Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Shinde

Others

4.8  

Rahul Shinde

Others

अज्ञात

अज्ञात

3 mins
8.2K


   

गोष्ट आहे माझ्या मरणाची.. मरणापूर्वीची.. तेव्हा झालेल्या जाणिवांची. 

  महिनाभर दवाखान्यात ज्या खोलीत मी मरणाशी झगडत होतो, ती खोली मला कोठडी वाटायची. स्वावलंबी नसल्याची स्वतःवरच कीव यायची.. इतरांसाठी निद्रावस्थेत असलेल्या माझ्या आत किती काही काही घडायचं. एक दिवस मन थेट बालपणीतल्या दिवसांत गेलं,

  "बंडया, मेल्या किती दमवशील? ऐक की जरा, आईची काय किंमत हाय का नाय तुला?" आई मला लहानपणी म्हणायची... तिची खरी किंमत ती गेल्यावरच कळाली.  

  बालपणी पावसात भिजताना बेभान व्हायचो आणि जाणवलं,बालपणानंतर आपण पावसापासून स्वतःचा बचावच करत आलो..इतक्या वर्षापूर्वीचे ते बालपणीचे दिवस त्या दवाखान्यातल्या बेडवर आठवताना आता आता घडल्यासारखे वाटत होते...आयुष्यात गोष्टी स्वतःच्या मर्जीप्रमाणे घडण्यासाठी केलेला अट्टाहास,धडपड, आक्रोश बालिश वाटत होता, अर्थहीन.. म्हणजे आपल्याला फक्त वाटत असतं, आपलं अस्तित्व खूप महत्वाचं आहे, पण तेव्हा जाणीव झाली, आपल्याशिवाय हा काळ चालत होता आणि राहील. . जात ,धर्म, लिंग, हे तुझं, ते माझं या सगळ्यांबद्दलचा वाटणारा अभिमान अर्थहीन होता,हे जाणवलं, ते हास्यास्पद वाटलं.. 

  आयुष्यभरात न समजलेला जीवनाचा अर्थ त्या खोलीत कळू लागला होता आणि त्याला आता समजून काय अर्थ होता का ?वाटलं,आता ही जखम बोचत राहील शेवटपर्यंत, पण मग समजलं , असे किती दिवस राहिलेत आपले? आणि ही समजच पुन्हा अनेक शारीरिक जखमांपेक्षा भयानक वाटली."

    "नको अडकून राहू कशातही 

    येणारा दिन कर समाधानी।।"

गावातल्या कीर्तनकाराचे हे बोल कळूनही ते अंगवळणी पाडले नव्हते.  

       दवाखान्यात निद्रावस्थेत मला भेटायला येणाऱ्या माणसांचे स्पर्श व्हायचे आणि त्या स्पर्शानेच ती व्यक्ती कोण आहे, हे कळायचे. स्पर्श म्हणजे जादूच. असा स्पर्श आपल्या माणसांना इतरवेळी का करत नाही आपण, हा प्रश्न पडला...म्हणजे आपण एकमेकांना मरणाजवळ नसताना गृहीतच धरतो का?

    दवाखान्यातल्या खोलीत असताना मला देवही भेटला. खरा होता,खोटा होता, भास होता की माझ्यातलाच भाग देव म्हणून बोलत होता, ते काही सांगता येत नाही. .. मी जिवाच्या आकांतानं त्याला विचारलं,

    "आयुष्य म्हणजे काय याची खरी ओळख, जाणीव इतक्या उशिरा का करून दिलीस मला? अशा शेवटच्या टप्प्यावर...आता काय उपयोग आहे त्याचा?जीवन जगण्याचा इतका मोहसुद्धा आताच का निर्माण झाला? थोडं आधी कळलं असतं, तर जगलो असतो मनमुरादपणे. ."

  "प्रत्येक गोष्ट निसटून चालली की मगच त्याची खरी किंमत कळते ना...तुझंही तेच होतंय, आयुष्य निसटतंय ना तुझ्याकडून, म्हणून तुला आता सगळी जाणीव होतेय.. आणि आधी मी जाणीव करून दिली नाहीस, असं कसं म्हणतोस? ही सृष्टी,तुझ्या आजूबाजूचे दुखी-कष्टी, ऊन-पाऊस,आभाळ..सर्व तुझ्यासाठीच तर बहाल केले होते... त्यात मी दाखवत असलेला अर्थ तुलाच डोळसपणे बघून शोधता आला नाही..तू आयुष्यातले प्रश्न सोडवण्यात इतका व्यस्त होतास की तूला जगण्यातलं सौंदर्य दिसलंच नाही."  

 देवाचं हे उत्तर ऐकून मी खिन्न झालो.. 

  आयुष्य मागे वळून पाहिलं तर ते बऱ्याचदा भयावर आधारलेलं होतं . 'वेदना होईल' याचं भय, आणि दवाखान्यात शरीर वेदनेत असतानाही मन मृत्यूपासून परतता येईल का, याचा विचार करत होतं ... का? काय उरलं होतं? पण दिलेलं, मिळालेलं पुरणारच नाही, हा मानवी मनाला मिळालेला शापच आहे का? आधीही मृत्यूचा विचार केला होता,तो तेवढ्यापुरताच.. वाटलं,मृत्यू नसताच तर?... तर शरीर, वेदना, सुख,प्रेम याला किंमतच उरली नसती, कारण हे नाश्वर आहे म्हणून याला महत्व आहे.. आणि मृत्यू नसता तर अहंकार,हिंसा,पाप हे सगळंही वाढून जगणं नरक बनलं असतं.

आयुष्यात महत्वाचा निर्णय घेताना, महत्वाच्या ठिकाणी जाताना इतरांची आवश्यकता वाटायची.पण मृत्यूच्या या सगळ्यात अवघड टप्प्यावर एकट्यालाच जावे लागते.. इथे कोणी सोबती नसते.. हे केवढ' कटू सत्य.. 

  दवाखान्यातही मला वाटत होतं , आपल्याला हव्या असणाऱ्या काही गोष्टी आपण असताना व्हायला हव्यात आणि त्या वाटण्याची गम्मतच वाटली.. अपेक्षा कधीच थांबत नाहीत,शेवटच्या घटकेतही नाही?...पण ते होणं ज्या माणसांसोबत जोडलेलं आहे, त्यांच्यासोबतचा आता आपला प्रवास संपणार आहे, या कल्पनेनं मी हलून गेलो आतून...आणि तिथेच ठरवलं, आता कसलीच अपेक्षा करायची नाही... 

   पुढच्या प्रवासाला तयार झलो, जो अज्ञात होता.....


Rate this content
Log in