Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Kadam

Tragedy

4.8  

Sandhya Kadam

Tragedy

अवघा रंग एक झाला

अवघा रंग एक झाला

7 mins
1.2K


पिपळकर व त्यांची पत्नी मीनाताई दोघेच पुण्यातील आपल्या घरी राहात असत. लग्न होऊन जवळजवळ ३५ वर्षे झाली परंतु मूलबाळ नसल्याने दोघांचीच एकमेकांना सोबत होती. क्वचित केव्हातरी पिंपळकरांचे मित्र त्यांच्या घरी येत तेव्हा त्यांच्या गप्पांना ऊत येई. चहाबरोबर पोह्यांचा फडशा पाडला जाई. बाहेर दिवाणखान्यात गप्पांचा फड रंगत असे.


आजही तेच! गप्पा रंगल्या होत्या. आत किचनमध्ये मीनाताईंची मात्र मनातल्या मनांत चिडचिड होत होती.

"आयुष्यभर फक्त गप्पाच मारल्या ह्यांनी दुसरं काही केलं नाही, बायकोची कधीच पर्वा केली नाही की कधी घरात काही आहे नाही ते बघितलं नाही, नुसती स्वत:च्या जीवाची मज्जा केली. आता आपली बायको म्हातारी झाली आहे याचेही भान नाही. माझ्या हाताखाली काय सुना-नातवंडं आहेत कामं करायला?" मीनाताई आपलं फ्रस्ट्रेशन काढत होत्या.

तेवढ्यात पिंपळकरांनी बाहेरून आॅर्डर सोडली, "मीने अगं भजी टाक कांद्याची पटकन." 

"अहो कांदे संपले आहेत कालच." मीनाताई पदर खोचत बाहेर येत उद्गारल्या.

मीनाताईंचा रोख पिंपळकरांच्या मित्रांच्या लगेच लक्षात आला.

त्यातील एक विनय लगेच म्हणाला, "वहिनी भजीचं राहू देत आता, पुढच्या वेळेस बघू. बाकी चहा आणि पोहे एकदम झकास बरं का वहिनी! बरं येतो रे सुहास..." असं म्हणून मित्रांनी घराबाहेर पळ काढला. तसं लगेच मीनाताईंनी पिंपळकराच्या पाठी येवून बडबडायला सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणे पिंपळकर त्याकडे कानाडोळा करून निघून गेले.


"कशाचं काही म्हणून नाही ह्या माणस..." असं म्हणून कपाळावर हात मारण्याखेरीज मीनाताई फारसं काही करू शकल्या नाहीत.


हे असं नेहमीचंच झालं होतं, रोजचेच वाद-विवाद आणि लुटुपुटुची भांडणं! तसं बघायला गेलं तर दुसरं कोण होतं कोण त्यांना एकमेकांशिवाय... रिटायर झाल्यानंतर त्यांनी हौस म्हणून पुन्हा रियाज करायला सुरूवात केली होती. जुन्या गाण्यांच्या कॅसेट ऐकत मीनाताई वेळ घालवायच्या. गाण्यांची त्यांना भारी आवड. सकाळी योगा क्लास आणि गाणी या व्यतिरिक्त घरच्या कामात वेळ जात होता. टाईमपास म्हणून आणि संवाद साधला जावा म्हणून वादविवाद करणे हा दोघांचाही नेहमीचा उद्योग झाला होता. लुटुपुटुच्या भांडणात वेळ चांगला जायचा. पण कधीकधी भांडणाचा आवाज चंद्र सप्तकापासून सुरू होऊन तार सप्तकापर्यंत पोचायचा ती गोष्ट वेगळी, परंतु एकंदरीत सर्व सुरळीत चालले होते.


एक दिवस पिंपळकर भर दुपारी १२ वाजता मासे घेऊन आले व त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये फर्माईश केली,"मीने मस्त ताजे बोंबील आणले आहेत टिकलं कर मस्तपैकी बोंबलांचं, तांदळाची भाकरी आणि जमलं तर सोलकढीपण कर." त्यांनी रंगात येऊन आपला बेत सांगितला. मीनाताईंचा पारा चढला.

त्या जोरात कडाडल्या,"अहो दुपारचे बारा वाजले आहेत आणि आता तुम्ही बाजार घेऊन आलात? घरातली कामं करताकरता जीव मेटाकुटीला येतो माझा. त्यात आज पुन्हा डोकेदुखी चाळवली आहे, कधी करू हे सगळं? जेवणार कधी आपण?"

"त्याला कुठे वेळ लागतोय? जेवण करण्याव्यतिरिक्त दुसरं काम काय असतं दिवसभर? धुण्या-भांड्याकरिता तर सुनिता येते. तुला जमत नसेल तर मला सांग. मी करतो, दे मला..." पिंपळकरांनी उत्तर दिलं.

"तुम्हाला माझी पर्वा नाही, त्रास देऊन मारून टाका मला एकदाचं..."

या वेळी मीनाताईंचा आवाज जरा जास्तच चढला होता.

"एकदा मला पोचवून आलात की मोकळे व्हाल मित्रांसोबत जग ढुंढाळायला. काही सांगून उपयोग नाही पालथ्या धड्यावर पाणी..." असे फणकाऱ्यात म्हणून बोंबलाची पिशवी उचलून मीनाताई किचनमध्ये गेल्या.

"हे अपेक्षितच होतं, नेहमीचच आहे... मनातच हसत पिंपळकर म्हणाले व त्यांनी टिव्ही ऑन केला आणि आणलेली मिरची कोथिंबीर नीट करायला घेतली. थोड्या वेळाने अचानक किचनमधून काही पडल्याचा मोठा आवाज आला.


पिंपळकर धावतच आत किचनमध्ये गेले, बघतात तर काय मीनाताई आत जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्या होत्या.

"अगं काय झालं मीने? तुला बरं वाटत नाही आहे का? अगं मीने ऊठ गं..."

तोंडावर पाणी मारत पिंपळकरांनी मीनाताईंना उठविण्याचा प्रयत्न केला.

"मीने अगं ऊठ ना, अगं तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे मला? मी यापुढे त्रास नाही देणार तुला ऊठ गं बाई ऊठ..." मीनाताई काहीच रिस्पाॅन्स नाही देत आहेत हे बघून पिंपळकर हादरले. त्यांनी धावत बाहेर जावून शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. शेजाऱ्यांच्या मदतीने ते मीनाताईंना जवळील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांना अॅडमिट केले.


मीनाताईंवर लगेच उपचार सुरू झाले, मीनाताई शुद्धीवर आल्या पण डाॅक्टरांच्या लक्षात आले की मीनाताईंच्या कमरेखालचा सर्व भाग पॅरालाईज्ड झाला होता.

"यापूर्वी त्यांना कधी काही त्रास झाला होता का?" डाॅक्टरांनी पिपळकरांना विचारलं

"काही ब्लड प्रेशर, डायबिटीज वैगरे?" 

"नाही प्रेशर, शुगर वैगरे काही नाही. फक्त अलीकडे मध्येमध्ये डोकं दुखत असल्याचे म्हणायची." पेनकिलर घेतली की बरं वाटायचं तिला, डाॅक्टरांकडे चल, चल म्हटलं तरी यायची नाही. पिंपळकर खूपच चिंताग्रस्त झाले होते... कापऱ्या आवाजात त्यांनी डाॅक्टरला माहिती दिली.

"बाकी काही त्रास होता का? कुठे पडल्या वगैरे होत्या का? मार लागला होता का?" डाॅक्टर विचारत होते.

"नाही तसा काही विशेष त्रास नव्हता. मी मात्र खूप त्रास दिला तिला. आता पण...", असे म्हणून पिंपळकर ओक्साबोक्शी रडूच लागले. एव्हाना त्यांचे मित्र हाॅस्पिटलमध्ये हजर झाले होते.

"काळजी करू नका सगळं ठीक होईल", डाॅक्टरांनी धीर दिला. पण आपल्याला त्यांचा एमआरआय व इतर काही रिपोर्ट करून घ्यावे लागतील."

"डाॅक्टर लागतील तेवढे रिपोर्ट करा, चांगल्यातली चांगली ट्रिटमेंट द्या पण माझ्या मीनेला लवकर बरी करा. हो, तिच्याशिवाय दुसरे कोणी नाही मला..." पिंपळकरांनी मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून हंबरडाच फोडला. शेजारचे व त्यांचे मित्र त्यांना धीर देत होते. पिंपळकर मात्र हमसून हमसून रडत होते.


कित्येक वर्षांनी त्यांना जाणीव झाली होती की मीनाताईच त्यांच्या सर्वस्व आहेत आणि त्यांचे मीनाताईंवर किती प्रेम आहे जे त्यांनी कधीच व्यक्त केलेले नव्हते.


निदान झाले! मीनाताईंना ब्रेन कॅन्सर होता. Glioblatoma Multiforum एक fast growing malignant tumour ह्या टयुमरने मीनाताईंच्या मेंदूचा बराचसा भाग व्यापून टाकला होता.

डाॅक्टरांनी पिंपळकराना आजाराची तीव्रता समजावून सांगितली. ऑपरेशन करणे शक्य नव्हते कारण त्यात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. 

"पिंपळकर आपल्याला ह्या केसमध्ये जास्त काही करता येणार नाही पण त्यांचा कमरेखालचा भाग पॅरालाईज्ड झाला आहे. त्या ऊठू शकणार नाहीत. चालू शकणार नाहीत, त्यांच्या स्पीचवर व मेमरीवरही परिणाम झालेला आहे, त्या नाॅर्मल आयुष्य जगू शकणार नाहीत.", डाॅक्टर सांगत होते.

पिंपळकरांच्या पायाखालची जमीनच सरकली, भयभीत नजरेने ते डाॅक्टरांकडे बघत राहिले. त्यांनी अश्रू पुसले आणि विचारले", डाॅक्टर खर सांगा माझ्या मीनेला काही होणार तर नाही ना?"

"पिंपळकर मी तुम्हाला फसवणार नाही, आपल्याकडे जास्त दिवस नाहीत.", डाॅक्टर म्हणाले.

"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचं आहे डाॅक्टर? आपण काहीच करु शकणार नाही का?", पिंपळकरांनी घाबरत घाबरत विचारले.

"हो पिंपळकर कधी काय होईल हे सांगता येत नाही. फार फार तर ६-७ महिने, कदाचित त्या अगोदरसुद्धा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जावू शकता." डाॅक्टर निर्वाणीच्या स्वरात बोलले.


मित्रांबरोबर विचारविनिमय करून पिंपळकर मीनाताईंना घरी घेऊन आले. मीनाताईंचं करताकरता ते थकून जायचे. त्यांच्यासाठी एक नर्स ठेवली होती ती पण त्यांची मुलीप्रमाणे काळजी घेत होती. मीनाताई बिछान्यावरून उठत नव्हत्या, सर्व बिच्छान्यावरंच, पिंपळकरांना त्या बरोबर ओळख द्यायच्या. एरव्ही कधी त्यांना विस्मरण व्हायचे आपल्या slurred speech मध्ये कधीकधी त्या जुन्या आठवणी काढत बसायच्या, कधीकधी फारच असंबद्ध बोलायच्या.


हळूहळू मीनाताईंच्या वेदना वाढू लागल्या होत्या. असह्य डोकेदुखीने त्या रडायच्या. पिंपळकरांना त्यांच्या वेदना बघवत नव्हत्या. कधीकधी विचार करत ते एकटक त्यांच्याकडे पाहात रहायचे.


असंच एकदा मीनाताईंनी पिंपळकरांना जवळ बोलावलं आणि त्या म्हणाल्या,"अहो तुमच्याशी बोलायचं आहे जरा." पिंपळकर मीनाताईंच्या ऊशाशी गेले त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवून म्हणाले,"अगं आत्ताच काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे?" 

"तुम्हाला साॅरी म्हणायचं आहे. मला कळतंय मी यातून बरी होणार नाही. माझ्यानंतर तुमची काळजी घेणारं असं कोणी नाही. स्वतःचं एखादं मूल असतं तर? तुम्हाला मुलांची आवड होती पण मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही. कोणीतरी तुमच्या बरोबर असतं तर मी निश्चिंत मनाने मरायला मोकळी झाले असते."

अस्पष्ट आवाजात त्या बोलत होत्या. पिंपळकर जीवाचे कान करून ऐकत होते.

"असं बोलू नकोस मीने तू बरी होणार आहेस, देवावर विश्वास आहे माझा, मी नवस बोललो आहे दगडूशेठला."

त्यांना अर्धवट तोडत मीनाताई म्हणाल्या, "खोटी आशा लावू नका मला, मला माहीत आहे आता वेदना सहन होत नाहीत. आणखी एक काम आहे तुमच्याकडे, उपकार करा माझ्यावर, मला मुक्ती द्या... आता ह्या वेदना आणि परावलंबी जीवन सहन होत नाही."

मीनाताई वेदनेने कळवळत होत्या. "सोडवा मल या वेदनेतून."

"मीने" पिंपळकर अक्षरशः ओरडलेच

"अगं काहीतरी बोलू नकोस. असं काहीतरी बोललीस तर मी कधीच तुझ्याबरोबर बोलणार नाही." असं बोलून पिंपळकर निघून गेले.

मीनाताई क्षीण आवाजात हाका मारत राहिल्या, "अहो अहो रागावू नका माझ्यावर."


काही दिवस गेले. मीनाताईंच्या वेदना वाढतच होत्या, निरनिराळी वेदनाशामके घेऊनसुद्धा न थांबणारी असह्य डोकेदुखी. त्या विशेष बोलत नसत. बहुतेक त्यांना काही आठवत नव्हते. फक्त रेडिओकडे बघत राहायच्या. मग पिंपळकर जुन्या गाण्यांच्या कॅसेट त्यांना ऐकवायचे... त्या ऐकायच्या का देव जाणे पण त्या थोडावेळ शांत राहात. थोड्या वेळाने पुन्हा विव्हळणे चालू होई. हळूहळू त्यांच्या सर्व हालचाली कमीकमी होत होत्या आणि खाणंपिणंही. शिल्लक होत्या त्या फक्त असह्य वेदना.


पिंपळकरही आता खंगले होते. मीनाताईंच्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या, बघवत नव्हत्या. कित्येक वेळा ते मीनाताईंसमोर बसून राहायचे एकटक बघत. मनात भलतेच विचार यायचे.


आतापर्यंत इंटरनेटवरून त्यांनी मीनाताई घेत असलेल्या वेदनाशामकांच्या lethal dose बद्दल माहिती करून घेतली होती. कधी वाईट विचार मनात येत, ते घामाने डबडबून जात. लगेच येरझाऱ्या घालायला सुरूवात करून मनातल्या विचारांना ते काढून टाकत.


पण आज मीनाताईंना कुठलेच औषध लागू पडत नव्हते. वेदना आणि फक्त वेदनाच! रात्रीचे तीन वाजले होते. मीनाताईंना बरे वाटावे म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचे किशोरीताईंचे गाणे लावले होते...'अवघा रंग एक झाला...'

अचानक मीनाताई अस्पष्ट आवाजात कण्हल्या, "आई गंऽऽ" कण्हणे चालूच होते. पिंपळकरांना काय करावं ते सुचत नव्हतं. घालमेल होत होती.


अचानक त्यांनी मनाशी काहीतरी ठरवलं, धीर करून उठले, किचनमध्ये जावून अर्धा वाटी दूध घेऊन ते मीनाताईंकडे आले. त्यात त्यांनी आधीच ठरविलेल्या गोळ्यांची अख्खी बाटली रिकामी केली. घामेजलेल्या चेहऱ्याने, साश्रू नयनांनी, थरथरत्या हातांनी त्यांनी ते सर्व दूध मीनाताईंना भरवले आणि म्हणाले, "शांत झोप हं आता..! "


नंतर ते आपल्या खुर्चीत बसले आणि क्षणार्धात ओक्साबोक्शी रडू लागले. थकल्याने त्यांचा डोळा लागला.


पहाटे त्यांना जाग आली. भावनेच्या भरात रात्री आपण काय केलं हे त्यांना आठवले. ऊठून त्यांनी मीनाताईंच्या बिछान्याकडे धाव घेतली. मीनाताई शांत झोपल्या होत्या, वेदनांचे नामोनिशाणही नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर... त्यांनी चिरनिद्रा घेतली होती.


पिंपळकरांना ती शांतता सहन झाली नाही, ते मीनाताईंच्या अंगावर कोसळले आणी हंबरडा फोडून ओक्साबोक्शी रडू लागले.


मीनाताई मात्र शांतपणे न परतीच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy