Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manish Vasekar

Others

2.4  

Manish Vasekar

Others

स्वर्गसुख

स्वर्गसुख

5 mins
233K


या गोष्टीला आता वर्ष होऊन गेलं असेल. पुण्याच्या दवाखाण्यातील त्या उग्र वासाने, सततच्या त्या जीवनमरणाच्या भयाने, आक्रोशाने मन खूपच उदास झालं होत. मुंबईची गाडी पकडून ताबडतोब घर गाठावं असं मनात होतं, म्हणून जवळच शिवाजी नगर स्टेशन गाठलं. मेल गाडी तर शिवाजी नगरला थांबणार नव्हतीच मग येईल ती लोकल पकडून लोणावळा गाठून मग पुढे बघू असं ठरवून लोकलची वाट बघत प्लॅटफॉर्मला उभा राहिलो. संध्याकाळची वेळ असल्याने गाडीला नोकरदार-वर्गाची गर्दी खूप होती. आलेल्या लोकलमध्ये कसाबसा चढलो आणि उभा राहूनच लोणावळा गाठलं.

लोणावळ्यात उतरलो-न-उतरलो की लगेच मागून इंद्रायणी धडधडत स्टेशनात दाखल झाली. समोर आलेल्याच डब्यात चढलो आणि थेट डाव्याबाजूला डोअरला गेलो. डोअरवर अगोदरच एक तरुण जागा धरून बसला होता म्हणून थोडा हिरमुसलो. पण मग त्याच्या मागची जागा काबीज करून, बस्तान मांडलं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळ सरत आली असली, तरी गरम हवा जाणवत होती. गाडी थांबलेली असल्यानं डोअर जवळची जागा पकडून हि खूप उकडत होत. आणि ट्रेन एकदाची हालली आणि लोणावळ्याच्या गार हवेने तन - मन तृप्त केलं. थोड्याच वेळात खंडाळा आलं. स्टॉप नसतानाही गाडी चांगली पाच मिनिटे थांबली. बहुधा तरुण पुण्याहून बसून आला असावा. त्याने उतरून पाय मोकळे करून घेतले. गाडी चालायला लागल्यावर परत आपल्या जागेवरून येऊन बसला.

पंचविशींतील असेल तो तरुण. सावळाच, चांगला उंचापुरा, अंगकाठीनेही बरा होता. चेहऱ्यावर तर बेफिकरी झळकत होती. बॅग किंवा सामानही त्याच्याकडे नव्हतं. बेरोजगार असावा बहुतेक. त्याच्याशी बोलावं कि नाही ह्या विचारात मी होतो. एवढ्यात त्यानेच मला विचारलं "काय काका, मुंबईलला निघाले का?" काका, एकदम काकाच करून टाकलं याने मला. सरळ उभा राहून आरश्यात बघावस वाटलं मला, इतक का वय दिसतय माझं! आताशी कुठे पस्तीसी पार झालीय. आणि हा म्हणतोय "काका". नाखुषीतच मी "हो, कल्याण" सांगून शांत बसलो. मग तो हि तरुण निवांतपणे गार हवा खात मोहंमद रफीच गाणं गुणगुणत बसला.

कुठल्यातरी आडरानात दोनतीन बाया गडबडीत आम्हाला 'उठा उठा, उतरायचय' म्हणत अंगावर आल्या. त्यांच्या हातात करवंदे, शेंगा तत्सम वस्तूच्या टोपल्या होत्या. स्टॉप नसतानाही गाडी थांबली, ठाकूरवाडी काय ते छोटस स्टेशन मागे लागलं, तेच असेल या गावाचं नाव बहुधा. त्या बाया पटपट उतरल्या आणि दरीच्या दिशेने चालत्या झाल्या. तेवढ्याच पटापट त्या खोल दरीत नाहीश्या देखील झाल्या. त्या दिशेनाश्या झाल्यावर पुन्हा आम्ही दोघे जाग्यावर बसलो. इतक्यात समोरच्या पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर एक सुंदर तरुणी दिसली, आम्ही दोघे तिच्याकडे बघत होतो , आमच्या गाडीच्या अंधुकश्याच उजेडातही तिचा सुरेख सोंदर्य नेत्रतृप्ती करणार होत. ती ही आम्हाला बघून छान स्मित देत होती. तिचे ते मोसंबी ओठ काहीतरी गूढ अन गोड पुट्पुटत असल्याचं भास होत होता.

आम्ही दोघे हि तिचे सुंदर लावण्य चघळत होतो. ती आमच्या फार जवळ होती, अगदी दोन हात दूर! तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. तिचा तो गोरा वर्ण, रेखीव नाक, नितळ त्वचा. कंबरेपरेंत मोकळे सोडलेले काळे भोर केस, थोडक्यात, ती एक आयटम बॉम्ब होती. तिच्या त्या गोऱ्या-गोऱ्या लांबसडक हाताने आम्हाला ती बोलवत होती, मला कि त्या तरण्याताठ्याला! देवजानो.

तेवढ्यात तिच्या ट्रॅकवरून पुण्याकडे जाणारी एक गाडी शीळ घालत धडधडत तिच्याकडे येताना आम्ही पहिली. माझी तर बोबडीच वळली. तो तरुण तिला मोठ-मोठयाने आवाज देत होता. गाडीकडे हातकरून गाडी आल्याचं ओरडून ओरडून सांगत होता. पण ती तशीच तिच्या धुंदीत तशीच गोड स्माईल देत उभी होती. गाडी खूप जवळ अली होती, त्या तरुणाने धिटाईने गाडीतून उतरून तीच हात पकडला आणि हिसक्यातच तिला जवळ ओढल. गाडी धडधड करत समोरून पार झाली, दोघे अजूनही थरथरत असल्याचं मला दिसलं. मग त्यानी तिला फटफटतच आमच्या गाडीत शेजारी बसवलं. मी दोघांनाही निहाळत होतो. तरुण थोडा घुश्यातच तिच्या कडे बघत होता, ती मात्र शांत शीतल हसत होती. दोघांचं काही तरी गुलूगुलू चालू होत, बसक्या आवाजात अस्पष्ट काहीस. गाडी धावू लागली. मग एक बोगदा आला आणि चित्र-विचीत्र आवाजात हसण्यात खिदळण्यात त्या दोघांचा रोमान्स चालू लागला. प्रत्येक बोगद्यात त्यांच्या ह्या प्रणय-क्रिडा चालत ते दोघे स्वर्गसुख उपभोगत होते. बोगदा सरलाकी, ती तरुणी माझ्याकडून बघून लाजून हासत आणि तो तरुण मिशा पिळत तृप्ती दर्शवत. मी पण मग बोगदा आल्याची चाहूल लागली की त्यांचा कडे पाठ फिरवत, उगाच कशाला कुणाच्यात "कबाब मे हड्डी".

अश्याच एका बोगद्यात, एक जोरदार आरोळी माझ्या कानावर आली. मागे वळून बघतो तर काय, हि माझ्या मागे बसलेली, प्रणय क्रीडेत मंत्रमुग्ध झालेली जोडी एकदम गायब. दोघेही तोल सुटून गाडीतून पडले. मला दरदरून घाम सुटला. काही क्षण माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. जेव्हा भानावर आलो तेव्हा गाडी बरच अंतर कापून समोर आलेली. आता मात्र खूप उशीर झाला होता, माझ्या व्यतिरिक्त कुणालाच हे तरुण-तरुणी ट्रेनबाहेर फेकल्या गेल्याच लक्षात आल नव्हतं. मग मी तशाच बसलो, निशब्द.

कर्जत नंतर एक मागून एक लोकल स्टेशन येत राहिली. कल्याण आलं, मी उतरलो आणि घरी पोहचलो, अगदी सुखरूप.

दिवसामागून दिवस गेले, मग महिने, मध्यंतरीच्या काळात मी ती घटना पूर्णतः विसरलो. दोन-चार वेळा पुण्याला हि गेलो, पण स्वतः च्या गाडीने. पण मागच्या खेपेला एक दिवसाचं काम असल्याने मी पुण्यासाठी सकाळी विशाखापट्टणम पकडली. आणि काम संपताच पुणे स्टेशनहुनच इंद्रायणी गाडी पकडून डोअरला मोक्याची जागा काबीज केली. गाडी सुपरफास्ट, लोणावळा लागलीच आलं आणि मग पुन्हा गाडी खंडाळ्याला थांबली. मग मी पण पाय मोकळे करून घेतले. खंडाळ्याहून गाडी निघाली, या खेपेला नशीब चांगलं म्हणून कोणी त्या ठाकूरवाडीला 'उतरायचंय' म्हणून उठवायला आलं नाही. पण नियमाप्रमाणे ठाकूरवाडी स्टॅशनानंतर, गाडी आडरानात थांबली. मला त्या तरुण-तरुणीची आणि त्यांच्या दुर्दैवी घटनेची आठवण झाली. मन अगदी खिन्न झालं. आणि अचानक मला त्या दिशेहून "काका! काका!!" म्हणून आवाज देणारी एक गोड छोटी मुलगी दिसली.

ती माझ्याकडे बघत हात वर करून मला बोलवत होती. मी थोडा हबकलो. त्या मुलीने मग मागे बघत "आई बघ ना, काका आलेत. आणि मला ते भेटायला पण येत नाहीत आणि ओळख पण दाखवत नाहीत". मी अचम्बून गेलो, काय हि मुलगी आपल्या ओळखीची आहे !!

तिच्या मागून तिची आई डोळे चमकावत समोर आली. आता मात्र मी टरकलो. माझा विश्वास बसत नव्हता ती आई, ती सुंदरी म्हणजे तीच तरुणी. त्या तरुणासोबत माझ्यासोबत प्रवास करत असताना गाडीतून फेकल्या गेलेली, त्या तिच्या तरुण प्रियकरासोबत.

आता त्या दोघीनी मला आवाज देणे चालू केलं "काका, काका इकडे या" आणि लगेच त्यांचा मागून तो, तोच तरुण आणि त्या गोड छोट्या मुलीपेक्षा थोडा मोठा, देखणा मुलगा हि त्यांना सामील झाला. ते चोघेही इशारा करत होते, ‘या इकडे या’. मी जाम घाबरलो, उठून सावध झालो. इतक्यात गाडी पण धकली, माझा जीव भांड्यात पडला . गाडी हळू हळू वेग घेत होती, तसा तसा मी थोडा थोडा सुरक्षित होत होतो. पण ते चोघेही ट्रॅक वरून धावत मला 'या. या काका’ म्हणून विनंती करत होते. गाडीने चांगलाच वेग घेतला, तसा मी सुरक्षित झालो म्हणून एक दीर्घ श्वास घेत सुस्कारा सोडला आणि उभ्याउभ्याच थोडा मागे सरकलो. आणि अचानक मला मागून कोणी जॊरात फटका मारत ढकल्याचं जाणवलं आणि दुसऱ्याच क्षणी मी गाडी बाहेर फेकल्या गेलो. खोल, खूप खूप खोल दरीत.

आता तुम्ही म्हणाल, 'हा केवळ अपघाती योगायोग असेल. बाकी फक्त बाष्कळ, मनाचे खेळ आहेत'. पण खरंच, मी कशाला खोट सांगू. माझ्यावर विश्वास ठेवा आणि पडताळून पाहिचच असेल तर " या कधी, इंद्रायणीने मुंबईला आणि हो आवर्जून गाडीच्या डाव्या बाजूच्या डोअरलाच बसा. आम्ही तुमच नक्की स्वागत करू आणि तुम्हाला देखील स्वर्गसुख देऊ. आम्ही म्हणजे , तीच ती गोड मुलगी, तो देखणा छोकरा. आणि ते रोमँटिक जोडपं आणि निसंदेह ह्या नवीन कुटुंबातील सो कॉल्ड सिनियर मोस्ट, मी . या तर मग. आपण नक्की भेटू,फक्त आणि फक्त स्वर्गसुखासाठी!!!


Rate this content
Log in