Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Suresh Kulkarni

Fantasy

4.1  

Suresh Kulkarni

Fantasy

भयानक स्वप्न !

भयानक स्वप्न !

11 mins
2.8K


रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी.पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. कोणी तरी बाहेरून दाराच्या ल्याचशी झटपट करतोय! चोर! मी अजून थोडा वेळ तसाच पडून राहिलो. आता माझे डोळे अंधाराला सरावले होते. पणआमच्या या मास्टर बेडरूम मध्ये अंधार कसा? अंधारात उषाला झोप येत नाही. ती नेहमी बेडलॅम्प लावून झोपते. मी शेजारी नजर टाकली. तेथे उषा नव्हती. माझ्या पोटात धस्स झाले. बहुदा बाथरूम मध्ये गेली असावी. पण टॉयलेट मधला लाईट बंद दिसतोय!तरी मी आत डोकावलेच. माझ्या पायाखालीच जमीन सरकली. ती तेथे हि नव्हती!गेली कोठे ? पुन्हा तोच आवाज. कोणी तरी नक्की घरात घुसलंय!

मी आवाज न करता बेडवरुन उठलो. बाहेरच्या लिव्हिन्ग रूम मध्ये आलो. खिडक्यांच्या पडद्यातुन फ्लॅट बाहेरचा उजेड घरभर भुरभुरल्या सारखा विखुरला होता. लिव्हिंग रूमच्या समोरच्या बाजूस आई बाबांची बेडरूम आहे. पण हे काय? बाबांच्या बेड मधला झिरो बल्ब चालूच होता आणि दार हि उघडेच होते. दारात पाठमोरा कोणी तरी धटिंगण उभा होता. तंगड्या फाकवुन! त्याची फक्त काळी आकृती मला दिसत होती. त्याच्या हातात वीतभर लांबीचे पाते असलेला चाकू क्षणभर चमकून गेला. त्या चाकूच्या पात्याला काहीतरी काळपट लागले होते. आणि ते त्याच्या टोकातून थेंब -थेंब सावकाश जमिनीवर ठिबकत होते. रक्त!!मी त्याला थांबवायला पाहिजे. प्रतिकार करायला पाहिजे. त्याला भिडले पाहिजे. हे सार मला कळत होत. पण माझ्या हातापायातिला बळ नाहीसे झाले होते. खरे तर तो पाठमोरा उभा होता. मला त्याच्यावर मागून सहज झडप घालता येणार होती. मी कसाबसा पुढे सरकलो. आई-बाबाचे आणि उषेचे त्या नराधमाने हातपाय बांधून टाकले होते. तिघेही वेडे वाकडे जमिनीवर पडली होती. त्याच्या फाकलेल्या पायातून मला साचलेल्या रक्ताचे थोरोळे दिसत होते! माझ्या जीवाचे पाणी पाणी झाले. म्हणजे या खटकाने त्यांना मारून टाकले कि काय? माझे पाय लटपटू लागले.

"बाबा ! आSS ई !!

 मी जोरात ओरडलो. पण माझा आवाज घशातच राहिला. घश्याला प्रचंड कोरड पडली होती. हृदय धावत्या रेल्वेच्या इंजिन सारखे सुसाट धडधडत होते. माझ्या सर्वांगाला घाम सुटला होता. इतका कि माझे अंगावरचा नाईट ड्रेस ओलाचिंब झाला होता. 

"अरे धावा कोणीतरी! आम्हाला वाचवा!!"मी मदती साठी टाहो फोडला. माझ्या आवाजातील राग,भीती, अगतिकता, असाह्ययता परमोच्य टोकाची असल्याची मला जाणीव होत होती. पण तो टाहो माझ्या घश्यातच विरून गेला!

मी ताड्कन पलंगावर उठून बसलो. घामाने माझे कपडे आणि अंगाखालची बेडशीटओली झाले होते. छातीतली धडधड थोडी कमी झाली होती. काही क्षणात सावरलो. एक भयानक स्वप्न मला पडले होते! असली जीवघेणी भीषणता आयुष्यात मी प्रथमच अनुभवत होतो. त्या स्वप्नाच्या आठवणीने पुन्हा पुन्हा अंगावर सरसरून काटा येत होता.मी घड्याळावर नजर टाकली. पहाटेचे साडेचार वाजून काही मिनिटे झाली होती. मी शेजारी नजर टाकली. उषा झोपेत गोड हसत होती. सकाळच्या साखर झोपेत उषा त्या बेडलॅम्पच्या मंद प्रकाशात किती निरागस दिसत होती!उषे तू आता तुलाच असं झोपेत मंदस्मित करताना पाहायला हवं होतस, मग तुला कळले असते कि मी तुझ्या साठी का ' पागल 'झालोय ! कसलं स्वप्न पाहतेस ? म्हणतात कि सकाळची स्वप्न खरी होतात. बापरे! हे कसले विचार माझ्या मनात येताहेत? सकाळची स्वप्न खरी होणार असतील तर? माझे ते अभद्र स्वप्न -----. नाही नाही ते खरे होणार नाही! आणि मी ते खरे होऊ देणार नाही !!

अरे स्वप्नाचा इतका काय धसका घ्यायचा ? एक मामुली स्वप्न. त्या स्वप्नात घाबरलोही असेन ,पण आता ते एक स्वप्न होत हे कळल्यावर इतकं मनावर घ्यायला नको. मी त्या स्वप्नाचा विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. पण ते दिवसभर मनात नको असताना रेंगाळत राहील. मी बेड वरून उठलो,एव्हाना साडेपाच झाले होते. दोनकप चहाचे आधण ठेवून ,प्रत्यविधी उरकले, चहा घेऊन मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो. 

                                                                              ००० 

"गेल्या चार सहा दिवसा पासून झोपेचा प्रॉब्लेमच झालाय." मी डॉक्टर माथुराना माझी व्यथा सांगितली. 

"प्रॉब्लेम? म्हणजे झोप येत नाही का?"

" म्हणजे सात-साडेसात झोपून हि आळस जात नाही. झोपेत वेडी-वाकडी स्वप्ने पडतात. मग दिवसभर जागरण झाल्यासारखे डोळे चुरचुरीत रहातात."

" सुधा, हा टिपिकल आय. टी. सिंड्रोम आहे!तुम्हा आय.टी. वाल्यांची हीच तक्रार असते. झोप येत नाही. पित्त होत! अपचन! डोके दुखी! वेडंवाकडं जगता, चहा,कॉफ़ीचा मारा,वर पिझा, कोला माती दगड." डॉक्टर माथूरानी माझे बी.पी. चेक करत मला झापले. ते माझ्या बाबाचे मित्र आहेत, म्हणून मला मोठ्या आवाजात सुनवू शकतात. " तस नाही. मागे कधी असा त्रास झाला नाही. म्हणून तुमच्या कडे आलो. "

"सुधा,कमिंग टू द पॉईंट. तुझी Quality झोप होत नसावी. ते जावू दे. चार दिवस ऑफिसला सुट्टी घे. उषा सोबत कुठेतरी वीक एंडला जा. रिलॅक्स हो. हल्ली टेन्शनमुळे खूप प्रॉब्लेम होतात. आपल्याला कळत नाही पण,आपण त्याचे बळी पडतो. थोडासा बी.पी. ज्यास्त आहे. पण काळजीचे कारण नाही. चार दिवसांची औषधें देतो. पुन्हा शुक्रवारी ये. पाहू काय प्रोग्रेस होते ती. "माथुरानी मला सल्ला आणि धीर दिला.  

                                                                             ००० 

निसर्गसानिध्यात त्या रिसॉर्टच्या 'हट' मध्ये मी अन उषा वीक एन्ड साठी आलो. उषा पूर्ण तयारीने आली होती. कपडे मोजकेच होते. पण महागडे ड्रॉईंग पॅड्स, वॉटरकलरच्या ट्यूबस, ब्रश. हाच फापट पसारा ज्यास्त होता. ती सक्काळीच उठून त्या हटच्या बाहेरच्या पायरीवर बसून समोरची झाड, फुलाचे ताटवे, लहान मोठे खडक. कशा कशाची चित्रे काढायची. मीही धावपळ न करता तिला चित्रात तल्लीन झालेली पाहत रहायचो. 

रात्रीचे डिनर उरकून आम्ही बेडवर झोपायला आलो. 

"काय ग उषे, तू त्या दिवशी तू झोपेत कसलं स्वप्न पहात होतीस?कारण झोपेत गालातल्या गालात  'जान -लेवा' हसत होतीस. "

"कधी?"

"मागच्या शनिवारची गोष्ट असेल."

"तू न वेडाच आहेस! आठवड्या मागचे स्वप्न कसे लक्षात असणार?"

"बर ,मग कालचच सांग. काल पण तू तशीच हसत होतीस!"

" कालच!अ ,पण हसायचं नाही हं! अन कोणाला पण सांगायचं नाही! नाहीतर तू चार-चौघात आपल्या जम्माडी गोष्टी सांगतोस अन फिदीफिदी हसतोस." हे वाक्य म्हणताना तिच्या चेहऱ्या वरचे भाव असे होते कि उषा, पाच का पंचेवीस वर्षाची हा प्रश्न मला पडला होता. 

"नाय -नाय हे फक्त तुझ्या माझ्यात. तुझी शप्पत !"मी तिची नक्कल करत म्हणालो. 

" नको ,नको ती शप्पत. सुटली म्हण !"

"सुटली सुटली !"

"काल न मी स्वप्नात तुला हुडकत एका जंगलात भटकत होते. काय मस्त जंगल होत! झुळझुळ वाहणारातो छोटासा ओढा ,चार दगडावरून पडणाऱ्या पाण्याचे ते इवलेसे धबधबे! हिरवेगार गवत! असं वाटलं इथंच बसावं. आणि --"

"आणि काय? "

" आणि या ओढ्याचं पेंटिंग करावं!"

"बर ते ओढा पुराण आवर. मग मी सापडलो का तूला ?"

" तर सापड्लासकी. तेथेच होतात कि तुम्ही. झाडाला टेकून तू बसला होतास. आणि ती तुझ्या मांडीवर झोपली होती!"

"बापरे! मग? तू ओरडलीस ना माझ्यावर?"

"नाय! मग मी तुला विचारलं ' सुधड्या ,सकाळी चहा करून साखरच डब्बा कुठे ठेवलास? मला सापडत नाहियय!' "

"मग?"

"मग काय?गोष्ट थोडीचय?माझं काम झालं होत. तुला डब्बा कुठाय तेच विचारायला मी जंगलात तुला हुडकत होते!मग घरी निघाले. गॅस वाया जात होताना!"

"अन माझ्या मांडीवर झोपलेली 'ती'. तीच काय ?"

"ती?न . ती पण मीच होते!"उषाने लाजत आपल्या लांब सडक बोटानी चेहरा झाकून घेतला. मला हसू आवरेना, स्वप्नात सुद्धा गॅस आणि साखरेचा डब्बाच येतो हिच्या ! हि अशीच आहे. साधी,सुंदर,अन निरागस. आय लव्ह यु उषा! अगदी आजन्म! आणि अनेक जन्म!!

                                                                         ०००  

विकेंडच्या आनंदच पांघरून घेऊनच आम्ही परतलो. आणि पुन्हा आपापल्या रुटीन मध्ये गुंतलो.म्हणजे मी ऑफिसात आणि उषा तिच्या शाळेत. या वीक एंडच्या भानगडीत सोमवारची डेडलाईन डोक्यातून सुटली होती.ऑफिसचा वेळ कमीच पडला.म्हणून प्रोजेक्टचे काम घरी घेवून आलो होतो.रात्रीची जेवणे झाली.आई-बाबा त्यांच्या खोलीत झोपायला गेली होती. 

"उषे कॉफी करून दे न आज प्लीज! आज कस हि करून हा प्रोजेक्ट पूर्ण करून सबमिट करायचाय. थोडस जागावे लागणार आहे."

"तुला माथुरकाकांनी 'जागू नका' म्हणून सल्ला दिलाय ना? मग? अन तसेही ती ऑफिसची भानगड घरात आणलेली नाही आवडत मला!तुला माहित आहे तरी तू पुन्हा पुन्हा तेच करतोस!" उषा भडकली पण थर्मास भर कॉफी करूनच ठेवली तिने !Thanks उषे! आग तुला 'जग फिरवून'आणायचं आहे, हा माझा 'गुप्त' अजेंडा आहे. त्या साठी काम तर करावेच लागेल ना मला! माझ्या विचारावर मी स्वतःशीच हसलो,अन लॅपटॉपच्या स्किनवर लक्ष एकवटले. 

प्रोजेक्ट ओ.के.करून सबमिट केले. संबधीताना मेल केले. कॉपी सेव्ह करून लॅपटॉप बंद केला. चांगला आळस देऊन घड्याळात पहिले. अडीच -पावणे तीन झालेच होते. थर्मास मध्ये राहिलेली कॉफी मगात ओतून घेतली आणि ग्यालरीत आलो. आत्ता पर्यंत पोटात नाही म्हटले तरी तीन - चार कप कॉफी गेली होती.त्यामुळे झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तशीही झोपेची वेळ टळून गेली होती. बाबान साठी झुलती आराम खुर्ची ग्यालरीत ठेवली आहे तिच्यात रील्याक्स झालो. उघड्या हवेतला तो सुखद गारवा ,काळ नीळ नभांगण, त्यात चंद -चांदण्याची मैफिल, आणि प्रोजेक्टच्या टेन्शन मधून हलके झालेलं मन, मस्त गरम कॉफीचा हाती मग! बॉस जिना इसी का नाम है! 'खोया खोया चांद ,खुला आसमान ---' स्वतःशीच गुणगुणत बराच वेळ त्या खुर्चीत बसून राहिलो. 

शेवटी कंटाळा येवू लागला म्हणून बेडरूम मध्ये गेलो. उषेचा लांबसडक बोटांचा नाजूक हात हातात घेवून डोळे बंद केले. झोप डोळ्या भोवती घिरट्या घालत होती. मधेच डोळा लागत होता. मधेच जाग येत होती. अचानक उषेचा हात माझ्या हातातून खसकन ओढला गेला! मी खाडकन डोळे उघडले. खोलीत अंधार होता. उषेला अंधारात झोप येत नाही.ती बेडलॅम्प लावून झोपते. लाईट गेले कि काय?का कोणी तरी मुद्दाम घालवली? माझे डोळे अंधाराला बऱ्या पैकी सरावले होते. शेजारी नजर टाकली. उषा तेथे नव्हती! मी सावधपणे बाहेरच्या खोलीत आलो. आई-बाबाच्या बेडरूमचे दार उघडे होते! त्या धटिंगणाची काळीभोर आकृती दारात उभी होती!दोन्ही पाय फाकवुन! हाती रक्ताळलेला वीतभर लांब पात्याचा सूरा घेऊन!!आई-बाबा ,उषा वेडेवाकडे हातपाय बांधलेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते !!! आणि त्यांच्या समोर तेच रक्ताचे थारोळे! माझ्या घशाला प्रचंड कोरड पडलेली,अंगाला दरदरून घाम आला होता!. तेव्हड्यात माझ्या हाती काहीतरी जड लागले. ते मी उचलून त्या नराधमाच्या बोडख्यात मारण्यासाठी झेप घेतली. पण माझा अंदाज चुकला. मी धडपडलो. 

घरातले सारेजण ग्यालरीत धावले.माझ्या पडण्याचा आवाज सर्वांच्या कानी.पडला असावा. मी एकीकडे आणि आराम खुर्ची एकीकडे पडली होती. आईने हात देवून उठवले. 

"सुध्या ,किती रे घामागर्द झालास? काय वेडइद्र स्वप्नात होतास कि काय? मेल नको तितका जगतोस. अन आपल्या खोलीत झोपायचं सोडून इथ ग्यालरीत काय करतोस?"

"आता, आई तुम्हीच सांगा. ऑफिसची खरकटी काम घरी आणतो. मग रात्र रात्र जगतो!"उषाने री ओढली. बाबा काही बोलले नाहीत पण 'हाता बाहेरची केस'म्हणून माझ्याकडे पहात होते. 

मी माझ्या बेडरूम मध्ये गेलो.आरश्यात पाहिलं. सुपारी एव्हड टेंगुळ कपाळाच्या डाव्या कोपऱ्यात आले होते. डोळे लालसर वाटत होते. मला खरे तर खुर्चीतच झोप लागली होती. त्या नंतरच सगळ स्वप्नच होते. तो उषेचा हात हातात घेवून झोपण, तिचा हात खसकन हातून ओढला जाण सगळच स्वप्नाततल,ते थेट त्या झेप घेण्या पर्यंत. त्या झेपेनेच खुर्चीतून खाली पडून जाग आली. तेच तेच स्वप्न का पडतय? मला कळेना.

                                                                           ००० 

"सुधा, तेच ते स्वप्न पडणं हि काही शारीरिक व्याधी नाही. हा विषय सायकिऍट्रिसचा आहे. डॉक्टर रेड्डी माझा मित्र आहे. तज्ञ माणूस. तू म्हणत असशील तर त्याची अपॉंटमेंट घेतो. " माझी व्यथा एकून डॉक्टर माथूर म्हणाले. 

"ठीक आहे! घ्या!"माझ्या काही इलाज नव्हता. या स्वप्नाच्या दहशतीने गेली दोन दिवस जागाच होतो!

माथूरानी फोन लावला. 

                                                                          ००० 

डॉक्टर रेड्डीचे केबिन प्रशस्थ होते. रेड्डी प्लिजिंग पर्सनॅलिटीचे पन्नाशीच्या घरातले गृहस्थ होते. त्यांनी माझी पूर्ण चौकशी केली. अगदी मला आठवत त्या लहान वयातल्या आठवणी पासून ते कालच्या स्वप्ना पर्यंत. कधी डोक्याला मार बसलाय का? लहानपणी शाळेत किंवा घरी कशाची भीती वाटायची काय? आई-बाबा भांडताना पाहिलंस का? एक ना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मला लहानपणी झोपेत चालायची सवय होती या पलीकडे त्यांच्या काही हाती आले नसावे. माझे आत्तापर्यंतच जगणं चार-चौघा सारखंच होत. 

" मिस्टर सुधाकर , फारस काही सिरीयस वाटत नाही. पण टेन्शन मात्र मला जाणवतंय. मी टेन्शन कमी होण्यासाठी आणि शांत झोपे साठी औषधे देतो.हा फिटबीट बँड हातात घालून ठेवा. यात तुमचे हार्ट बिट,आणि झोपेचा डाटा रेकॉर्ड होत राहील. दहा दिवसांनी आपण तो अनलाईज करू.तोवर टेन्शन घेऊ नका."

डॉ रेड्डीनी दिलेला बँड मगटावर बांधला,आणि त्यांनी दिलेला प्रिस्क्रिप्शनचा कागद घेऊन बाहेर पडलो. 

                                                                         ००० 

रेड्डीच्या औषधाचा गुण येत होता. आठवड्यात छान फ्रेश वाटत होत. डॉ. रेड्डीकडे फॉलोअप साठी जाणे जमले नाही. औषधे पण संपली होती. मी हळू हळू निर्धास्त होत होतो.तरी प्रिकॉशन म्हणुन डॉ. रेड्डीच्या 'गुड नाईट'वाल्या गोळ्या आणायला गेलो तर केमिस्ट म्हणाला ' प्रिस्क्राइबड गोळ्या संपल्यात ,रिप्लेसमेंट देऊ का?'मी 'हो'म्हणालो. कारण नेहमीच्या गोळ्या येण्यास चार सहा दिवस लागणार होते. 

झोप पुन्हा दगा देऊ लागली. तशी स्वप्नाची दहशत जागी झाली.  म्हणून त्यादिवशी झोपताना दोन गोळ्या घेतल्या. डोळ्यावर झापड येत होती. स्वप्नाची भीती वाटू लागली. मन जागे रहा म्हणून बजावत होते.तरी झोपे साठी शरीर बंड करून उठले. 'रिप्लेसमेंट 'बरीच स्ट्रॉंग असावी. पापण्या उघडता उघडेनात. मन 'झोपू नको' म्हणत होते पण जाग रहाणं शक्य होईना,शेवटी त्या औषधाच्या जुलमाला शरण गेलो. 

समोर आई-बाबा ,आणि उषा हातपाय बांधलेल्या अवस्थेत वेडेवाकडे पडलेले दिसत होते. बाबांच्या बेडरूमच्या दारात तो हाती रक्ताळलेला सुरा घेऊन पाय फाकवुन उभारलेला पाठमोरा खाटीक तसाच दिसत होता! तेच रक्ताचं थारोळं! तोच माझा कोरडा आक्रोश!! तोच घामाने थपथपलेला मी!! तीच असहाय्यता, आणि तीच अगतिकता!!! 

"वाचवाSS !"सर्व शक्ती एकवटून मी ओरडलो. पण माझा आवाज घश्यातच अडकला! 

मी ताड्कन उठून बसलो! पुन्हा तेच स्वप्न ! पुन्हा एकदा त्या भयानक स्वप्नाच्या तावडीतून सुटलो होतो!मी शेजारी नजर टाकली बेड वर उषा असायला हवी होती, पण ती तेथे नव्हती! म्हणजे मी अजून स्वप्नातच आहे कि काय? मी उठून उभा राहिलो. डाव्या हाताने उजव्या दंडाला जोरदार चिमटा काढला. चांगलाच कळवळलो. म्हणजे मी जागाच होतो. समोर पहिले, जे मला त्या फुल मिरर मध्ये दिसत होते त्यामुळे मी नखशिखान्त शहारलो! गर्भगळीत झालो ! आरश्यात मला दिसत होते कि,मी घामाने भिजलो होतो, माझ्या कपड्यावर रक्ताचे भरपूर डाग होते! आणि --आणि उजव्या हातात वीतभर लांब पाते असलेला तो रक्ताळलेला सुरा होता! त्याच्या टोकातून अजूनही रक्त थेंब - थेंब टपकत होते!!

अरे देवा, म्हणजे स्वप्नात दिसणारा , बाबांच्या बेडरूमच्या दारात उभा असलेला धटिंगण मीचआहे कि काय?!!!

                                                                            ००० 

रीतसर पोलिसांनी घराचा कब्ज्जा घरातला होता. ते बाबांचा जवाब लिहून घेत होते. 

" काका नेमकं काय झालं ते सांगू शकाल ?"इन्स्पे. नी विचारले. 

"काल रात्री नेहमी प्रमाणे आम्ही रात्री दहा वाजता जेवणे करून झोपी गेलो. मुलगा,सून त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले होते. रात्री कधीतरी समोरच्या दाराला कोणीतरी खुडबुड करतंय असं वाटलं म्हणून उठलो. तोवर तो धिप्पाड चोर त्याच्या साथीदार सह घरात घुसला होता. त्या धिप्पाड चोराच्या हाती लांब पात्याचा सुरा होता. त्या दोघांनी आपली तोंड काळ्या फडक्यांनी झाकली होती. त्यांना कपाटाच्या किल्ल्या हव्या होत्या. त्यांनी आमचे हातपाय बांधून तोंडात बोळे कोंबले होते. तोवर सुनबाई पाणी पिण्यासाठी उठली ,त्यांनी तिची पण गठडी वळली. त्यांनी पुन्हा आम्हास धमकावयास सुरुवात केली. आम्ही दोघे होतो तोवर आम्ही त्यांना दाद देत नव्हतो. पण त्यांनी उषेचे हातपाय बांधून घातल्यावर मात्र आमचा धीर सुटला! मी गादी खालच्या किल्ल्या काढून देणार तेव्हड्यात आमचा मुलगा,सुधाकर आला. त्याने त्या पाठमोऱ्या धिप्पाड चोराच्या डोक्यात दोनकिलो वजनाचा लोखंडी डंबेलचा फटका मारला ! आणि त्याचा हात पिळवटून त्याच्या हातातला तो उघडा सुरा काढून घेतला! तो धिप्पाड चोर जमिनीवर कोसळला. दाराआड लपलेला त्या चोराच्या साथीदाराने एकदम सुधावर झेप घेतली. सुधाच्या हातातल्या सुऱ्याचे पाते त्याच्या बरगडीत घुसले! रक्ताची धार लागली. सुधा पुन्हा त्या धिप्पाड चोरा कडे वळला आणि त्याच्या छाताडात सुरा भोसकणार तेव्हा मी ओरडलो. ' नको सुधा, नको मारूस त्याला!!' तरी त्याने त्या चोराच्या मांडीवर दोन वार केलेच! आणि न बोलता स्वतःच्या बेडरूम कडे निघून गेला . "

"न बोलता ? म्हणजे ?"

" म्हणजे तो झोपेचं होता !बहुदा त्याला पुन्हा झोपेत चालण्याचा अटॅक आला असावा!"बाबानी त्यांची जबानी संपवली. 

मला ,त्या जखमी चोरांना पोलीस घेऊन गेले. 

यथावकाश माझी सुटका झाली ,पोलिसांच्या आणि त्या स्वप्नाच्याहि तावडीतून !

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy