Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudev Patil

Drama Horror Others

2.5  

Vasudev Patil

Drama Horror Others

रसवंती

रसवंती

7 mins
1.1K


      थंडी उतरू लागली तशी बालेवाडी लवकर डाराडूर होऊ लागली. आज ही साडेदहाही वाजले नसतील तितक्यात महादेवाच्या पारावरची एकेक डोकी कमी होऊ लागली.नदीघाट चढून गावाकडं अश्विन महिन्याची थंडी झड गावात घुसू लागली तशी सारीच लवकर पेंगू लागली.नदीपल्याड मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या साखर कारखान्यावर रात्रभर गजबज ऐकू येत होती. ईस्ना, तिरमल, सखा, बापू शिर्के अजुनही गप्पात रंगले होते. महादेवाच्या मंदिरातला दिवा वाऱ्याच्या झ्योतानं हालत होता तर मारुतीच्या देवळातील घंटीही टिणीणीण टिणी,टिणीणीण टिणी वाजत होती. राम मंदीराच्या मागून दोन काळ्या मांजरी भांडतच महादेवाच्या मंदीराकडं गुरगुरु लागल्या.तसं बापूनं पारावरनं खाली उडी घेत अंधारात चाचपडत दगड उचलून शिलकीतली शिवी हासडत त्यांना नदीकडं उसकावलं. मांजरी तरी गुरगुरतच होत्या.पुन्हा जोराचा दगड भिरकावल्यावर त्या नदीकडं सरकल्या.

 "आता दिवाळी येतेय,सुखाची जावो बापू!नी या काय भोरभोट्या गुरगुरताहेत?",ईस्ना बैठक चाळत पुटपुटला.

"अरं ईस्ना बा त्या गज्जनसेठ सारख्याच या मांजरीपण मातल्यात बघ!तो कुठून बिकानेरहून येतो नी चार वर्षात दुकानाचं बस्तान बसवतो काय!नी आता टोलेजंग बंगला ही बांधून होतोय!दणकेबाज घरभरणी ठेवणार आहे व आख्ख्या बालेवाडीला गावपंगत देणार आहे!नी आपण पिढ्यानपिढ्या गप्पा ठोकत महादेवाच्या नी मारतीच्या पारावरच्या मांजरीच हुसकावणार!" तिरमलनं संपत आलेल्या बिडीचा पुरता जीव घेत कश ओढत चुरगाळत सुनावलं.

"हे मात्र मुद्याचं बोलला तिरमला तू!पहा पठ्यांनो ! त्या बहाद्दराला ,पुरी बालेवाडी चावडीच्या त्या घरात दुकान थाटायला नाही म्हणत होती तरी त्यानं मोठं घर व मोक्याची जागा म्हणून एकाचंही ऐकलं नाही व त्याच चावडीत दुकान टाकलं",बापू उडी मारत पारावर बसतांना म्हणाला.

"अरं बाप्या!गाव त्याच्या भल्यासाठीच नाही म्हणत होतं त्याला.कारण गजा,शालू व बबन शेठची ती घटना घडून एक वर्षही उलटलं नव्हतं"ईस्नाबा जांभई देत म्हणाला.

"अरं भावांनो पण त्या वेळेस चावडीवर कुणी फिरकायला तयार नसायचं तिथं त्याच बबन सेठच्या दुकानाच्या घरातच दुकान टाकायला ही जिगर कलेजा लागतो ,काहीही म्हणा.आता त्यानं शहरातून कुटुंब ही आणलं.बंगल्याला शेवटचा हात मारणं सुरू आहे.शिवाय दुकान वाढवण्यासाठी लागुन असलेलं गजाचं घरही त्यानं आजच उघडलं. दुपारी त्या घरातील रसवंतीचं गजाचं मशीन त्यानं बाहेर अंगणात काढतांना मी स्वत: बघितलं" , सखा अंगावरची गोधडी पांघरत म्हणाला.

"अरं पण त्या गजाचं व शालूचं असं नको घडायला होतं.नी त्या निष्पाप कोवळ्या गिट्टूला पाहतांना तर सारं गाव हळहळलं होतं!नी तो गजा ही याच पारावर तळतळत न्याय मागत होता पण...."

तोच बापूनं साऱ्यांना हातानं इशारा करत चूप बसवत मारुतीच्या देवळाकडं पहायला इशारत केली.

मारुतीच्या देवळात सावली लांबत बाहेर येत होती पण कुणीच दिसत नव्हतं.सखा घाबरून गोधडी सावरत उठला. तोच नदीच्या घाटाकडनं जोराचा थंड वारा घोंगावत पाराकडं आला.पारावरची वडा-पिंपळाची झाडं घिरट्या घेऊ लागली.पानात सळसळ उठली व वरून वडाची जुनाट सुकलेली डहाळी कडकड आवाज करत पारावर धप्पकन पडली.सारी भांबावून उठली व आपापल्या घराकडं 'आजपर्यंत पारावर असं विचीत्र कधीच घडलं नाही'असं आपापसात बोलत सुसाट निघाली.

परततांना त्यांना मात्र गज्जन तातेडच्या नविन बंगल्यासमोर शहराच्या रस्त्याकडनं एक जीप येऊन थांबल्याची दिसली.रात्री अकराच्या आसपास?एरवी त्यांनी थांबून चौकशी केलीच असती पण घाबरली असल्यानं ते तसेच पुढे निघाले.

   गज्जन तातेड दिवाळी जवळ येऊ लागली तशी घाई करत होता.घरभरणीच्या मुहुर्तापर्यंत सारी कामं उरकणं महत्वाचं होतं.बंगल्याचं रंगकाम व पिओपीचं काम तेवढं बाकी होतं तर दुकानाजवळचं दुसरं घरही त्यानं ग्रामपंचायतीकडनं भाड्यानं घेत त्यातील सामान बाहेर काढत त्याचं तळ घेणं, भिंतीला गिलावा करण्याचं काम त्यानं आजच सुरू केलं होतं.पण गावातील पाणीपुरवठा करणारी बोअरची मोटार जळाल्यानं गाव विहीरीवरनं फक्त पिण्याचच पाणी येत होतं.गज्जनला तर पाण्याची आवश्यकता होती.म्हणुन दुकानामागील झाकून बंद केलेला आड उघडून छोटी मोटार टाकून पाणी काढायचं त्यानं ठरवलं नी नेमके पिओपी करणारे राजस्थानी कारागीर जीपनं त्याचवेळी आले.त्यांना शहरातून जेमतेम ठरवलं होतं .खेड्यात कामाला यायला ते तयारच नव्हते.पण आपल्या राजस्थानचा माणूस अशी ओळख दाखवून व हवी ती मजूरी देत त्यानं त्यांना बोलवलं होतं.त्याची गाडी अकराला आली.त्यांना जेवू घालत कामास लावलं.पण पुढच्या भागात आताच आलेली घरची मंडळी असल्यानं माणसांनी मागच्या भागाचं काम सुरू केलं.बारा वाजता त्यांच्या कामास सुरुवात झाल्यावर गज्जन शेठ आड उद्याच उघडू असा विचार करत झोपला.

 पिओपी करणारे कारागीर पटापट आपलं काम करू लागली.एक दोनच्या सुमारास कारागीर काम करत आहेत पाहून ठेकेदार ब्रिस्टाॅल पेटवत बाहेर आला.जिना उतरत मागून साईडनं बंगल्याच्या पुढच्या अंगणात आल्यावर त्याला समोर शेठचं बंद दुकानघर असलेली जुनी चावडी दिसली.नविन ग्रामपंचायतीचा बोर्ड ,दक्षिणेची गाव दरवाज्याची कमान,तिच्यापुढील बस स्टॅण्ड, पूर्वेचा गाव दरवाजा, मंदीरं ,पार सारा परिसर बल्बाच्या पिवळ्या प्रकाशात जणू थंडीनं कुडकुडत असल्याचा जाणवला.त्यानं कश ओढत पाराकडं जाणं पसंद केलं.गाव दरवाज्याचं तळ घडलेल्या दगडांनी फरसबंद केलेलं होतं.तेथूनच रस्ता घाटात उतरत असल्याचं दिसताच पुढं नदी असावी,आपण नवीन म्हणुन तो पाराजवळ थोडा थांबला.तोच त्याला चावडीकडून छन छन व गर्रर्र्र्र सुर्र्र्र्र असा आवाज कानावर पडला.त्यानं मागं वळून पाहिलं तर चावडीसमोर रसवंतीचा चरखा सुरु दिसला व त्याच्या चाकावरील घुंगराचाच तो आवाज येत होता.त्याला आश्चर्य वाटलं.आपण आताच तिकडणं आलो तेव्हा काहीच कसं दिसलं नाही?

तो पाराकडून रसवंतीकडं निघाला.शेठच्या बंगल्याच्या तिरकसच असलेल्या दुकानाच्या अंगणात एका कुबडीच्या आधारानं दोन्ही पाय नसलेला माणुस त्याला दिसला.

"भाईसाहब चाय मिलेगी क्या?",ठेकेदारानं विचारलं.

"ही रसवंती आहे ऊसाचा रस मिळेल इथं!चहा कशाला?"कुबडीवाल्यानं तुटकपणे सांगितलं.

"अरे भाईसाहब,इतनी ठंड मे,वो भी रात के दो बजे गन्ने का रस कौन पियेगा?"

"बरोबर तुमचं,पण आमची रसवंती पण बंदच होती !आजच सुरू करतोय म्हणून लवकर उठून तयारी करतोय?आमची शालु गेलीय आडावर पाणी घ्यायला".

"अच्छा !अच्छा!,वहिच मै सोच रहा था की इतनी रात रसवंती कैसे सुरु!आज तुम शुभारंभ कर रहे हो तो पहला कस्टमर मैच बनता हू!एक गिलास पिला ही दो".

कुबडीवाल्यानं चरखा सुरु करत ऊस पिळत ग्लास भरला .ठेकेदार पाहतच होता.त्याच्ये पाय गुडघ्यापासुन नव्हते .तो संथपणे हालचाली करत होता.रस पिऊन त्यानं खिशातनं दहाची नोट काढली तोच तो कुबडीवाला बाहेर निघाला.

"अरे भाईसाहब किधर चले?ये रस के पैसे तो रखो!"

ठेवा तिथंच,मी आडावर चाललोय शालूकडं"सांगत तो कुबडीवाला चालता ही झाला.

ठेकेदारानं दहाची नोट तिथंच ठेवत तिच्यावर ग्लास ठेवत जाणाऱ्या कुबडीवाल्याच्या तुरकणाऱ्या चालीकडं पाहत राहिला व नंतर बंगल्यावर परतून ताणून दिली.

सकाळी नऊला उठून त्यानं तोंड धूत कामाची लाईन लावली व शहराकडं दुसऱ्या साईडवर जाण्याचं ठरवलं.तो बंगल्याच्या पुढे येत जाता जाता गजन शेठला भेटायला दुकानाच्या पायऱ्या चढू लागला, तोच त्याला अंगणात धूळ खात पडलेला चरखा दिसला.तो गपकन थांबला व मागे परतला.

रात्री आपण इथंच ऊसाचा रस प्यालो तेव्हा इथं स्वच्छता होती व हा चरखा सुरू होता ,जवळच ऊसाची थप्पी होती नी आता आपण काय पाहतोय, यावर तर किती तरी वर्षांपासून हा बंद असावा इतकी धूळ?कसं शक्य आहे हे?तो चक्रावलाच.

तो गजन शेठला भेटून 'काम सुरू है,मै दुसरी साईड पे जा रहा हू' सांगत रजा घेऊ लागला.पण तरी न राहवून त्यानं गजनशेठला विचारलंच.

"शेठ,आंगण मे पडा चरखा रात मे सुरू होता है क्या?"

"नही.रातमेच क्या कभी भी नही.मैने बाजू का मकान कल ही खोला.उसमेसे कल ही निकालकर उसे बाहर रखवाया.लेकीन क्यू ?"

ठेकेदाराला जोराचा धक्का बसला ते ऐकून.आपण रात्री रस प्यालो,ती रसवंती, तो कुबडीवाला?ते सारं काय होतं मग?"पण तरी त्यानं सारं मनात ठेवत,"कुछ नही दोपहर मजदुरो को चाय ,रस पिने के लिये यु ही पूछ रहा था"सांगत तिथून तो सटकला व पुन्हा बंगल्यात येत कारागिरांना काही सुचना केल्या.

"जल्दी से सारा काम निपटालो.मै अभी यहा नही आ पाहुंगा दुसरी साईडसे!लेकीन कोई भी हालत मे रात को बंगलेसे बाहर पाव मत रखना!मेरी बात पक्की दिमाख मे ढाल लो"

कारागिरांना वाटलं हा ग्रामिण भाग असल्यानं ठेकेदार काळजी घेतोय.म्ह णून त्यांनीही माना डोलवत कामास लागले.ठेकेदार नंतर बालेवाडीत परतलाच नाही पण शहरात जाऊन त्यानं गन्ने का रस, कुबडीवाला, शालू या विचारानं अंथरूणच पकडलं. काम झाल्यावर कारागीर परत आले पण पैसे घेण्यासाठी देखील त्यानं बालेवाडीचं नाव काढलं नाही.

  कामाच्या धांदलीत गजननं ठेकेदाराकडं लक्षच दिलं नाही.व तो दुकानामागील चावडीच्या पाच वर्षापासून बंद आड खुला करायला निघून गेला. माणसाकरवी त्यानं गवत साफ करत त्यावरील माती ,पाट्या, टाटाची पत्रे बाजुला केली.जुन्या काळातला बांधलेला आड त्याला दिसला.तिथं आड आहे हे त्याला लोकांनीच सांगितलं होतं. त्यातलं पाणी मातलेलं, शेवाळलेलं होतं.पण दुकानाजवळच्या घराचं तळ व गिलावा घेण्यासाठी त्याला तेच पाणी श्रेयस्कर वाटलं.त्यानं टिल्लू मोटार सोडत पाणी सुरू केलं. गावातल्या गवंडींना बोलवत काम सुरू झालं.पाच वर्षापासून बंद घरात हवा जाताच,पाणी मारताच कुबट वास हळूहळू जाऊ लागला. पोट दरवाज्यातून दुकानातले गिऱ्हाईक काढत गजनशेठ कामावर लक्ष ठेवू लागला. संध्याकाळ होताच माणसांनी काम आटोपतं घेतलं.गजननं त्यांना जेवणं करून रात्रीही येण्यास सांगितलं.पण त्यांना त्याघरात किती भयंकर घटना घडलीय हे माहित असल्यानं त्यांनी फक्त हो म्हणत काढता पाय घेतला.गजननं पोट दरवाजा लावत त्या घराचा दरवाजा उघडाच ठेवला.रात्री गवंडी आलेच नाही.पण गजन इकडं पिओपी करणारे बाहेर रंगकाम करणारे घरातील कुटुंबात अडकला व तिकडं दुर्लक्ष झालं.आडावरून त्या घरातून नळीनं पाणी बंगल्याकडं येत होतं.रात्री दहा वाजले.

 गजनची साली 'सना'ही पण शहरातून बहिणीसोबत बालेवाडीत दोन दिवसांपूर्वीच आलेली.नितांत सुंदर, लाॅ काॅलेज करणारी.बहिणीच्या बंगल्याच्या गृहप्रवेश कार्यक्रमाची तयारीत मदत करण्यासाठी आलेली.या वर्षी तिचं ही लग्नाचं ठरलेलं.अवखळ मनाची सा‌ली साऱ्या नव्या बंगल्यात मुक्त वावरत होती.गजन ही धावपळीत वेळ मिळेल तेव्हा सालीशी,कुटुंबाशी गप्पा करत होता.दहाला ही सना सहज बंगल्यातून अंगणात आली तर तिला भजे तळल्याचा खमंग वास आला. त्या वासानं तिला सैरभैर केलं.ती वासाच्या दिशेनं चालू लागली व दुकानाजवळच्या उघड्या घरात आली.घरात तळ ओलं,भिंतींचं प्लास्टर ओलं.पण जणू आताच भजे तळले जात असावेत असा खमंग वास येत होता.तीला कळेना वास कुठून येतोय.ती घराच्या मागच्या उघड्या दरवाज्यातून आडाकडं आली.आता वास हळूहळू कमी होऊ लागला.आडाकडं सारा अंधार दाटलेला.फक्त दरवाज्याच्या सरळ रेषेत प्रकाशाची तिरीप कमी कमी होत गेलेली. मागे शेत व नंतर नदीचा काठ.आडावर मोटार घुन्न्न्न ssss आवाज करत फिरत होती.तर शेताकडनं रातकिड्यांचा आवाजही भयाणता पसरत होता.नदीपल्याड दूर साखर कारखान्याची रोशनाई गावाकडं दिसत होती.शहरात राहणाऱ्या सनाला हे सारं अप्रुक वाटत होतं.तोच अंधारात आडावर कुणी तरी बाई उभी असलेली सनाला दिसली.सारं गाव झोपायला आलेलं असतांना ही कोण?

"कोण आहे?"सनानं भीत भीत आवाज दिला.

"मी ! मी शालू, रसवंतीसाठी पाणी घ्यायला आलीय."

सना पुढं तिच्याकडं सरकू लागली.तोच नळीतून निघालेल्या पाण्यानं ओल्या जमीनीवर तिचा पाय सटकला व ती पुढे तोल जाऊन जमिनीवर धप्पकन पडणार इतक्यात आपल्याल्या कुणीतरी सावरलंय हे सनाच्या लक्षात आलं. सनानं उठत पाहीलं तर तीच बाई.

"शहाण्या सवरत्या लेकीनं अनबक जागेवर रात्री-अपरात्री चोपून चापून पाय टाकावा.....!"स्वत:ला शालू सांगणाऱ्या त्या बाईनं अंधाराकडं पाहत सनाला खडसावलं.सनाला क्षण दोन क्षण अंधारी आल्यागत,झापड बसल्यागत झालं. ती उठली पण अंग जड झाल्यागत झालं.ती आता माघारी फिरली.बंगल्यातल्या अंगणात उभ्या गजननं तिला घरातून येतांना पाहताच "सना,तिकडं कुठं गेली होतीस गं ?"टोकलं.

त्याच्याकडं सनानं तिरप्या मानेनं पाहत लाल खडीचा भेदक कटाक्ष टाकला.गजनला वाटलं नवीन बंगल्यात सारी माणसाची,मजुराची गर्दी असल्यानं लघुशंकेला घरामागं गेली असेल व नेमकं आपण विचारलं म्हणून तोऱ्यात घुश्शात परतली.

पण सनाचं तर सारं प्रकरणच विस्कटलं हे गजनलाच काय पण सनालाही माहीत नव्हतं.ती आता विक्रांत म्हस्केला शोधू लागली.....


  क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama