Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Horror

3.8  

Suresh Kulkarni

Horror

डिकोस्टा!

डिकोस्टा!

10 mins
2.2K


परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब, बायका, पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा 'कुटुंब' व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!

कालच सिमेंटने भरुन आलेले शिप, गोडाऊन मध्ये डंप करून तो निवांत झाला. अजून स्टील आले नव्हते. आठवड्याभर लागणार होता. तोवर त्याला काही काम नव्हते. खाऱ्या हवेत उघडा बंब बसून, बियर तरी किती पिणार? 

त्याच्या घरा समोर, रेशमी वाळूचा समुद्र किनारा आणि घरामागे राठ, तेलकट पानांच्या झाडाचे जंगल होते. त्यातून एक छोटीशी पायवाट समुद्राच्या बीचवर उतरत होती. उघडे नागडे मूळ रहिवासी, कधी कधी माशेमारीसाठी समुद्रात उतरताना त्याला दिसत. त्यांची भाषा त्याला सगळी समजत नसली, तरी त्यातील काही तामिळी, शब्द त्याला कळत. बरेच जणांच्या गळ्यात क्रूस दिसायचा, त्यावरून ते ख्रिश्चन असावेत असा त्याने अंदाज बांधला होता. 

तापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, कोणीतरी बसलेले त्यागराजला दिसले. या पूर्वी कोणी असे, निवांत बसलेले त्याच्या पहाण्यात नव्हते. तो उच्छुकतेपोटी त्या व्यक्ती कडे निघाला. तो एक पाठीत वाकलेला पांढऱ्या शुभ्र केसाचा,निस्तेज चेहऱ्याचा म्हातारा होतो. अंगात काळी पॅन्ट आणि तलम पांढरा शर्ट, इन केलेला! इतकी अप टू डेट व्यक्ती येथे आल्या पासून त्याच्या पाहण्यात नव्हती. ओळख करून घ्यायला हरकत नव्हती. कंपनीला कोणी तरी मिळाले तर बरेच होईल. 

"गुड इव्हिनिंग!" हात पुढे करत त्यागराज म्हणाला.

"गुड इव्हिनिंग, मिस्टर --?"

"त्यागराज!"

"नाईस टू मीट यु त्यागराज. मी डिकॉस्टा. मी गोव्यातून आलोय. खूप दिवस झाले. आता आठवतही नाही किती दिवस झाले! आणि मी ते मोजायचंहि सोडून दिलाय!"

" मी, ---"

"मला माहित आहे! तुम्हीच ते इंजिनियर आहेत! ब्रिजेस बांधायला भारतातून आला आहेत!" त्याला बोलू न देता तो म्हातारा म्हणाला. 

"तुम्हाला कसे माहित?" आश्चर्य चकित होत त्यागराजने विचारले. 

"कोणी तरी इंजिनियर आल्याचे, आसपासचे लोक बोलताना ऐकले होते. तुमच्या वेषभूषेवरून ते तुम्हीच असणार हे उघड होते."

"तुम्ही करता काय?"

" मी आता काहीच करत नाही! एके काळी चर्च मध्ये काम करायचो. आता त्या चर्च मध्ये प्रेयर करायला कोणीच येत नाही! ते बंदच असते हल्ली."

"का?"

"हे आडाणी लोक. कोणी तरी अशी वंदता पसरवली कि हे चर्च जेथे बांधले गेलय, त्याजागी, गेल्या शतकात ग्रेव्ह यार्ड होते! त्यामुळे येथे केलेली प्रेयर वाया जाते! उलट त्यामुळे प्रेतात्मे जागे होत आहेत! झालं, लोकांनी तोंड फिरवले."

"मग तुम्ही कोठे रहाता?"

"मी तेथेच! त्या चर्चच्या शेजारी एक छोटेखानी खोली आहे तेथेच रहातो! या एकदा घरी. अर्थात भीती वाटत नसेल तरच!" मंद हसत म्हातारा म्हणाला. 

"आहो, भीती कसली? आणि तुम्ही तेथे राहतंय! तसा हि, माझा असल्या गोष्टीवर विश्वास नाही! पण त्या पूर्वी तुम्हालाच माझ्या कडे डिनरला यावे लागेल! या येथे समोरच माझे क्वार्टर आहे. ते समोर लाल छताचे."

म्हाताऱ्याने कपाळावर आडवा हात धरून, त्यागराजने निर्देश केलेल्या दिशेला पहिले. आणि समजले असल्याचा मान हलवून संकेत दिला.

"चला असेच भेटत राहू!" म्हातारा सावकाश जागेवरून उठत म्हणाला. 

"असेच नाही तर, उद्याच भेटणार आहोत. माझ्या घरी डिनर साठी!" त्यागराज म्हणाला. एव्हाना सूर्याने आपला प्रकाश पसारा आवरायला सुरवात केली होती. दोघांनी 'बाय' केला. म्हातारा त्या जंगलात जाणाऱ्या पाय वाटेल लागला आणि त्यागराज क्वार्टर कडे वळला. 

                                                                          ००० 

दुसरे दिवशी ठरल्या वेळी तो म्हातारा, एखाद्या इंग्रजा प्रमाणे डिनरसाठी हवे असलेल्या काळ्या सूट मध्ये आला होता. एक छोटस व्यवस्थित पॅक केलेलं गिफ्ट पण आणले होते. तो दारात दिसला तसा त्यागराज जागेवरून उठला.

"वेलकम, सर!"

"थँक्स! मी तुमच्या साठी जमेल तशी एक गिफ्ट आणलंय त्याचा स्वीकार करा प्लिज!" हातातलं ते गिफ्टच पाकीट त्यागराजला देत डिकोस्टा म्हणाले. 

त्यानंतर दोघात खूप गप्पा झाल्या. संगीत, साहित्य, लोकगीत, अनेक गोष्टींत डिकोस्टाला रुची होती. 

"ड्रिंक्स चालतील का डिकोस्टा? जेवणा पूर्वी थोडे घेऊ." त्यागराजने विचारले. 

"तसे वयोमानाने झेपत नाही. पण घेऊयात आज. आपल्या मैत्रीच्या नावाने. मला दूर जायचे आहे. तेव्हा हार्ड ड्रिंक ऐवजी, बियरचा एखादा ग्लास मला घ्यायला आवडेल. चालेल ना?" त्याच्या सौम्य आपलुकीचे आणि मोकळेपणाचे त्यागराजला कौतुक वाटले. परफेक्ट जंटलमन! 

मोजके जेवण करून म्हातारा निघाला. 

"डिकोस्टा मी येऊ का तुमच्या घरापर्यंत कंपनी म्हणून?"

"नको! आहो काळजी करू नका. रस्ता माझ्या पायाखालचा आहे. जाईन सुखरूप. थँक्स फॉर एव्हरी थिंग. गुड नाईट!" 

डिकोस्टा दाराबाहेर पडले. 

त्यागराजने डिकोस्टानी दिलेली ती भेट वस्तू पॅकिंग मधून बाहेर काढली. कसल्यातरी प्राण्याची दोन छोटी हाडे निळसर मण्यात गुंफलेला तो एक गळ्यात घालायचा ताईत होता. असाच ताईत डोकोस्टच्या गळ्यात असल्याचे त्याला आठवले. आता या जगाच्या कोपऱ्यातल्या, अविकसित भूभागावर काय गिफ्ट मिळणार? त्याने तो ताईत गळ्यात घातला. 

त्यागराजला खूप समाधान वाटले. म्हातारका होईना एक सुशिक्षति मित्र मिळाला होता. 

कधी सकाळी, कधी संध्याकाळी डिकोस्टा, त्यागराजला दिसायचे. नेहमीच बोलणे व्हायचे नाही पण 'हाय' 'हॅलो' व्हायचे. 

                                                                        ००० 

स्टील शिपमेंट ताब्यात घेताना त्यागराजला दूरवर डिकोस्टा दिसले. त्याने हात उंचावून त्यांना आभिवादन केले. 

"कोणाला हात दाखवताय, सर?" शेजारी उभाअसलेल्या स्थानिक लेबर काँट्रॅक्टरने विचारले.

"अरे, ते डिकोस्टा आहेत!"

"कोण? चर्च मधले डिकोस्टा?"

"हा! तू ओळखतॊस त्यांना? व्हेरी नाईस पर्सन!"

"हो, ते खूप दयाळू आणि चांगले गहृस्थ होते!"

"होते नव्हे, आहेत! आम्ही रोज भेटतो!"

"म्हणजे, तसे ते आहेत! पण पूर्वीचे राहिले नाहीत!"

"म्हणजे?"

"म्हणजे, त्यांना बहुदा वेड लागले आहे! एकटाच समुद्रकिनारी कधी कधी बसलेले असतात, कोणाची तरी वाट पहात बसल्या सारखे!"

"अरे, एकटा जीव आहे. गोव्याचा. समुद्राकडे पाहून जुन्या गोष्टी आठवत असतील!"

"पूर्वी ते आमच्यात मिसळायचे. अडचणीत सल्ला द्यायचे."

"मग?"

" काय झाले माहित नाही. एकदिवस अचानक रात्री चर्च मध्ये जोरजोराने आवाज येऊ लागले. सकाळी आम्ही गेलो तर, आतील सगळे फर्निचर, जिसेसचे फोटो, उंच पुतळे उद्वस्त झाले होते. चर्चच्या भिंतींना तडे गेले होते. ते फादर पिटर सोबत, त्यांच्या खोलीत सोबतीला रात्री असायचे! फादर पीटर मात्र त्यारात्री नंतर कधीच सापडले नाही! या घटनेनंतर, डिकोस्टा कधीच माणसात मिसळे नाहीत! आम्हाला ते, आता ओळखत पण नाहीत! स्थानिक लोक त्यांना भुताने पछाडलेय म्हणतात! त्या चर्चला घोस्ट चर्च म्हणतात, आता कोणी तेथे जात पण नाही! आणि माझा तुम्हाला हाच सल्ला असेल कि तुम्हीही त्या वास्तू पासून दूरच रहा!"

"असेल हि, मला माहित नाही! माझा असल्या फालतू गोष्टीवर विस्वास नाही. माझ्याशी डिकॉस्टा खूप छान बोलतात आणि वागतात."

"तसे असेल तर चांगलेच आहे. पुन्हा माणसात आले तर आम्हाला ते हवे आहेत! कदाचित तुमच्या प्रेमळ वागणुकीमुळे काही तरी चांगले होईल."

त्यागराज त्या बोलण्याने सुखावून गेला. 

त्या संध्याकाळी डिकोस्टा दुसरे दिवशीचे डिनर इन्व्हिटेशन देऊन गेले. डिनरच्या वेळेस चर्च उद्धस्त झाला त्या रात्रीची कहाणी विचारण्याचा त्यागराजने निर्णय घेऊन टाकला. 

                                                                   ००० 

त्या रात्री टिपूर चांदणं पडलं होत. त्या प्रकाशाच्या जाळीतून चालताना अंगाला गार वार झोंबत होत. स्टील शिप सोबत आलेल्या, शॅम्पेनची बाटली त्यागराजने डिकोस्टा साठी 'गिफ्ट' म्हणून पॅक करून घेतली होती. म्हातारा खुश होणार होता! 

साधारण दोन मैल पायपीट केल्यावर त्याला ते भयाण अंधारात उभे असलेले चर्च दिसले. तो त्या वास्तू जवळ आला, तेव्हा ते स्पष्ट दिसले. त्याच्या अपेक्षेपेक्षा ती इमारत खूप जुनी वाटत होती. वीत वीत रुंदीच्या भेगा ठायी, ठायी पडल्या होत्या. खिडक्यांची तावदाने फुटली होती. बऱ्याचशा भिंतीत झाडांनी मूळ धरली होती. त्या पडीक वास्तू शेजारी एक बैठे घर दिसत होते. त्याच्या खिडकीतून मिणमिणता प्रकाश धिटाईने खिडकी बाहेर येत होता. हेच डिकोस्टाचे घर होते. रातकिड्यांची किरकिर त्या गडद शांततेला अधिक गूढ करत होती.  

त्यागराज दार वाजवण्याच्या बेतात होता, पण त्या आधीच डिकोस्टाने दार उघडले. कसे याना आत बसून कळले?

" स्वागत आहे मित्रा. तुम्ही आल्याची चाहूल लागली होती!" त्यागराजच्या मनातील प्रश्नाचे उत्तर, दार उघडताना त्यांनी दिले. ती खोली चांगलीच प्रशस्त होती. एका कोपऱ्यात छोटासा किचन ओटा होता. त्या अलीकडे एक सिंगल बेड. बस. फार पसारा नव्हता. 

त्यागराजने सोबत आणलेली गिफ्ट डिकोस्टाना दिली. 'थँक्स' पुटपुटत ती त्यांनी स्वीकारली. चार सहा भांडी झाकून, डायनिंग टेबलवर ठेवली होती. बहुदा त्यात डिनर असावे.चर्चच्या दिशेच्या खिडकी जवळ एका वेगळ्या टेबलवर ड्रिंक्सची सोय केली होती. 

"त्यागराज, तुम्ही ड्रिंक्सचे दर्दी आहेत हे माझ्या लक्षात त्या दिवशी आले होते. तुमच्या साठी एक स्पेशल सर्पराईज ड्रिंकची मी सोय केली आहे! चला, आस्वाद घेऊ या. मुद्दाम आजच्या साठी ती बाटली मी जपून ठेवली होती!" एक उंच मानेची बाटली, अत्यंत आदराने म्हातारा डिकोस्टा घेऊन आला. आणि ती त्यागराजच्या हाती दिली. त्यावर कृष्णधवल रंगात लेबल लावलेले होते. black wine! test of evil! आणि packed for firmantetion ची तारीख पाहून तो उडालाच. ती होती dec.१८२०! 

"येथे खूप दिवसा खाली, रानटी द्राक्षाच्या जाती-कुळीतल्या फळांची वायनरी होती. कोणीतरी एक क्रेट, एका ख्रिसमसच्या थंडगार रात्री, घराबाहेर ठेवून गेले होते. फादर पिटर ड्रिंक्स घेत नसत. त्यांनी तो क्रेट मला देऊन टाकला. मी काही स्पेशल सेलिब्रेशनसाठी तो वापरतो! आज हि स्पेशल इव्हेंटचं आहे ना? म्हणून ---"

त्या वाईनचे दोन पेग भरत डिकोस्टा म्हणाले. 

"बरे झाले तुम्हीच तो विषय काढलात. या चर्च बद्दल बरेच वाईट साईट ऐकायला मिळतंय. तुमच्या बद्दल लोकांना खूप आदर आहे. अचानक तुम्ही लोकांपासून तुटून अलग का झालात? नेमकं त्या रात्री, असे काय या शेजारच्या चर्च मध्ये घडले होते? आणि हो, त्या दिवशी नंतर फादर पीटर कोणालाच दिसले नाहीत? त्यांचे काय झाले?" वाईनचा तो ग्लास तोंडाला लावत, त्यागराजने एका दमात सगळेच प्रश्न विचारले. ते तुरट पेय, 'वाईन' या सदरात मोडणारे नव्हते. व्हिस्कीच्या जातिकुळीतली असावे! मजा येणार होती. 

"म्हणजे तुम्हाला सगळे समजले तर?"

"आहो, काहीच समजेना! म्हणून तुम्हाला विचारतोय. कारण फक्त तुम्हीच एकमेव, त्या घटनेचे साक्षीदार आहात!"

"तेही, खरेच! आणि हेही खरे आहे कि, आज तुम्हाला हेच सांगण्यासाठी डिनरचे आमंत्रण दिले आहे. तुम्ही माझी भेट स्वीकारून माझ्यावर किती उपकार केलेत हे तुम्हालाही माहित नाही!"

"कसली भेट स्वीकारली? आणि मैत्रीत, कशाला हि उपकाराची भाषा?"

"मी दिलेला ताईत तुम्ही गळ्यात घालून, तुम्हीच या चर्चची, माझी आणि फादर पीटरची सत्यता जाणून घेण्यास योग्य आहेत, हे सिद्ध केलाय!"

एव्हाना तीन पेग त्यागराजच्या पोटात गेले होते. कानात भुंगे फेर धरून गुणगुणू लागले होते. साली दारू कडक होती! डिकोस्टाचे शब्द ऐकताना निसटत होते. 

" मग सांगाना, नेमकं काय झालं होत त्या रात्री?"

"तुम्ही माझ्या बद्दल काय ऐकलंय?"

"हेच कि तुम्हाला भूतान झपाटलंय! तुम्ही लोकांना ओळखत नाही!"

"ते काही प्रमाणात खरे आहे!"

"मग पूर्ण सत्य काय आहे?"

"आज पासून बरोबर सत्तावीस वर्षा पूर्वी, आजच्या सारखीच आमावास्याची रात्र होती! फादर पीटर घरी, म्हणजे या खोलीत, गेले होते. मी चर्चचे दिवे मालवून दारे बंद करण्याच्या उद्योगाला लागलो होतो. तेव्हड्यात माझ्या मागे काही तरी वाजले म्हणून मी मागे वळून पहिले. प्रेयरच्या डायसची जमीन फाटताना दिसत होती! मी तिकडे धावलो, तर आसपास अनेक जागी जमिनीला भेगा पडू लागल्या! जमिनीच्या पोटातून काही तरी बाहेर येण्याची धड्पड करत होते. पहिली शवपेटी डायस वर जमिनीतून बाहेर आली! पहाता पहाता चर्चच्या भिंतींना तडे जाऊ लागले! माझी म्हणजे तुम्ही ज्याला डिकोस्टा म्हणतंय त्या देहाची दातखीळ बसली होती!"

"म्हणजे तुम्ही डिकोस्टा नाहीत?" त्यागराजची दारू खाड्कन उतरली. 

"मी डिकोस्टा नाही! हा डिकोस्टाचा देह मी काही काळा साठी घेतलाय!"

"मग -- तू --तुम्ही?"

"माझे मी जिवंत असतानाचे नाव तुम्हाला सांगून काय उपयोग? बस एक पोकळ आत्मा होतो या देहाने डिकोस्टा झालो, इतकेच! तर असा मी बाहेर आलो! लोक म्हणतात डिकोस्टाला भूतान झपाटलंय, सत्य आहे."

"फादर पीटर?"

" अरे हो, त्याना तुम्हाला भेटायचं आहे का? चला माझ्या सोबत! येणार?"

त्यागराज दगडासारखा घट्ट खुर्चीला धरून बसला होता! 

"तुम्ही त्रास घेऊ नका त्यागराज! मीच त्यांना घेऊन येतो! आणि हो कोठे पळून जायच्या भानगडीत पडू नका! तुम्ही माझ्या साठी खूप मोलाचे आहेत! तुम्ही जागेवरून हलू शकणार नाहीत, तशी मी व्यवस्था केली आहे!"

डिकोस्टा चपळाईने उठला आणि आतील बाजूस गेला. येताना एक नाजूक नक्षी असलेली शवपेटी खांद्यावर घेऊन आला. त्याने त्या शवपेटीचे झाकण उघडले. आत एक, पांढऱ्या फादर घालतात तश्या वेशातील, एक हाडाचा सांगाडा होता! 

"काय करणार त्यागराजजी? मी कित्याक दिवसाचा उपाशी होतो. फार नाही मी फक्त त्यांच्या मानेवर माझे दात रुतवले होते! हुशार माणूस, काय होती हे त्यांना कळले! त्यांनी चटकन देह सोडला!"

त्यागराजच्या घश्याला आता कोरड पडू लागली! या सगळ्या भानगडीत आपले काय होणार? मरण समोर दिसत होते! झगडणे भाग होते! 

"डिकोस्टा, हा सगळा इतिहास झाला. या क्षणी माझा काय सबंध आहे या सगळ्यात?"

त्यागराजने हात पाय हलवण्याचा प्रयत्न केला. ते गारठले होते! हाताची अवस्था पाया पेक्षा बरी होती! आपल्या आत्म्याच्या परवानगी शिवाय हा आपल्या शरीरात घुसू शकणार नाही! हे तत्वज्ञान त्यागराजला होते! 

" मित्रा, तू मला म्हणजे, या डिकोस्टाला पाहतोच आहेस! हे शरीर आता विकलं होत चाललंय! मोडकळीस आलाय! मला नवा देह लागणारच कि? म्हणून तुमची निवड केली आहे!"

"आणि मी तुम्हाला माझ्या शरीरात येऊ दिले नाही तर?"

"तो तुमच्या गळ्यातला ताईत माझी वाट सुखकर करणार आहे! तो तुम्ही गळ्यात घालून मला तुमच्या देहात येऊ देण्याची, विनंती मान्य केलीआहे! आणि पुढे काय होणार? या प्रश्नाच्या उत्तरासाठी फारकाळ तुम्हाला वाट पहावी लागणार नाही, त्यागराज!" भयाण स्मितहास्य करत डिकॉस्टा म्हणाले.

बोलता बोलता डिकोस्टाच्या डाव्या हाताचे मधले बोट, लांबत असल्याचे त्यागराजला दिसत होते. हाताची कातडी फाडून, आतील बोटाचे हाड बाहेर आले. त्या हाताच्या पंजाची कातडी गाळून पडत होती. नखे वेडीवाकडी आणि काळपट पडत होती, आणि बोटाची हाडे वाढत होते! काही क्षणात ते मधल्या बोटाचे नख त्यागराजच्या दोन्ही डोळ्याच्या भूमध्यावर टेकले. अंगात वीज सळसळल्याची जाणीव त्यागराजला झाली! हीच वेळ होती! त्यागराजने सर्व शक्ती निशी, तो कपाळावर टेकलेला अभद्र हात झिडकारून टाकला! ताड्कन तो जागेवरून उठला. समोरच्या म्हाताऱ्याच्या कमरेत लात घातली. त्याच्या गचांडीला धरून, डोक्याइतके उचलून जमिनीवर आपटले! साली, चिवट जात! शेवटी त्याच्या निर्जीव डोळ्याकडे पाहून तो समाधानाने हसला! तो मुडदा त्याने, फादर पीटरचा सांगाड्या सोबत त्याच शवपेटीत कोंबला! त्या शवपेटीचे झाकण लावून कुलूप घातले! आणि ती शवपेटी तळघराच्या जिन्यावरूनच खाली सोडून दिली!

चला, झाले ते ठरवल्या प्रमाणेच झाले! या त्यागराजच्या कपाळाला बोट लावले तेव्हाच, आपण या देहात प्रवेश केला हे एक बरे झाले! आता आजपासून आपण 'त्यागराज' झालो तर! या देहाचे जीवनमान आठयांशी वर्ष आहे. तोवर हा वापरता येईल! पण त्या पूर्वी नवा देह पाहून ठेवायला हवा! हे असेच सुरु ठेवायला हवे. देह नाही मिळाला तर, पुन्हा त्या जुन्या जीर्ण सांगाड्यात, आणि कुजक्या थडग्यात ओढले जाण्याची शक्यता असतेच! म्हणून हा 'शो मस्ट गो ऑन!" 

                                                                        ००० 

तापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, कोणीतरी बसलेले, डॉ. आशिषला दिसत होते! ओळख करून घ्यावी का?



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror