गोविंद ठोंबरे

Inspirational Tragedy


3  

गोविंद ठोंबरे

Inspirational Tragedy


पोरका

पोरका

2 mins 16.7K 2 mins 16.7K

उन्हाची आज खूप रखरख वाटत होती. सूर्य अगदी आग ओकत तापला होता. जणू तो खूप रागावला असावा कोणावर तरी!अंगाची अगदी लाही लाही होत होती. जमिनीच्या अंगाला भेगा पडून ती खूपच निर्जीव अवस्थेत दाह फोडत असावी अशी दिसत होती. कुठेच चितपाखरू दिसत नव्हतं. पाखरांनी कदाचीत झाडांच्या कुशीत विसावा घेतला असावा. वाऱ्याची तप्त झुळूक मधूनच यायची.जसं काही वाऱ्याचं भान गेलं आहे की काय आणि ते उगीच रानमाळावर भटकायला निघालं आहे असं जाणवत होतं! एवढ्या जालीम उन्हात भानू मामा धोतराचा कोचा खऊन झप झप पावलांनी कुठेतरी वाट फोडत निघाला होता.घामानं कुडत्याला वास सुटला होता आणि डोक्याचा मळकट गमजा भानू मामाचं डोकं आवळून गप गुमान भानू मामाच्या वाटेकडे बघत सोबत निघाला होता. कदाचित त्याला काहीतरी माहीत असावं! मामाच्या पायात पायतान होतं पण ते खूप जीर्ण झालं होतं.भानू मामाची दरिद्री बोंब मारून सांगत होतं ते! भानू मामा लगबगीने वेग वाढवत पायात अवसान आणून पुढे चालतच होता. पुढच्या वळणावर तो वळण घेऊन अजूनच वेगाने निघाला.

थोड्याश्या अंतरावर पोहचल्यावर भानू मामा एका आंब्याच्या झाडाकडे निघाला.झाड जवळ करत त्यानं झाडाच्या खोडाला मिठी मारली अन ओक्साबोक्सी रडायला चालू केलं. भानू मामा का रडत आहे काही समजतच नव्हतं!खोडाला पाठ देत मामा रडतच खाली बसला. आपल्या कोरड्या पडलेल्या गळ्यावर हाथ फिरवत भानू मामानं स्वतःचीच समजूत काढावी अशी भावनिक नजर दिली.डोळे मिटवून भानू मामानं खोडावर डोकं टेकवलं.अन दोन्ही हाथ गुडघ्यावर टेकवून भानू मामा मोठयाने श्वास घेऊ लागला. "आवं कारभारी!ह्या आंब्याच्या रोपाला जरा पाणी घाला की,ह्य आंब्याचं रोप आपल्या लेकरावानी हाय बरं का!ह्याची निगा राखायला पायजी तुमी. मी असले नसले तरी ह्यो झाड तुमाला माजी याद दिईल ! देवानं माज्यासारखी बांज बाई तुमच्या गळ्यात घातली आन एकादं लेकरू वटीत घ्याव मनलं तर आपल्या दरिद्र्याच्या पदरात कुणी लेकरू बी देत नाई. त्या बिगिर आपण ह्य झाड पोसू बगा..आपल्या लेकरावानी! हाईच आपल्या जवळ एवढा अर्ध्या यकराचा तुकडा त्यात ह्य झाड जोपासू बगा." मेलेल्या बायकोचं सगळं बोलणं आठवत होतं भानू मामाला. भानू मामाचं खूप प्रेम होतं बायकोवर!कधी गरिबीला कंटाळली नाही भानू मामाची कारभारीन.भानू मामाच्या खांद्याला खांदा देऊन तीनं कष्ट केलंही आणि सोसलंही! पण कधी तक्रार नाही केली.पण त्याच दारिद्र्यानं तीचा जीव घेतलाच!अन भानू मामाला तीच्या आठवणी देऊन तीनं कायमचा सुटकारा घेतला.

" अय भानू ह्यच झाड हाई का रं? ह्यच तोडायचं हाई नं? या आवाजाबरोबर भानू मामा भानावर आला."व्हय !ह्यच हाई!"एवढंच बोलून भानू मामा बाजूला सरकला. इतक्यात झाडावर जोरात कुऱ्हाडीचा घाव बसला अन भानू गपकन खाली बसला! डोळे पाणावले होते मामाचे! डोक्यावरचा गमजा तोंडावर ठेऊन मामा गप गुमान पहात राहीला. एका एका घावाबरोबर झाड कोसळत गेलं अन भानू मामाचा जीव पण तीळ तीळ तुटू लागला.कुणाचं तरी देणं होतं अन ते गळ्यापर्यंत आलं होतं म्हणून बायकोच्या आठवणींचा घोट घ्यावा लागला भानू मामाला ! भानू मामा मयतीला आल्यासारखा बसून राहीला आणि झाडाचं खांडकं पडेपर्यंत डोळे विस्फारून पाहत राहिला! मामा आता मात्र खरंच पोरका झाला होता!


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design