Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudev Patil

Drama Others

2.2  

Vasudev Patil

Drama Others

फितुर आभाळ

फितुर आभाळ

7 mins
1.1K


  भाग : - दुसरा


           ३


 दुलबा या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता.त्याला आपलं नांदतं गोकुळ आठवू लागलं.

दुलबास संता, धना व बाजी अशी तीन मुलं.थोरल्या धनाचं जनाशी लग्न होऊन जना सुन म्हणुन यमुनाला घर सांभाळण्यास भरभक्कम साथ देत होती.धनानं आपलं शिक्षण आटोपतं घेत सारा राबता सांभाळायला सुरूवात केलेली. नऊ-दहा एकराचं थाळ्यागत तापीकाठाला काळं कसदार रान.विहीर अजिबात न आटणारी.शिवाय खालच्या अंगाला नदीवर आता बॅरेजचं काम सुरू झालेलं.रानात ऊस,केळी कापूस अशी पिकं निघत.शिवाय घराच्या परसात

 गाई म्हशी दुध दुभत्याला होत्याच.सारा गाव दुलबाचा शब्द झेले.दुलबानं गावात स्वत:चा बराच पैसा ओतून नविन विठ्ठल मंदीर उभारलं होतं.गावकरी,गावातील माल खरेदी करणारे इतर ठिकाणचे व्यापारी यांनीही देणगी देत हातभार लावलेला.मंदीराच्या आवारातच दुलबानं पुजारीसाठी व इतर कुणी आलं तर मुक्काम करता यावं म्हणुन भक्त निवास बांधलं.नंतर दुलबानंच गावाला विश्वासात घेत त्या निवासात अनाथ मुलं ठेवली.त्यांच्या जेवणाची सोय गावात वार(माधुकरी) ठरवत केली.त्यांनी मंदिराची देखभाल करत राहावं तर गावानं त्यांच्या जेवणाची व शिक्षणाची सोय करावी.यात दुलबा जातीनं लक्ष देत असे.पदवी झाली की ती मुलं आपापल्या पायावर उभी राहत निघून जात व त्या ठिकाणी दुलबा वारीला गेले की अनाथाश्रमाशी संपर्क साधुन व परिसरातील अनाथ मुलं आणी.हा पायंडा दुलबा व गावाने सतत सुरु ठेवलेला पण आता पुजाऱ्याऐवजी या मुलाकडंच पुजेची सोय सोपली. 

 संताचं बी.पी.एड. झालं. त्याचवेळी गावातील हणमंतरावाच्या मुलीचं-राधाचंही बी.एड झालं.दोघांनी सोबतच जळगावला शिक्षण केलं.हणमंतरावाची परिस्थीती जेमतेम.पण तो पक्का कावेबाज,धूर्त.त्याला दुलबाचं वर्चस्व सहन होत नसे. तो दुलबास कायम पाण्यात पाहत असे.कारण ही तसंच होतं.दुलबानं ग्रामपंचायतीत त्याला पराभूत केलेलं.दुलबाची इच्छा नसतांना गावकऱ्यांनीच जबरीनं दुलबास उभं करत हणमंतरावाच्या भष्ट्राचारी पॅनलला धूळ चारली व हणमंतरावाची राजकीय कारकिर्दच नंतर लयास गेली.दुलबानं मात्र पाच वर्षातच अंग काढत हे आपलं काम नाही असं मनाशी म्हणत दुसऱ्याकडं सत्ता सोपवली.पण हणमंतरावाच्या मनात कायम तेढ राहिलीच.शिवाय मंदिरातही त्याला हस्तक्षेप करता येईना .त्यामुळे तो दुलबाचा कायम खार करी.

 धना व राधाचं सुत जुळलं. हे हणमंतरावास जेव्हा समजलं तेव्हा त्याला मनातल्या मनात खूप आनंद झाला. हणमंतरावाचा स्वभाव माहित असल्यानं दुलबानं आपल्या पोरास परोपरीनं समजावलं.पण धनानं ऐकलंच नाही.नाईलाजास्तव दुलबानं होकार दिला.दोघांचं लग्न ठरलं.दुलबास वाटलं नाते संबंधानं तरी हणमंतरावाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.पण इथूनच हणमंत रावांनी खेळी करण्यास सुरुवात केली.

 हणमंतरावाचे दूरचे नातेवाईक जळगावला होते.त्यांची शैक्ष. संस्था होती.त्या संस्थेत बी.एड.ची जागा निघाली. हणमंतरावाला हे कळताच त्यांनी भेट घेत हातापाया पडत मुलीला लावण्याबाबत विनवलं.आकडा ठरला.पण एवढा पैसा आणायचा कोठून? हणमंतरावांनी सोनेवाडीला येत दुलबास व धनास गाठलं.संस्थेत धनाजीरावाचं काम होतंय व राधा ही तात्पुरती लागेल.नंतर जागा निघाली की राधेचं डोनेशन मी माझा जळगावचा प्लाॅट विकून देईनच पण आताचं धनाजीरावांचं डोनेशन आपण भरा. दुलबाला आकडा ऐकताच घाम फुटला. दुलबानं 'मुलांचा सल्ला घेतो नी मग कळवतो', असं सांगत वेळ निभावली.मंदिरात पैसा ओतला गेल्यानं, शिवाय धना व बाजी दोघांचं शिक्षण ,धनाचं लग्न त्यामुळं हातात काहीच नव्हतं.करावं काय?बाजीनं सपशेल नकार दिला तर संतानं 'कर्ज काढुयात पण धनास लावू' सांगितलं.तिकडे हणमंत रावानं पोरीमार्फत धनाजी रावांना चिथवलं.मी माझा जळगावचा प्लाॅट विकून तुझं डोनेशन भरेन.मग दुलबास डोनेशन का जड जातंय? रात्री राधानं धनास भरलं.

पोरकट धना नव्या नवरीच्या लाडीक किकनं फुणसु लागला.घरात तणफण सुरु झाली.शेवटी संताचाही जोर वाढला.दुलबानं कधी नव्हे एवढं कर्ज सावकाराकडनं जमीन तारण देत उचललं.

 हणमंतरावांनी तोच पैसा भरत पोरीचं काम केलं व नातेवाईकाच्या पाया पडत जावयालाही तात्पुरत्या स्वरुपात अनुभवासाठी लावावयास लावलं.'भले काहीच देऊ नका ,पुढे जागा निघाली तर विचार करा पण तूर्तास जावयालाही कामावर ठेवा'अशी विनवणी केल्यानं नातेवाईक संस्थाचालकानंही फुकट माणुस मिळतंय म्हणून होकार दिला.दिड-दोन वर्ष धना व राधा दोन्ही जळगावला राहत संस्थेत राबू लागले. बऱ्याच वेळी धनाला थोडं थोडं समजे व तो राधेला याबाबत विचारे पण राधा त्याला शांत बसण्यास भाग पाडे.अॅप्रुवल झालं; पण राधेचं! धनाचं होण्याचा प्रश्नच नव्हता.धनाला हे कळताच तो संतापला. त्यानं संस्थाचालकाची भेट घेत जाब विचारला.संस्थाचालकानं त्याला सरळ हाकलून लावत तुमच्या सासऱ्यांनाच विचारा,असं ठणकावलं..इकडं सावकाराचं व्याज वाढु लागलं. दुलबाचं सारं उत्पन्न जाऊनही व्याजही फिटेना .देण्याचा आकडा फुगू लागला.

 धनानं हणमंतरावास जाब विचारताच, धनाला कोपऱ्यात घेत 'तुम्ही लागलात काय नी राधा लागली काय!पगार तर तुम्हीच घेणार. तुमचं ही काम होईल,हे नाही तर दुसरं.काळजी कशाला करता. फक्त मी सांगतोय त्या प्रमाणं ऐका! त्यावेळेस राधासाठी मी पैसे मागितले असते तर तुमच्या घरच्यांनी दिलेच नसते नी मग तुम्ही आजपर्यत सोनेवाडीतच केळीचे बारे धरत राहिले असते!' असा जावयाला कानमंत्र दिला.जो धनाला पटला.

 दुसऱ्या दिवशी धना सोनेवाडीत परतला.दोन चार दिवस उलटून ही धना परतत नाही म्हटल्यावर संतानं त्याला विश्वासात घेत सारा प्रकार काढला व दुलबास कथन केलं.

जागा बीएड ची निघाल्यानं माझं काम झालं नाही.फक्त राधाचंच झालं.मग मी तिथं थांबू नधना खाल मानेनं उत्तरला

 दुलबा सुनेचं काम झालं पण पोरगा घरी यानं सुन्न झाला.कर्ज होऊन ही पोरगा बेरोजगार याचं त्यांना शल्य वाटू लागलं.चार पाच महिने झाले.सुन पगाराचा छदाम ही देईना. बाजीचं डोस्कं भणाणलं.कर्ज वाढतंय, भाऊ घरी नी वहिणी तर पगाराचं नाव काढत नाही.तो घरात धना, दुलबाशी वाद घालु लागला.धना मात्र काहीही न बोलता संता सोबत शेतात निघून जाई.संतानं सबुरी घेत बाबास हणमंतरावाची भेट घ्यायला लावली.

"हणमंतराव !काय करावं?कर्जाचा आकडा फुगतोय.तरी ते माझं मी पाहिन पण धना व सुन चार महिन्यांपासून अलग राहत आहेत हे चांगलं नाही."दुलबा काकुळतीनं बोलत होता.

"दुलबा!पोरीला तर इथं येता येणार नाही!हे धनाजीरावास समजायला हवं.तुम्ही म्हणत असाल तर मी राधाला कायमचंच बोलवतोहवं तर.पण सोन्याचा घास मिळालाय बघा!धनाजीरावांनी तिथं जळगावला रहायला काय हरकत आहे? वादावादी घराघरात चालते.इतका बाहू करायचा नसतो"हणमंतराव 'मेरीच टांग उपर ' या आविर्भावात बोलला.

".....",दुलबाला काय बोलावं कळेना.

"धनाजीराव जळगावला गेले की नाही नोकरी तर काही तरी धंद्याचं पाहतो हवं तर!फक्त करायचं म्हणुन मीच काय काय करायचं तुम्ही पण....!"हणमंतराव तिरक्या नजरेनं दुलबाचा अदमास घेत बोलला.

"आरं हणमा पण आता आणखी आम्ही काय करावं"दुलबा कळवळला.

"नाही मला तसं नाही म्हणायचं पण माझा प्लाॅट आहे जळगावला लहान्या मिरेच्या लग्नाकरता ठेवला होता .हवं तर तो देतो त्यांना.बांधावा त्यांनी व मस्तपैंकी दुकान थाटावं"

"आरं पण बांधनं म्हणजे पैसा?"

"आता तुमचंही बाप म्हणुन पोरासाठी काहीतरी.... विका थोडी फार जमीन..."

"हणम्या तोंडच फोडीन!जमिनीचं नाव काढलं तर!नी तु मला बापाचं कर्तव्य शिकवतोय का!याच बापानं विस लाख मोजले विसरला का?"दुलबा जागेवरनं उठत त्वेषानं बोलत हणमंतरावावर चालुन गेला.

"दुलबा शांत व्हा मला तसं नव्हतं म्हणायचं.पण आपण काही जमीन मजा करण्यासाठी नाही विकणार.धंद्यात पडण्यासाठी विकणार.आता शेतीत काय राम राहिलाय.पिढ्या खपल्या पण आपण आहोत तिथंच आहोत.उलट हाच पैसा धद्यात अडकवला व जम बसला तर दोन चार वर्षात करोडपती होतंय माणुस!"

"करोडपती होण्यासाठी वतन विकणारी अवलाद नाही मी" दुलबा रागानं बोलला.

"पहा पटलं तर घ्या माझा सल्ला,नाहीतर एवीतेवी काही वर्षानंतर व्याजात जमीन घालवुन बसाल व मुलं ही रिकामी राहतील" असं सांगत हणमंतराव चालते झाले.

दुलबा पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत घराकडं माघारला.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच दुलबानं तिन्ही पोरांना एकत्र बसवत चर्चा केली.

"धनास दुकान टाकण्यासाठी मदत द्यावी की काय?कसा उभारायचा पैसा?"

"बा, व्याज फुगतंय.शेत काहीही करुन विकावंच लागेल.नुसतं उत्पनानं कर्ज फिटणं मुश्कील आहे."संतानं समजदारी व शहाणपणाचा मार्ग सुचवला.

"बा!त्या पेक्षा धनादादानं वहिणीस कर्ज काढायला लावलं व बाकी जमीन सोडता येईल.दुकानाचं तात्पुरतं स्थगित ठेवू" बाजीनं तोड काढली.

"आरं धना बोल तू पण काही?"दुलबा म्हणाला.

"राधा ऐकेल असं वाटत नाही"

"का ऐकणार नाही?वीस लाख भरलेत तेव्हा तर नोकरी मिळाली? शिवाय आपण कर्ज काढलं तर वहिणीनं ऐकायलाच हवं"बाजी संतापला.

धना हमरी तुमरीवर आला.

त्यांना शांत करत संता बोलू लागला.

"बा!शेत तर विकावं लागणारच .मग थोडं जास्त विकू .कर्ज फेडुन धनाला दुकान थाटून देऊ.मग नंतर जम बसला की घेता येईल जमीन परत"

"जो धना आताबाईला कर्ज काढायला सांगू शकत नाही तो दुकान चालल्यावर मदत करेल याबाबत दुलबा साशंकच होता.त्याला बाजीचं बोलणं पटत होतं.तर संता भाऊ धनाला मदत करु पाहत होता.

"संता दादा ,पस्तावशील.तुझ्या पोराबाळाचा ही विचार कर"बाजी तीळ तीळ तुटत म्हणाला.

"बाजी तुला समजत नाही.तू शांत बस.धनाला उभं करणं व त्यांचा तुटणारा संसार जोडणं या घडीला महत्वाचं आहे"संता बाजीला समजावू लागला. या गदारोळात यमुनाबाईचा रक्तदाब कमी होऊ लागला.त्यांना तातडीनं धनासोबत जळगावला हलवलं.धनानं जळगावला राधा व हणमंताची भेट घेत सारं सांगितलं.बाजी ही दुखरी नस दाबण्यासाठी हणमंतरावांनी राधाला काही सांगितलं.परत येतांना राधा आठ दिवसाची रजा टाकून सासु सोबत आपली बहिण मिराला घेऊन सोनेवाडीला आली.हणमंतराव ही आले.

 हणमंतरावांनी संताजीस विश्वासात घेत चार एकर शेत विकण्यासाठी राजी केलं .राधा आपल्या बाजी दिराला समजावू लागली.मिराची लुडबुड वाढू लागली.हणमंतरावांनी दुलबास व बाजीस विश्वास पटावा म्हणुन मिरा बाजीस देण्यास कबुल केलं.तरी दुलबा तयार होईना.संता आता दुलबाशी बोलेनासा झाला.यातच यमुना बाईचा रक्तदाब पुन्हा कमी होऊन त्यांनी श्वास सोडला.पण दुलबाकडंनं पाणी घेतांना पोरांच्या आड येऊ नका असं वचन घेऊनच त्यांनी शेवटची घटका मोजली.

तर्पण होताच बाजीला बाजुला ठेवत हणमंतरावांनी रांजणेवाडीच्या शिंद्यांना दुलबाचं चार एकराचं रान विकलं.आधीचं कर्ज फेडून हणमंतराव व धनानं सारी रक्कम परस्पर जळगावला नेली.चार एकर जे बाजीच्या व काही संताच्या नावानं खाते फोड झाली होती तीच जमीन विकली.दुलबा यमुनाच्या वचनात अडकल्यानं एक शब्द ही बोलला नाही.बाजीनं संताला कोपऱ्यात नेत हवं तर माझ्या नावावर असलेलं विक दादा पण तुझ्या नावावरचं विकू नको" हे परोपरीनं विनवलं.पण संतानं मनावर घेतलंच नाही.

पुढच्या पंधरा दिवसात पैसे पाहताच हणमंतरावानी प्लॅन बदलवत प्लाॅटवर भव्य माॅलचं बांधकाम सुरू झालं.

 पाच एकरात संता राबू लागला.बाजीचं मनच उखळलं.दुलबा यमुनाबाई गेल्यानं व आपल्या हयातीत वतन विकल्याचा बट्टा लागल्यानं खचू लागला.आपल्या छोट्या नातवांना घेऊन ते विठ्ठल मंदीरातच वेळ घालवू लागले.

माॅलचं बांधकाम होताच धना व राधा सोनेवाडीकडं फिरकेनासे झाले.हणमंतरावांनी व धनाने उद्घाटन करत माॅल सुरू केला.पण संता ,बाजी व दुलबासही बोलावलं नाही. बाजीनं राडा केला.पण व्यर्थ.आता हणमंतराव पुढच्या तयारीला लागला.रांजणेवाडीच्या शिंद्यांचा मुलगा रंजन व त्यांचं ऐश्वर्य त्याच्या मनात भरलं होतं .शिवाय दुलबाचं चार एकर रान त्याच्याकडंच होतं.म्हणुन हणमंतरावांनी सौदा केल्यादिवसापासुनच दाणे टाकावयाला सुरवात केली होती.खरेदी होताच मिराला बाजीला भेटायला मना करत रंजनशी ओळख वाढवली. रंजन ही जळगावला वारंवार येऊ लागला.हणमंतरावांनी मिराची सोईरीक रंजनशी पक्की केली. मिराच्या लावण्यावर फिदा रंजननं आपल्या बापास हणमंतरावाची ऐपत पाहुच दिली नाही.ही वार्ता सोनेवाडीस जाताच मनात द्वेश असुनही मिरा बाबत साफ्ट काॅर्नर ठेवत फुलू पाहणाऱ्या प्रितीनंही आपणास चंदन लावुन हळद मात्र दुसऱ्याची लावत फितूरी केल्यानं बाजी बिथरला.त्यानं जळगाव गाठत राधा, मिरा हणमंतराव या साऱ्यांचा रंजनसमोर दारू पिऊन चौकात बॅंड वाजवला. रंजन मध्ये पडू लागताच रंजनच्या कानाखाली असा काही आवाज काढला की दिवसा त्याला तारे दिसू लागले.


   क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama