संजन मोरे

Others


2.5  

संजन मोरे

Others


सावज

सावज

4 mins 22.9K 4 mins 22.9K

सावज...... 

रत्ना आत, अन म्हातारा बाहेर वट्यावर पडला होता. दारु पिवून , बोंबलाच्या कालवणात दोन भाकरी कुस्करून हाणून, वर डेऱ्यातल्या थंडगार पाण्याचे दोन तांबे रिचवून शिवाप्पा म्हातारा टम्म फुगून घोरत पडला होता. उन्हाळ्यानं जास्तच गदमदत होतं. आत घरात रत्नी ची उलघाल चालली होती. भेंड्याच्या मातीचं, अन पत्र्याचं छप्पर असलेलं घर त्यांचं. घरात रत्नी आन म्हातारा दोघंच. पावूस काळ असला, कडाक्याचा हिवाळा असल्यावर शिवाप्पाला घरात झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. त्याच्या वारगीचे म्हातारे कुठंपण देवाळ धरुन पडायचे . पण रत्ना घरी येकटी असल्याकारणानं शिवाप्पा ला रात्रीचं घर सोडता यायचं नाही. रत्नी ची आई येरवाळीच, एकपारगी पात संपवून चार वाजताच घराकडं निघावं, तशी वरच्या घराकडं अवकाळीच निघून गेली. कारभारीन गेली तसा जवारीच्या पिचक्या ताटासारखा शिवाप्पा मोडून पडला. वाळून चिप्पाड झाला. शिवाप्पा म्हातारा होत गेला अन, मकंच्या भरल्या ताटासारखी रत्नी झपाटय़ाने वाढत गेली . मोठी होत गेली. 

आईविना पोर, कारभारनी विना घरधनी.

 म्हातारा लवकरच काठीवर आला. हात पाय कटाकटा वाजू लागले. म्हातारी निघून गेली अन म्हातारा पैलतीराचा ध्यास लावून बसला, आला दिवस पुढं ढकलू लागला. रत्नाला लवकरच जाणतेपण आलं. घराचा बोजा आंगावर पडला.ती गांगरून गेली. शाळा संपली, पाटी फुटली. पुस्तकं चूलीत गेली. वावार ना शिवार ! तिला शेत मजूरी शिवाय पर्याय उरला नाही.

 सगळं आवरून सावरून सकाळी दहा वाजता ती बायांसंगं निघायची, चालत. कमरेला खुरपं, डोक्यावर टावेलाची चुंबळ, चुंबळीवर भाकरीचं गठूळं, हातात शेरडीचं दावं. असा फैल ची फैल सडकेनं निघायचा. दिवस पुढं अन ह्या माघं. उन चटकू लागायच्या आत वावरात पोहोचावं लागायचं. तोंडाळ मालक वाट बघतच असायचा. बिगी बिगी मुकाट्यानं कामाला जुपी करायची. डोक्यावर टावेल गुंडाळून, अंगात घरातल्या पुरुषाचा शर्ट घालून पातीला बसायचं. सरासरा हात चालू लागतो. खुरपं हालू लागतं. तणावर राग काढायचा. खुरप्याची आटण लावून हिसका द्यायचा की गवत मुळापासून उपटून येणार. साठलेला गवताचा ढीग आपआपल्या शेरडाम्होरं टाकायचा. मिसरी लावायच्या दोन सुट्ट्या, जेवणाची एक अशा तीन सुट्ट्या व्हायच्या. शाळेगतच होतं काम. साडे पाच वाजता दिवसाची सुट्टी व्हायची. घड्याळ न बघता बायांना टाईम आपसूक कळायचा. मालकाची वाट न बघताच त्या पात सोडायच्या. मग जाता जाता वाटंवरच्या रानातली वांगी खुडायची, तंबाटी तोडायची, वाफ्यातली भाजी उपटायची. संध्याकाळच्या कालवणापुरतं घावलं की चालू लागायचं. उन्हानं जीव आंबून गेलेला असतोय. घरी जावून विसावा न्हाय. च्या करुन स्वयपाकाला बसायचं. धपाधपा भाकरी थापायच्या.

रत्नी च्या आता हे सगळं आंगवळणी पडलंय. गावात दारु मिळायला लागली तशी शिवाप्पाला दारूची लत लागली. म्हातारं ख्वॉड पण रोज खायला खराट आळणी लागायचं. टम्म फुगून एकदा झोपला की मग मरुन पडल्यावानी पडायचा. काठी उशाला ठेवून म्हातारा वट्यावर झोपायचा. त्याच्यामुळं तरण्या ताठ्या रत्नीला बिनकाळजी झोपता तरी यायचं. रत्नी दार उघडं ठेवून दरवाजात पडायची. घरात गदमद. दिवसभर तापलेला वरचा पत्रा, चूलीजवळची जमीन गरमाट राहायची. घरात ना लाईट ना पंखा. आंगातून घामाच्या धारा निघायच्या. जवानीची धग अलगच. अशा या धगीत, गदमदत्या आगीत रत्नी घरात एकटी पडली होती. म्हातारा शिवाप्पा बाहेर वारवशी निजला होता. 

**

 मजूरीला गेलं की बागायतदारांच्या नजरा रत्नी कडं राहून राहून वळायच्या. गावात दळणाला गेली की गिरणीत गिरणवाला पोरगा, दुकानात वाण्याचा नातू, चौकात बुलेट लावून तिच्याकडं बघून खाकरणारा पहिलवान लाल्या, जाता येता तिला शब्दाने डिवचणारी उनाड तरणी पोरं... 

तरूणपण म्हंणजी रत्नी च्या जीवाला एक घोरच झाला होता. रत्नी वयात आली अन टोळकी सक्रिय झाली. अणखी एक सावज टप्प्यात आलं होतं. शिकारी तल्लख झाले.

"म्हातारा दारु पिवून पडलेला असतो, रत्नी घर उघडं ठेवून निजलेली असते. सरळ हातरुणात घुसायचं. तोंड दाबून.....

तिलाही आवडणारच की." 

"दळणाला आली की आंधारात आवळायची. कुस्कारायची, उचलून न्ह्यायची. गावात पडक्या घरांना तोटा न्हाय." 

"रत्ने हजार देतो........" 

"रत्ना बाय..... नातवंडं सुट्टीला आल्यात. तू मळशीत जावून पाटीभर काकड्या तोडून ठेव. मी येतोच न्ह्यायला...."

असं किती, अन काय काय.......? 

" हे आब्रूचं फूल चुरगाळायला तर सगळीच टपल्यात. दार लावून झोपावं तर उकाड्यानं जीव हैराण होतोय. म्हातारा ढिम्म. पोरगी लग्नाला आलीय. म्हाताऱ्याला काही घेणं देणं नाही. आपण लग्न करून गेल्यावर म्हाताऱ्याला कोण करुन खायला घालणार ?"

रत्नी ला म्होरचं उजाड आयुष्य उन्हात बघीतल्यासारखं सपष्ट दिसत होतं. दिवसभर बाया संभाळून घेत होत्या, रात्रीचा भरोसा नव्हता. गावातले टोळके माजले होते.

" किती चुकवशील रत्ने...?"

" किती वाचवशील स्वतःला...?"

" लग्न होईपर्यंत मजा करून घे..."

" पुढची पुढं......." 

पण रत्नी अजून तरी कुणाला बधली नव्हती.

दळणाचा डबा घेवून रत्नी घरला आली. वाटेत लाल्या खाकरलाच. परातीत पीठ काढायला तिनं डब्यात हात घातला. पीठात दोन हजाराची गुलाबी नोट. सोबत एक पांढरी चिठ्ठी.

" उद्या दहाच्या गाडीने नात्यापुत्याला ये.. मजा करू....... लाला. "

परातीत वंजळभर पिठ, डबा उघडा. दोन हजाराची नोट, वाकड्या तिकड्या अक्षरातली चिठ्ठी, अन सुन्न बसून राहिलेली रत्नी. लाल्याची मजल लांबवर पोहचली होती. गिरणीवाल्या मार्फत चिठ्ठी धाडली होती. 

"ह्यो आपल्याला सुखानं जगू देणार न्हाय."

" लाल्या मस्तवाल गुंड, जणू गावात सोडून दिलेला पोळंच. कुणाला सांगणार ?

कुणाकडं दाद मागणार ? गरिबाच्या पोरींनी कसं जगावं ? हे मस्तीला आलेले सांड गायी, कालवडी बघून डिरकत फिरत्यात. गोठा मोडून, अडचणीत कुपाटीला थटलेली अडेल गाय गाठून तिच्यावर उडत्यात."

" कसं जपायचं स्वतःला ?" 

रत्नी कशी जपेल स्वतःला....?


Rate this content
Log in