Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Jawdekar

Romance Drama

4.7  

Medha Jawdekar

Romance Drama

यात्रा प्रेमाची

यात्रा प्रेमाची

10 mins
2.2K


      भारत-पाकीस्तान वर्ल्ड कप 20-20 ची मैच अगदी रंगात आली होती आणि आईने मला बरोबर गाठले. त्याच काय आहे, आमच्या घरी टीव्ही म्हणजे आईची मोनोपॉली.त्यातच आज मी तिला तिच्या रडक्या सिरिअल बघायला न देता मैच लावली,मग तिला मी पेंडिंग ठेवलेल्या कामांची आठवण येणारच ना !

      " ए आई ,रिमोट दे ना ग ! किती इंटरेस्टिंग मैच चालली आहे. "

    " चिन्मय ,मी तुला आत्ता शेवटचं विचारते, तू अष्टविनायकाच्या यात्रेला कधी येणार ? बाकी सगळे उद्योग करायला तुला वेळ असतो ,पण आईबरोबर कुठे जायचे म्हंटले की तू लगेच बिझी !"

    "ए आई माझं काय वय आहे का यात्रा बित्रा करायच ? तुझी तू जा ना ! मला कशाला ओढतेस त्याच्यात ?"

     "अरे, किती वेळा सांगायचं तुला ? मी नवस बोलले आहे अष्टविनायकाला ! तुझ शिक्षण पूर्ण होऊन चांगली नोकरी लागू दे,मग तुला घेऊन मी अष्टविनायकाची यात्रा करेन म्हणून ! आता तू इंजिनिअर झालास आणि तुला चांगली नोकरी पण लागली आहे .आता तुला यात्रेला आलंच पाहिजे."

आईने अगदी निर्वाणीचा इशारा दिला.

    " हे बरोबर नाही हं आई ! मी रात्र रात्र जागून अभ्यास केला म्हणून तर मला डीस्टीशन मिळाले.आणि कॅम्पस मध्ये सिलेक्ट झालो म्हणून चांगली नोकरी मिळाली ! पण सगळं श्रेय देवाला !"

    " तुझी मेहनत आहेच रे ,पण देवाचा आशीर्वाद पण हवाच असतो ना ! चल ना एकदा ,मग मी पुन्हा कधी तुला माझ्या नवसात गोवणार नाही "

आई अगदीच काकुळतीला येऊन म्हणाली.

    शेवटी पंधरा दिवसानंतरच्या वीकेंडला यात्रेला जायचं कबूल केलं,तेव्हा कुठे आईने रिमोट दिला आणि ती खुशीत बुकिंग करायला निघून गेली.

      नंतरचे पंधरा दिवस मी शक्य होईल तेव्हा मला या यात्रेमुळे कसा त्रास होणार आहे ! माझी महत्वाची काम कशी पेंडिंग रहाणार आहेत,हे आईला ऐकवत राहिलो.आईने पण बिचारीने ऐकून घेतले.

      शेवटी एकदाचा ट्रीपला जायचा दिवस उजाडला.सक्काळी सक्काळी उठून अंघोळ करावी लागल्याने मी खूपच वैतागलो होतो.सकाळी पाच वाजता बोरीवलीहून सुटणारी बस साडे सहा वाजता आमच्या स्टॉप ला आली.भल्या पहाटे निघायला लागल्याने बहुतेक प्रवासी झोपेतच होते.मी पण बसमध्ये चढल्यावर मस्त ताणून दिली ,पहिला महाडचा गणपती येईपर्यंत एकदीड तास झोप होईल या विचाराने.

       अर्धा पाऊण तास झाला असेल ,तेव्हढ्यात इमॅजिका असा ओरडण्याचा आवाज आला आणि मी दचकून जागा झालो.बाहेर बघितलं इमेजिका एंटरटेनमेंट पार्क ची भली मोठी जाहिरात दिसत होती.आता ओरडल कोण म्हणून आजूबाजूला बघायला लागलो ,तर माझ्या मागच्याच सीटवरील एक गोड मुलगी साधारण माझ्याच वयाची असेल रुमालात तोंड लपवत होती.अच्छा ही ओरडली का !

मी मागे वळून बघतोय म्हंटल्यावर ती आणखीनच लाजली." अरे वा ! इतकी छान असते का यात्रा "

"काय हे मनू ,लहान मुलांसारखं ? " तिच्या आईने तिला हसत हसत म्हंटल.

"ओह,सॉरी,इतकी मस्त ऍड बघून रहावलच नाही बघ मला ! फार जोरात ओरडले का ग ? "

"छे ग ! फक्त बस मधली सगळी झोपलेली माणसं जागी झाली "

तिच्या आईने तिला चिडवलं ते बघून तर मला हसूच यायला लागलं.

      अष्टविनायकाची यात्रा केल्यावर गणपती पावतो म्हणतात. पण इथे तर एकही गणपतीचं दर्शन न घेताच मला देव पावला होता.माझा वैताग कुठल्या कुठे पळाला.आईने जबरदस्तीने मला यात्रेला आणल्याबद्दल मी मनातल्या मनात थँक्स म्हणून टाकलं.आता तीन दिवस ही गोड पोरगी आपल्याबरोबर असणार व्वा !

       महडला आम्ही सगळे देवदर्शनासाठी उतरलो.ती तिच्या नातेवाईकांबरोबर आली होती.सहा जणांचा ग्रुप होता त्यांचा ! सगळ्यांचीच खूप लाडकी होती ती.सगळे जण मनू म्हणुन बोलवत होते तिला.काय नाव असेल तीच ? मीना ,मनाली,मीनल की मृण्मयी ? हिची ओळख कशी करून घ्यावी या विचारात असतानाच देवळात पोचलो.गणपती बाप्पा ला मनापासून नमस्कार केला.आता तुझ्याच हातात आहे रे बाबा सगळं !

        महड आणि पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यावर बस लोणावळ्याला जेवायला थांबली. ती परी आणि आणि तिची फॅमिली आमच्या टेबलवर जेवायला बसले होते. आईने आपल्या बडबड्या स्वभावानुसार आपणहून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.एरवी "सगळ्यांशी काय बोलत बसते ग "म्हणून चिडणारा मी ,अगदी मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होतो.ते सगळेजण अंधेरीवरून आले होते.तिचे आईबाबा, काकाकाकू, आणि आत्या.आणि हो त्या मुलीचं नाव मृण्मयीच होत.अगदी तिला शोभेल अस.ती माझ्या समोरच्या खुर्चीत बसली होती.आमची एकसारखी नजरानजर होत होती आणि ती एक छानसं smile देत होती.मला तर जेवण संपूच नये असं वाटत होतं.

     रात्री आठच्या सुमाराला हॉटेलवर पोचलो.आत्ता उद्या सकाळीच बसचा प्रवास सुरु होणार. रात्री डिनर च्या वेळी मृण्मयी च्या फॅमिलीची भेट झाली.

" तू काय करतोस चिन्मय? जेवताना तिच्या बाबांनी माझी चौकशी केली.

"मी कॉम्पुटर इंजिनेरिंग केलय काका ,आणि आता एका MNC कंपनी मध्ये जॉब करतोय "मी शक्य तितक्या नम्रपणाने सांगितले.

"अरे वा छान ! आणि देवभक्तही दिसतोयस ! देवदर्शनाला आणि तेही आईबरोबर आलायस म्हणून म्हंटल !" आजकालच्या मुलांना आईवडीलां बरोबर कुठे जायला नको असत " मृण्मयी च्या बाबांनी माझे कौतुक केले.

आत्ता काकांना काय सांगणार माझ्या देवभक्तीबद्दल !

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला.

"आमचा चिन्मय तसा नाहीये बरं का ! त्याला एकदा चल म्हंटल की लगेच ऐकतो आईच " आईपण ग्रेटच ! एरवी नाही पण बाहेरच्या लोकांसमोर खरं-खोटं का होईना ,पण बरं बोलते माझ्याबद्दल !

" मृण्मयी ,तू काय करतेस ? " आईने अगदी माझ्या मनातील प्रश्न विचारला.

" मी ग्राज्युएशन बरोबरच फॅशन डिझायनिंग केलंय काकू ! आणि आता एका फॅशन डिझायनर कडे जॉब करतेय.मी इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे डान्स शिकलेय आणि हॉबी म्हणून छोट्या प्रोग्रामची कोरिओग्राफी करते "

" वा छान ! ऑल राऊंडर आहेस अगदी ! आईने मृण्मयीच कौतुक केलं.

"तरीच हीचा ड्रेसिंग सेन्स इतका चांगला आहे. " मी आपलं मनातल्या मनात पुटपुटलो.

     दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मी कटकट न करता उठलो आणि अंघोळ वगैरे करून तयार झालो. आईला तर आश्चर्याचा धक्काच बसला.ब्रेकफास्ट आटपून आम्ही बसमध्ये चढून बसलो.आज खरंच देवबाप्पा माझ्यावर प्रसन्न झाला होता.ती गोड परी आज माझ्या बाजूच्याच सीटवर बसली होती.तिच्या आईच्या शेजारी आणि मी माझ्या आईच्या शेजारी.मध्ये फक्त पॅसेज. आमच्या दोघाच्या आया खिडकीबाहेर बघण्यात गुंग असल्याने आम्हाला दोघांनाच गप्पा मारायला चान्स मिळाला.एवढ्या सुंदर मुलीशी बोलायची माझी पहिलीच वेळ होती.आम्ही आपलं जनरलच बोलत होतो.लेटेस्ट पिकचर कोणतं बघितलं ,वगैरे वगैरे.आमच्या मध्ये काहीच कॉमन नव्हत, education, आमचं फील्ड ,पण एकमेकांशी बोलावस मात्र वाटत होतं.

      येऊर,सिद्धटेक या गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही मोरगावच्या दिशेने निघालो.बसचा एसी हळुहळु चालेनासा झाला.बसमधले लोक कुरकुर करायला लागले.आम्हाला तसं फारसं गरम होत नव्हतं ! पण सगळेच म्हणत होते,म्हणजे असेल बहुतेक.शेवटी बस बंद पडली आणि सगळ्या प्रवाशांनी एकच गलका करायला सुरुवात केली.उकाड्याने बस मध्ये बसवत नव्हतं आणि बाहेर ऊन असल्याने बाहेर पण जाववंत नव्हतं.यासाठी मला अशा ट्रॅव्हलच्या बस मधून प्रवास करायला आवडत नाही.गाड्या मेंटेन पण नाही करत हे लोक.एरवीचा मी असतो ना तर आईला अगदी वात आणला असता.पण आजची गोष्टच वेगळी होती.

       बरीच खटपट केल्यावर गाडी कशीबशी सुरू झाली ,पण एसी सुरू होईना.मग मोरगावला जाणं कॅन्सल करून ,मुक्कामाच्या हॉटेल वर जायचं ठरले.दुसऱ्या दिवशी जरा लवकर निघून आधी मोरगाव आणि मग ओझर आणि लेण्याद्रीच्या गणपतीचं दर्शन करायचे असे ठरले.

      एवढया लवकर हॉटेलवर जाऊन वेळ कसा घालचायचा असा प्रश्न पडला.हॉटेलच्या काउंटर वर चौकशी केली तर जवळच एक चांगले गार्डन आहे असे समजले.मग जरा फ्रेश होऊन,चहा वैगरे घेऊन आम्ही सगळे म्हणजे माझी आणि मृण्मयीची फॅमिली बागेत गेलो.बागेत थोडावेळ फिरल्यावर मोठी माणसं दमली आणि बाकावर बसून गप्पा मारायला लागली.बाग बरीच मोठी होती आणि चांगली मेंटेन पण केली होती.

" अरे सगळे जण बसलात काय ?अजून बरीच बाग बघायची आहे " मी मृण्मयी कडे बघत म्हणालो.

मृण्मयी ला माझा इशारा बरोबर कळला.

" आई,मला नुसतं बसून बोअर होतंय ! मी जाऊ का ? 

"जा ,पण जास्त वेळ लावू नका.रात्र व्हायला आली आहे."

" हो हो लगेच येतो " अस म्हणत आम्ही दोघे सटकलो.

      झाडांना नुकताच पाणी घातले होते.ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता.त्यातच फुलांचा सुगंध मिसळला होता.मृण्मयी तिच्या कॉलेज मधल्या, ऑफिस मधल्या गमती जमती सांगत होती.आणि मी माझ्या.आम्ही अशा काही गप्पा मारत होतो की जणू आमची खूप वर्षांपासूनची ओळख आहे.

      दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता उठून,अंघोळ वगैरे आटोपून 4 वाजता हॉटेल सोडले.आजचा यात्रेचा शेवटचा दिवस होता.मनाला एक अनामिक हुरहुर लागली होती.मृण्मयी आता परत कधी भेटेल ?

भेटेल तरी का ? भल्या पहाटे मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतलं.अगदी प्रसन्न वाटलं.मी माझा DSLR कॅमेरा घेऊन आलो होतो.फोटोग्राफी माझी हॉबी आहे.माझ्या कॅमेरात चांगले फोटो येतायत म्हंटल्यावर मृण्मयी च्या घरच्यांनी त्याचे काही ग्रुप फोटो काढायचा आग्रह केला.अशी संधी मी थोडीच सोडणार होतो.लगे हात मृण्मयीचे एकटीचे छान पोझेस मधले फोटो काढून घेतले.

"मला व्हाट्सअप्प वर फोटो share कर हं ! "

मृण्मयीने बजावले.

