अनाथाची दिवाळी
अनाथाची दिवाळी
कशी होईल दिवाळी
अनाथाच्या रे घरात
दशा पाहून तयाची
भरे धडकी उरात ।।
मागे रस्त्यावर भीक
रोज भरावया पोट
कधी काळी मिळायची
एक रुपयाची नोट ।।
नाही कधीच गावला
हाती त्यांच्या रे फटाका
सण मोठा दिवाळीचा
शर्ट अंगात फाटका ।।
कशी पेटेल पणती
माझ्या अनाथाच्या दारी
माय बाप ऊसतोड
नाही दिवाळी साजरी ।।
फडामधी ऊसतोडी
गावी फराळाचा वास
त्यांच्या मुखाला रे कधी
नसे दिवाळीचा घास ।।