Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mansi Nevgi

Romance Others

4.0  

Mansi Nevgi

Romance Others

हातातली सोनेरी पाने

हातातली सोनेरी पाने

4 mins
12.2K


उषा भराभर कामं आटपून आरशात स्वत:ला न्याहाळू लागली .

'त्याचा आवडता रंग घालू का..?' 

तो नेहमी म्हणायचा " लाल रंग तू परिधान केलास ना ... की कलिजा खल्लास होतो बघ ... लाल रंगाची लाली तुझ्या सौदर्यालाच फक्त खुलवत नाही .... समोरच्याचं काळीजही चिरते ... बघ हा सांभाळून..!!" आणि दिलखुलास हसत सुटायचा . 

उषाला आठवलं आणि ती लाजली . आज वीस वर्षांनंतर चेतन तिला भेटणार होता .वयाच्या अठराव्या वर्षी ती त्याच्या प्रेमात पडली होती ..! 

तिने लाल रंगाची पण गुलाबी बॉर्डरची कॉटनची साडी .. त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाउज ..कानात पोवळ्यांची सुबक कर्णफुले ... गळ्यात लांबलचक ठसठशीत मंगळसूत्र आणि हातात पोवळ्यांचे कडे ...असा साज चढवला ... थोडी सैलसर कमरेपर्यंत रुळणारी वेणी घातली .. तिचं सौदर्य आज आरश्यालाही भुरळ घालत होतं..चेतन भेटणार म्हणून डोळ्यांत जी चमक होती ती कित्येक दिवसांत तिने पाहिलीच नव्हती .काल फोनवर त्याचा आवाज ऐकताच मनात साठलेल्या भावना कधी ओघळून गालांवर आल्या तिला कळलेच नव्हते.अनामिक ओढीने ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचली . 

इतक्यात फोन वाजला ..

" अगं तिकडे कुठे पाहतेयस ... समोर बघ .. बाय द वे .. लाल रंग काळीज चिरतोय हं आजही .... ! "  

उषाने समोर पाहिलं .चेतन ... तिच्याकडे पाहून हसत होता. लाजेच्या कळ्या तिच्या गालांवर फुलल्या.

"इतक्या वर्षांनंतरही कसं रे ओळखलंस मला ...वजन वाढलंय ना माझं ... तू पाहायचास तेव्हा शॉर्ट केस असायचे माझे .. तरीही ओळखलंस..!

" अगं तुझ्या श्वासांनाही ओळखायचो मी ... एखाद्या पुस्तकातल्या पानांच्या सहवासात थोडा काळ जरी गुलाबाची पाकळी राहिली ना ..तरीही .. पुस्तक कायम गंधाळलेलंच राहतं .. तू तर गुलाब आहेस आणि मी ते पुस्तक ..अगदी साठाव्या वर्षीही भेटली असतीस तरी मी ओळखलं असतं तुला ..! आजही तू तितकीच सुंदर आहेस ....! " 

ती शहारली ... त्या शहाऱ्यांनी सुखावलेल्या तिच्या रोमारोमाला तिने लपवलं. दोघांनीही बऱ्याच गप्पागोष्टी केल्या. मित्राच्या घरी चेतन गेला असता त्याने तिथे एक काव्यसंग्रह पाहिला .. वाचनाचा मोह अनावर होऊन पुस्तक हातात घेतले... आणि हृदयात एक अनामिक ओढ दाटली ...काहीशी ओळखीची . त्याने पान उघडले अन् ..... "उषा ... माझी उषा ... " तो पुटपुटला . मग काय ..! त्याने तिचा मोबाईल नंबर मिळवलाच ... आणि लगेच भेटण्याचंही ठरवलं. ही सारी हकीकत चेतन सांगत होता आणि उषा पल्लवीत होउन ऐकत होती . गप्पांच्या ओघात चेतन नकळत तो एकटाच असल्याचे बोलून गेला , एकदम शांतता पसरली.त्यांनी जेवण उरकलं आणि भेटत राहण्याच्या बोलीवर एकमेकांची रजा घेतली .


उषाचं तर आयुष्यच बदललं होतं ... ! वीस वर्ष समीरच्या संसाराला ती ओढत होती अगदी विषण्णपणे . आताशा ती कविता लिहू लागली होती .लपवलेल्या स्त्रीभावनेचे व्याकूळ शब्द भरभर कागदावर उमटायचेत..घडायची कविता ...आणि झळकायचीही .. काव्यसंग्रहातून ..! उषा मात्र रोज बरसायची तिच्याच एकांतात ... मोकळं करायची स्वत:ला .. कारण समीरने परमोच्च सुखाच्या सरींनी तिला कधीच चिंब केलं नव्हतं. चेतनला दिलेलं प्रेमाचं वचन आईवडिलांखातर तिने मोडलं ,पत्नीधर्म निभावण्याचं मनाशी पक्क केल्यानंतरच समीरच्या घराचा उंबरा तिने ओलांडला होता. सौदर्य .. मार्दव ..शृंगार सारं काही असतानाही समीर मात्र तटस्थ .. एखाद्या सन्याशासारखा . ऐन तारुण्यातही त्याने कधी तिला मोहरवलं नव्हतं की चुरगळून टाकलं नव्हतं . पेटलेल्या भावना बिछान्यावर एकाकी विझायच्या. ...उशी मात्र भिजत राहायची . ती उशीही आत्ता निर्विकार झाली होती ,तिच्या शुष्क झालेल्या भावनांसारखी . प्रेमासाठी गेली वीस वर्षे याचना करणारी उषा झाकोळलेलीच होती ... सोनेरी किरणांच्या प्रकाशात तिचं वैवाहीक जीवन उजळलंच नव्हतं..! नराने मादीचा उपभोग घ्यावा आणि त्या कधीतरी झालेल्या प्रेमविहीन संभोगातून एका कोवळ्या जीवानं आकारावं .. असाच झाला होता ...अवनीचा जन्म ..! 


अवनी तिची अठरा वर्षाची मुलगी . अवनी दहा महिन्यांची असताना निराशेने उषाला इतकं ग्रासलं .. की ब्लेड हातावरच्या नसांवर चालणार ... इतक्यात अवनीने टाहो फोडला आणि तिच्यातल्या आईपणाचा पुनर्जन्म झाला. अवनीला हृदयाशी घट्ट कवटाळून ती पुटपुटली .. "आता उरलीय फक्त अवनीची आई ... समीरची पत्नी मेली ! " 


आज पुन्हा वीस वर्षांपूर्वीची उषा तिला साद घालत होती . एकाकीपणाच्या वाळवंटातून समीरचा हात सोडून चेतनच्या कुशीत धावत शिरावसं तिला वाटत होतं. ज्या सौभाग्यलंकारांचे पाश तिच्या मनाला रोजच रक्तबंबाळ करत होते ..त्यांना तडकन तोडावं..जगावं स्वत:साठी . पुलकीत कराव्यात विरक्त झालेल्या भावना. हातात उरलेल्या आयुष्याच्या पानांना सोनेरी करावं ...!

तिचं ठरलं ! 

"आई छान दिसतेयस .. हे गोड हसू यापुढे कायम राहायला हवंय हा मला ..! " मागून येऊन आलिंगन देत अवनी म्हणाली . 

" खरंच ...! " 

" बाळा.. स्वीकारशील का कुणी परकं आईच्या आयुष्यात आलेलं ...? " उषाने पटकन विचारलं .

"फक्त तुझ्या गालावरच्या हरवलेल्या हसऱ्या रेषांसाठीच हं ... ..!" अवनी हसत म्हणाली .

'आता प्रेम आकाशात रुजून ढगांतून रिमझिमत ओसाड धरणीला चिंब भिजवणार होतं ...!' या विचाराने उषा उजळून निघाली .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance