Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Suresh Kulkarni

Others

4  

Suresh Kulkarni

Others

कोण होती ' ती ' ?

कोण होती ' ती ' ?

5 mins
16.7K


तसा 'तिचा ' आणि माझा सहवास उणे -पुरे पंचेवीस -तीस वर्षांचा . आमच्या सहवासातून आणि तिच्या सांगण्यातून 'ती ' थोडी फार समजली . जगण्याची चिकाटी आणि दुःख यांचं मिश्रण होती . तिला तीन भाऊ आणि एक मोठी बहीण होते . पण इतरांन पेक्षा लहानग्या 'भगवानावर 'भयंकर जीव . चिंचेच्या बोटकातले अर्धे बोटूक भगवाना साठी ठेवायची . देवळातला खडीसाखरेचा खडा असो कि पाडाचा आंबा असो . त्यात भगवानाचा हिस्सा असायचा . घरची गरिबी . भांडी ,धुणं , नदी -विहिरीचं पाणी , सडा सारवण , सार आईच्या बरोबरीनं करायची . थोरली बहीण सक्काळी दूध -काला खाल्ला कि गजगे घेऊन खेळायला पळायची . शेतात जाता -येत , म्हशी मागे फिरताना पायात काटे मोडायचे , म्हणून कोणीतरी एक खेटरांचा जोड दिला होता म्हणे . हिने काय करावं ? त्यातली एक चप्पल भगवानाला दिली ! का तर त्याच्या किमान एका तरी पायात काटा मोडूनये ! इतका जीव ज्या भावाला लावला तो तिच्या शेवटच्या आजारपणातहि भेटीला आला नाही ! गेली तरी आला नाही ! ' भगवानाला पत्र टाकून बोलावून घ्या ' म्हणत गेली !

घरच्या गरिबी आणि 'पोरीला काय करायचंय शिकून ?' या भावनेतून तिला शिक्षण मिळालेच नाही . पण इकडून तिकडून काही काही शिकली . तिला लिहता वाचता येत होते . तिची स्मरण शक्ती दांडगी होती . एकदा कानावर पडलेले ती पुन्हा पुन्हा आठवून म्हणत असे . 'ईश्वर मती मज द्यावी ...',' कैलास राणा .... '

आरत्या मस्त चालीवर म्हणायची . तिचे कथन भयंकर प्रत्यंकारी असायचे . तिच्या लहानपणी गावात प्लेग कसा यायचा ? शेतात- रानात राहायला कशी भीती वाटायची ? एकदा वाघाने दत्ता मामाला खोपीतून कसा ओढून नेला ? वाघा - कोल्ह्य पेक्षा साप विंचवाची कशी दहशत होती ? हे ती ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे यावेत असे रंगून सांगत असे .

' अन मग तुमि काय करायचो ?' कोणी तरी विचारायचे .

' मग ना ? आमी देवाचा धावा करायचो , दत्ता दिगंबराया हो , पांडुरंग -पांडुरंग म्हणायचो , आस्तिक आस्तिक म्हणायचो . मग ..... मग ..... सकाळचं व्हायची ! एकदम धीर यायचा !' त्या काळ रात्रीत अडकलेले श्रोते सुद्धा सुटकेचा श्वास सोडायचे .

खाण्या पेक्षा कष्ट ज्यास्त होते . तशी ती रोडच होती . लग्न झाले . दोन मुलं एक मुलगी झाली . सासुरवास होताच. पण जरा सासरी स्थिरावल्या सारखी होत होती . थोडे सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच प्रकृती साथ देईना . कृश होत चालली होती . नणंद ,जावा भावकीतले तर आता हाड्नकातड म्हणू लागले . सासूने तर 'मड 'च म्हणायला सुरवात केली ! तिचे दागिने ,नवी कापड आपणच वापरायला सुरवात केली .

'आत्ये ,ते लाल लुगडं कोरच ऱ्हाऊद्या , गौरीच्या हळद -कुंकाला नेशिन, ' ह्यांनी ' हौशेने आणलंय .' 'अन तुला मड्याला काय करायचंय ? एकदा नेसल्यान काय होतंय ? पुन्हा घे कि तुज तुज बोळगतट ! मी काय उरावर बांदून नाणाऱ्य का काय ? अली मोठी हौशीची !' असे जिव्हारी लागणारे आणि जहरी संवाद रोजचेच झाले होते !

एका रात्री , रात्र कसली सुर्यास्था नन्तर एखादा तास झाला असेल , परसातून घरात येताना , ती कश्याला तरी अडथळुन पडली . हातातला कंदील दूर जाऊन पडला आणि विजला . मिट्ट अंधार ! तिने डोळे उघडले तेव्हा वैद्य कसलेसे चाटण करून देत होते . तापाने ती फणफणली होती !

'काय झालं ,ग? '

' मी पडले . फेकून दिल्या सारखी !' कशी बशी ती म्हणाली . पुन्हा ग्लानीत गेली !

मग सुरु झाले एक अघोर सत्र ! कारण त्या दिवशी होती अमोश्या ! पडली ,ती वेळ वाईट होती म्हणे ! बाहेरची बाधा झाली या बद्दल घरच्यांची खात्रीच पटली ! दहीभात कुंकू मिसळलेला उतरून टाकणे , हळद -कुंकवाची ती रिंगणे , शकुन पाहून त्या बरहुकूम उपचार करणे , लिंबाच्या झावळ्यांचा चोप (शुद्ध हरपे पर्यंत ! ),मारुतीला ,पिंपळाला फेऱ्या , मुंज्या चा उतारा , रमल भाकिते ........ तिच्या तोंडून ऐकताना वाटायचे, अरे असे काय होते , त्यामुळे हि वाचली ? केवढी हि शारीरिक आणि मानसिक छळवणूक कशी सहन केली असेल ?

"कस सोसलस ग हे सार ?" मी एकदा विचारलं . तर म्हणाली ,

" कुठं सांगू नकोस . फार त्रास व्हायचा रे , पाठीवर वळ उठायचे ! अंग ठणकायचं ! जीव नकोस व्हायचा ! पण सगळं सहन केलं ! कोणासाठी ठाऊक आहे ?"

" कोणा साठी ?"

" पोटातल्या बाळा साठी ! "

" म्ह्नणजे ? ........ घरच्यांना ठाऊक होते ?"

"नाही . पण नंतर वैद्यांनी सांगितले "

" मग ? झाली असेंलना तुझी त्या 'भुताटकीतून ' सुटका ?"

" कर्म माझं ! भूत पोटी आलाय ,' पाडून टाक ' म्हणून घरचे मागे लागले ! "

" मग ?"

"मग काय ? भूताटकी पेक्षा अघोरी उपाय नशिबी आले ! ---------- पण माझ्या लेकरानं त्या उपायाला दाद दिली नाही ! सूर्य नारायण सात घोड्याच्या रथात बसले ,त्या दिवशी तो सूर्योदयाला जन्माला ! रथसप्तमीला ! हो मुलगाच झाला .खूप अशक्त , पण पोटात असल्यापासून दुःख पचवण्याची ताकत घेऊन आलाय ! "

तिने आयुष्य भर कष्टच केले . एकत्र कुटुंब होते तेव्हाही ,आणि नवऱ्याच्या बदली पायी दुसऱ्या गावी बदली झाली तेव्हाही . कारण तो पर्यंत तिचे स्वतःचे कुटुंब विस्तारले होते .ती सवाष्ण होती ,तो वर मी तिला कधी झोपलेली पहिली नाही . रात्री मी झोपेपर्यंत ती स्वयंपाक घरात झाकपाक करत असे . आणि सकाळी चहा करण्यात चुलीवर गुंतलेली असे . इतके कष्ट उपसत असून हि कधी कोमेजलेली दिसली नाही . केव्हाही पहा ती ताजी ,टवटवीतच ! सकाळीच स्नान , स्वच्छ नऊ वार चापून चोपून नसलेलं लुगडं , कपाळावर रसरशीत रुपया एव्हडं कुंकू . ती क्वचितच बैठकीच्या खोलीत यायची ,बहुतेक तिचा वावर मागील दरानेच असे .

मुलांचे तिला खूप कौतुक होते . शेजारच्या बायकांना ती नेहमी सांगायची ,

'आमच्या मधला 'माधव ' इंजिनेरींगला आहे . तो एकदा इंजिनियर झाला कि मला तो जीप गाडीतून फिरविला , तुम्हीं बागच !'

तेरा वर्ष थायरॉईड कॅन्सरशी लढली ! पोटात आग होतेय म्हणत गेली ! घश्यात आग होतेय म्हणत गेली !

दोनदा ऑपरेशन झाली ! दोनदा किमो झाली ! कॅन्सर जिंकला ! तिचा माधव इंजिनियर झाला होता ,पण ती सरकारी दवाखान्यातच गेली ! तिची जीप गाडीत फिरण्याची इच्छा मात्र 'अमर ' राहिली !

कोण होती ती ?

ती माझी आई होती !! अन मीच तो ' पोटातून दुःख सहन करण्याची ताकत घेऊन आलेला ' भाग्यवान कि हतभागी !


Rate this content
Log in