Kishor Mandle

Romance


5.0  

Kishor Mandle

Romance


ऑटिजम (autism)

ऑटिजम (autism)

4 mins 1.8K 4 mins 1.8K

ट्रेनचा खडखडाट कानाला स्पष्ट जाणवत होता. लॅपटॉपवर काम करत असताना कॉफीचा कप ओठाला लावत जतीन विचार करत होता. काम तस अर्जंट नव्हते पण झोप येत नव्हती म्हणून लॅपटॉप उघडून बसला होता. राधाने बनवलेली कॉफी त्याला खूप आवडायची पण काही वेळापूर्वी झालेल्या भांडणामुळे ती जाऊन झोपली होती. स्वतः बनवलेली कॉफी नाईलाजाने पित होता. लॅपटॉप बंद करून तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. 12 वाजून गेले होते. एखाद दुसरी ट्रेन धडधडत जात होती. समोर असलेले निर्मनुष्य ट्रॅक पाहत त्याने एक उसासा सोडला. डोळ्यासमोर काही वेळापूर्वी झालेले भांडण आले.

“राधा सहजा कधी चिडत नाही आणि माझ्यावर तर नाहीच नाही. मी चुकलो, मान्य आहे. पण इतके टोकाचे बोलण्याची गरज नव्हती”

विचारात असतानाच त्याच्या मुलीच्या रडण्याचा आवाज कानावर आला. बेडरूममधली लाईट चालू झाली. जतीनने कप टेबलवर ठेवला आणि बेडरूमचा दरवाजा उघडला. अनन्या बेडवर उड्या मारत मोठयाने रडत होती. राधा तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. जतीन दार उघडून आतमध्ये आला. बेडवर बसत उड्या मारत असलेल्या अनन्याला धरायचा प्रयत्न केला पण ती जास्तच हायपर होती. कदाचित काहीतरी स्वप्न पाहिले होते. पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव कळत होते. तिचे भाव आपल्याला कितपत कळतात कुणास ठाऊक असा विचार मनात येऊन गेला, पण मग राधा बरोबर बोलली अस होतं नाही का?

बऱ्याच वेळानी अनन्या शांत झाली. ती झोपेपर्यंत राधा आणि जतीन एकत्र प्रयत्न करत होते. ती जशी झोपली तस राधाने तिला मिठी मारून डोळे बंद केले. पुन्हा शांतता घरभर पसरली. राधा आणि अनन्या एकमेकीला मिठीत घेऊन झोपी गेल्या. जतीनने काहीवेळ दोघींना डोळे भरून पाहिले. अश्रू ओघळले तसे हाताने ते पुसत तो दुसऱ्या बाजूला तोंड करून बेडवर झोपला. झोप लागायला त्याला फारसा वेळ कधी लागायचा नाही.

सकाळी अलार्मने जाग आली. 6 वाजले होते. अनन्या अजूनही झोपली होती. राधा अर्थात किचनमध्ये असणार. त्याने झोपलेल्या अनन्याच्या डोक्यावर हात फिरवला. उठून बाहेर आला. किचनमध्ये कानोसा घेतला. राधा डबा बनवत असणार. जतीन आंघोळीला गेला. तयारी करून टेबलवर आला. राधा टेबलवर एक एक गोष्ट आणून ठेवत होती. जतीन निमुटपणे बसला. राधाने ब्रेड आणि ऑमलेट समोर ठेवले. चहा आणायला ती आत जाणार तेव्हढ्यात जतीनने तिचा हात धरला. ती थांबली पण जतीनकडे पाहत नव्हती. जतीन हलक्या आवाजात बोलला

“सॉरी”

तिने वळून पाहिले. जतीनच्या डोळ्यात पाहत ती समोरच्या खुर्चीवर बसली. जतीन तिच्याकडे पाहत होता. ती त्याच्याकडे पाहत होती. एक दोन सेकंद असेच गेले आणि तो बोलला

“सॉरी राधा, चुकलं माझं. मी तसं रिऍक्ट करायला नको होतं”

राधाच्या डोळ्यात ओलसरपणा आला. पण तिने भावनेचा ओघ आवरत जतीनला विचारले.

“जर तुला असे वाटत असेल की तुझे frustration मला कळत नाही तर तू चुकतोयस. मला ते कळते म्हणूनच मी तुला कधी अनन्याच्या थेरपी मध्ये involve करत नाही. तू एक फ्रंट सांभाळतोयस आणि मी दुसरी. पण दुसऱ्या कुणाच्या reaction मुळे तू अनन्याला मारणं मला पटणारे नाही”

जतीनच्या समोर काल संध्याकाळी झालेला प्रसंग आला. त्याच्या ऑफिसमध्ये फॅमिली पार्टी होती. खरतर त्याला खूप टेन्शन आले होते. अनन्याला घेऊन बाहेर कुठे जाणे तो टाळत होता, पण राधाने जोर दिला म्हणून तो दोघींना घेऊन गेला होता. अनन्या जशी हॉलवर पोहोचली तशी आजूबाजूला असलेल्या लोकांना पाहून restless झाली. स्पीकरच्या आवाजाने ती रडायला लागली. राधा तिला जवळ घेऊन बसली होती, पण ती शांत होत नव्हती. जतीन थोडा अवघडत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, आणि अचानक ती किंचाळू लागली. सगळे तिच्याकडे पाहत होते. जतीनने तिला शांत करायचा प्रयत्न केला पण ती राधाला बोचकारू लागली. राधा तरीही प्रयत्न करत होती. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहू लागले तसे जतीन irritate होऊ लागला. आणि एका क्षणाला त्याने अनन्याच्या पाठीवर धपाटा मारला. अनन्याने जोराने राधाच्या हातावर चावले. राधा वेदनेने कळवळली आणि तिचा अनन्याला धरलेला हात सुटला. अनन्या हॉलच्या गेटच्या दिशेने धावू लागली. राधा त्या वेदनेतही तिच्या मागे धावली. जतीन सुन्न होऊन ते पाहत राहिला. त्याला frustration आणि guilt यातून बाहेर येईपर्यंत राधा आणि अनन्या बाहेर गेले होते. तो धावत बाहेर गेला. गेटवर राधा खूप ताकतीने अनन्याला आवरत होती. जतीन जवळ जाऊन काही बोलणार तेवढ्यात राधाने रागाने त्याच्याकडे पाहिले

“तू आणि तुझी पार्टी तुला लखलाभ, आम्ही घरी चाललोय. तू तुझं prestige सांभाळ”

राधा रस्त्याकडे निघाली. त्या वेळेला काय बोलावे हे कळत नव्हते. कसातरी स्वतःला सावरत तो म्हणाला

“थांब मी गाडी घेऊन येतो”

राधा एव्हाना रस्त्यावर पोहोचली होती. तो तिला थांबवेतोवर एक रिक्षा आली आणि राधा निघून गेली. घरी गाडी चालवत येत असताना त्याने अनन्याला मारल्यावर तिचा झालेला केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. चावीने दरवाजा उघडला. हॉलमध्ये शांतता होती. आत येऊन त्याने बूट काढले. बेडरूममधून अनन्याचा रडण्याचा आवाज येत होता. त्याने बेडरूममध्ये डोकावून पाहिले. अनन्याला मांडीवर घेऊन राधा तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. तो आत जाणार तेवढ्यात राधा रागाने बोलली

“तुझी पार्टी सोडून कशाला आलास? जा सांभाळ तुझी image”

जतीन तेव्हा रागाने बाहेर निघून आला. पण दुसऱ्या दिवशी राधा समोर त्याला आपली चूक जाणवत होती. जतीन उठून राधाकडे गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलला.

“खरच चुकलं माझं, मी फक्त माझा विचार करत होतो. माझी image, माझं दुःख. पण ह्या सगळ्या वेळात तू एकटीच अनन्याला, आपल्या मुलीला सांभाळत होतीस.”

राधाच्या हातावर उरलेला काळानिळा वळ पाहत तो हुंदके देत खाली बसला. हृदयात आलेली असह्य कळ त्याच्या शरीरात असलेली ताकत सहन करू शकली नाही. लादीवर त्याला बसून रडताना पाहून राधा उठून त्याच्याजवळ बसली.

“जतीन ती आपल्या दोघांची मुलगी आहे, सॉरी मी चिडले तुझ्यावर. पण तिला आपल्या दोघांच्या आधाराची गरज आहे. Autism diagnose झाला तेव्हा मी नोकरी सोडली, कारण तिला सतत बाजूला कुणी असण्याची गरज होती. तू अनन्यासाठी जी धडपड करतोयस ती तिच्या थेरपीला लागणाऱ्या पैशासाठी करतोयस, पण ती आपली मुलगी आहे. तिला होणारा त्रास हा आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कुणाला कळणार!”

जतीन अजूनही हुंदके देत होत होता. बेडरूम मधून आवाजाचा भास झाला तसे दोघे तिकडे धावले. अनन्या झोपेतून उठली होती.

आईबाबांना पाहून ती गोड हसली. दोघेही तिच्या जवळ गेले. जतीनने तिला मिठीत घेतले, आणि ती नेहमी सारखीच त्याला बिलगली.


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design