       लेण्याद्रीच्या गणपतीच्या दर्शनानंतर यात्रा संपली.आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.आम्ही दोघेही गप्पच होतो.मला तिच्याबद्दल जे वाटतंय ते तिला पण वाटत असेल का ? आमचा उतरण्याचा स्टॉप सगळ्यात आधी होता.आम्ही उतरण्यासाठी उठलो. "वहिनी ओळख ठेवा !"मृण्मयीच्या आईबाबांनी आवर्जून सांगितले.मृण्मयी काहीच बोलली नाही.पण तिने डोळ्यानेच निरोप दिला.

       संपली यात्रा ! दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरू झाले.ऑफिसला गेलो तरी डोक्यात मृण्मयीचेच विचार होते.एकदम आठवले, अरे आपण तिचा फोन नंबर घेतलाच नाही.श्या ! आता कॉन्टॅक्ट कसं करायचं तिला ? फेसबुक वर असेलच ती ! फ्रेंड्स request 

टाकून ठेवु ! बघू रिस्पॉन्स देतेय का ! Request तर टाकली आणि उत्तराची वाट बसलो.ती फेसबुक वर आली सुध्दा नाही.नसेल तिला आपल्यात इंटरेस्ट !

आपण उगीच आशा लावून बसलोय.

      रात्री त्याच विचारात घरी गेलो.जेवताना आई काहीतरी सांगत होती.माझं नेहमीप्रमाणे लक्ष नव्हतं.

मी मोबाईलवर face book चेक करत होते.

"अरे चिन्मय ! जेवताना तरी तो मोबाईल बाजूला ठेव!

लक्ष कुठे आहे तुझे ? तिसऱ्यांदा सांगितलं तुला !

कॅमेऱ्यातले फोटो लोड केलेस का ? मृण्मयी ला पाहिजेत.

" कोणाला ? " माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता.

"अरे मृण्मयी चा ! तिचा फोन आला होता मला.मी तुला गेले आठ दिवस सांगतेय ,फोटो लोड कर म्हणून

पण तुझं लक्ष कुठाय ? "

"आई , तुझ्याकडे मृण्मयीचा नंबर आहे ? "

मी इथे फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शोधतोय तिला आणि तिचा नंबर घरातच आहे !

यापुढे आईच्या बोलण्याकडे नीट लक्ष दयायचे ! मी मनाशीच निश्चय केला.

 "अरे ,शेवटच्या दिवशी तिनेच दिला होता.चिन्मयने फोटो लोड केले की मला पाठवायला सांगा व्हाट्सअप्पवर म्हणून "

    लगेच नंबर मागितला असता तर बरं दिसलं नसता ना ! घाईघाईने जेऊन आधी फोटो फोन मध्ये लोड केले.आईकडून मृण्मयी चा नंबर घेऊन तिला फोन केला.

"आईला नंबर दिलास आणि मला का नाही दिला ग?

"तू मागशील म्हणून बरीच वाट पाहिली ! मी काय आपणहून द्यायचा का तुला ? बुद्दु कुठला !शेवटी तुझ्या आईला दिला नंबर.रोज वाट पाहत होते तुझ्या फोनची.शेवटी आज मीच केला फोन तुझ्या आईला"

   आयला ,खरंच बुद्दु आहे मी !पण ती मात्र ग्रेट हं !

"मी फेसबुक वर request पाठवली होती पण तू accept नाही केलीस "

मी माझी बाजू मांडली.मी सुध्दा प्रयत्न करत होतो.

"मी नसते फारशी Fb वर.मला बोअर होत.बर ,फोटो पाठव हं लवकर !

     एकदा फोन नंबर मिळाला आणि तिच्या मनात काय आहे हे समजल्यावर मात्र मी अजिबात वेळ घालवला नाही.आम्ही विकेंडसना भेटायला लागलो.कधी मॉल मध्ये तर कधी एखाद्या मूवी ला.

आणि एक दिवस मी मृण्मयी ला प्रोपोज केलं.

मृण्मयीने लगेच होकार दिला नाही.

" चिन्मय , तू मला आवडतोस ,पण आपण आधी घरच्यांची संमती घेऊया.आईबाबांच्या विरोध पत्करून मला काहीच करायचं नाही.तू तुझ्या घरी सांग,मी माझ्या घरी सांगते. "

   तिचं हे बोलणं ऐकून मी थोडा हिरमुसलो.मला वाटलं ती लाजेल ,काही तरी रोमँटिक उत्तर देईल.पण नंतर मलाही तीच म्हणणं पटलं.

     सगळं सुरळीत व्हावं अशी बहुतेक गणपती बाप्पाचीच इच्छा असावी.आठ दिवसातच आईने माझ्या लग्नाचा विषय काढला.

" अरे चिन्मय,आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. ! तू कोणी बघून ठेवली आहेस का ?तसं असेल तर आधीच सांग.मला उगाच वधुवर सूचक मंडळात फेऱ्या मारायला नकोत.माझ्या मैत्रिणीचे एकेक अनुभव ऐकते ना मी ! हल्ली मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्यात म्हणे ! मुली बघून लग्न ठरेपर्यंत दोन वर्षे सहज जातील. "

"आई नको ते विवाह मंडळ ! तुला उगीच माझ्यासाठो मुली शोधायचा त्रास नको म्हणून मीच शोधली आहे मुलगी "

"अरे वा ! कोण आहे ती ? चांगली आहे ना ? आणि मुख्य म्हणजे आपल्यापैकी आहे ना ? " 

" अग हो हो ! आपल्या पैकीच आहे ,आणि तू तिला पाहिले पण आहेस .अग अष्टविनायकाच्या यात्रेला आली होती ती मृण्मयी !"

 मी एकदाच सांगून टाकले.

" अरे वा ! मृण्मयी का ? छान आहे मुलगी ! तिच्या घरचे सुध्दा किती चांगले आहेत बोलायला ! काय रे,

यात्रेतच जमवलस वाटत ? मी जबरदस्तीने तुला नेलं म्हणून ! ,तू तर यायलाच तयार नव्हतास !

आईने मला बोलण्याची संधी सोडली नाही.

"मग तुला पसंत आहे ना सून म्हणून ?"

" हो तर ! मी तिला पहिल्यांदा पाहिली ,तेव्हाच मला वाटलं,ही माझी सून झाली तर किती छान होईल !"

 मला कल्पना नव्हती ,आई इतक्या लवकर ग्रीन सिग्नल देईल म्हणून !"

" तिच्या घरचे तयार आहेत का लग्नासाठी ? तुम्ही मुला मुलांनी ठरवलं असलं तरी मोठ्या माणसांनी भेटले पाहिजे एकदा ! तुझ्या काकांना आणि मामाला पण कळवायला हवं ! तिच्या आईबाबाशी पण बोलायला हवं '! " आईची नुसती लगीनघाई सुरू झाली.

     मृण्मयीने घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईबाबांनी पण विरोध नाही केला.पण रितीप्रमाणे घरच्या मोठ्या माणसांचा विचार घेऊन ठरवू अस म्हणाले.

      लवकरच आमच्या दोघांच्या घरच्या मोठ्या माणसांची बैठक आमच्या घरी ठरली. मृण्मयी पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होती.मी आदल्या दिवशी चक्क सुट्टी घेऊन माझी खोली आवरली.आणि सलोन मध्ये जाऊन स्वतः पण जरा ठाकठिक होऊन आलो.मृण्मयीचे आई बाबा ,काका काकू यांना आमचं घर खूप आवडला.मला तर त्यांनी आधीच बघितलं होत.माझ्या काकांकाकू आणि मामा मामी ला मृण्मयी खूप आवडली.आईची पसंती तर आधीच झाली होती.माझा धाकटा भाऊ पवन तर म्हणाला सुध्दा " काय रे चिन्मय ,इतकी चांगली पोरगी तुला कशी पटली ? " 

म्हणजे मला काहीच किंमत नाही.

      अष्टविनायकाच्या यात्रेत माझं लग्न जमलं हे जेव्हा माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना समजले ,तेव्हा त्यांनी आधी विश्वासच ठेवला नाही.आधीच ठरवलं असेल तुम्ही आणि मग यात्रेला गेला असाल ,घरच्यांना दाखवायला ! अस चिडवायला लागले.पवन होताच सगळ्यांना तिखटमीठ लावून यात्रेच्या खऱ्या खोट्या स्टोऱ्या सांगायला !

       माझ्या काही लग्न जमत नसलेल्या मित्रांनी माझ्याकडून हळूच त्या ट्रॅव्हल कंपनीचा नंबर घेऊन अष्टविनायकाची यात्रा पण केली.त्यांना गणपती पावला का ते अजून कळायचं आहे !

      आज आमच्या लग्नाला एक वर्ष झालंय. ज्या अष्टविनायकाच्या यात्रेत आमचं जमलं ,त्याच यात्रेला जोडीने जाण्याची मृण्मयीची इच्छा आहे.आणि मी यावेळी आनंदाने तयार झालो आहे.तीच ट्रॅव्हल कंपनी ,तीच आमच्या घरची माणस ! आम्ही सगळे चाललोय गणपती बाप्पाचे मनापासून आभार मानायला !

      गणपती बाप्पा मोरया !


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance