महापूर ( अष्टाक्षरी )
महापूर ( अष्टाक्षरी )
चूक कोणाची कळेना
पाणी चढत चालले
असे आस्मानी संकट
घरा घरात शिरले........१
कोणी धीर दयावा कोणा ?
पाणी दारात घरात
किती सावरावे आता
पाणी सुकले डोळ्यात.......२
सारी कमाई अशीच
गेली पुरात वाहुन
जीव तुकडा तुकडा
गेले हातचे सोडून.......३
माझे माझे कुठे आता ?
माझ्या जवळ राहीले
अभिमान अहंकार
सारे गळुन पडले !......४
कसे समजावू त्यांना
म्हणे निसर्ग कोपला !
स्वार्थ थोडा दूर ठेवा
धोका आपण आणला !!.....५
एक बरे झाले पहा
माणूसकी ती दिसली
माणसाला माणसाची
गळा भेट ती जाहली......६