.प्रमोद घाटोळ

Inspirational


0.2  

.प्रमोद घाटोळ

Inspirational


यंदाचा पाऊस

यंदाचा पाऊस

2 mins 1.2K 2 mins 1.2K

      मातीच्या सुगंधाच अत्तर गावाच्या अंगापांगातून घमघमत होत.पाण्याचे चिंब ओघळ त्याच्या विशाल तनूवर तर्र उमटले होते.अख्खा गाव वर्षभरापासून पाण्याविना कासाविस झाला होता. अन् जेष्ठातील पहिल्या पावसान त्याला आंघोळ घातली, तसा गावात आनंद जणू न्हाऊन निघाला. उन्हाच्या तापाची बोंबाबोंब एकदम विरली.आठवड्या भरात त्याच्या अंगावरची हिरवी लव मखमली गालीच्या सारखी भासू लागली. डोळ्यांनी भिंतीवर पाहिलेला देखावा प्रत्यक्ष जमिनीवर अवतीर्ण झाला. आकाशात इंद्रधनूष्य आपला हुनर दाखवू लागला. त्यातील रंगछटा येणाऱ्या उद्याची भविष्यवाणी करत होत्या. पाखरं उंचावरून झेपावत स्वच्छंदी पणानं आवागमन करू लागली होती.

    घराच्या कौलारू छपरातून निघणाऱ्या वाफांनी अख्ख गाव वाफावून निघाल होत. टिनाच्या पत्र्यातून थपकणारे पावसाचे थेंब त्याच्याच सचेत आस्तित्वाची जाण करून देत होते. या वर्षी पावसाळ्याची खरी सुरवात जरा उशीराच झाली होती. त्यामुळे निर्जिव झाड सुद्धा माणसा सारखे सद्गगदीद झाल्यागत वाटत होते. झाडावरची पक्षांची घरटी परत डागडूजीला आली होती. पक्षी त्याच्या भिंती बळकट करण्यात मस्त होते. त्यांच्या चोचीतून चुकून खाली पडणारे केराचे तुकडे त्याची साक्ष देत होते. पक्षांचा पेरते व्हाचा आवाज शेतकऱ्यांना सुखावत होता. वाहनाच्या चाकांनी उडणाऱ्या पाण्याच्या चिरकांडया पाणी जमिनीच्या पोटभर झाल्याचे सुनावीत होत्या. सगळे कसे सजल वाटत होते.

    गावच्या मारोतीच्या देवळात सांगता किर्तनासाठी सारा गाव उलटला होता. जो तो मारोतीला रुईच्या फुलाचा हार घालून नारळ अर्पण करत होता. त्याच्याकडे गावकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले होते. त्यांची हाक ऐकल्याच समाधान गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अख्ख्या बाराकोसात सगळयात जास्त पाऊस चिचगावात पडला होता. आपल्या गावाचा मारोती साक्षात असल्याची सगळ्यांना खात्री पटली होती. मूर्तिच्या समोर उभे राहून गावकरी बजरंगाचे रूप टकलावून न्याहळत होते.

    भूलीनं आता कात टाकली होती. सततच्या पंधरा दिवसाच्या पावसामुळे तिची खडी फुटली होती.आजूबाजून तिच्या काठावर पडून असलेला केरकचरा पार वाहून गेला होता. पात्रातून वाहणारा पाण्याचा प्रवाह काचा सारखा चक्क दिसत होता. काठावर असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर माकडं मौजेत उडया मारत किंचाळत होते. त्यांचा हूप हूपचा आवाज दूरपर्यंत जात होता. गावातील शाळकरी मुलं पारावर जमून त्यांची चेष्टा काढत होते. नदीचे खळखळ वाहणारे पाणी पाहून तृप्त झाल्याची भावना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.यंदाच्या जोमदार पावसामुळं प्रत्येक जण समाधानी झाला होता.


Rate this content
Log in