Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

swati Balurkar " sakhi "

Tragedy

2.4  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

सौदा

सौदा

11 mins
2.4K


( आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे! )

आज खूप दिवसांनंतर सुभागी शास्त्री नगरच्या जुन्या कॉलनीमधे आली होती. तिला कामावर येणं जमलच नाही.

गेले ८-१० दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता.

कुठलीशी भट्टीची दारू पिऊन तब्ब्येत बिघडली होती.

सुभागी थकून गेली होती.

दवाखान्याच्या चकरा, तिथल्या घृणास्पद नजरा , घरचा स्वयंपाक !

सारं शीण आणणारं होतं.

तिच्या अंगातही २-३ दिवसांपासून बारीक ताप होता.

नेमकी अशावेळी सावत्र आई गावी निघून गेली होती.

कॉलनीच्या मागच्या भागात सुभागी कचरा गोळा करीत होती.

प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या काय मिळेल ते वेचत होती.

या कॉलनीतले काही लोक तर तिला स्वतः होऊनच जुनं सामान देऊन टाकायचे.

काही लोक उरलेलं अन्न ,रात्रीची पोळी -भाजी खायला द्यायचे.

काही लोक जुने पाने कपडे द्यायचे.

ही कॉलनी तिला फार आवडायची.

या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती, मागच्या वर्षांपासून . बाहेरून निळ्या आवरणाने झाकलेली होती , त्यामुळे आतलं काही दिसायचं नाही.

तेव्हां सुभागीला आत पाहण्याची फार इच्छा होती.

आज बर्‍याच दिवसानी आल्यामुळे तिला दिसलं कि नवीन बिल्डिंगचे पडदे काढले होते अन् ती सुंदर रंगात चमकत होती.

२-३ बिर्‍हाडं रहायला पण आली होती.

चला कचरा गोळा करायला अजुन एक जागा वाढली, सुभागीला मनात वाटलं.

कुतुहलापोटी ती बिल्डिंग च्या मागे गेली.

अजुन वॉचमन ठेवला नसावा बहुतेक. बरच जुनं सामान फेकलेल, पडलेलं होतं..

सुभागी खुश झाली. अधाशासारखं सामान उचकु लागली.

नवीन आलेल्या लोकानी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं असावं.

पोत्यात भरलेले काही कपडे होते.

तिथे एक जुनाट मळकी सुटकेस पडलेली होती.

तशा मिळत नाहित हल्ली. खूपच जुनी सुटकेस !

तिने उघडली . त्यात काही कागदपत्रं , फाइल्स होत्या.

तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले.

सुटकेस रिकामी झाली पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजुला .तो जड वाटला .

तिने शोधलं तर त्यात अजुन एक चोर कप्पा होता.

हात घालुन चाचपलं तर एक कपड्याची पुरचुंडी मिळाली.

उत्सुकतेपोटी तिने उघडली.

अन बघून तिचे डोळे चमकले.

त्यात एक हार होता नेकलेस.

कुइरी कुइरी ची डिझाइन अन् हिरवे खडे बसवलेले होते.

दोन पदरी सोनेरी हार. सुभागी हरखली.

तिने तसाच तो स्वतःच्याच गळ्यांला लावून पाहिला .

खूप छान वाटलं .

मग झोळीच्या कप्प्यांमध्यून आरशाचा एक तुकडा काढला. . तुटक्या कंगव्याने केस सारखे केले आणि हार गळ्यांत घालून पाहिला.

आरशांत ती स्वतःला कुण्या राजकुमारी सारखी वाटली. तिला तिचं रूप मनोमन आवडलं.

तिच्या आईने "सौभाग्या" असं सुंदर नाव ठेवलं होतं पण अशिक्षित लोकांमधे ते अपभ्रंश होऊन सुभागी झालं होतं .

सुभागी गव्हाळ सुंदर ,नीटस मुलगी होती, पण अस्वच्छतेमुळे , चेहर्‍यांवरच्या धुळीमुळे तिचं सौंदर्य झाकल्या गेलं होतं.

शिवाय मळकट कपड्यांमुळे तिच्याकडे कुणाचं विशेष लक्ष जायचं नाही.

तिच्यासाठी ते भलंच होतं.

आरशांत पहाताना कुणी पाहिल म्हणून तिने पटकन हार काढला आणि आपल्या परकराच्या चोर खिशात ठेवून दिला.

अजुनही बरच काही रद्दी सामान गोळा केलं.

परत निघाली तर खांद्यांवर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती.

चालणे अवघड झाले होते. पण ती खूप खुश होती.

आनंदाच्या नादात तिची पावले झपझप पडत होती.

नेहमीच्या रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तिने सामान विकलं.

रोजच्या पेक्षा ही जास्त पैसे मिळाले.

तिने ठरवलं आज बापाची दवाखान्यातून सुट्टी होणार होती. बाप घरी येणार काहितरी गोड धोड करावं.

बेवडा असला म्हणून काय झालं आहे तर बापच ना !सख्खा.!

खूप जीव लावतो मला .

दवाखान्यातलं खावून कंटाळला असेल.

घरी पोहोचेपर्यंत ती सतत परकराच्या खिशातला हार चाचपडत राहिली.

घरी पोचली.

घर कसलं घाणेरड्या बस्तीतली झोपडी होती.

पण सुभागीने आवरून नीटनेटकी छान ठेवली होती.

घरी येताच तिने दार आतुन बंद केलं .

आरशासमोर उभी राहिली आणि हार हळूच काढून गळ्यांत घातला.

आरशांत स्वतःला न्याहाळू लागली.

क्षणभर तिला स्वतःच्याच कपड्यांची आणि अवताराची लाज वाटली.

तिने हार काढून , एका डबीत जपून ठेवला.

आंघोळ करून , स्वच्छ कपडे घालून आली.

भिंतिवरच्या जुनाट गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडली. पुन्हा हार गळ्यांत घातला.

आता मात्र स्वतःचंच हे रूप तिला अप्सरेगत वाटलं . स्वतःवर अभिमान वाटला.

इतक्यात दार वाजलं. ती घाबरली.

पटकन हार काढला , डबीत ठेवला .

मग दार उघडलं .

दारात बाप उभा होता, अशक्त झाला होता.

"काय गं सुभागे इतका येळ दार उघडाया?"

"अरे अंग धूत होते ना . अनं बा तू एकलाच कायले आला ?.मी येत होती ना तिकडं दवाखान्यात." ती तक्रारिच्या सुरात बोलली.

"जाउ दे ना माय! काय काय करशीन तू बी? तुझी माय नाय आली का अजून।"

"नाय ना बा. तू पड ना जरा गोधडीवर." तिने गोधडी अंथरली.

"मी आत्ता भाकर टाकते. "

तो शांत चित्ताने पडला अनं सुभागी नं भाकरीच्या ऐवजी येताना आणलेली कणिक मळली.

केरोसिन च्या स्टोव्हवर शिरा अनं पोळंया केल्या.

बापलेक आनंदाने जेवले.

बापाला खूप आनंद वाटला .

मायेनं गळा दाटून आला.

संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तल्लफ झाली. दवाखान्यात ५-६ दिवस त्याला मिळाली नव्हती.

आजारी होता त्यामुळे सहन केलं.

मग तो सुभागीकडे पैशांची मागणी करू लागला.

तिला वाटलं होतं एवढं जिवावर बेतल्यावर त्याची ही सवय सुटेल.

"फगस्त आज एक डाव दे . दे ना गं माय पैशे. फगस्त आजच.

दे ना माय."

तो गयावया करू लागली.

सुभागी तटस्थ.

मग तो झटापटीवर आला.

इतक्या उन्हातान्हांत , मेहनतीने कमावलेले ५०-१०० रुपये त्याला देताना तिचा जीव तुटला.

दोन दिवस या पैशात धकले असते असं वाटलं.

"बा तू नाय कमावलं तं काय नाय , पण हे असं गमावू नको ना रे.! आजच तं दावखान्यातून सुट्टी झाली ना. मंग कशाले?"

"हे आखिरचं सुभागे , बाळ दार लावून घे. आत्ता आलोच"

तो गेला अन् सुभागी डोक्याला हात लावून बसली.

हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला .

पुन्हा एकदा दार लावून दिव्यांच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली.

मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली कि हा नेकलेस ती कधीच घालून मिरवू शकणार नाही.

तिच्या वस्तीला , परिस्थितीला आणि कपड्यांना पाहून एवढा भारी हार तिच्याकडे असणं साजेसं नव्हतंच .

कुणालाही तो चोरीचाच वाटणार.

या छोट्याशा झोपडीत किती दिवस आणि कुठे म्हणून तो हार लपवणार.

शिवाय या भिकारड्या झोपडपट्टीत कुणीही केव्हांही घरातून तो हार चोरून नेऊ शकतं.

तिची सावत्र आई तर तो नेकलेस घेवून टाकेल किंवा मग विकून टाकेल.

जर तिला हार नाही दिला तर ती काहीही घाणेरडे आरोप करेल.

काय करावं अन् कसं करावं ? चिंतेत तिला काहीही सुचेना .

बापही पिऊन ,उशीरा घरी आला होता.

पोरीनं गोड धोड केलं , पैशेपण दिले , या आनंदात होता.

नशेत कौतुक करत होता, रडत होता.

तिच्या डोक्याचरून हात फिरवत होता .

त्याला कमावाता येत नाही त्याची माफिही मागत होता.

ती मात्र रात्र भर कूस बदलत राहीली, झोप काही लागली नाही.

रात्र भर सुभागी हाराचाच विचार करत होती.

सकाळी मात्र तिने ठरवलं कि हार विकायचा अन पैसे घ्यायचे.

पैशे कुणाच्याही नजरेस पडू द्यायचे नाही.

हवे तेव्हां अडी -अडचणींत कामी येतील.

कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील.

एवढं कशाला, बा माझं लग्न ठरवल कि तेव्हा लग्नात पण पैसा कामाला येईल.

हो बराबर हाय असंच कराव लग्न होईपर्यंत तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होतं हे तिला कळालं .

सकाळी रोजच्या सारखी ती उठली.

न्याहारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाली.

तास दोन तासात २-४ कॉलन्या पालथ्या घातल्या.

सामान विकुन रोजचे पैसे मिळाले .

ते घेवून निघाली.

पाय आज सराफ बाजाराकडे वळले .

सगळ्या दुकानांसमोरून जाताना तिला पुनःपुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती.

सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते.

भारी कपडे अन् परफ्युमच्या वासाने परिसर दरवळत होता. लोक तिच्या कडे तिरस्कृत नजरेने पहात होते.

सगळ्या दुकानांसमोर सेक्युरीटी गार्ड होते , कोणीही तिला जवळ फिरकु देईना.

ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपर्‍यांमधे बसली.

कळकट प्लास्टिक च्या बाटलीतलं पाणी पिलं.

बटव्यातून दहा रुपये काढले, हार एकदा चेक केला.

वडापावच्या गाडीकडे गेली.

एक वडापाव खाल्ला, अजुन एक खावा वाटत होता पण तिने मन मारलं .

पाणी पिऊन सराफ गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली.

तिथं एक छोटं दुकान होतं .

तिथे काम करणारा माणुस हळुच बाहेर येऊन तिला म्हणाला,

" काय पायजे अंगठी का झुमका?"

त्याच्या त्या बोलण्याची अन् बघण्याची तिला शिसारी आली.

"काय बी नको " म्हणत ती भराभर पुढे निघाली.

तो मागुन बोलवत होता पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातुन झाली होती.

आता गल्लीतलं शेवटचं छोटंस दुकान तिने पाहिलं. दागिने घडविणाराचे दुकान होतं.

गल्ल्यावर बसलेला चश्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला.

धोती -शर्ट , पगडी घातलेली होती.

त्याच्या हाताखाली २-३ माणसे होती.

काचेच्या शोरूम पेक्षा तिला हे पेढीवजा दुकान बरं वाटलं. विश्वासुदेखील वाटलं .

सुभागी हिम्मत करून निघाली.

दुकानात चढताना नोकरानी हटकलं ," चल बाई ! बाहेर चल. कुठे घुसु राह्यली ?"

"अरे बाबा असं काय हाकलतो ? मी काय भीक नाय मागत. शेटकडं काम हाय म्हणून आली ना!"

कर्मचार्‍याने विचारलं" काय काम आहे ,सांग ना?"

"हार विकायचा हाय!"

"सोन्याचा????"

"हो ss! मंग काय खोटा?"

तो आत गेला .

सेठच्या कानात कुजबुजला , सेठने मान डोलावली.

"ये पोरी, आत ये बस ." शेट नरमाईने बोलला.

"काय चहा पाणी घेशील का? " कर्मचार्‍याने अदबीने विचारले.

"नाय बा! पाणी नगं, हां चाय चालल ना ! पण चिल्लर नाय माझ्याकडे.!"सुभागी बोल ली.

"अगं पैसे कशाला? असंच प्यायाचा चहा. ए पोर्‍या दोन चहा सांगरे!"

" हं पोरी, बोल काय काम अाहे दुकानात.?" शेठ ने विचारलं.

"हां शेट ह्यो हार कितीचा हाय ते इचारायचं होतं ?!"

तिने परकराच्या खिशातून हार असलेली चिंधी काढली.

गाठ सोडून हार समोर ठेवला.

हार मळकट झाला असला तरीही त्याची बनावट , नक्षीकाम आणि बसवलेले पाचू अप्रतिम होते, हे जाणकार माणसाला लगेच कळंलं .

सेठच्या डोळयांत चमक आली तरीही त्याने चेहर्‍यांवर साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले.

हाताखालच्या मदतनिसाची तर बेचैनी वाढली.

"हा हार तु़झ्याकडे कसा?" सेठने चष्म्यावरून पाहत विचारले.

"कसा म्हणजे ?" सुभागी.

"कुणाचा आहे?" सेठ.

आता मात्र सुभागीची हुशारी एकदम जागृत झाली.

शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुषारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येतंच .

कालपासून सगळे विचार झाले , पण या प्रश्नाचा विचार तिने केलाच नव्हता .

तिचा आताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता.

हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ? ती विचारात पडली.

"एवढा काय विचार करतीय? हा हार विकायचाय ना तुला? मग त्याचं बिल नाहितर खरेदीखत लागेल ना . ते आहे का तुझ्याकडे?" मदतनिस विचारत होता.

"सेठ ते कसं असल माझ्याकडं ? ह्यो लई जुना हार हाय. माझ्या आजीनं माझ्या माईला दिला व्हता अन् माझ्या मायनं मरताना मला दिला. " तिचे डोळे ओलसर झाले.

"अरेरे होय का? कधी गेली तुझी आई?"

"झाली धा वर्ष .तिला वाटलं म्या लगनात घालन हा हार !"

"मग आता का विकायचाय.?"

"सेठ , माझा बा काय बी काम करत न्हाय. पीतो अन् त्यो बीमार बी हाय . घर चालवाया पैसा न्हाय म्हणून ईकायचाय." "

"बरं बरं असू दे बघतो. हरकत नाय."

"सूरजमल हे जरा तपासून घे रे " शेठने आदेश दिला.

तिने मदतनिसाला हार दिला.

पोर्‍या चहा घेऊन आला.

सुभागी ला एक चहा आणि एक पारले जी चा पुडा दिला.

तिची भूक अर्धवट राहिली होती.

ती चहा बिस्किटात रमली.

तिला सेठबद्दल खूप आदर वाटला.

सूरजमलने सेठला इशार्‍याने बोलावले.

सेठ गल्ल्यावरून उठून हळूच आतल्या खोलित गेला.

दार लावलं.

दोघांत काहितरी गूप्त बोलणं झालं.

शेठ बाहेर येवून गल्ल्यावर बसला.

सुभागीचं चहा बिस्किटं खावून झालं.

निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाइन्स बघत होती.

सेठने हाक मारली. , "सूरजमल झालं का नाय? लवकर ये ना बाबा"

सूरजमलने त्याच मळक्या कपडयांच्या पुरचुंडीत हार आणून दिला.

"काय झालं काका?" तिने आश्चर्याने विचारले.

सेठ बोलले , " हे बघ पोरी, तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण , हा मला विकत घेता येणार नाही."

"काऊन सेठ?"

"हे बघ मनाला नको लावून घेवू. पण हा हार नकली आहे , सोन्याचा नाही." सेठ बोलला , पण सुभागीच्या सगळ्या योजनांवर पाणी पडल.

सुभागी मनात खूप दुखी झाली.

आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं .

चला बरंच झालं ताण गेला ,असही वाटलं एक क्षण.

पुन्हा वाटलं खोटा आहे म्हणजे घालून मिरवताही येईल.

" अहो काका , असं कसं म्हणता?"

तिला आता खोटं बोललेलं निभावणं भाग होतं .

मन म्हणालं - कोणीपण कचर्‍याच्या ढिगात सोन्याचा हार कशाला टाकल?

आपलंच चुकलं .

असा सगळा विचार डोक्यात चालला होता.

तिच्या चेहेऱ्याचे भाव पाहुन सूरजमल बोलला , " हे पहा पोरी तुला आमच्यावर विश्वास नसेल तर सराफ्यात कुठंपण विचारून ये. आमचं काय नाय."

"तसं नाय काका आजीनं खोटा हार कसा जपला एवढं वर्ष अस वाटलं."

"बनावट तर फार छान आहे हाराची. " सेठ बोलले .

"मालक ते पॉलिश खूप छान केलंय, जुन्या काळातलं. त्याच्यामुळे तो सोन्याचा आहे अस वाटतं बघितलं की!" सूरजमलने पुष्टी केली.

सुभागीच्या मिश्र भावना होत्या. पण तिला या लोकांवर खूप विश्वास जडला होता.

"तसं नाही काका. तुमच्या वर भरोसा हाय, पण हार विकायचा होता पैशाची गरज होती. "

ती खंत करत बोलली आणि पुरचुंडी घेवून उठली.

"मग नाय घेणार का विकत?" शेवटचं बोलून ती जायला निघाली.

तेवढ्यात सेठने सूरजमलला इशारा केला.

"सेट गरीब पोरगी आहे. ईमानदार आहे, पैशाची गरज आहे बहुतेक . ते पॉलिश चे पैसे तरी देवू शकता ना बिचारीला." सूरजमल बोलला.

ती थबकली. "होय का काका? मिळतील का थोडे काही पैशे?"

" सूरजमल बघ बरं, पुन्हा एकदा काही निघतात का?" सेठ बोलला अन सुभागी पुन्हा आशेने थांबली.

हार त्याला दिला अन बाकड्यावर बसली.

तो आत गेला, बाहेर आला .

बोलला ,पुन्हा गेला, आला.

ती आशेने बघत राहिली.

"सेठ ,४३० रुपये भरतील पॉलिशचे , अन ते जडलेल्या खड्यांचे . तेवढे देऊ शकता तुम्ही. " सूरजमल बोलला.

"एवढेच ??" सुभागी मनातून खूश होती. फुकटात पैसे मिळत होते पण चागले लोकं म्हणून ती तानत होती.

"बरं' ४७०₹ लावून टाकू . घे ".सेठ बोलला.

"काय शेट ५०० ₹ तरी लावायचे ना केवढ्या आशेने आले होते मी. !" सुभागी नाराजीने म्हणाली.

" बरं पोरी. तुझ्या मनासारखं होऊ दे घे ५०० रुपये." सेठ हसत म्हणाले.

ती हरखली. ५०० चे पण सुटे घेतले, घरात लपवायला सोपे. बापाने मागितले तरी थोडे थोडे देता येतील.

ती निघणार एवढ्यात सेठ बोलला," अरे सूरजमल , ते डिजाइन साठी ठेवलेले खोटे हार आहेत ना वरच्या डब्ब्यात. त्यातला एक पोरीला दे बरं ! बिचारी रिकाम्या हाताने चालली ना"

"बऱ मालक " पाच मिनिटात त्याने खूपच सुंदर नकली हार

आणुन दिला.

आतातर तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

तिने कृतज्ञतेने सेठला हात जोडले अन हार घेवून घरी निघाली.

नवा हार घालुन , स्वतःला आरशात न्याहाळताना ती खूप सुंदर दिसत होती. सुभागी खुश होती.

नवा हार मिळाला, ५०० रुपये मिळाले , अन् आता कुण्णाची भीती पण नाय.

"कचर्‍यातल्या हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला. देवमाणसं भेटली बुआ आज" सुभागी देवाला म्हणाली.

*-*-*-*-*-*-*-*-*

तिकडे सुभागी गेली अन् सेठ चष्म्याआडून सूरजमलकडे बघून हसले.

"एक चाय बिस्किटं , ५०० रुपये नगद आणि २०० रुपयाचा नकली हार! बदल्यात - तीन तोळ्याचा पाचूचा हार , तो पण अॅन्टीक!! सेठ सौदा फायद्याचा झाला का नाय? " सूरजमल टाळी वाजवून हसत बोलला.

सेठने पाकिटात ५००० रुपये घातले अन त्याला देत म्हणाले,

" तुझं बक्षिस ठेव बरं. तुला पण फायद्याचा सौदा. ! जा सगळ्यांना एक- एक चहा सांग पटकन."

सेठ आणि सूरजमल दोघे खुश!

- समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy