Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गोविंद ठोंबरे

Tragedy

4.2  

गोविंद ठोंबरे

Tragedy

भोग

भोग

4 mins
27.5K


जना घाबरत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट साफ़पणे दिसत होतं. भेदरलेल्या मनानं तिने चोर पावलाने पुढे येण्याची हिम्मत केली. पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला. कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मग्न असलेला इसम तीच्या डोळ्यासमोर बसलेला तीने पहिला.खाकी वर्दीतला हा इसम देवासारखा वाटण्याचं कारणही तसंच होतं!कपाळाला अष्टगन्ध आणि गळ्यात तुळशीची माळ,नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गळ्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता.जनाने हे हेरलं आणि त्या क्षणी तीने त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं, "साहेब,मी जना! बैतुर गावची हाय मी.माझा नवरा तुमच्या ठाण्यामधी अटक हाय.कुणाला भिटू म्या काय बी कळणा गेलं बगा !" त्या इसमाने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि विचारलं,"नाव काय तुझ्या नवऱ्याचं?" जना पाणावलेले डोळे घेऊन सांगत होती,"सोनबा नाव हाय बगा !" आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकी वर्दीतल्या त्या इसमाने आत बोट दाखवत सांगितलं,"आत मध्ये साहेब बसलेत एक, भिंगरे साहेब नाव आहे त्यांचं त्यांना भेटा तुम्ही.तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहे."एवढं सांगून तो इसम आपल्या कामात मशगुल झाला.जना धन्यवाद देत आत गेली.

थोड्या वेळात कसलातरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या या माळकरी पोलीस इसमाच्या कानावर आला म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला.जना खाली बसून रडत होती आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावर जोराने ओरडत होते.तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर नाहीतर त्याला सडू दे इथेच आम्हाला त्याचं काही एक देणं घेणं नाही म्हणून ताकीद देत होते भिंगरे साहेब!जना त्यांना सांगत होती,"साहेब माह्या गरीब माणसाजवळ कुटून येणार व्ह एवढा समदा पैसा. साहेब माफी द्या हो!माह्या नवऱ्याची काय बी गलती नाय बगा,उगा फशिवलय त्याला!"जना पोट तिडकीने सांगत होती.पण भिंगरे साहेबाला काही एक घाम फुटत नव्हता.उलट ते तिची चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तीला दम देत होते."साहेब!माह्या जवळ ह्या मंगळसूत्रा बिगर काय बी नाय बगा, काय करू मी यकटी बापडी बाय माणूस!"असं म्हणून जना डोळ्यातून धारा गाळत होती.भिंगरेने तिच्याकडे पाहत गर्जून सांगितलं,"नवराच जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का?नसेल होत पैशाची तजवीज तर आन ते मंगळसूत्र इकडे !त्याला मोडून चार पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला.गुन्हेगार कुठला तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून!"असं म्हणत भिंगरे जनेकडे सरकला तशी जनाने गळ्यात हाथ घालून मंगळसूत्र काढलं अन भिंगरे साहेबाला देत म्हणाली,"घ्या साहेब हे!तुमचं बी खरं हाय.काय करू नवराच नसंल जवळ तर!पण माह्या नवऱ्याला काय बी करून सोडा,तुमच्या पाया पडते!"असं म्हणून तीने ते मंगळसूत्र भिंगरे साहेबाच्या हातात दिलं.भिंगरे भ्रष्ट हास्य आणत तिच्याकडे पहात होता तेवढ्यात तो माळकरी खाकी वर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला आणि त्याने भिंगरेच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे दिलं आणि तो रागाने भिंगरेकडे पाहत ओरडला,"भिंगरे ही काय पद्धत आहे तुमची?एका सुहासणीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्ट बुद्धी झाली तुमची?भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर !तुम्हाला झोप तरी कशी येते असं वागून? तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय! यासाठीच का ही खाकी वर्दी घातली होती? कुठे फेडाल हे पाप! ये बाई घाल तुझं हे मंगळसूत्र गळ्यात आणि निघ इथून!एखादा वकील बघ चांगला अन जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा.पैसे नसतील तर मला सांग माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो. नवरा जामीनावर सुटल्यावर त्याची फिस त्याला परत दे!" असं म्हणत तो इसम भिंगरेकडे रागाने पाहू लागला. तसा भिंगरे लाजेने डोळे लपवत तिथून निघून गेला.जनेने त्या भल्या माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला.

या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन आठ महिने झाले होते!आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भावाने उभा होता!तेवढ्यात कोणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला.रांग सोडून हा इसम तिथे गेला अन पाहतो तर काय भिंगरे! एक हाथ लटलट कापत होता,तोंड जरासं वाकडं दिसत होतं अन पाय अतिशय निकामी अन थरथरत होताना दिसत होता!"काय झालं भिंगरे? असं कसं काय झालं? मला तर कल्पनाही नाही या गोष्टीची!"मोठ्या आपुलकीने त्या सद्गृहस्थाने चौकशी केली. बाजूला उभी असलेली भिंगरेची बायको समोर आली."नशिबाचे भोग सगळे! दुसरं काय असणार? यांच्या अंगावरून वारं गेलं! दीड महिने झाले! आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना. काही उरलं नाही जवळ. खूप विलाज केले ,पैसे घालवले पण काही फरक पडला नाही यांना!"असं म्हणत तीने स्वतःचे डोळे पदराने पुसले. भिंगरे पाणावलेल्या डोळ्याने फक्त पहात होता. अन तो सद्गृहस्थ मनात भिंगरेसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनाने तिथून निघून गेला! कर्म कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ कदाचित हेच का??? त्या जनेच्या तळतळणार्या जिवाने तर नाही ना....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy