राहून “वाटंतं का गं तसं?” अशा शंका कानात ओतू लागल्या. तिच्यापासून फटकून राहणारी पमी मात्र धावत सुटली. संजुला गाठलं.

आला संजू. तो येताच साऱ्या बाया दूर सरकल्या. त्यानं तिचा हात धरून नाडीचे ठोके पहिले. छातीवर हात ठेवून छातीतली धडधड पाहिली. उचलून खांद्यावर घेतली आणि धावतच थडी चढला. वाटेवर उभ्या केलेल्या जीपगाडीत तिला ठेवलं. जीप निघून गेली दवाखान्याच्या दिशेने...

मागे धुण्यासोबत अर्ध्यामुर्ध्या सुकत आलेल्या बाया एकमेकींना मनात असेल ते आणि जमेल तसं सांगत आणि शक्य तितकं ऐकतही राहिल्या.

“मी म्हन्ल व्हतं ना, तोच येईल. आला का नयी?” रखमा शेवंतीला सांगत होती.

“गंज पाह्यलं म्या बी पॉट चाप्लून, पर तसं काई जाणवलं नयी गं.” हौसाबाई अनुभवाचे बोल तरण्या फसीला सांगत होती.

“मला बी नई वाटत. मांगच्या मंगळवारीच संगच धुणं धुतलं आम्ही.” पमी असलीयत सांगत होती.

“नको सांगू. माहितीय मला, तू तिचीच बाजू घेणार...” विषयाचा डोह आटू न देण्याची काळजी घेणारी सुगंधा पमीला डोहातल्या पाण्याचे भेव दावू लागली. अखेर धुण्याच्या सुकण्यासोबत प्रत्येकीच्या तोंडात तोच एक विषय भिजत राहिला. न सुकण्यासाठी...

“मानसिक तणाव आणि जरासे आम्लपित्त.” ह्या डॉक्टरांच्या निदानानंतर जरासा उपचार घेऊन सायंकाळी दोघेही घरी परतले. त्याने तिला तिच्या घरी पोहचवले. तिच्या आईला औषधे देण्याच्या वेळा समजावल्या आणि केलेली मदत हे आपले कर्तव्यच आहे असे मानत स्वत:ला शाबासकी देत आपली गाडी घेऊन स्वत:च्या घरी गेला. विश्रांतीसाठी घरी झोपलेल्या नंदाला भेटण्यासाठी आलेली प्रत्येक बाई लांब हुसासा टाकत आणि नंदाच्या बोलण्यावर काहीसा अविश्वास दावत “जप बाई जीवाला...” एवढाच सहानुभूतीमय सूचक सल्ला देऊन जाता जाता स्वरचित गूढ उकलण्याचा प्रयत्न करून जात होती.

“बाई व्हयचं ते झालं, इपरीत इचार नको करू काई. कधी न कधी करावच लागंल ना, मंग टाक ना करून लवकर... तसं घरानं चांगलंय तेचं. चुका काय व्हून जात्यात ह्या वयात...” अखेर भेटायला आलेल्या म्हाताऱ्या ईठाइने आपल्या मोकळ्या स्वभावानुसार मोकळं सांगून टाकलं...

“आजी अगं तसं काय नाहीये गं....” असं सांगण्याचा विचार नंदाच्या मनात आला पण मनातच ठेवला आणि फक्त हसली... स्वत:च्या रिकाम्या पोटाकडे पाहत... आपल्या प्रेमळ नजरेने...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy