Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Drama

2  

Suresh Kulkarni

Drama

किस्सा रघ्याचा

किस्सा रघ्याचा

11 mins
1.3K


दुपारची उन्हं करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. 'धंद्याच्या' दृष्टीने त्यांचा हा 'भाकड' पिरेड होता. त्यामुळे ते दोघे 'सुख -दुःखाच्या' गप्पा मारत असावेत असे, पाहणाऱ्यांना वाटत होते आणि ते खरेही होते. ज्यास्त कमाई (विनासायास) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.

 

रघ्या दोन दिवसांपासून पप्याच्या मागे लागला होता. 

"पप्या, यार, तेव्हड ते, 'मामा'शी सेटिंग करून दे ना!" आज चौथ्यांदा रघ्याने विनंती केली. 

"रघ्या, साल्या, तुला माझ्या 'इलाख्यात', माझा फंडा नाय चालवता येणार!"

"कबूल!, पण तेव्हड सेटिंगच बघ!"

"पहिल्या, कमाईची 'चपटी' मंगता! आसन मंजूर तर बोल!"

"देतो, ना यार, तुझ्यापेक्षा काय 'चपटी' ज्यास्त हाय काय?"

"तस नाय! पण काय की, एकटी असली की व्हिस्की पोटात उगाच उड्या मारती, म्हणून आपुन दारूच्या बाद चिकन घेतो! आखरी तीनशे-एकशेबीस, गिलकत्ता, कलकत्ता पट्टीचं पान अन् पाचशे पंच्चावनचा धूर!"

उगाच नाय, या पप्याला 'भिकारी लाईनीत', 'पाप्या' म्हणत! नरकात जाईल! नुस्ता ओरबाडत असतो. 


"पप्या, मायला, तू काय म्हणशील ते कबूल!!" रघ्याने पप्याच्या सगळ्या आटी मान्य केल्या. त्याला कारणही तसेच होते. चार-पाचशेची कमाई, हजार-दोन हजारांवर जाणार होती! पप्याचा फंडा होताच तसा! फक्त त्याला लोकल पोलिसांची (म्हणजे 'मामा'ची) साथ गरजेची होती. त्याचा एकदा 'हिस्सा' फिक्स झाला की झालं! एकीकडून पोलिसांचं 'अभय' अन् कमाईची खात्री! 

"रघ्या, हे सेटिंग माझ्या 'मामा'च्या मध्यस्तीनं होणार, आता आमची भागी साठ-चाळीसची, म्हणजे शंभरातले साठ माझे! आता नव्या 'मामाचं' काय ठरल ते तुझं तू बघ! बरं, तुझा एरिया कोणचा? सेटिंगला त्या एरीयाचा 'मामा' हुडकावा लागंल, म्हणून विचारतोय!"


रघ्या थोडा विचारात पडला. 

"पप्या, आपल्याला वडगावचं रेल्वे स्टेशन चाललं! रात्री दहा-वीसच्या लोकलने घरी जाता येतं!"

"ठीक! मग ठरलं! उद्याच आमच्या लालू मामाच्या कानावर घालतो. चार-दोन दिवसांत कळवतो तुला."

तेव्हड्यात शिट्या मारीत एक ट्रेन स्टेशनात शिरली. रघ्या लगबगीने 'धंद्या'साठी बायकांच्या डब्ब्यात घुसला!

                                                                       ००० 


चार-सहा दिवसांनी रघ्या, पप्या अन् हवालदार लालू सिव्हिल ड्रेसमध्ये वडगावच्या रेल्वे स्टेशनला उतरले. 'सिव्हिल ड्रेस' मधे रघ्या अन् पप्या ओळखू येत नव्हते. जीनच्या पँटी अन् टी शर्टात ते अप-डाऊन करणाऱ्यापैकीच वाटत होते. हे 'भिकारी' आहेत यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. लालूने ऐटीत मोबाईलवर एक नंबर मारला. 

"हा, आम्ही आलोत. एक नंबरच्या टी-स्टालवर ये!"

पप्याने नजरेने रघ्याला खूण केली. रघ्या गुमान टी-स्टॉलकडे सरकला आणि चार चहाची ऑर्डर दिली. 

समोरून एक कद्दूसारख्या गरगरीत ढेरीचा, पोलीस डुलतडुलत आला. 

"दगडू, काल तुला बोललो होतो, तो हा रघ्या!" रघ्याने अदबीने नमस्कार केला. दगडूने रघ्याकडे एक नजर टाकली, अन् पुन्हा लालूच्या बोलण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. 

"नीट पाहून ठेवा दगडूशेठ, उद्या भिकाऱ्याच्या वेशात जवळ आला तरी कळायचं नाही बेनं!" रघ्या कसनुसं हसला. आपल्या विनोदावर आपणच मोठ्याने हसत लालू म्हणाला, 

"लालूबा, ते तुमचं फिफ्टी-फिफ्टी नाय जमायचं. आपल्याला साठ पाहिजेत! बकऱ्याला ढोस आम्ही द्यायचा, बोलाचाली आम्ही करायची! हे बेनं नुस्तं पोट दाबून नाटक करणार! जमत असलं तर थांबा नसता निघा!" समोरच्या चहाच्या कपाला हात घालत दगडू कठोर आवाजात म्हणाला. लालूने रघ्याकडे अपेक्षेने पाहिले. रघ्याने मुंडी हलवली. तशी पप्याच्या पोटात कळ आली. उद्यापासून लालूमामा पण चाळीसऐवजी साठ घेणार होता! 

"मग ठरलं का?" लालूने रघ्याला पुन्हा विचारून खुंटा बळकट केला. 

"ज्यास्त होतात, पण ठीक आहे!" रघ्या कबूल झाला. 

दोन्ही हवालदार टी.ए.- डी.ए., नाईट शिफ्ट, असली अगम्य सरकारी भाषा बोलत निघून गेले. पप्या मात्र गहन विचारात बुडाला होता. तो मनातल्या मनात माहितीतले सगळे बार पालथे घालत होता! पार्टीसाठी बारची निवड करणे सोपी गोष्ट नव्हती! शेवटी त्याने 'लैला' फिक्स करून टाकले!

                                                                     ००० 


आळीसारखी सरपटत ती पॅसेंजर ट्रेन वडगाव स्टेशनच्या, दोन नंबरच्या प्लॅटफार्मवर थांबली. कोणत्या तरी ट्रेनचे क्रॉसिंग असावे. आता आर्धा-पाऊण तास निवांत कारभार होता. गाडीतले लोक पाय मोकळे करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर निर्हेतूक फिरत होते. काही जणांनी चहाचा स्टॉल जवळ केला. खरं म्हणजे दुपारचा एक वाजलेला होता. पण 'चहा' हे स्टेशनवरील टाइमपासचं साधन. जेवणवेळ होती. गाडीच्या डब्ब्यात, बरेच जणांनी दशम्याची गाठोडी सोडली होती. पाणी बाटल्यावाल्यांची लगबग सुरु झाली. रुखवताच्या ताटासारखे, डोक्याच्यावर तळहातावर तोलून धरलेली भजी, सामोसा विकणारे डब्या-डब्ब्यातून फिरत होते. सगळ्यांचा धंदा तेजीत होता. 

रघ्या पण तयारीतच होता. गुडघ्यावर फाटलेली कळकट मळकट पँट, फाटकी भोकपडकी बनियन, विस्कटलेले भीस्स केस, चेहऱ्यावर दुनियाभरची लाचारी थोपलेली, रघ्या भिकाऱ्यांचा 'शहेनशाह' दिसत होता! त्याच्या दाढीच्या खुंटातून चेहऱ्यावरचे उपाशी-तापाशी भाव तर टपकत होते! त्याला पाहून पाहणाऱ्याच्या मनात फक्त एकच भावना येत होती, ती म्हणजे 'दया!' 

"मायबाप, चार दिवसाचा उपाशी हाय! शिळा-पाका तुकडा द्या गरिबाला! दुवा लागन तुमाला! तुमची लेकरंबाळं सुकात रहातील!" अशी भावनिक साद घालत, तो प्लॅटफॉर्मवरून रेल्वेच्या खिडक्यांतून आत डोकावत होता. 

"आहो! द्या हे, त्या भिकाऱ्याला!" खिडकीच्या तोंडाशी बसलेल्या आपल्या नवऱ्याला ती बाई म्हणाली. 

"नको! ती भाजी-पोळी कालची आहे!" नवऱ्याने  विरोध केला. 

"म्हणूनच द्या! कालची असली तरी चांगली आहे. सकाळीच त्यातलीच, आपण पण खाल्ली की! घरी पोहोचेपर्यंत भाजी विटून जाईल. मग फेकूनच देणार ना आपण! त्यापेक्षा भुकेल्याच्या मुखात जावू देत ना! " बायकोला विरोध करण्यात अर्थ नसतो, इतपत ज्ञान असलेला तो असावा. त्याने पटकन होकारार्थी मुंडी हलवली. 

"ये, बाबा!" त्याने खिडकीच्या आडव्या गजळीला तोंड लावून पुढे जाणाऱ्या रघ्याला आवाज दिला. रघ्या त्या खिडकीजवळ आला. 

"लई दुवा लागन तुमाला! चार रोज झाले, उपाशी हाय! अन्नाचा कन पोटात गेला न्हाय! देव तुमचं भलं करो!" रघ्या, ते पोळी-भाजीचं बोचक त्या नवऱ्याच्या हातून घेताना बडबडत होता, पण नजरेने त्या जोडप्याचे निरीक्षण करत होता. बाईच्या हातात पाटल्या, गळ्यात बोरमाळ, मंगळसूत्र, तर माणसाच्या उजव्या हाताच्या बोटात दोन आंगठ्या होत्या. दोघांचे कपडेही  झकपक होते! मालदार वाटत होते. 

रघ्याने त्या खिडकी समोरच्याच, फलाटावरल्या सिमेंटच्या बाकड्यावर बसून ती भाजीपोळी खाल्ली! ती खरंच चवदार होती. बाजूच्या नळाचं पाणी गटागटा पेला. सहाजिकच त्याचा तोंडावर, खाऊन तृप्त झाल्याचे भाव उमटले होते. तर खिडकीतल्या बाईच्या चेहऱ्यावर, 'माझे कसे, नेहमीच बरोबर असते!' हा तोरा दिसत होता! ती त्या नजरेने आपल्या नवऱ्याकडे पाहात होती. तेव्हड्यात काहीतरी बिनसले. रघ्याला खळखळून उलटी झाली! पाण्यात दगड पडल्यावर तरंग उठावा, तसे रघ्याच्या जवळपासचे लोक पांगले. पण तेथेच कोंडाळं करून, रघ्याभोवती उभे राहिले. काही कार्ट्यांनी मोबाईल खिशातून बाहेर काढले! रघ्या दोन्ही हातानी पोट आवळून, गडबडा लोळू लागला! तोंडाने 'मेलो, मेलो रे देवा! वाचिव!'चा टाहो तो फोडत होता! बघे वाढत होते! तसा रघ्या ज्यास्तच चेकाळला. जोर खाऊन रडू लागला. 

"या बाबानं काय देलं ठाव नाय! घास पोटात गेला अन् अंगार पडली पोटात!" बघ्यांची शंभर टक्के सहानभूती रघ्याकडे वळली होती. ते पोळीभाजी देणारे जोडपे तर पार हादरून गेले होते. असे कसे झाले हे त्यांच्या आकलनाच्या बाहेर होते. 

"बाजू! बाजू!" हातातला दंडुका जमिनीवर आपटत, एक डुबरा पोलिस कुठूनतरी उगवला. त्याला पाहून रघ्याचा जीव भांड्यात पडला. तो दगडू हवालदार होता!

"काय, तमाशा चाललंय? काय भानगड आहे?" दगडूने कमावलेल्या पोलिसी आवाजात विचारले. 

"अहो, काय झालंय माहित नाही. त्या गाडीतल्या माणसाने या भिकाऱ्याला काहीतरी खायला दिले, त्याने ते खाल्ले, एकदम त्याला उलटी झाली! 'मेलो! मेलो!' म्हणून हा भिकारी तडफडतोय! तेव्हड्यात तुम्ही आलाच!" कोणीतरी हवालदाराला माहिती पुरवली. 

"ओ साहेब, खाली या!" दगडूने त्या माणसाला गाडीतून खाली उतरून घेतले.

"हे पहा तुम्ही समजदार दिसताहात! या भिकाऱ्याला एखाद्या दवाखान्यात न्या! याचा इलाज करा!" लोकांनी 'बरोबर आहे!' अश्या माना डोलावल्या. 

"अहो, आम्हाला गावाला जायचंय! माझे वडील आजारी आहेत! नाही-नाही मला ते इलाजाचं जमायचं नाही हो!" तो माणूस पार गर्भगळी झाला होता. 

"काय? नाही जमायचं?" दगडू डाफरला. त्याने खिशातली मेणचट पॉकेट डायरी काढली. बॉलपेन उपसून काढले. 

"हूं, नाव ?" त्या माणसाला दमात घेत म्हणाला. 

"अहो, पण कशाला?"

"बोलतो तेव्हडा सांग!" दगडू एकेरीवर आला. 

त्याने सांगितलेले नाव डायरीत लिहून घेतले. 

"पत्ता? खरा सांगायचा! पोलिसांशी चालबाजी नाय करायची!"

त्याने पत्ता सांगितला. 

"फोन? मोबाईल अन् लँडलाईन दोनी!"

त्या माणसाला आता विरोध करणेही जमेना. 

"मायला पळा! काय तमाशा आहे का कोणी नागवं नाचतंय?" दगडूने दम भरला तसे बघे पांगले, तरी दुरून जमेल तसं पाहात होते. 

तो माणूस आता रडण्याच्या बेतात होता. लोहा गरम है! मार दो हातोडा! दगडूने आपला जडशीळ हात त्या माणसाच्या गळ्यात टाकला. 

"हे बघ, सालं, हे लफडं झालंय! या भिकाऱ्याच्या जीवाचा प्रश्न आहे! खरंतर मला पंचनामा करून, पोलिस केस करावी लागणार आहे! मागच्याच आठवड्यात एक भिकारी असाच मेलाय! आत्तापर्यंत दहा-वीस व्हिडिओ मोबाईलवर झाले असतील! त्यात तू, मी आणि तो भिकारी सगळेच असतील! तवा विचार कर!" दगडूने ठासून बार भरला!

"अरे देवा! हवालदार साहेब, तुमच्या पाया पडतो! काहीही करून यातून सोडवा हो, मला !" त्या माणसाने संपूर्ण शरणागती स्वीकारली. 

"ठीक! दहा हजार दे! घेतो मिटवून!"

रघ्याची बोंबाबोंब बंद होती, तरी तरफडणे चालूच होते. त्याचे सारे लक्ष दगडू'मामा' कडेच होते!

"अहो, मी साधा शिक्षक माणूस! इतके पैसे नाहीत हो माझ्याजवळ!"

"नाहीत? नसायला काय झालं? नायतर मर, कोर्टात खेटे घालत!"

"असं काय करता? प्रवासात, इतकी रक्कम कोण बाळगतं?"

"वा! मग असं कर, हाताच्या बोटातल्या दोन्ही आंगठ्या दे!" दगडूने शेवटचा घाव घातला. त्या माणसाला नाही म्हणायला जागाच नव्हती! सगळी सूत्रं दगडूच्या हाती एकवटली होती! 

तो माणूस हातातली आंगठी काढण्याच्या बेतात असताना कोणीतरी तेथे आल्याचे दोघांनाही जाणवले. 

"काय हवालदार? काय झालंय?" विचारणारा रापलेल्या चेहऱ्याचा, धिप्पाड, टकला माणूस होता. 

"क- काय नाही! आमचं जरा खाजगी बोलणं आहे!" कसेबसे दगडूच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. खरेतर त्याची दातखीळच बसायची बाकी होती! मायला हे खविस इथं कसं तडमडलं? 

"अहो, या भिकाऱ्याला मी भाजी पोळी दिली. त्याने ती खाल्ली. त्यानंतर त्याला त्रास होवू लागला. हे हवालदार म्हणतात की या भिकाऱ्याचा औषधोपचार करा, नाहीतर पोलिस केस करतो!  मी कसा करू? माझेच वडील आजारी आहेत, म्हणून गावी निघालोय!" त्या माणसाने त्या टकल्या माणसाला सांगितले. तेव्हड्यात गार्डची शिट्टी झाली, गाडी काही क्षणात निघणार होती! तो माणूस हवालदिल झाल्याचे दिसत होते. 

"मग, काय करू हवालदार साहेब?" त्याने अजीजीने विचारले. हवालदार गप्पच उभा! 

"जावा तुम्ही! मी पाहतो त्या भिकाऱ्याला. करतो ऍडमिट! चांगला तपासून घेतो, अन् इलाजपण करतो! त्याची नका काळजी करू! आपला प्रवास सुखाचा होवो!" त्या टकल्याने जवाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. गाडी वेग घेण्याच्या बेतात होती, त्या माणसाने पळत जाऊन गाडी पकडली. 

                                                                      ००० 


तो टकलू माणूस राघ्याजवळ आला. 

"काय होतंय तुला?"

"साहेब, ह्या इथं असलेल्या लोकांनी पाहिलंय, त्या माणसाने जे खायला दिलं ते मी खाल्लं, अन् मला उलट्या सुरु झाल्या!"

"काय झालं होतं, नाही विचारत! मी विचारतो काय होतंय?" त्याने कठोर शब्दात विचारले. 

"उलट्या होतात. पोटात दुखतंय, चकरा येताय!"

"अजून?"

"अजून? अजून पोटात आग होतीय! या हवालदारास इचारा की! यांनी पण पाहिलंय! बोला की हवालदार!" रघ्या कळवळला. ह्या दगडूमामाला काय झालंय कोणास ठाऊक? भाडखाऊ मुसळासारखा मख्ख उभा आहे! दातखीळ बसली की काय याची? हाता-तोंडाशी आलेलं 'बकरं' खुशाल सोडून दिलं? का?! दगडू कसला बोलतोय? समोर साक्षात गुप्ता साहेब होते! सिव्हिल ड्रेसमध्ये!! 

"हूं, हवालदार, याच्यासाठी स्टेशन बाहेर 'ऍम्ब्युलन्स' घेऊन आलोय! तेव्हा घ्या याला! टाकू करून भर्ती!" 

'ऍम्ब्युलन्स?' रघ्या सावध झाला. काहीतरी गडबड झाली होती. हा टकलू कसा ऍम्ब्युलन्स घेऊन आलाय? अन् हा हवालदार, का असा मुडद्यासारखा झालाय? रघ्याचे लक्ष्य त्या टकल्याच्या बुटाकडे गेले. लाल पोलिसी बूट! झटक्यात रघ्याची ट्यूब पेटली, हा बहुदा 'मामा'चा 'बाप' असावा! वरिष्ठ अधिकारी!! आणि म्हणूनच मामाची जीभ लुळी पडली होती!

"तुमासनी तरास कह्यापायी, साहेब? आता, मले बरं वाटतंय! मी जातो! रामराम हवालदार साहेब!" रघ्या घाईत उठून सटकू पाहात होता. पण गुप्तांनी एका ढांगेत रघ्याची गचांडी धरली. 

"आता कुठं पळतुस? तुझं अजून चेकप करायचंय! चांगला भर्ती करून घेतो! तुझा 'हा, खाल्लं की उलटायचा' रोग मुळासकट बरा होईल!" गुप्ताने त्याला तसेच, फरफटत स्टेशन बाहेरच्या पोलिस व्हॅनमध्ये नेवून पटकला. दगडू हवालदार पाय ओढत आला आणि व्हॅनमध्ये बसला. 

                                                                       ००० 


गुप्ताची व्हॅन पोलिस स्टेशनासमोर थांबली. बाहेरच्या वऱ्हांड्यात बसलेला दत्तोबा खाड्कन उभा राहिला. काम फत्ते झालंय, हे त्याने गुप्ता सरांच्या ऐटीत चालण्यावरूनच ताडले. 

"दत्तोबा, पाहुणा आणलाय! त्याला ऍडमिट करून घ्या! मी आलोच!" रघ्याला दत्तोबाच्या हवाली करून, गुप्ता चौकीत घुसला. पाठोपाठ खाली मुंडी घातलेला दगडू पण होता!

दत्तोबाने रघ्याचे बखोट धरून त्याला कोपऱ्यातल्या 'स्पेशल' कोठडीत नेले. त्या अंधाऱ्या कोठडीत एक ट्रकचे जुने टायर, एक लाकडी ऐसपैस टेबल आणि कोपऱ्यात तेल लावून ठेवलेले चार सहा चकचकीत लाकडी दंडुके होते! रघ्याच्या पोटात गोळा उठला! बोंबला! आता काय आपली खैर नाही! हे पोलिस आपल्याला टायरमध्ये घालून कुचून काढणार, या बद्दल त्याच्या मनात शंका उरली नाही. 

"काय रे तुझं नाव?" दत्तोबा दरडावून विचारलं. 

" र...रघु!"

"रघ्या! हा गुप्ता साहेब म्हणजे एकदम हैवान आहे! तुला कळलंच म्हणा! दया-माया त्यान्ला माहित नाही! मरस्तोर मारत्यात, दवाखान्यात नेवून इलाज करून आणत्यात, अन् पुन्हा मारत्यात! खरं बोलस्तोवर! टोले खाऊन बोलण्याऐवजी, पटापटा, पोपटासारखं बोलून टाक! खरंखरं सांगून टाक, त्यात तुझंच भलं आहे!" अनुभवाचा गुटका पाजून दत्तोबा कोठडीबाहेर पडला. जाताना त्याने कोठडीचं दार ओढून घेतलं. 

पाच-दहा मिनिटांत तो गुप्ता नामक हैवान खाड्कन दरवाजा उघडून आत आला. रघ्याकडे ढुंकूनही न पाहाता त्याने कोपऱ्यातील एक दंडुका हातात पेलून बघितला आणि मग तो रघ्याकडे सरकला. 

"नका, साहेब नका मारू!" रघ्याने भोकाड पसरले. 

"ऑ! अजून तर सुरवात पण नाही! तोवर बोंबलायला सुरवातपण केलीस?"

"नका मारू साहेब, सांगतो! सगळं खरं सांगतो!"

"हूं! सांग पटापटा! लक्षात ठेव खोटं बोललास तर..." लाकडी टेबलच्या कोपऱ्यावर बूड टेकत गुप्ता बोलले. 

"खरं तेच सांगतो! साहेब मी गरीब माणूस! माझं नाव रघ्या. भीक मागून पोट भरतो! माझ्या दोस्ताला माझ्यापेक्षा जास्त भीक मिळायची. मी त्याचा फंडा पाहिला. तो कोणी काही खायला दिलं की खायचा, मग ओकायचा, पोट दाबून गडबडा लोळायचा, 'मेलो, मेलो' म्हणून कल्ला करायचा, अन्नातून विषबाधा झाल्याचं नाटक करायचा!"

"मग?"

"मग, सेटिंगवाला पोलिस यायचा, खायला देणाऱ्या माणसाला दमात घ्यायचा, 'केस' करतो म्हणून घाबरवून सोडायचा."

"मग?"

"'मिटवाय'चं म्हणून पैसे उकळायचा! तो पोलिस अन् माझा मित्र पैसे वाटून घ्यायचे! त्यांच्याच मदतीने मी या दगडू हवालदाराचं सेटिंग करून घेतलं होतं! अन् फसलो बघा "

"असं लफडं आहे का? रघ्या, मायला चांगला हट्टाकट्टा आहेस! भीक का मागतोस?"

"काय करू साहेब? सगळेचजण हेच विचारतात! कोणी नोकरी देत नाही! नुस्त्या कोरड्या चौकश्या!" रघ्याचा स्वर कडवट झाला. गुप्ताला जाणवले. 

"घरी कोणकोण असत?"

"मी, आई, अन् माझा सात वर्षांचा मुलगा, चंदू .

"बायको?"

"चंदूच्या बाळंतपणात मेली!"

"बाप!"

"तो पण मेला! कॅन्सरनं! माझी एक किडनी विकून इलाज केला, पण नाही जमलं!"

"रघ्या, किती शिकलास?"

"काडी लावा त्या शिक्षणाला! काय उपयोग झाला नाही! बी.ए. झालोय!"

"उद्यापासून या चौकीबाहेरच्या शंकर मुंडक्याच्या चहाच्या टपरीवर काम देतो! फार नाही पण पोटापुरतं मिळेल! करशील?"

रघ्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने गुप्ताचे पाय धरले!

"माय-बाप, उपदेश करणारे खूप भेटले, अन्नाला लावणारे मात्र तुम्हीच! करीन मी ते काम!! लाचारीने भीक मागण्यापरीस कितीतरी बरं!"

"अन् हे बघ, आमच्या दत्तोबाचे अक्षर गिचमिड आहे. माझं काही लिखाणकाम कर, जमेल तसं देत जाईन !"

रघ्याला बोलताच येईना. तो फक्त रडत होता! मगाचा हैवान आता त्याला फरिश्ता वाटत होता!

                                                                          ००० 


अर्ध्या तासाने रघ्याच्या कोठडीतून गुप्ता साहेब बाहेर आले. आपल्या खुर्चीत बसून त्यांनी दत्तोबाला आवाज दिला. 

"दत्तोबा, त्या भिकाऱ्याच नाव, गाव, पत्ता लिहून घ्या, अन् द्या त्याला सोडून!"

ताटकळलेल्या दगडू हवालदाराला हायसे वाटले. बरे झाले, बहुदा केस नोंदवून न घेण्याचं गुप्ता साहेबांनी मनावर घेतलं असावं! 

रघ्या अंग चोरून कोठडीतून बाहेर आला, आणि गुप्तासाहेबाना हात जोडून नमस्कार घालून निघून गेला! गुप्तांनी आपला मोर्चा दगडूकडे वळवला. 

"दगडू हवालदार, काय केलंत? आणि का ?"

"नाही म्हणजे साहेब! आता तुमच्यापासून काय लपवायचं? आपल्या पगारात नाही भागात..."

"म्हणून भिकाऱ्यासोबत भागी? लोकांना अडचणीत आणून पिळवणूक? ब्लॅकमेलिंग का म्हणू नये याला?"

"म्हणजे... जरा चुकलंच माझं !!" दगडूला कळून चुकलं होतं की नरमाईनं घ्यावं लागणार. 

"मग, आता?"

"आता, सगळं तुमच्याच हातात! तारा नाही तर मारा!"

"दगडू! या मोबाईलच्या जमान्यात काम करणं मोठं अवघड झालंय! तुम्ही त्या माणसाला दहा हजार नाहीतर आंगठी मागत असल्याची व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ आलीय!"

"ऑ! कोणी शेण खाल्लं?" दगडू पुटपुटला!

"शेण खात होतात ते तुम्ही! मीच केलाय तो व्हिडिओ! रेल्वेत भिकाऱ्यांचा त्रास होतोय, अशा तक्रारी होत्या! त्याच्या मुळाशी आपलीच माणसं निघावीत हे दुर्दैव! लाज वाटते तुमची! पोलिस आणि रेल्वेला बदनाम करत आहेत तुमच्यासारखे!"

हे गुप्ताचं माकड तापलंय! याचाही कोणीतरी 'बाप' असलंच की! बघावं लागंल! पण आता तर याच्याच कलान होऊ देत! ही वेळ मारून न्यायला पाहिजे!

"साहेब, माझं रिपोर्टींग नका करू! लहान पोरंबाळं आहेत पदरात! एव्हढी गलती पोटात घाला! रिपोर्टींग झाली तर सी आर मध्ये येईल. म्हातारपणी पेन्शनीला अडकाअडकी होईल! पाठीवर मारा पर पोटावर नका मारू!" 

गुप्ता विचार करत होते. याला शिक्षा करणे महत्वाचे होते. पण त्याचे परिणाम त्याच्या बायकापोरांना भोगावे लागणार होते. चार्ज शीट-चौकशी याचा फेरा पडला तर अवघड जाणार होते. बरे याला माफ केले तर, हा पुन्हा तेच करणार! पक्का कोडगा आहे! काय करावे?

"दगडू! ही माझ्या कारकिर्दीतली तुझी पहिली चूक आहे, मी ती तूर्तास बाजूला ठेवतो, बंद करत नाही! दुसऱ्या वेळेस मात्र तुला वाचवणार नाही! मी आहे तोवर तुला एकच शिक्षा, पब्लिकच्या संपर्काची ड्युटी कधीच मिळणार नाही! "

"जी, तुम्ही म्हणाल तसं!" 

खाली मान घालून दगडू तोंडातल्या तोंडात पुटपुटला. वर्ष-दोन वर्ष त्याची 'वरकमाई' बंद होणार होती!

गुप्तांनी मोबाईल उचलला. व्हाट्सअपवर कोणीतरी 'पोलिसांच्या तावडीतून एक देवमाणसाने केलेली सुटका.' हा रेल्वेस्टेशनवरचा रघ्याचा प्रसंग शेयर केला होता. त्यात शेवटी...त्या देव माणसाचे थँक्स मानण्याचे राहूनच गेले!', अशी खंत व्यक्त केली होती. 

गुप्तांनी कन्ट्रोल रूमशी संपर्क साधला आणि 'कोणत्याही भिकाऱ्याला अन्न किंवा खायला देऊ नये, अडचणीत येण्याची शक्यता असते!' हा संदेश सर्व जनतेस कळवण्याची व्यवस्था केली. 

तो मेसेज तुम्हालापण मिळाला असेलच म्हणा...


Rate this content
Log in