घड्याळ सांगे....
घड्याळ सांगे....
घडी सांगे मनुजास
ऐक माझी बात खरी
कुणासाठी ना थांबतो
यंत्र निर्जीव मी जरी
टिक टिक करुनिया
देतो करून स्मरण
वेळ ना थांबतो जरा
जातो पुढे क्षण क्षण.
आयुष्याचा डाव जणू
दोन घडीचाच खेळ
लावा सार्थकी जीवन
नको उगा अवमेळ.
जाई उडून भरारा
वेळ कापरासारखी
घेई उपयोग खरा
सुज्ञ तो रत्नपारखी.
असो कोणी राजा रंक
वेळ नाही कोणासाठी
होती दिन आणि रात
याच कालचक्रापाठी.
दिले मोल किती जरी
वेळ नाही मिळणार
तोच होईल यशस्वी
वेळ जो रे पाळणार.
जाता वेळ निसटून
बोलताल हाय हाय!!
पश्चाताप करण्याचा
उपयोग मग काय?
राही मनुजा दक्ष तू
ठेव समयाचे भान
पळ -पळ कर सार्थ
मिळवाया जगी मान.