Kishor Mandle

Tragedy


4.7  

Kishor Mandle

Tragedy


जल्लाद

जल्लाद

7 mins 1.8K 7 mins 1.8K

जल्लाद

गावाच्या बाहेर जिथे सहसा कोणी येत नाही. तिथे एका जल्लादाचा मुलगा एका पिंपळाच्या फांदीला जाड दोरखंडाने फास बांधत होता. त्याचा मित्र बाजूला बसून हे सगळे पाहत होता. दोघांचे नाव सांगावे असे वाटले पण पुन्हा विचार आला की ही गोष्ट जरा सार्वत्रिक सत्य वाटेल अशी लिहावी. साध्या भाषेत सांगायचे तर गोष्टीला कुठल्या नावाच्या किंवा आडनावाच्या कोंदणात न बसवता सांगता आले तर बघू. लिखाणाची भाषा पण मराठी घेणं हे फक्त माझ्या सोयिकरता. तर नायक आणि त्याचा मित्र सहनायक किंवा सहकलाकार. दोघे फाशीची तालीम करत होते. नायकाने बरोबर आणलेले दगडांनी भरलेले पोते, जे साधारण माणसाच्या वजना इतके होते. फासाची गाठ जशी नायकाच्या वडिलांनी त्याला शिकवली होती, तशीच आहे ही नायकाने खात्री केली. नायकाने फास साधारण एखाद्याच्या गळ्यात टाकल्यानंतर खाली जेवढी जागा उरली पाहिजे तेवढा फास वर नेला. उरलेल्या दोरखंडाचे टोक सहनायकाकडे दिले.

“घट्ट पकडून ठेव, अजिबात जागेवरून हलता कामा नये”

सहनायक आदेश आला तसा दोरखंडाचे टोक ताकदीने घट्ट पकडून उभा राहिला. नायकाने खाली पडलेले सत्तर किलोच्या पोत्याच्या गळ्याजवळ फास आणला. फास व्यवस्थित पोत्याच्या उर्फ कैदीच्या गळ्याशी लावला आणि घट्ट केला. एकदा सहनायकाकडे पाहत नायकाने पोते हाताने उचलले आणि साधारण दोन फूट हवेत उचलले. एकदा सहनायकाकडे पाहिले आणि म्हणाला

“आता जेवढे मी अंतर उचलले आहे तेवढाच दोरखंड ओढून घे आणि मी सोडल्यावर तुला फक्त तेवढाच दोरखंड सोडायचा आहे.”

सहनायकाच्या हाताला घाम सुटत होता. त्याने नायकाने उचलून धरलेले दोन फूट दोरखंड ओढून घेतले. वरचा हात जिथे होता तिथून दोन फुटावर त्याने दुसरा हात धरला. आता नायकाने जसे पोते सोडेल तसे सहनायकाने पहिला हात सोडून दुसरा हात एवढेच अंतर सोडायचे होते. एकदा दोन्ही हाताच्या पकडेवर अंदाज घेऊन मान डोलावून तयार असल्याचा इशारा दिला. नायकाने इशारा समजून पोते सोडले. जसे पोते सोडले तसे पोते खाली आले आणि दोरखंड खाली आला. वजनाने दोरखंड खाली आला आणि पोते फासामधून सुटून खाली पडले. नायक आणि सहनायक खाली पडलेल्या पोत्याकडे पाहून हिरमुसले. वाईट वाटण्याची भावना दोघांच्या चेहऱ्यावर एकसारखी होती.

गेले दोन महिने झाले, हा प्रकार रोज चालू होता. नायकाने हिशोब आठवड्याचा लावला होता. आतापर्यंत आठवड्यातून जास्तीत जास्त चारवेळा फास बरोबर बसला होता. जोवर आठवडाभर फास व्यवस्थित बसत नाही तोवर तालीम चालणार होती. वडिलांनी शिकवलेली कला कुठल्याही गलती शिवाय आत्मसात होत नाही तोवर हे करत राहण्याचा नायकाचा ध्यास होता. सहनायक ज्या बिचाऱ्याचा ह्या कलेशी दुरवरही कोणताही संबंध नव्हता, तो फक्त मित्रासाठी कामातून वेळ काढून ह्या तालमीला हजेरी लावायचा.

नायक त्या दोरखंडातून सुटलेल्या पोत्याकडे पाहत होता. सहनायक निमुटपणे उठला आणि दोरखंड खाली जमिनीवर सोडला. गेले दोन महिने तो रोज नायकाला तो फास बांधताना पाहत होता. इतके दिवस बाजूला उभा राहून तो फक्त सहनायकाची भुमिका वठवत होता. आज का कुणास ठाऊक त्याने पोत्याचे तोंड हातानी धरत फास बांधायला घेतले. नायकाच्या चेहऱ्यावर असलेले उदास भाव नाहीसे झाले. कुतुहलाने तो सहनायक काय करतोय ते पाहू लागला. सहनायक एकलव्या सारखा गुरूने त्याला शिष्य न मानलेले असूनही प्रयत्न करत होता. सहनायकाने फास बांधून एकदा दोरखंड ओढून पकड घट्ट बसल्याचा अंदाज घेतला. नायक नकळत चालत सहनायकाच्या जागी जाऊन उभा राहिला. नायकाने दोरखंड ओढून पोते वर ओढून घेतले. सहनायकाने एकदा नायकाकडे पाहिले. आपण नकळत जागा बदल केली हे त्याच्या ध्यानात आले. नायक उंचीचा अंदाज घेऊन दोरखंड ओढून उभा राहिला होता. दोन हाताच्या पकडीमध्ये गरजेपुरते अंतर ठेवून त्याने पोत्याकडे पाहिले. सहनायक त्याच्याकडे चालत जाऊन बोलला

“थांब, मी धरतो.”

नायकाने एकदा सहनायकाकडे पाहिले आणि त्याच निराकार चेहऱ्याने दोरखंड सोडला. पोते ठराविक अंतर खाली सरकले, आणि फास अगदी योग्य जागी येऊन पोते हवेत लटकले. फास अगदी परफेक्ट बसला होता. सहनायकाने आनंदाने हवेत उडी मारत दोन्ही हवेत नेले. मोठ्याने आरोळी ठोकत नायकाला मिठी मारली. सहनायकाने मारलेल्या मिठीला प्रतिसाद द्यायला त्याने दोरखंड सोडला. पोते जमिनीवर पडले. दोघानी एकमेकाला मिठी मारून दोनतीन गिरक्या घेतल्या. नंतर दोघांनी त्या पोत्याभोवती अगदी लहान मुलांसारख्या ओरडत गिरक्या घेतल्या. सहनायक आपल्याच धुंदीत नाचत होता. नायक त्याला साथ देत होता. नाचता नाचता नायकाच्या मनात विचार आला

“मला अजूनही ज्या गोष्टीत आत्मविश्वास नाही ती गोष्ट ह्याने पहिल्या प्रयत्नात केली. आपण तर देशातील नावाजलेल्या जल्लादाची औलाद आहोत. वडीलांनी शिकवलेला फास ह्याने फक्त आपल्याला बघून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केला.”

अचानक निराशेचे ढग मनभर पसरले. घरात येऊन पडलेली सरकारी चिट्ठी डोळ्यासमोर आली. इकडे अगदी उलट सहनायकाच्या मात्र हे अजून ध्यानीमनीही नव्हते. तो आपण हे करू शकलो ह्याच विचाराने भारावून गेला होता. ज्याला हे मला जमेल असे वाटूनही नाही करता आले त्याची निराशा आणि ज्याला हे जमेल असे न वाटत असताना ते लीलया करून गेल्यावर झालेला आनंद ह्या दोन भावना एकाच वेळी समोर उभ्या होत्या. पण नायकाच्या चेहऱ्यावर जमलेले मळभ अलगद सहनायकाच्या चेहऱ्याकडे सरकले. कारण मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव न टिपता आले तर ती मैत्री कसली! दोघेही घरी निघाले. नेहमी प्रमाणे नायकाने वाटेत सहनायकाला घरी सोडले आणि पुढे निघाला.

जल्लाद त्याच्या शेतावरून घरी परतले होते. वाडवडीलापासून चालत आलेली गोष्ट करत असताना, घरची शेतीसुद्धा सांभाळत होते. वयाची साठी गाठायला एखादं वर्षच बाकी होते. नायकाला घरात आलेले पाहून त्यांनी थरथरत्या हातात असलेला चहाचा कप तोंडाला लावला. चहा कसाबसा पिऊन त्यांनी कप खाली ठेवला. नायक एव्हाना न्हाणीतून हातपाय धुवून बाहेर आला होता. आईने दिलेला चहा घेऊन समोरच्या खुर्चीत बसला. जल्लादाने मायेने हाक मारली

“पुढच्या रविवारी दादासाहेब गावावरून परत येतील, तेवढे ज्वारीची दहा पोती त्यांच्या घरात टाकून ये”

नायकाने मान हलवली

“बरंय टाकेन मी, अ..शेतात काल दुपारी आलो होतो! गडी भेटला, म्हणाला की तुम्ही तालुक्याला गेलेला.”

जल्लादाने मांडी घालत सोफ्याखाली ठेवलेला कागद दाखवला. जल्लादाने सरकारी ऑफिसमध्ये जाऊन वयाचा दाखला दिला होता. तसेच आपण आता फाशीची शिक्षा द्यायला शारीरिकदृष्ट्या अपात्र आहोत असे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे आता सरकारी जल्लादाच्या यादीतून त्याचे नाव वगळले होते. नायक हताश झाला. त्याने तोंडाने चक आवाज काढून तो कागद हातात घेतला. आतला मजकूर वाचून त्याने वर पाहिले. जल्लाद त्याच्याकडेच पाहत होता.

“गेल्या महिन्यात माझ्या कानावर आले की, तु आणि तुझा मित्र रोज वरच्या रानांत असलेल्या पिंपळाकडे जाता”

जल्लादाने सरळ विषयालाच हात घातला म्हणून नायक उगाच आडपडदा न ठेवता बोलला

“फाशीचा सराव करत होतो, मला बऱ्यापैकी जमायला लागलं आहे. तुम्ही अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे होते”

जल्लादाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या हसऱ्या ओठामुळे अजून खोल गेल्या. त्याने नायकाला हात करून बाजूला बसायला सांगितले. नायक बाजूला येऊन बसला. जल्लादाने पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला

“जेव्हा चिट्ठी आली तेव्हाच मी बोललो होतो ना, आता ह्या थरथरत्या हाताने हे काम काही जमायचे नाही. आणि मला आलेली चिट्ठी ही चुकीने आली असणार. माझ्या वयाप्रमाणे मी सेवेतून निवृत्त आहे.”

नायकाला जेवढे माहिती होते त्याप्रमाणे पुढच्या काही महिन्यात मध्य भारतात घडलेल्या एका सामूहिक बलात्काराचे आरोपीना फाशीची शिक्षा मिळण्याची शक्यता होती. म्हणून आधीच देशात असलेल्या सगळ्या जल्लादाना ह्यातीचा आणि शारीरिक दृष्टीने योग्य असल्याचा दाखला पाठवायला सांगितले होते. तसेच स्वतः बदली नात्यातील कोणाचे नाव सुचवायला सांगितले होते. नायकाने मनातली गोष्ट वडिलांना बोलून दाखवली

“तुमच्या जागी माझा जायचा विचार होता.”

जल्लादला ह्याचे कारण आधीच माहीत होते, आणि त्यामुळेच जल्लाद भावुक झाला. नायक पुढे बोलू लागला

“दादाने कॉलेजमध्ये असताना तुमच्या जागी काम करायला नकार दिला, तुम्हाला खूप राग आला होता.. वाईट सुध्दा वाटले. पण मी तेव्हा खूपच लहान होतो. ह्यावेळेस पुन्हा संधी आली म्हणून मनात विचार आलेला की आपण जाऊ. तुम्हाला बरं वाटेल”

जल्लादाने एकदा बायकोचे आनंदाने भरून आलेल्या डोळ्यांकडे पाहिले. आवाजात आलेली थरथर सांभाळत बोलला

“राग तर खूप आला होता तेव्हा! लहानपणी तुम्हाला सहज फास कसा बांधायचा हे खेळत खेळत शिकवत होतो. माझे वडिलांनी तर मला विचारलेही नाही, स्पष्ट फर्मावले की हे काम आले पाहिजे आणि आपण पुढे करत राहिले पाहिजे. काही दिवस खूप राग आला. पण दादा जसा अभ्यासात प्रगती करत होता ते पाहून तक्रारीला जागा उरत नव्हती. मग हळूहळू मेहनत करत तो मोठा झाला. आज मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. मग मनाला कळू लागले की खानदानी कौशल्य शिकले पाहिजे पण तेच करीअर केले पाहिजे असे काही नाही. दादाचा कल वेगळा होता, आणि त्यात त्याने स्वतःला सिद्धही केले. त्यामुळे मला बरं वाटेल म्हणून करू नकोस. तुला ते काम करणे पटले पाहिजे आणि आवडले पाहिजे. अर्थात आपले हे काम करायला आवडते हे चार चौघात सांगू नकोस. तुझ्या आजोबांनी तर आयुष्यभर नातेवाईकात कळून दिले नाही. माझी आजी त्यांना म्हणायची की कुणाला मारण्यासाठी मिळालेले पैसे संसाराला कसे फ़ळतील. आजूबाजूचे लोक काय म्हणतील वगैरे वगैरे.”

नायकाने जल्लादाकडे पाहत विचारले

“तुम्हाला नक्की असे वाटते ना! कारण तुम्हाला आनंद वाटला तर मला आवडेल हे करायला”

जल्लाद पाठीवर ठेवलेला हात खांद्यावर आणत म्हणाला

“तुला माझे मन राखावे असे वाटले तेच मला खूप आहे”

दुसऱ्या दिवशी सहनायक गप्प उभा राहून पाहत होता. नायकाने दोरखंड फांदीवर टाकून खाली ओढून घेतला. पोतं जमिनीवर होते. नायकाने इशारा करत सहनायकाला जवळ बोलावले

“इकडे ये आणि फास बांध कालसारखा”

सहनायक चाचरत मागे सरकला

“नको रे, मी आपला काल सहजच बांधला. तुला वाईट वाटले असेल तर सॉरी रे”

नायक दोरखंडाच्या दुसऱ्या टोकाकडे जात बोलला

“काही वाईट नाही वाटले मला, तू माझ्यापेक्षा ह्या कामात सरस आहेस. मग तू हे करायला काय हरकत आहे. असे काही जरुरी नाही ना, जल्लादाच्या मुलानेच हे काम केले पाहिजे”

सहनायक हसला. पोत्याच्या भोवती फास घट्ट बांधून इशारा केला.

पोते खरकन खाली येत फासात अडकले. लटकत असलेल्या पोत्याला पाहत दोघांचा चेहरा खुलला.


Rate this content
Log in