Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Patil

Action Inspirational

3  

Santosh Patil

Action Inspirational

शर्यत

शर्यत

5 mins
16.9K


      झुंजू मुंजू होऊन पहाटेला जाग येत होती. गवत न्हाऊन ताजेतवाने झाले होते. अगोदरच उठलेल्या गावाला शामा परटाचे कोंबडे बांग देऊन उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वेशीतून जाणाऱ्या पायवाटेवरून सदाशिव पाटलाची बैलं गळयातील घुंगरू तालात वाजवत आपत्याच नादात शेताकडे निघाली होती.

      सदाशिवाची बैलं म्हणजे अख्या शिवापूर गावाचे नाक होते. आजूबाजूच्या वीस पंचवीस गावात अशी खोंड नव्हती. कुठेही आणि कितीही मोठ्या शर्यती असू देत, सदाशिवच्या बैलानी ती शर्यत जिंकली नाही, असे कधी झालेच नाही. दोन वेळच्या अन्नाला महाग झालेला सदाशिव आता सुखाचे घास खात होता. दुस-याच्या शेतात मजूरीने जाणाऱ्या सदूने आता स्वतःच्या मालकीची बरीच जमीन खरेदी केली होती. पंचक्रोशीत तो आता जमीनदार म्हणून ओळखला जात होता.

      सदाशिवाचला बैलांचा खूप लळा लागला होता. त्याने त्यांना जनावरे म्हणून कधी वागवलेच नाही. अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे तो त्यांची काळजी घ्यायचा. मोठ्या हौसेने त्याने त्यांचे नाव सर्जा आणि राजा ठेवले होते. देवानेही मुलांच्या बदल्यात त्यांना बैलंच भेट म्हणून दिली असावीत. कारण सदाशिवाच्या बायकोची, शांताची कूस कधी उजवलीच नाही.

      सदाच्या अपेक्षेपेक्षाही सर्ज्या-राजाने त्याला भरपूर पैसा आणि जमीन मिळवून दिली होती. सदानेही ठरविले होते की, आता सर्ज्या-राजाला  फक्त विश्रांती द्यायची, त्यांना त्रास होईल असे काहीही करायचे नाही. वर्षामागून वर्षे सरत होती. सदाशिवही वाढत्या वयाप्रमाने जमिनीकडे झुकत होता. त्याच्याबरोबरच सर्ज्या-राजाही जमीन हुंगू लागले होते. सदाची परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदाला येत होती. अशातच शांताचे आजारपण डोके वर काढत होते. तिला जिल्ह्याला नेऊन चांगल्या डॉक्टरकडे दाखवायची गरज होती. पण, परिस्थितीच्या रेट्यापुढे सदाला ते शक्य होत नव्हते. गावातील लोकांच्याकडून उधार पैसे घेऊन शांताचा तात्पुरता उपचार केला जात होता. पण आजार कमी न होता वाढतच होता आणि आजार वाढण्याबरोबर उधरीही वाढतच होती. सदूचे डोके विचाराने भणभणत होते. पण मार्ग दिसत नव्हता. जी काही शेती विकत घेतली होती, ती सुद्धा सावकाराकडे गहाण पडली होती. आता शांताला तीळतीळ मारताना पाहत बसण्याशिवाय सदाशिवकडे कोणताही पर्याय नव्हता. दिवस मुंगीच्या पायानी पुढे पुढे सरकत होता. दिवसभर मजुरी करून थकलेला सदाशिव संध्याकाळी खिन्न मनाने अंगणात बसलेला असायचा.

      एक दिवस सदाशिवचा मित्र महादेव, सदाशिवला भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पातून तो सदाशिवला बोलला की, तालुक्याच्या गावी बैलगाडयांच्या जंगी शर्यती आयोजित केलेल्या आहेत. आणि बक्षीसही एकावन्न हजारांचे आहे. इतक्या पैशातून शांता वहिनींचे ऑपरेशन होऊन बरेच पैसे शिल्लक राहतील आणि त्याला सावकारकडे गहाण पडलेली जमीनही सोडवता येईल.

      सदाशिवच्या मनात आशेचा किरण चमकला, पण दुसऱ्याच क्षणी त्याचे मन पार करपून गेले. कारण, त्याचे लाडकी मुलेही (सर्जा-राजा) त्याच्याप्रमाणेच आता म्हातारी झाली होती. त्यांना शर्यतीत पळवणे म्हणजे मूर्खपणाचे होते. पण आशेला वय नसते, काळाचे बंधन नसते. तिन्हीतला एकतरी नंबर मिळाला, तरी शांताचे ऑपरेशन होईल आणि नाही मिळाला, तरी काही नुकसान होणार नव्हते. सदाने स्वतःच स्वतःला समजावले आणि सर्जा-राजसह तडक तालुक्याच्या गावी शर्यतीसाठी जाण्यास निघाला. मैदान गर्दीने खचाखच भरले होते. दूरदुरून आलेले लोक, दूरदुरून आलेली बैलं पाहण्यात गुंग होते. ती अरबी घोड्यांसारखी तारणीबांड खोंड पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. ती फुरफुरणारी खोंड अधिकच आक्रमक दिसत होती.

      इतक्यात सदाशिव आपल्या लाडक्या सर्जा-राजासह तेथे दाखल झाला. हाडाचा सापळा शिल्लक राहिलेला सर्जा-राजाला पाहताच लोक कुचेष्टेने हसू लागले. एकेकाळी सर्जा-राजाला शर्यतीच्या मैदानात पाहताच जल्लोष करणारे लोक आज त्याच सर्जा-राजाला पाहून फिदीफिदी हसत होते. सदाशिवला मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते आणि त्या मतलबी लोकांचा तिरस्कारही वाटत होता. उभरत्या काळात थुंकीही झेलणारे लोक, पडत्या काळात मात्र शत्रूसारखे वागतात, हे त्याला कळून चुकले होते.

      हळूहळू शर्यत सुरु होण्याची वेळ जवळ येत होती. सर्जा-राजाला तर स्फुरणच चढले होते. सिंह जरी म्हतारा झाला, तरी गवत खात नाही आणि शिकारही करायला विसरत नाही. सर्जा-राजा म्हातारे झाले होते. पण शर्यत त्यांना नवीन नव्हती.

      पंचांचा इशारा होताच, सर्व बैलं उधळली. हरणाच्या वेगाने बैलं धावत होती. गुलाल उधळावा तसा धुरळा हवेत उडत होता. एकमेकांना जिंकण्यासाठी बैलं सारा जीव पायात आणून धावत होती. गाडीवान तर दुश्मनाला बदडावे तसे आपल्या बैलांवर तुटून पडत होते.

      सर्जा-राजामध्ये तर वीरश्रीच संचारली होती. ते धाऊ लागले. त्यांच्यात जणू तारुण्यच अवतरले होते. एक एक बैलजोडी मागे पडत होती. तसतसे लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालत होते आणि सर्जा-राजाची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु झाली होती. शारीरिक ताकदीपेक्षा भावनांची ताकत जास्त असते, हेच सर्जा-राजा दाखवून देत होते. कारण, त्यांची आई-शांता आजारी होती आणि तिच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे त्यांना शर्यत जिंकल्यावर मिळणार होते, हे त्या मुक्या जनावरांना समजले असावे आणि त्यांच्या इच्छाशक्तीपुढे  सारी ताकदवान खोंड कमी पडत होती. चित्याच्या गतीने अंतिम रेषा जवळ येत होती. सदाशिव तर अवाक् होऊन धावणाऱ्या सर्जा-राजाकडे पाहात होता. इतर गाडीवान म्हातारी बैलं पुढे जाताना पाहून अधिकंच खवळून उठले होते. ज्या बैलांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हरभऱ्याचा, सोयाबीनचा भरडा आणि कोवळे लुसलुसीत गवत आणि न परवडणारा खर्च करून पाळले होते, त्यांना ही मरायला टेकलेली म्हातारी बैलं मागं टाकतात, हे पाहून अधिकच बेभान होऊन आपल्या बैलांना बदडत होते, पण ते सारे व्यर्थ ठरले होते. कारण सर्जा-राजाने सीमारेषा कधीच पार केली होती.

      थोड्याचवेळापूर्वी कुचेष्टेने हसणारे लोक आता सर्जा-राजाची स्तुती करत होते. ‘मुंगीने हत्तीला हरवले.’ असे म्हणत होते, तर कोणी ‘तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे’, असे म्हणत होते.

      थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु होणार होता. पण, सर्जा-राजा अधीर झाले होते. त्यांनी सदाची वाट न पाहता घरचा रस्ता धरला. झपाझप पावले पडत होती. वेगाने रस्ता मागे पडू लागला होता आणि गाव जवळ येत होता. दारात येताच सर्जा-राजाला शांता दिसताच ते उभ्याउभ्याच धाडकन जमिनीवर कोसळले. शांता धावतच त्यांच्याजवळ गेली आणि सर्जा-राजाची डोकी आपल्या मांडीवर घेऊन तिने त्यांना कवटाळले. अगदी पोटच्या पोराप्रमाणे! सर्जा-राजाची हीअवस्था पाहून तिचे मन तुटत होते. तिच्या डोळ्यातून तर नद्यांचे पाटच वाहत होते. घरात धावत जाऊन तिने भाकर तुकडा आणला. सर्जा-राजाने तो मोठ्या समाधानानेखाल्ला. इतका वेळ मृत्यूलाही वाट पहायला लावणाऱ्या सर्जा-राजाला आता मात्र मृत्यूने खिंडीत गाठले होते. पण सर्जा-राजा त्याला दाद देत नव्हते.

            बक्षिस घेताच सादाही धावत पळत घरी येत होता. कारण, त्याला माहीत होते की, सर्जा-राजा थेट आपल्या घरीच गेले असणार. पूर्वीचे अनुभव त्याच्या पाठीशी होते. शर्यत जिंकल्यावर सर्जा-राजाला ओढ लागायची ती आपल्या आईला म्हणजे शांतला भेटायची आणि ते दोघे जितक्या वेगाने धाऊन शर्यत जिंकायचे, त्याच्या दुप्पट वेगाने घरी परतायचे. जणू त्यांना ही आनंदाची बातमी आपल्या आईला म्हणजे शांताला द्यायची घाई असायची. त्यानंतर तिने भरवलेला भाकर तुकडा व मायेने पाटीवरून फिरवलेला हात व कौतुकाचे बोल हेच त्यांच्यासाठी जगातील कोणत्याही बक्षीसापेक्षा मोठे भासत असावे.

      आज सदाला ही आनंदाची बातमी शांताला कधी एकदा देतो, असे झाले होते. कारण, इतक्या पैशातून शांताचे ऑपरेशन तर होणार होतेच, पण तो आपली गहाण टाकलेली जमीनही परत मिळवू शकणार होता.

      सदा धावत पळत घरी आला. अंगणात येऊन पाहतो, तर सर्जा-राजा जमिनीवर कोसळले होते आणि शांता त्यांना कवटाळून रडत होती. त्यांना अशा अवस्थेत पाहताच सदानेही टाहो फोडला. त्याने सर्जा-राजाला कडकडून मिठी मारली. सर्जा-राजाच्या डोळ्यात समाधानाचे भाव भरून उरले होते. आपण जनावरे असूनही ज्यांनी आपल्याला पोटच्या मुलांप्रमाने मायेने वाढवले, त्यांच्या मातृ-पितृ ऋणातून मुक्त झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरपसरले होते आणि आपल्या मुलांना अशा अवस्थेत पाहून आक्रोश करणाऱ्या सदा आणि शांताचे चेहरे सर्जा-राजाच्या टपोऱ्या उघड्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. जणू ते मृत्यूनंतरही आपल्या आई-वडिलांना डोळे भरून पहात होते.

 

 

 

 


Rate this content
Log in

More marathi story from Santosh Patil

Similar marathi story from Action