Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Akash Kokate

Abstract Drama

5.0  

Akash Kokate

Abstract Drama

इंटरनेट आणि काटकोन त्रिकोण..!

इंटरनेट आणि काटकोन त्रिकोण..!

5 mins
16.1K


रामरावांची स्वारी आज भलतीच खुशीत दिसत होती, घरात पण एकदम चैतन्याचे वारे संचारले होते, रामरावांच्या सौ. ने जी जय्यत तयारी केली होती, ती दिवाळ सणालासुद्धा लाजवणारी होती. अंगणात(म्हणजे घरासमोरील 'रस्त्यावर') काढलेली भलीमोठी रांगोळी, दारावर लावलेली तोरणे, घरभर पसरलेला धुपबत्तीचा सुवास, मिठाईची रेलचेल. रामरावांना शुगर, गोड खायला वर्ज होतं तरी आज ती मिठाई किचनमध्ये मस्त थाटात पडली होती. रामरावसारखे त्यांच्या गॅलरीत हाताची मागे घडी घालून येरझाऱ्या मारत होते आणि सारखे आपल्या घरासमोरील कॉर्नरकडे बघत होते. चिंताग्रस्त दिसत होते. तेवढ्यातच त्यांना नको असलेल्या श्री.म्हैपत रावांचे आगमन झाले. श्री. म्हैपत राव म्हणजे रामरावांच्या पारंपरिक शत्रू. म्हैपत रावांच्या आणि रामरावांच्या स्वभावात एकमेकांबद्दलचे 'वैर' ह्याखेरीज काहीही सामायिक नव्हते. मागच्याच उन्हाळ्यात रामरावांच्या घरी त्यांच्या ऑफिसातले एक बडे साहेब आले होते. त्यांचा पाहुणचार जर व्यवस्थित झाला तर 'आपली पगारवाढ नक्की' ह्या विचाराने रामरावांनी 'त्यांच्या पाहुणचारात कसलीही कसर ठेवणार नाही' असा पण केला होता. साहेब सपत्निक सकाळी १० वाजता येणार होते. 'सपत्निक' म्हणल्यावर त्यांनी दुपारचे १२ वाजवले यायला. वातानुकुलीत गाडीतून साहेब आले. रामरावांच्या घरात ना AC ना कुलर. एव्हाना साहेबांच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. रामरावांनी साहेबांना आजच काढलेल्या नवीन चकाकत्या ग्लास मधून पाणी दिले. साहेबानी २ घोट घेतले आणि रामरावांकडे असा काही दृष्टी कटाक्ष टाकला की रामरावांच्या तोंडचे 'पाणी'च पळाले. साहेबांच्या सौ. ने "आमच्या ह्यांना बर्फ असलेलं सरबत लागतं" अशी माहिती पुरवली. पण रामरावांकडे तर फ्रिज नव्हता. रामराव विचारात पडले की बर्फ आणावा तरी कुठून?" (मनात) अरेच्चा म्हैपतरावांकडे तर फ्रीज आहे" पण हे काम उंदराने मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे कठीण होते. पण त्यादिवशी त्यांना फक्त त्यांचा वाढणारा पगार दिसत होता. ते सरळ घरातून निघाले आणि म्हैपतरावांना बर्फासाठी 'थंड' डोक्याने अर्जव केली. पण म्हैपतरावांनी "अहो आमच्या हिने बर्फ करायच्या साच्यात पाणीच भरले नाही हो" अशी थाप मारून ती विनंती लाथाडली होती. रामरावांना त्यांच्या थापा लक्षात आल्या अन त्या बर्फामुळे परत एकदा 'शीत'युद्ध पेटले होते. शेवटी बिना बर्फाच्या 'सरब'ताने साहेबांची 'सरब'राई केली.

"अहो रामराव..!!!" म्हैपतरावांनी मोठ्याने थोबाड वासाडले.

तेव्हा रामराव विचार तंद्रीतून बाहेर आले.

"तुम्ही लै चिंतेत दिसताय, एवढ्या येरझाऱ्या मारून तुमच्या मनातील प्रश्न सुटेल का हे मला माहित नाही, पण तुमच्या 'सुटलेल्या' पोटाचा प्रश्न नक्की सुटेल" असं म्हणून त्यांचं ते सैतानी हास्य त्या प्रसन्न वातावरणाचा अंत करु पाहत होतं.

रामरावांनी 'गरम पोह्यातल्या कडीपत्त्या' कडे जसं आपण दुर्लक्ष करतो तसं त्यांनी म्हैपतरावांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

"कशाची वाट पाहताय..एवढी? जास्त वाट पाहणे तुमच्यासारख्या शुगर असलेल्या माणसाला धोकादायकच !" असं जेव्हा ते बरळले तेव्हा रामरावांनी स्वतःला आलेला राग गटागट गिळून त्यांना "ते कसं??" असं विचारल्यावर.

"क्योंकी सब्र का फल हमेशा 'मिठा' होता है..!" म्हैपतराव बत्तीशी दाखवत हसत सुटले आणि त्यांना पाहून रामरावांना त्यांच्या बत्तीशीची 'ऐशी तैशी' करण्याचे विचार रेंगाळू लागले तेवढ्यातच त्यांचे लक्ष घराच्या बाहेर गेले आणि पाहतात तर त्यांचा परशा(प्रशांत) ऑटो रिक्षातून बाहेर डोकावत "अण्णा अण्णा " अशी हाक देत होता, ते दृश्य पाहून राम वनवासाहुन परतल्यावर आयोध्यानगरीतील प्रजेची जशी अवस्था झाली होती अगदी तशीच अवस्था ह्या 'रामा'ची झाली होती. जॉन इब्राहिमच्या चेहऱ्यावर अभिनयाची रेष उमटली आणि ती माय बाप रसिक प्रेक्षकांनी पाहिली तेंव्हा त्यांना जेवढा आनंद होईल त्यापेक्षा जास्त आनंद आज रामरावांना झाला होता. त्यांचा हा आनंद पाहून म्हैपतरावांची मात्र दैना झाली होती. त्यांची अवस्था इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात वनडाऊनला पाठवल्यावर 'आशिष नेहरा' ची जशी व्हावी अगदी तशीच झाली होती..

रामरावांनी हाक मारली. "अगं ऐकतेस का? परशा आला बघ".

त्यांच्या सौ. हे ऐकल्यावर गोठ्यातून दावणीला बांधलेली जशी म्हैस सुटते तशा किचन मधून सुटल्या होत्या.. हॉल मध्ये येऊन चातक पक्षी जसा 'पावसाच्या' प्रतीक्षेत आकाशाकडे बघतो अगदी त्याच नजरेने त्या आपल्या वंशाच्या 'दिव्या'ला पाहत होत्या.

ऑटो रिक्षा घरासमोर आली. परशा एक भला मोठ्ठा कम्प्युटर घेऊन घरात शिरत होता. तेवढ्यात त्याच्या मातोश्रीने त्याला अडवलं आणि आपण घरात गणपती जसा आणतो अगदी तशीच पूजा कम्प्युटरची केली. सगळे सोपस्कार पार पडले. कम्प्युटर शेवटी एक रूममध्ये विसावला. त्यादिवशी रामरावांनी सगळ्या गल्लीत पेढे वाटले व ते पाहून म्हैपतरावांचे तोंड कडू पडले हे आत्ता वेगळे सांगायची गरज नाही.

परशा कम्प्युटरच्या सगळ्या setting करत होता आणि त्याचे आई वडील आपला मुलगा 'एडिसन' असल्यासारखा कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते.

ते सगळं सुरू असताना म्हैपतराव असे काही गायब झाले होते जसे निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी..!

Hutch च्या जाहिरातीतला तो कुत्रा जसा त्या लहानमुलाच्या मागे तो जिथे जाईल त्याच्यामागे जातो तसं कम्प्युटर आला म्हणजे इंटरनेट आलेच.

परशा ने सगळ्या Settings केल्या आणि त्याने वळून त्याच्या अण्णांकडे(रामरावांकडे) पाहिलं. एकूणच ते सगळं वातावरण ISRO ने सॅटेलाइट लाँच करायच्यावेळी जसं असतं अगदी तसंच होतं. अण्णा म्हणजे सिनियर वैज्ञानिक व परशा ज्युनियर वैज्ञानिक असल्यासारखे एकमेकांना सांकेतिक भाषेत बोलत होते व रामरावांच्या सौ. संरक्षण मंत्र्या सारख्या फक्त बघत होत्या. शेवटी परशाने password टाकून सॅटेलाइट लाँच करत असल्यासारखे Enter बटन दाबले आणि Homescreen उघडली तसा घरात एकच जल्लोष. लगान चित्रपटामध्ये जेव्हा भुवनची टीम जिंकते तेव्हा भारतीय commentator "हम जित गये" असं म्हटल्यावर तेथील जनतेने जो काही गोंधळ घातला अगदी तसाच !

त्यांचा तो काटकोन त्रिकोण असलेला परिवार आनंदात न्हाऊन निघाला आणि त्या काटकोणातील दानशूर 'कर्णा'ने (रामरावांनी) सगळ्या शेजाऱ्यांना बासुंदी पाजली.

नंतर सुरू झाले परशाचे प्रौढ वर्ग. विद्यार्थ्यांमध्ये दस्तुरखुद्द रामराव होते. सगळ्यात आधी परशाने त्यांना सगळ्या Social Media Websites जसे Facebook,Whatsapp,Gmail,Orkut, Borkut(बोरकूट म्हणजे इत्यादी) बद्दल थोडक्यात सारांश पद्धतीने सांगितले.

नंतर सुरू झाले रामरावांचे प्रश्न आणि परशाची उत्तरे. परशा एकदम 'सिद्ध' व 'सात्विक' मुनींसारखा बसला होता आणि त्याच्या शिष्याच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे हे त्याला त्याचे परम कर्तव्य आहे असे वाटत होते आणि रामराव पण जिज्ञासू वृत्तीने त्याच्या समोर बसले होते.

"परशु(लाडात), फेसबुक 'अप्पा बळवंत चौकात' मिळेल ना रे का आपल्याला ते मुंबईहून मागवावे लागेल?" रामरावांनी करुणामय चेहऱ्याने विचारले.

त्या धक्क्याने सावरत परशा म्हणाला "अहो अण्णा ती एक Website आहे व ती इंटरनेटवर उपलब्ध आहे"

प्रश्नार्थक चेहऱ्याने अण्णा " कित्ती पानांचं पुस्तक आहे ते??"

परशाला तिथून पळता पण येत नव्हतं. त्याची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती.

"तसं नाही हो अण्णा, ते पुस्तक नाही ते एक मित्र जमवण्याचे साधन आहे" परशाने केविलवाण्या चेहऱ्याने सांगितले.

फेसबुकवर बोलताना परशाच्या तोंडाला फक्त 'फेस' यायचा बाकी राहिला होता.

दिवसेंदिवस परशा असा काही मग्न झाला त्या कम्प्युटरच्या विश्वात. त्याने मैदानाचे तोंड शेवटचे कधी पाहिले हेही त्याच्या स्मरणात नसावे. रामराव पण इंटरनेटच्या विश्वात रमले होते. परशाने त्यांना स्मार्ट फोन पण घेऊन दिला होता. आत्ता बापलेक समोरासमोर कमी आणि Whatsapp वरच जास्त बोलत होते. ज्या रामरावांना 'You Tube चा आणि आपल्या घरातल्या tube चा तिळमात्र संबंध नाही' हे पेटवायला परशाला अर्धा तास लागला होता तेच रामराव आत्ता तासनतास you Tube वरचे व्हिडीओ बघण्यात घालवत होते. हे बापलेक सकाळी उठल्यावर फेसबुकवर 'पोस्ट' आधी करायचे अन नंतर दातांना 'पेस्ट' करायचे.

हसतं खेळतं कुटुंब आत्ता जेवायलासुद्धा एकत्र विरळच बसायचे, "अरे अमक्याने माझी Friend Request स्वीकारली नाही. तमक्याने मला tag केले नाही. थांब मी त्याला Block करतो" असे कलहाचे विषय सुरू झाले.

परशाने आईला पण शॉपिंगच्या ऑनलाइन दुनियेत आणलं. त्याने तिला फ्लिपकार्ट, Myntra, Amazon ह्या वेबसाइट्स दाखवल्या होत्या व त्यामुळे अण्णांचे दिवाळीच्या आधीच दिवाळं निघणार होतं. इंटरनेटमुळे सगळे जग जवळ आले होते मात्र घरातली माणसं खूप दुरावली होती.

त्या काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजू तीन समांतर रेषा झाल्या होत्या... कधीच न मिळणाऱ्या..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract