Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kamlesh Gosavi

Thriller

3.9  

Kamlesh Gosavi

Thriller

अफवा...

अफवा...

5 mins
25.7K


         बारीतल्या पिंपळावरील 'फटकूरा' आज बेचैन झाला होता. 'फटकूरा' रानमांजराचा प्रकार. काळ्या डोळ्यांसहीत संपूर्ण केसाळ शरीर तेही काळ्या रंगाचेच. दिवसभराच्या भुकेने कासावीस झालेला. आज बाहेर पडू शकत नव्हता. पिंपळाच्या ढोलीत त्याचे घर. पिंपळाच्या सभोवती एकही झाड नसल्याने त्यास जमिनीवर उतरुनच पोटापाण्यासाठी जावं लागायचं. पण. आज त्याला धीरच होईना. दोनतीन वेळा उतरण्याचा प्रयत्न केला पण... पुन्हा माघारी. नुसती घालमेल.

     थोडासा धीर केला आणि जमिनीपर्यत आला, पण छे! सर्रकन मागे फिरला नि ढोलीजवळ थांबला. गेले दोन तास हेच चालू होते. झुडपात त्याला हालचाल जाणवत होती. 'भूक सहन होत  नाही' मग तो माणूस असो वा प्राणी. त्याने निश्चय केला, सुटला सुसाट..सार...सार....सार, नि एकच आरोळी, 'मेल्यानु हडे.. हडे... हडे!'

    एखाद्या कुत्र्याने भुंकावं नि गावची सारी कुत्री आपला बँडबाजा वाजवत यावीत, तशी कोकलट. तीस पस्तीस तरुण पोरांचा घोळका जमला.

    "अरे! खयच्या दिशेक गेलो?" वासूने ओरडून सुनल्याला विचारले. सुनल्या धापा टाकत,  "माका नाय म्हायत, आदलो आराडलो!"

"उगवत्या सड्याच्या दिशेक कोणतरी धावत गेलो, आंधारात माका गमला नाय!" अदल्याने उत्तर देवून टाकले.

   "अरे! फुकणीच्या वायच कड काढलं आसतं तर मेल्यं आसतं? खरा काय ता दिसला आसता ना!" गटाचा म्होरक्या पकल्या खवळला.

   "आता त्वाँड ढापा नि पुना आपापली जागा धरा!" इष्याने हुकूम सोडला नि थोड्याच वेळात सर्वत्र सामसूम.

    सकाळचा वाफाळता चहा फुकंत प्यावा तसा, पाणवट्यावरील बायकाही रात्रीच्या विषयाचा आस्वाद घेत होत्या. "दिसता पण गावना नाय. माका तर देवचारच आसतलो, असा वाटता!" शाली दबक्या आवाजात म्हणाली.

    "नाय.नाय चाळेगत बीळेगत काय न्हाय, अगो! झील माणूस बायल माणसाचे कपडे घालून बायल माणसांकाच मारता. त्येका काय तरी म्हणतत, 'सिरिअस कलर' असाच काय तरी." टेमकरांच्या राखल्यान आपली अक्कल पाजळली.

"नाय ओ ताईनू, 'सिरिअस कलर' नाय 'सिरिअल किलर." चार बुकं शिकलेल्या भाई चव्हाणाच्या बायकोनेही आपली हुशारी दाखवली.

     दोन कळश्या पाणी नि चार हांड्याच्या गप्पा त्याच विषयाच्या. पानाचा विडा चवीनं तासभर चघळावा, तशी म्हातारी माणसे त्याच विषयात.

"बारापाचाचो परसाद घेवूक व्हयो!" पारावर बसलेल्या रिकामटेकड्यांच्या सभेत राऊळ आनाने सुचवले.

    गावर्‍हाटीत काहीतरी चूक झाली आहे, त्यामूळे हा त्रास गावाला. अशीच चर्चा चालू. न संपणारी.              देवळात टाईमपास म्हणून पत्ते खेळत बसलेल्यांचं तर भलतचं.

     "तुमका काय म्हायत हा!, ह्यो गोयासून इलो हा..तडे धा-बारा बायकांका उडवन इलो हा." बदामाचा बादशहा फेकीत सावताच्या बाळग्याने विषय काढला. "अरे! 'भिती नको ना घालू, खेळायला देना." मुबंईकर प्रमोद बोलला. "मेल्या, भिती नाय.खरा हा! कालेजच्या पोरीक,नदीवयल्या बाईक चाकवान भोकसल्यान म्हणे."  इट्या परबाने सोम्याचे पत्ते बघत विषय पुढे नेला. पत्ते पिसल्याप्रमाणे तोच तोच विषय.

    आप्पा वाण्याच्या दुकानासमोरील गर्दी बघून असं वाटायचं की धंदा जोरात आहे. पण तसं काहीच नाही. गिर्‍हाईकांना थांबवून नविन माहीती मिळते का? हा नविन धंदा वाण्याचा. नेहमी पुड्या बांधणारा आप्पा वाणी आजकाल 'पुड्याच' जास्त सोडत होता. 'वस्तू विकत नि खबर फुकट' असा बोर्ड तेवढा लावायचा बाकी होता.

   संपूर्ण गावावर 'त्याची' दहशत पसरलेली. प्रत्येकाच्या मनात 'त्याची' भिती. मधू सुताराच्या बायकोवर पहिला हल्ला. आरडाओरड केल्यामुळे ती सुटली. दुसर्‍या दिवशी नदीवर, सावित्रीस मिळाला दणका. ताग्या धनगराची सून म्हणजे वाघिणचं. शंभरभर बकर्‍यांना एकटी जंगलातून चरवून आणायची. पण त्याला बघून तीने 'ताप' घेतल्याय, ती अंथरुनच धरुन. कुणाला पाणंदीत, कधी माळावर, भरडावर, बामणाच्या बारीत, नदीवर, धुमकावर, परसूवात... प्रत्येकाच्या तोंडून नाना स्थळे, काळ अन वेळ. चर्चा फक्त त्याचीच.

    "कोण अक्करमाशी इलो हा नि ह्या आमचा बोडक्या घरातसून भायर पडत नाय, आठ दिवसांचे काजी किती गावाक व्हयेत. खयं गेलेत, बोंडवांचो ढिग पडलो हा मग काजींका काय पाय फुटलेत!" टेंबावरची अनी सूनेच्या नावाने दगड फोडत होती.

  अनीची 'कॅसेट' पकल्याच्या कानात पडली. विचारचक्र सुरु झाले. गावात प्रत्येकाची बोंब, काही ना काही चोरीस गेल्याची. त्याने नाईट ड्यूटीवाल्यांची मिटिंग बोलावली.

   त्याने वाढलेला चोरीचा प्रकार सर्वांना सांगितला. गावात भय पसरण्यामागे वेगळे कारण आहे, हा सूर उमटला. "सुताराचो मधगो सकाळीच एकटो फिरताना दिसता!" रामू बोलला.

   "पण आपण असा कोणावरही संशय घेवू शकत नाही." मुबंईकर प्रमोद म्हणाला.

       "ठिक आसा! आपून खराखोटा शोधून काढू. उद्या सकाळीच फिल्डींग लावायची, मधूवर पाळत ठेवायची!" सगळं प्लाॅन पकल्याने समजावून सांगितले नि मिंटिंग संपली. नाईट ड्यूटीवाले झोपी गेले.

    भल्या पहाटेच मधग्याच्या घरावर नजर लावून बसले. तर काही नेहमीच्या वाटेवर. अंतरातरावर.

   सुतारांचा मधुकर उर्फ मधगो! गावाने ओवाळून टाकलेला, अस्सल बेवडा. गरीब अन्नावाचून मरेल पण त्याचा दारुविना एक दिवसही उजाडला नसेल. पैसे असो वा नसो. वेगवेगळी शक्कल वापरुन समोरच्याला अक्कल गहाण टाकण्यास लावणारा तो दारुसाठी पैशाची व्यवस्था व्यवस्थित करीत असे.

     नेहमीप्रमाणे मधू बाहेर पडला. फिल्डींग लावलेली पोरं अर्लट झाली.

सर सर माडावर चढला. नारळाला हात घालणार तोच 'सरसर' आवाज झाला. खाली वाकून बघतो तर काय? पोरं कुत्र्यासारखी वर तोंड करुन. नारळाबरोबर तोही आला खाली नि   आठ दिवसांची भिती, झालेला त्रास, सगळा एकदम बाहेर काढत धू-धू धुतला.

     गावभर बातमी पसरली 'तो' मिळाल्याची.

    पंचायत बसली. सरपंच उठले, "बघ, मधू! खरं सांग. देवळात खोटं बोलशील तर जिभ वाकडी होईल."

   मधग्याची बायको खांबाला टेकून हुंदके देत होती.

    मधूने तोंड उघडले. "त्या दिवशी बायलेबरोबर भांडाण झाल्लला. लय त्वाँड सोडल्यान म्हणान दांडो काढलय मारुक, तसा आरडत पळाला. शेजारी जमले, विचारुक लागले. लाजेखास्तर माझा नाव न सांगता, काळोखात कोणतरी दिसलो म्हणे. थयसून गावभर चर्चा. कोण बाहेर पडना झाले. नुस्ती भिती. माका गावली संधी. मग एकाचे काजी, दुर्‍याचे नारळ, तिसर्‍याचे सुपारे. जा-जा मिळाला ता घरात भरलयं. मिया दोषी आसय पण माका रान मोकळा करुन कोणी दिला?"

    "फुकणीच्या! चोर तो चोर वर शिरजोर" पकल्या खवळला. तोपर्यंत पंचानी त्यास आवरले.

    "आबांनु, ह्यो इतको चवताळता कित्याक? नाईट ड्यूटीचे ह्येंचे पराक्रम म्हायत हत! अवो बियर मारुन टायट नि मांगरात, कुडयेत.. खयं खयं कोणां कोणांबरोबर धुमशान घालतत, ता इचारा!"

पोरांच्या माना खाली.

   शेवटी शृंगारे गुरुजी उभे राहीले. "हे बघा!, मधुकर म्हणतोय ते खरे आहे. ऐंकीव गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे दहा दिवस भितीचे ढग गावावर आले. त्याला धडा शिकविण्यापेक्षा आपणही धडा घ्यायला पाहीजे असे मला वाटते." असे म्हणत छोटेखानी भाषण संपवले.

मधग्याने तिरकस नजरेने बायकोकडे बघितले. ती गालात हसली. निर्दोष सुटणार विश्वासाने.

मधग्याने पुन्हा चोरी करायची नाही नि गावाने ऐंकीव गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही, अशी ताकीद देत पंचायत संपली.

    पुढचे चार महीने पुरेल एवढं भरलंय आठ दिवसात, मग चोरी कशाला? पुढचं पुढे! मनात बोलत मधू निघाला. तर आपण मूर्खपणे वागलो, ही अपराधाची भावना पण 'भय' गेला, या आनंदाने गावकरी परतले.

त्या रात्री तो गांव शांत झोपला अन पिंपळा वरील तो 'फटकूरा'ही. पण कित्येक गावं जागू लागली. कारण घडलेल अर्धवट गोष्ट वार्‍यासारखी पसरली. प्रत्येक गावांत तेच नाटक. पात्रे मात्र बदलेली. या सर्वास एकच गोष्ट होती कारणीभूत.

             "जी सहज, आपोआप, रातोरात नि वार्‍यासारखी पसरते, ती...'अफवा'!"

 

                     

 

 


Rate this content
Log in

More marathi story from Kamlesh Gosavi

Similar marathi story from Thriller