Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

sneha shinde

Drama Tragedy

4.3  

sneha shinde

Drama Tragedy

प्रवास

प्रवास

9 mins
215


अंगणातल्या पारिजातकाची फुलं वेचता वेचता सुधा काकू अगदी भान हरपून गेल्या होत्या. एक एक फूल हळुवारपणे त्या ओंजळीत साठवत होत्या. त्या प्रत्येक फुलागणिक त्यांना कान्हाच्या मुरलीचे सुमधुर स्वर ऐकू येत होते. फुलं वेचता वेचता कधी त्या मुरलीधरात एकरूप होऊन जात हे त्यांचं त्यांनाच कळत नसे. चिमुकल्या हातांनी त्यांच्यासोबत माहीचं एक एक फूल वेचणं आणि त्यांच्या पदराशी तिचं खेळणं सगळं त्यांना अगदी गोड स्वप्नवत भासे आणि त्या परमसुखात काकू अगदी तल्लीन होऊन जात. माहीचं सतत त्यांच्या मागून दुडक्या चालीनं चालणं आणि इवल्याशा हातांनी जवळ ओढणं अगदी आपलं बालपण नव्याने जगत असल्यासारखं वाटायचं सुधा काकुंना. माहीच्या येण्यानं त्यांचं घर अगदी सुखात न्हाऊन निघालं होतं. समीर आणि जान्हवी दिवसभर ऑफिसात असायचे. माहीचं सगळं करण्यात दिवस कसा जायचा कळायचंदेखील नाही. आजी व नातीची छान गट्टी जमली होती. माहीला आंघोळ घालण्यापासून ते तिच्यासोबत बागेत खेळण्यापर्यंत सगळं त्या अगदी हौशीनं करायच्या. माहीला त्यांचा इतका लळा लागला होता की ती एकही क्षण त्यांच्यापासून दूर राहू शकत नव्हती. सुधा काकू थोडा वेळ जरी मैत्रिणींसोबत गेल्या तरी माही रडून घर डोक्यावर घ्यायची. दिवसेंदिवस माहीचं त्यांच्या इतकं आहारी जाणं जान्हवीला काही फारसं रुचत नव्हतं.


घरी आल्या आल्या जान्हवीनं तिचं नेहमीचं पुराण पुन्हा सुरु केलं, "तुझ्या त्या म्हातारीला वृद्धाश्रमात कधी सोडणार आहेस समीर? की मी आता माहेरी निघून जाऊ? तू काही बोलणार पण आहेस की नेहमीप्रमाणेच फक्त माझी बडबड ऐकून गप्प बसणार आहेस?"


समीर शांतपणे सगळं ऐकत होता. काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं. एकीकडे आयुष्यभर खस्ता खाऊन लहानाचं मोठं करणारी आई तर दुसरीकडे जीवापाड प्रेम करणारी बायको. मनात विचारांचं वावटळ सुरु होतं, भावनांचं एकच काहूर माजलं होतं. सुन्न होऊन तो जान्हवीचं बोलणं ऐकत होता. जान्हवीची बडबड सुरूच होती... "तुझ्या त्या आईनं पोरीला अगदी डोक्यावर बसवलीय, दोन मिनिटंसुद्धा तिला सोडून राहायला मागत नाही कार्टी. समीर मी शेवटचं विचारतेय तू तुझ्या आईची व्यवस्था करतोयस की मी माझी बॅग भरायला घेऊ?"


समीरने आपल्या बॅगेतला अर्ज काढून जान्हवीच्या हातात ठेवला आणि सुन्नपणे आतल्या खोलीत निघून गेला. अर्ज पाहून जान्हवीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पटापट तिने काकूंचं सगळं सामान पॅक केलं आणि गाणं गुणगुणतच ती स्वयंपाक घरात शिरली. कधी एकदा सासूबाई येतील आणि कधी मी त्यांना कायमची घराबाहेर काढीन असं झालं होतं तिला.


बागेत माही तिच्या चिमुकल्या दोस्तांसोबत खेळण्यात अगदी गुंग झाली होती. काकू त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारता मारता तिच्याकडे लक्ष ठेऊन होत्या. इतक्यात अचानक अवकाळी पावसाची रिपरिप सुरु झाली. माहीला घेऊन काकू आडोशाला धावल्या. पावसाची रिपरिप आता थोडी ओसरली होती अंधुकशा प्रकाशात माहीला घेऊन काकू घरचा रस्ता चालू लागल्या. माहीच्या निरागस प्रश्नांना उत्तर देता देता कधी त्या घरापाशी पोहोचल्या कळलंदेखील नाही. घरी पोहोचताच काकूंनी पाणी गरम केलं आणि माहीला अंघोळ घालून त्या माजघरात येऊन बसल्या. आता देवघरात जाऊन दिवा लावावा म्हणून त्या उठतात तोच जान्हवीने वृद्धाश्रमाचा अर्ज त्यांच्या हातात दिला. काकूंनी हसतमुखाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे त्या देवघराच्या दिशेनं निघाल्या. देव्हाऱ्यातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे त्या एकटक पाहात बसल्या. बासरी वाजवण्यात तल्लीन झालेल्या मुरलीधराची हसरी मूर्ती त्यांना खूप काही सांगू पाहात होती. सकाळी वाहिलेली पारिजातकाची फुलं आता पार कोमेजून गेली होती. आपल्या आयुष्यचंसुद्धा काहीसं असंच आहे. कधी एखाद्या फुलासारखं बहरलेलं आयुष्य क्षणात निर्माल्य बनतं, देवाच्या चरणाशी असलेल्या फुलांची जर ही अवस्था मग आपली तरी अवस्था याहून निराळी का असावी? शेवटी आपणसुद्धा आयुष्यभर या कान्हाच्या चरणाशीच तर आहोत. आयुष्यभर कुटुंबासाठी जगताना स्वतःचा विचार कधी केलाच नाही. कदाचित म्हणूनच कान्हानं एक वेगळं आयुष्य जगण्याची संधी आपल्याला दिली असावी. मनाशी कसलासा निर्धार करून त्यांनी देव्हाऱ्यातली मूर्ती उचलली आणि माजघरात आल्या. भरल्या डोळ्यांनी त्यांनी माहीकडे पाहिलं. ती धावत काकूंपाशी आली. त्यांच्या पदराला ओढत त्यांना खेळायला घेऊन चालली. काकूंनी तिला जवळ घेतलं. तिला कुरवाळताना डोळ्यातल्या आसवांना त्या थांबवू शकल्या नाहीत. एकदा समीरला डोळे भरून पाहिलं आणि सामान उचलून त्या तडक वृद्धाश्रमाच्या दिशेनं निघाल्या.


"सुधा काकु s s अहो सुधा काकु s s फुलांऐवजी पानच गोळा करताय तुम्ही..." कुसुमच्या आवाजानं सुधा काकूंची तंद्री भंगली. भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकदा कुसुमकडे पाहिलं आणि ओंजळीतील फुलं घेउन त्या कृष्णापाशी धावल्या. डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. माहीच्या आठवणीनं जीव अगदी कासावीस होत होता. पोरीनं काही खाल्लं असेल की नाही या विचारांनी त्यांना गहिवरून आलं.


कान्हा का रे माझा अंत पाहतोयस? का इतकी कठीण परीक्षा घेतोयस? का मला माझ्या सुखापासून वेगळं करतोयस? का? सुधा काकु मोठमोठ्यानं ओरडत होत्या. त्यांना होणारा त्रास पाहून कुसूमचे डोळे भरून आले. ती काकूंचा हात हातात घेऊन त्यांना समजावू लागली. आश्रमातल्या त्यांच्या सगळ्या मैत्रिणी धावत काकूंपाशी आल्या. सगळ्यांनी मिळून त्यांना शांत केलं.


अगदी आठवड्याभरापूर्वीच काकू आश्रमात आलेल्या. तिन्हीसांजेची वेळ, बाहेर कोसळणारा अवकाळी पाऊस, त्यात मधूनच होणारा विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट वातावरणातली भिती वाढवत होता. ओल्याचिंब काकू उराशी कृष्णाची मूर्ती कवटाळून थरथरतच आश्रमाच्या दारापाशी उभ्या होत्या. शरीरासोबत मनदेखील अश्रुंनी भिजलं होतं. कुसुमनं हसतच त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली.


काकूंचा स्वभाव तसा मनमिळाऊ दोनच दिवसात आश्रमातल्या बऱ्याच जणांशी त्यांची छान गट्टी जमली. कुसुमचा स्वभाव तर त्यांना फारच भावला होता, आणि कुसुम पण सतत काकू काकू करत त्यांच्या मागून असायची. आश्रमातल्या बऱ्याच कामात काकू तिला मदत करू लागल्या. हळूहळू तिथल्या माणसांमध्ये त्यांचं मन रमू लागलं. पण रोज सकाळी फुलं गोळा करायला गेलं की काकूंचं मन अस्वस्थ व्हायचं. माहीच्या पायातल्या पैंजणांची छुमछुम, तिचं त्यांच्या पदराशी खेळणं आणि त्यांच्या ओंजळीत एक एक फूल टाकणं सगळं सगळं आठवायचं त्यांना. ती भरली ओंजळ त्यांच्या आयुष्याचं सुख होतं. पण आता तीच भरलेली ओंजळ त्यांच्यासाठी एक जखम बनली होती. मग तासंतास त्या श्रीकृष्णापुढे भांडत बसायच्या, कित्येकदा तिथेच त्यांचा डोळा लागायचा.


 हॉस्पिटलबाहेर समीर अस्वस्थ येरझाऱ्या घालत होता. डोळ्यासमोर तापानं फणफणलेली पोरं आजीच्या नावाचा सारखा जप करत होती. काही दिवसांनी होईल सगळं नीट असा विचार करून समीर आणि जान्हवी स्वस्थ होते. पण आज मात्र माहीची तब्येत जास्तच बिघडली. दिवसभर पोरीनं अन्नाचा कणदेखील तोंडात घेतला नव्हता आणि अचानक संध्याकाळी ती बेशुद्ध होऊन पडली. धावत पळतच समीरनं हॉस्पिटल गाठलं होतं, माहीला ऍडमिट करावं लागलं.


मोकळ्या हवेत समीरला थोडं बरं वाटत होतं. प्रत्येक पावलागणिक विचारांची गती वाढत चालली होती. मनाशीच मनाचं द्वंद्व सुरु होतं. कोणत्या हक्कानं आईकडे धाव घ्यावी? आईला दिलेलं दुःख आठवून त्याची मान शरमेनं खाली झुकली. बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने मनाशी काही ठरवलं आणि तो बाहेर निघाला. वृद्धाश्रम नजरेस पडताच त्याची पावलं जड झाली. आईच्या नजरेला नजर द्यायची हिंमत त्याच्यात नव्हती. भरल्या अंतःकरणाने तो हळूहळू पावलं टाकत गेटजवळ आला. आश्रमाच्या पायरीवर सुधा काकू देवासाठी वाती वळत बसल्या होत्या. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. माहीच्या आठवणीनं त्यांचा कंठ दाटून आला होता. तिला उराशी कवटाळण्यासाठी मन अधीर होत होतं. इतक्यात त्यांचं लक्ष गेटपाशी उभ्या असलेल्या समीरकडे गेलं. समीरनं त्यांच्याकडं पाहिलं. हातानेच काकूंनी समीरला जवळ बोलावलं. त्याला बाजूला बसवून त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवू लागल्या. समीरला हुंदका अनावर झाला. आईला मिठी मारून तो रडू लागला. काकूंनी त्याला शांत केलं. समीरनं झाला प्रकार सविस्तर त्यांना सांगितला. सगळं ऐकून काकू सुन्न झाल्या. माहीच्या काळजीनं त्यांना गहिवरून आलं. घाई घाईनंच त्या समीरसोबत हॉस्पिटलला जायला निघाल्या.


सुधा काकू माहीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत होत्या. माहीची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. माहीचा हात हातात घेऊन त्या रडत होत्या. तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. बऱ्याच वेळानंतर माही शुद्धीवर आली, डोळे उघडून पाहते तर तिची लाडकी आजी तिच्याकडे पाहून हसत होती. माही पटकन उठून आजीला बिलगली, तिला कुशीत घेतल्यावर काकूंनी इतका वेळ रोखून धरलेले अश्रू अनावर झाले. आईच्या गालावरचे अश्रू पुसत समीरने दोघींना मिठी मारली. कोपऱ्यात बसून जान्हवी सगळं पाहत होती. माहीला पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

 

काकूंनी माहिला थोडं खाऊ घातलं. तिच्या आवडत्या परीची गोष्ट ऐकता ऐकता ती झोपी गेली. माहीला अलगद मांडीवरून पलंगावर ठेवत सुधा काकु खोलीच्या बाहेर आल्या. समीर त्यांच्या मागोमाग बाहेर आला. त्यांना अडवत त्यांची माफी मागू लागला. "आई मला माफ कर, आपल्या घरी चल..." काकूंनी समीरकडे पाहून एकदा स्मितहास्य केलं आणि त्या हॉस्पिटलबाहेर पडल्या.


जड पावलांनी सुधा काकू वृद्धाश्रमाच्या दिशेनं चालू लागल्या. मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता. आपलं म्हणण्यासारखं आता त्या घरात त्यांचं काहीच उरलं नव्हतं. आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार एका क्षणात परका झाला होता. चालता चालता मन भूतकाळात रमून गेलं.


घरच्यांच्या विरोधाला न जुमानता काकूंनी जिद्दीनं प्रेमविवाह केलेला. संसार अगदी सुखात चालू होता. प्रेमाचे ते दिवस अगदी बहरलेले होते. समीरच्या जन्मानंतर काका-काकू खूप खुश होते. सगळं अगदी छान चालू होतं. अचानक काळाने डाव साधला. एका अपघातात काकांचा मृत्यू झाला. ऐन तारुण्यात नवरा गेला. समीर अगदी वर्षा-दिड वर्षाचा होता, समोर पूर्ण आयुष्य होतं. ना माहेरचे कोणी सोबत ना सासरचे तरीही काकू खचून गेल्या नाहीत. त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यांच्या एका मैत्रिणीच्या ओळखीने प्राथमिक शाळेत त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. लहानग्या समीरला मैत्रिणीच्या घरी सोडून काकु शाळेत जात. कधी एकदा शाळा सुटेल आणि समीरला डोळे भरून पाहीन असं त्यांना व्हायचं. बघता बघता दिवस सरत होते समीर मोठा होत होता. शाळा मग कॉलेज सगळं छान चालू होतं. काकूंनी त्याला कधीच काही कमी पडू दिलं नव्हतं.


म्हणता म्हणता वर्षे सरली. समीर आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. काकूंची पण शाळेतून निवृत्ती झाली होती. सगळं काही छान चालू होतं. काकू अगदी समाधानी होत्या. त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं. नेहमीच त्या या गोष्टीचं समाधान श्रीकृष्णापुढे व्यक्त करत असत. तासंतास कान्हासोबत गप्पा मारण्याचा त्यांना जणू छंदच जडला होता.

एके संध्याकाळी समीर जान्हवीला घेऊन घरी आला, काकूंनी अगदी हसत हसत तिचं स्वागत केलं. गप्पा छान रंगात आल्या होत्या. इतक्यात समीरने आपल्या आणि जान्हवीच्या प्रेमाबद्दल काकूंना सांगितलं. काकू खुश झाल्या, जान्हवी अगदी चुणचुणीत, दिसायला देखणी सुशिक्षित मुलगी होती. काकूंनी आनंदाने लग्नासाठी परवानगी दिली. काही महिन्यातच थाटामाटात लग्न पार पडलं. जान्हवी सून बनून घरी आली. काकूंनी अगदी तिला मुलीसारखं जपलं, जान्हवी पण काकूंना हवं नको सगळं पाहायची. घर सांभाळून नोकरीवर जायची, तिला संध्याकाळसाठी काकू काही काम बाकी ठेवत नसत. सगळं अगदी छान सुरु होतं. नेहमी मैत्रिणींशी बोलताना काकू जान्हवीचं कौतुक करायच्या. आपली सून अगदी मुलीसारखी माया करते हे सांगताना त्यांचे डोळे पाणावायचे.


एके दिवशी जान्हवीन त्यांना सुखद बातमी दिली आजी होण्याच्या जाणिवेनं काकू अगदी सुखावून गेल्या. समीरच्या लहानपणी त्याला वेळ न देऊ शकलेल्या त्यांचं मन अगदी भरून आलं. होणाऱ्या नातवंडासोबत प्रत्येक क्षण त्यांना पुन्हा अनुभवता येणार होता. पुढचे नऊ महिने काकूंनी जान्हवीला अगदी फुलासारखं जपली. बाळंतपण सुखरूप पार पडलं, छोटीशी परी पाहून काकू अगदी सुखावून गेल्या.


माहीच्या जन्मानं घर अगदी आनंदून गेलं, समीर, जान्हवी, काकू सगळेच खूप खुश होते. माहीच्या मागे दिवस कसा जायचा कळतदेखील नव्हतं. पाच वर्ष कशी गेली कळलंच नाही, दिवसेंदिवस माहीची मस्ती तिचे हट्ट सगळं पुरवण्यात काकू अगदी रमून गेल्या होत्या. आताशा जान्हवीचा स्वभाव खूप बदलला होता. सततची चिडचिड छोट्या छोट्या गोष्टींवर समीरशी होणारे तिचे वाद, जान्हवीवर काढलेला राग सगळं त्यांना असह्य वाटे. कित्येकदा त्यांनी तिच्याशी या विषयावर बोलायचा प्रयत्न केला पण जान्हवी काही तिच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नव्हती. घरातले वाद वाढतच होते. काकूंचं सतत माहीसोबत असणं जान्हवीला खटकत होतं. समीर तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण जान्हवीला कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. समीरची आतल्या आत खूप घुसमट होत होती.


एके दिवशी संध्याकाळी राधा काकू माहीला घेऊन बागेत जायला निघाल्या. कोपऱ्यापर्यंत पोहोचतात तोच त्यांना आठवलं, त्या चष्मा घरीच विसरून आल्या होत्या. दारापाशी येतात तो आतून मोठमोठ्याने भांडणाचे आवाज येत होते. त्या आल्या पावली माघारी फिरल्या त्यांना कळून चुकलं होतं आयुष्याचा पुढचा प्रवास त्यांना वृद्धाश्रमाच्या दिशेनं करायचा होता.


धापा टाकतच काकू वृद्धाश्रमात पोहोचल्या. कुसुमनं पाणी देता देता माहीची विचारपूस केली. सगळं ठीक आहे सांगून काकू आपल्या खोलीत गेल्या. पाटावरचा श्रीकृष्ण स्मितहास्य करत उभा होता, क्षणभर जणू काही आपल्याला तो हिणवतो आहे आपलं सुख हिरावून आपल्यावर हसतो आहे, असं वाटून काकू जोरजोरात ओरडायला लागल्या. रडत रडत त्याला आपल्या दुःखाचा जाब विचारू लागल्या. मूर्तीच्या पायाशी डोकं आपटून घेऊ लागल्या. रडता रडता काकू बेशुद्ध पडल्या. कुसुमने लगेच डॉक्टरांना फोन लावला.


हळूहळू काकूंनी डोळे उघडले. पायथ्याशी समीर हुंदके देत बसला होता. काकू हळूहळू उठून बसल्या. हातानेच समीरला जवळ बोलावलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला जवळ घेतलं. समीर हुंदके देऊन रडत होता. "आई मला माफ कर खूप मोठी चूक झाली माझ्या हातून, प्लिज मला माफ कर..." समीर काकूंना विनवणी करू लागला. काकू त्याला शांत करत होत्या. इतक्यात छोटी माही धावतच आत शिरली, आजीला बघताच धावत येऊन पलंगावर चढण्याचा प्रयत्न करू लागली. कुसुमने तिला उचलून पलंगावर ठेवली, माही आजीला जाऊन बिलगली. जान्हवी दरवाजापाशी उभी होती. आत येऊन बोलण्याचा धीर तिला होत नव्हता. इतक्यात काकूंचं तिच्याकडं लक्ष गेलं. तिच्याकडे पाहून काकू हसल्या तिला जवळ बोलवलं. काकूंचे पाय पकडून जान्हवी रडू लागली. "आई मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. मला माफ करा आई माफ करा..." काकूंनी तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. तिला जवळ घेऊन त्या समजावू लागल्या, "हे बघा बाळांनो चुका सगळ्यांकडून होतात पण त्या वेळेत सुधारणं फार कमी जणांना जमतं. आणि कोणत्याही चुकीसाठी पश्चात्तापाइतकी मोठी शिक्षा नाही. आईचा आपल्या मुलांवर कधीच राग नसतो त्यांच्या सगळ्या चुका ती पोटात घेते म्हणूनच तर ती एक आई असते." काकूंचं बोलणं ऐकून कुसूमचेही डोळे पाणावले.

 

सुधा काकू आपल्या श्रीकृष्णाला उराशी कवटाळून भरल्या डोळ्यांनी आश्रमातल्या सगळ्यांचा निरोप घेत होत्या. माही त्यांचा पदर पकडून त्यांच्या मागे मागे जात होती. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते. वर्षानुवर्षे मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अनेक आजी-आजोबांना काकूंचा हेवा वाटत होता. आज ना उद्या आपलीदेखील मुलं आपल्याला परत घेऊन जायला येतील या विचाराने कित्येक जण आनंदी होत होते. अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन सुधा काकू घरी जायला निघाल्या. माहीचा हात हातात घेऊन त्या आश्रमाच्या पायरीपाशी आल्या. पायरीवर बसून कुसुम रडत होती. काकूंनी तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि हसतमुखाने सगळ्यांचा निरोप घेऊन त्या घरी निघाल्या. आश्रमाच्या गेटपाशी उभी राहून कुसुम त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहिली...


Rate this content
Log in

More marathi story from sneha shinde

Similar marathi story from Drama